(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग तंत्रज्ञान या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी सुलभेतेने मिळू शकतात. विशेषत: नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम ॲण्ड सीटी), या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास, हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळू शकते. या संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील, “नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट- जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एनसीएचएम – जेइइ)” चाळणी परीक्षा द्यावी लागते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ५१ संस्थांमधील, “बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट,” या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. (२१ संस्था या केंद्रीय अर्थसाहाय्यित आहेत. २९ राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत, १ सार्वजनिक क्षेत्रातील आहे आणि २५ खाजगी संस्था आहेत.)

या परीक्षेव्दारे महाराष्ट्रातील पुढील संस्थांमध्ये,नमूद केलेल्या जागा भरल्या जातात- (१) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-मुंबई (केंद्रिय संस्था),एकूण जागा-४५६, (२)स्टेट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-सोलापूर (राज्य शासनाची संस्था), एकूण जागा-४६०, (३) सेंट फ्रांसिस इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-मुंबई (खाजगी संस्था), एकूण जागा-६०, (४) एमएआय इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-सिंधूदुर्ग (खाजगी संस्था), एकूण जागा-६०,

अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा दिं.२७ एप्रिल २०२५ रोजी होईल. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-मुंबई/नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नासिक, कोल्हापूर, नागपूर

अशी  असते परीक्षा

 ही परीक्षा संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे. या परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ट व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात – इंग्रजी भाषा (६० गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३०  गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (३० गुण), कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता (३० गुण), असे २०० प्रश्न विचारले जातात. पेपरचा कालावधी- तीन तास. प्रश्न पत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असते. त्यामुळे प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल तर हिंदीत वाचून अर्थ काढता येतो. त्याचा फायदा,  सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल  याविषयाचे प्रश्न सोडवताना होऊ शकतो. अचुक उत्तरांसाठी गुण दिले जातात. उत्तर चुकल्यास गुण कापला जातो.

   अर्हता- या अभ्यासक्रमास कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मात्र या उमेदवाराने १२ वीला इंग्रजी विषयाचा अभ्यास करणे  आवश्यक. हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी नवी दिल्लीशी संलग्नित आहे.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण

एनसीएचएम ॲण्ड सीटी,ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित, प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट“, हा महत्वाचा अभ्यासक्रम आहे.

हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. आतापावेतो या संस्थेने दीड लाखाच्या आसपास उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर हॉटेल आणि तत्सम व्यवसायामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात होऊ शकते. ही पदवी घेतलेल्या ९५  टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सामावून घेतले जाते.

सुरेश वांदिले