पुसीची भ्रमंती
आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली.
अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे, रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं.
चक्कर मारुन येत जरा..
अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा येतात तो वेळ साधून येतेस बरोबर..
तुला कां बरं वाईट वाटतय..तू घरकोंबडा आहेस म्हणून मी सुध्दा घरकोंबडी व्हावं असं तुला वाटत का?
अगं बाई, मी घरकोंबडा असलो म्हणून काय झालं, घराच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरच टाकून आईबाबा बाहेर जातात ना….मग मी त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असं कसं वागणार?
बरं बाबा,तू राहा घरी,मी मात्र निघाले…
हो हो.. जा जा..मी कुठे थांबवलय तुला..पण आज जरा जास्तच नटलीस नि सजलीस म्हणून विचारलं..
सांगेन की मी बाहेरुन आल्यावर..असं बोलून पुसी कॅटने हळूच खिडकीतून बाहेर उडी घेतली. बाहेरचं मोकळं आभाळ आणि मस्त सुटलेली हवा यांनी ती एकदम ताजीतवाणी झाली.
बाहेर पडण्याची मौज रोंडीला कधीच कळायची नाही, असं खिडकीजवळ उभा असलेल्या रोनाल्डोसाठी मनातच म्हणत, पुसीने शेपूट उंच केली आणि थाटात पुढे चालू लागली.
चालत चालत ती माहिमच्या मासोळी बाजारात आली. मासोळी बाजारात कोळीण मावश्यांकडे अनेक मांजरी पहुडलेल्या होत्या. मासोळ्यांना स्वच्छ केल्यावर त्यांचे काप करुन काही मावश्या ग्राहकांना देत होत्या. त्यातला एखादा तुकडा त्यांच्या बाजुला पहुडलेल्या मांजरीपुढे टाकत. त्या मांजरी डोळे न उघडताच खात असत. काही मांजरी तर तेही कष्ट घेत नसत.
त्यातील एका मांजरीला पुसीने विचारलं..येतेस कां गं माझ्या बरोबर फिरायला…
तिने नाक फेंदारुन पुसीकडे बघितलं..नि चल फूट केलं.
मासोळी बाजारातील या आळशी मांजरींना सोडून पुसी पुढे निघाली. वाहनांना चुकवत आणि कडेकडेने चालत ती राणीच्या बागेत पोहचली. ऑक्सर पेंग्विनला बघून पुढे जातच असताना तिच्या कानावर हाक आली,
अगं मावशे इकडे कुठं..भाचऱ्याला भेटावयास आली वाटतं..
पुसीने चमकून मागे वळून पाहिले…करिश्मा वाघीण तिलाच बोलत होती.. पटकन मागे फिरुन पुसी करिश्माजवळ पोहचली.
करिश्माला बघून पुसी आनंदली.तिच्या डोळयातून अश्रू आले.
किती दिवसांनी भेटलीस गं तू…
काय करणार करिश्मे, असं दररोज मला नाही जमणार ना इथं इतकं दूर येणं..पण करिश्मे तू अशी या पिंजऱ्यात कां बरं..येतेस का माझ्याबरोबर फिरायला…पुसीने विचारलं.
नाही गं मावशे, मला काही शक्य नाही..वीरा एक महिन्याचा सुध्दा नाही ना..त्याला सोडून जाऊ शकत नाही..या पिंजऱ्यातून बाहेर कसं पडायचं हेही मला ठाऊक नाही..करिश्मा वाघीण, पुसीची नजर चुकवित म्हणाली.
म्हणजे करिश्मे तू इथं समाधानी नाहीस का.. पुसीनं विचारलं..करिश्मा काहीतरी सांगणार तोच वीरा धडपडला..त्याला सावरायला करिश्मा निघून गेली..त्यांचं बोलणं अर्धवटच राहिलं…
दुरुनच करिष्माला बाय करुन पुसी पुढे निघाली. बागेच्या बाहेर असणाऱ्या बसथांब्याजवळ एक गाडी थांबलेली दिसली. कुणाच्याही लक्षात येणार नाही हे बघून पुसी त्या गाडीत चढली आणि एका सिटखाली जाउुन बसली.
