(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“नेमो”संकटात…

तेजोमयी आणि तिच्या आईबाबांची अंदमान बेटाची सफर मोठी आनंदात सुरु होती. एका पर्यटन कंपनीसोबत ते अंदमान सफरीसाठी आले होते. अंदमान बेटांवर अनेक नैसर्गिक बंदर आहेत. चहुबाजूने पसरलेल्या महासागरानं या बेटाच्या सौंदर्यात चांगली भर घातलीय. समुद्राचं पाणी नितळ नि निळेशार. वेगवेळ्या किनाऱ्यांवर पर्यटकांना समुद्रात डुंबण्याची, आंघोळ करण्याची मस्त मौज करता येते.

या सगळयांचा आनंद घेत इतर पर्यटकांसोबत तेजोमयी तिसऱ्या दिवशी शहीद व्दीपावरील नॅचरल ब्रिज बघायला आली. या ठिकाणी असे दोन नॅचरल ब्रिज आहेत. हे ब्रिज म्हणजे नैसर्गिक कमानी. त्या चुनखडीच्या दगडांपासून तयार झाल्या. समुद्राच्या लाटा आणि वाऱ्यांमुळे या चुनखडीच्या दगडांची झिज होऊन, त्यांना कमानीचा आकार मिळाला. पहिली कमान ‘हावडा ब्रिज’ म्हणून ओळखली जाते. या ब्रिजपासून काही अंतरावर दुसरी कमान आहे.

दुसऱ्या ब्रिजकडे जाताना मध्ये प्रवाळयुक्त ओबडधोबड दगड लागले. त्यांच्यामध्ये जमलेल्या समुद्राच्या पाण्यात वेगवेगळे जलचर आपल्याच तालात विहरत होते. तेजोमयी तिकडे लक्ष ठेऊन होती. या पाण्यात तिला तिनचार रंगाचा खेकडा दिसला. त्याचा फोटो ती काढायला गेली, तेव्हा तो चटदिशी एका दगडाच्या आड लपला. करंगळी एव्हढ्या मासोळया सुळकन वर येत नि झुळकन पुन्हा पाण्यात शिरत. सी कुकुंबर दिसले. चपट्या आकाराचा नि पांढऱ्या पट्टयांनी सजलेला नारंगी रंगाचा “नेमो (क्लॉउन फिश)” मासा दिसला. त्याला बघितल्यावर “नेमो” सिनेमातील मासा तिला आठवला. चित्रपटात बराच पराक्रमी दाखवलेला हा ‘नेमो’, प्रत्यक्षात मात्र जरा घाबरट वाटत होता. एव्हढ्या तेव्हढयाने तो पळून जायचा.

अशा वेगवेगळ्या जलचरांचं बारकाईने तेजोमयीचं निरीक्षण सुरु असतानाच, कुणीतरी त्या पाण्यात कोल्डड्रिंकची प्लॅस्टिकची बाटली टाकली. तेजोमयीने झर्रदिशी मागे वळून बघितलं. तिच्याच वयाच्या एका मुलाचं हे कृत्य असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिला त्या मुलाचा भयंकर राग आला. ती रागातच त्याच्या जवळ गेली. त्याच्यावर जोरात ओरडली. त्या मुलाच्या आई-बाबांना काहीक्षण काय झालं ते कळलंच नाही. पण लगेच सावरुन मुलाच्या आईने तेजोमयीवर हात उगारला. तेजोमयीच्या आईने वरच्यावर हात पकडला म्हणून तेजोयमी वाचली. मुलाचे आईबाबा अव्दातव्दा बोलू लागले. ते बघून बरेच पर्यटक तिथे गोळा झाले.

“काय ग शहाणे, कशासाठी आमच्या बंटिवर ओरडलीस?” बंटिचे बाबा तेजोमयीवर डाफरले.

“काका, मी कां ओरडले हे महत्वाचं नसून तुम्ही कां त्याला रागावला कां नाहीत हे महत्वाचं.”

“तेजो उगाच आगावूपणा करु नकोस.” तेजोमयीच्या आईने तिच्यावर डोळे वटारले.

“या अतिशहाण्या मुलीला पोलिसातच द्यायला हवं.” बंटिची आई ओरडली.

“मला नाही, या बंटीलाच पोलिसातच द्यायला हवं.” तेजोमयीही जोरात म्हणाली.

“असा काय गुन्हा केला, बंटिने आँ?” त्याचे बाबा नाक फुगवत म्हणाले.

“काका अहो, तुमच्या बंटिने इथे या पाण्यात प्लॅस्टिकची बॉटल फेकली, ते तुम्हाला दिसलं नाही का?”

“तर काय झालं? कोणता मोठा प्रलय झाला?” मुलाची आई ओरडली.

पाण्यात तरंगणा-या त्या बॉटलमध्ये एक ‘निमो’ मासा अडकल्याचं काहींना दिसलं. आता, सोबतच्या गाईडच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याने तेजोमयीला आपल्याजवळ घेतले नि तो बंटिच्या आईबाबांना म्हणाला, “बघताय तुमच्या मुलाचा प्रताप. त्या प्लॅस्टिकच्या बॉटलीत तो ‘निमो’ फसलाय. बाहेर येण्यासाठी धडपडतोय. त्याला ते जमलं तर ठीक. अन्यथा गुदमरुन त्याचा प्राण जाणार. हे प्लॅस्टिक इतर जलचरांच्याही पोटात जाऊ शकतं. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. या प्लॅस्टिकचे तुकडे होऊन या समुद्राचं सुंदर स्वच्छ पाणी प्रदुषित होऊ शकतं. त्याच्यामुळे आखणी जलजर आणि जलवनस्पतींना फटका बसू शकतो.”

“अहो, पण ते बंटिला कसं माहीत असणार?” थोड्या नरमाईने बंटिचे बाबा म्हणाले.

“त्याला माहीत नसेल तर तुम्ही सांगायला हवं ना. या किनाऱ्यावर येतांनाच, इथे प्लॅस्टिक टाकल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे सांगणारा मोठा बोर्ड लावलाय. तो तुम्ही वाचायला हवा होता. तुमच्या मुलालाही वाचायला लावायला होतं.” गाईड किंचित चढ्या स्वरात म्हणाला.

बंटिला आपली चूक लक्षात आली असावी. तेजोमयीजवळ येऊन त्याने क्षमा मागितली. सुदैवाने त्या प्लॅस्टिक बॉटलमधील ‘नेमो’ही त्याचवेळी धडपड करुन बाहेर पडला. तो आपल्याकडे बघून थँक्यू म्हणतोय असं तेजोमयीला वाटलं. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.

सुरेश वांदिले

९३२४९७३९४७