(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पिटुकला इंजिनीअर

“ हॅलो! हॅलो!!

कसे आहात? मस्त मजेतना. काय म्हणालात? नाही. कां? काय म्हणता, माझ्या मुळे. आता, त्याला मी काय करु शकतो म्हणा. तसंही, तुमच्या मॉम्स ॲण्ड मम्मीजना मी अजिबातच आवडत नसल्याचं, मला ठाऊकाय.

मला घरातून घालवण्यासाठी, खरंतर यमसदनीच थेट पाठवण्यासाठी, त्या बिच्च्याऱ्या काय काय नाही करत. आमची (अखेरची) वाट लावण्यासाठी त्या घामेघूम काय होतात, आम्हाला शिव्याशापांची लाखोळी काय वाहतात,  पण आम्हीसुध्दा  भारी खट  नि बहाद्दर! सहजासहजी थोडीच दाद देतो त्यांना. आमची मिशी कायम, ‘झेंडा उचा रहे हमारा’, सारखीच.

हे पुराण सांगायचं कारण की, आम्ही तुम्हाला त्रासदायक-फ्रीसदायक वाटत असलो तरी आम्ही म्हणे, तुमच्यासाठी भारी आहोत, असा लागलेला शोध. अर्थातच, हा शोध तुमच्यातल्याच विद्वान मनुष्यप्राण्याने, ज्याला तुम्ही संशोधक म्हणतात, त्यांनी लावलाय.

त्यांच्या संशोधनानुसार आमच्या शरीरात म्हणे अत्यंत ॲडव्हान्स्ड किवा खूप प्रगत अशी क्षमता आहे. कशाची? वास आणि स्वाद ओळखण्याची. आमच्या मेंदूला फक्त एका सेकंदात १००० वास ओळखता येतात. तुमच्या नाकाला एवढं करायला १० सेकंद लागतात. मग आम्ही आहोत की नाही, तुमच्यापेक्षा १००पट समोर. हा हा हा!

जर्मन कुळातील आमच्या एका बांधवाच्या जिनोममध्ये, रासायनिक संकेत ओळखणाऱ्या रिसेप्टर्स (संवेदक) ची संख्या, प्रचंड असल्याचं लक्षात आलय. त्यामुळे आमचा उपयोग न्यूरोबॉयलॉजी (मज्जासंस्था शास्त्र) या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. म्हणजे कसा? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, शरीराच्या हालचाली नेमक्या कशा होतात, संवेदनक्षमता आणि सामाजिक वर्तन याचा हा अभ्यास.

आता तर, छोट्या  आकाराच्या रोबोटसाठी आम्ही जणू काही वरदान ठरु शकतो, असं तुम्हाला वाटू लागलय. कारण आम्ही कोणत्याही अडथळ्यांमधून गतिने मार्ग काढू शकतो. त्यासाठी आमच्या पायाची वैशिष्ट्यपूर्ण रचना उपयोगी पडते. भुकंपासारख्या दुर्घटनेत तर शोध आणि बचाव कार्यासाठी, छोट्या रोबोट्सना, ही रचना खूप फायदेशीर ठरु शकते,  असं तुम्हाला वाटू लागलय.

आमच्या काही वेगळ्या प्रजातींच्या बांधवांच्या आतड्यातील जीवाणू, प्रतिजैविकासारखी रसायनं तयार करतात. ते अनेक रोगकारकांवार चांगलाच परिणाम करतात. या रसायनांपासून भविष्यात नवीन प्रतिजैविके तयार केली जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अधूनमधून होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी प्रभावी औषधं तयार होऊ शकतं. आहे, की नाही मस्त गंमत?

कित्येक सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, पक्षी, लहान सस्तन प्राण्यांचं पोट आमच्यामुळे भरतं. म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही, ‘अन्न रुपातले परब्रम्हचं जणू’! अन्नसाखळीचं संतूलन त्यामुळे टिकून राहतं. असा, आमचा तुमच्यासाठी नि इतर प्राण्यासांठी मोठा उपयोग.

बापरे, हे फुकटचं ज्ञान तुमच्यासारख्या  विद्वान नि ज्ञानी मनुष्यप्राण्यास कां बरं सांगत बसलो. मूर्ख लेकाचा मी…”

“अरे, पण तू हा जो कुणी आहेस, ते तर सांगना…”असं म्हणालात ना तुम्ही.

“सांगतोच की. मी काय कुणाला घाबरायला झुरळ थोडच आहे. आँ! हे काय? मी तर खरोखरच झुरळच आहे की. विसरलोच होतो. तुम्हाला घाबरणारा इटुकला नि थिटुकला, तुमच्या मम्मीज आणि मॉम्सचा नावडता. किचनपासून फर्नीचरपर्यंतचा घुसखोर. असं असूनही, तुमच्यासाठी बऱ्याच काही कामाचा.

तुमच्यापैकी काहिंनी आम्हाला ‘निसर्गाचा स्वच्छक’ अशी उपाधीही दिलीय. कारण, आम्ही कुजलेली पाने, सेंद्रिय कचरा खातो. पोषकतत्त्वे पुन्हा मातीत परत जाण्यासाठी आमचा उपयोग होतो.

माझी मूर्ती लहान, पण कीर्ती? ते तुम्ही ठरवायचं…. तुम्हाला एक गुपित सांगतो, या पृथ्वीवर ३० कोटी वर्षांपूर्वी आमचा जन्म झाला. डायनोसारचा जन्म २३ ते २४ कोटी वर्षांपूर्वीचा. तुमचा म्हणजेच मनुष्यप्राण्यांच्या पूर्वजाचं आगमन ३ लाख वर्षांपूर्वी झालय. याचा अर्थ , आम्ही तुम्हाला कितीतरी पटिने सिनअर!

या गोष्टीचा  धडा काय?  आपण सगळेजण या निसर्गाची लेकरं आहोत. म्हणूनच एकमेकांच्या उपयोगी पडून निसर्गचक्र सुरुळीत सुर    राहावं,याची तजवीज, निसर्गानेच करुन ठेवलेली असते. कुणी पिटुकला, कुणी थिटकुला, कुणी इटुकला, कुणी मिटूकला असला म्हणून त्याला कस्पटासमान समजू नये.

पुढच्या वेळी मला हुसकवण्याचा किंवा  मला पादत्राणाने, माझे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा इतकचं लक्षात ठेवा, मी निसर्गाचा एक पिटुकला ‘इंजिनिअर‘ आहे.

खूपच बडबडलो बुवा. अरे, तिकडे त्या  किचनच्या कोपऱ्यातील कचरा कधीपासूनच माझी वाट बघत बसलाय, हे विसरलोच होतो, गड्या. त्याची विल्हेवाट करायला मला निघावच लागेल आता…”

सुरेश वांदिले