ती गाडी काही वेळाने गेट वे ऑफ इंडिया जवळ पोहचली. तिथे सर्व प्रवासी उतरले. पुसीही उतरली. गेट वे ऑफ इंडियाजवळ छत्रपती महाराजांच्या पुतळयाजवळ आली. महाराजांचा घोडा आपल्या अंगावर येईल की काय असं वाटून ती दचकली. पण तो घोडा बराच वेळ काहीच करत नाही हे बघून तिला हायसे वाटले. आपल्या सोबत येतोस का फिरायला, असं त्याला विचारावं असं पुसीस वाटलं. पण कितीही मान उंचावली तरी आपलं बोलणं त्याला ऐकू जाणार नाही हे तिच्या लक्षात आल्याने ती पुढे निघाली.
अवतीभवती बऱ्यापैकी गर्दी होती. लोकं गेट ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवरुन बोटिमध्ये बसत असल्याचं पुसीला दिसलं.
ती हलक्या पावलानं त्यांच्यासोबत चालू लागली आणि कुणाच्याही लक्षात येणार नाही हे बघून तिने बोटित उडी घेतली. बोट सुरु झाली. समुद्राच्या पाण्यातून जाऊ लागली. पाण्याचे तुषार अंगावर पडताच पुसीचे अंग शहारले. तिने हळूच मान बाहेर काढली. त्याचेवेळेला एक छोटी मासळी तिच्या जवळ आली. असं दोन-तिनदा घडलं. पुसीने मनात काहीतरी ठरवलं आणि ती तोंड उघडून सज्ज झाली. तिच्या सुदैवाने आणखी एक छोटी मासोळी तिच्याजवळ आली तिने पटकन तिने पकडून गट्टम मेलं.
वा वा… दिवसभराचा सारा शिण या मेजवाणीनं निघून गेला.. पुसी स्वत:लाच म्हणाली.
बोट बऱ्याच दूरपर्यंत गेली आणि पुन्हा परत फिरली. पाण्यावरुन वरखाली ,खालीवर होणाऱ्या बोटीमुळे पुसीच्या पोटातलं पाणीही खालीवर होत होतं. त्याची तिला गंमत वाटत होती. काही वेळाने बोट थांबली. सर्व लोक उतरले. पुसीही सावध राहून उतरली.
पुसी चाणाक्ष आणि हुषार होती. त्यामुळे ती जशी घरापासून गेट वे ऑफ इंडिया जवळ पोहचली. तसाच मार्ग पकडून आणि तशाच पध्दतीने घरी पोहली.
ती पोहचली तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. आईबाबा घरी यायचे होते. पुसीने हुश्श केले. घरात शिरल्या शिरल्या तिने आनंदाने उडी मारली. शेपूट उंचावून रोनाल्डो भोवती फेर धरला.
अगं, एवढा आनंद व्हायला काय घडलं..सांगशील का जरा मला.रोनाल्डोने विचारलं.
अरे, त्याचीच तर वाट बघतेय ना..कधी सांगतेय तुला मी असं झालय..
मग सांग की..
त्यानंतर पुसीने दिसभरात काय काय घडलं याची इथ्यंभूत माहिती दिली. ती गोष्टी वेल्हाळ असल्यानं, सारं काही रंगवून रंगवून सांगितलं. पाण्यातल्या मासोळीची कथा ऐकल्यावर तर रोनाल्डोच्या तोंडास पाणी सुटलं..
बरं बाई जमतं तुला..रोनाल्डो पुसीला दु:खी अंत:करणानं म्हणाला..
अरे, तुला सुध्दा जमू शकतं की..तुला तर म्हंटल होत ना चल माझ्यासोबत म्हणून. आज पर्यटन दिवस.. म्हणजे फिरण्याचा दिवस…फिरायला निघालं की असं नवं दिसतं..मजा येते..मेजवाणीही मिळते..बाहेरच पडलो नाही तर कसा मिळायचा आनंद..आणि कशा दिसणार छान छान गोष्टी..पुसी त्याला म्हणाली..
पुढच्या पर्यटन दिवसाला मी नक्कीच येईन हं पुसी तुझ्यासोबत, रोनाल्डो पुसीला लहान तोंड करुन म्हणाला..
पुसी खुदकन हसली आणि तिने स्वत:भोवती गिरकी घेतली.
सुरेश वांदिले