पुस्तक परीक्षणाचा धसका..
तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून आणि १ टक्के वाचून व्हायची. त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी बाबांना आशा होती. त्यामुळे तेजोमयी सध्या पुरवणी हातात धरुन त्यावर नजर टाकते, यावर बाबा खूष होते.
तेजोमयीनं पुरवणी हाती घेतली की, उत्सुकतेनं अलेक्झांडर (द डॉगी) ही त्यात डोकावून जायचा. या डोकावण्यामुळे तीन-चार वेळा पुरवणी फाटली. त्यामुळे तेजोमयी त्याला रागावली. तेव्हा त्याने आपली उत्सुकता पुन्हा कधी दर्शवली नाही. तेजोमयीने पुरवणी हाती घेतली की तो फक्त आईच्या अवतीभवती घुटमळायचा.
तुला वाचता आलं असतं तर..असं आई त्याला एकदा बोलून गेली..
आँ, हे क्का Sय अशा आशयाचे भाव आणत त्याने मान वर केली..तेव्हा आईने तेजोमयीकडे बोट दाखवलं.. यातलं काहीही न कळल्यानं अलेक्झांडरने गॅलरी गाठून मस्तपैकी ताणून दिली..
तर पाच मिनिटात पुरवणी दर्शन संपवणारी तेजोमयी आज २० मिनिटे झाले तरी पुरवणी खाली ठेवेना, याचं बाबांना कुतुहल वाटलं. त्यांनी उत्सुकतेनं तेजोमयी एवढी काय वाचतेय म्हणून डोकावून बघितलं. तेजोमयी पुस्तक परीक्षण मन लावून वाचत होती.
बापरे ! बाबांच्या तोंडून अवचितपणे बापरेचा उद्गार बाहेर पडला.
काय झालं बाबा, तेजोमयीनं दचकून विचारलं.
अगं तू आणि पुस्तक परीक्षण..
म्हणजे, हे काय विचारणं झालं बाबा…
अगं बाई, तू पुरवणीसुध्दा नीट वाचत नाहीस आणि आज थेट पुस्तक परीक्षण वाचत बसलीस, म्हणून आश्चर्य वाटलं.
बाबा, यात काय आश्चर्य वाटून घेण्यासारखं..
अगं, मी सुध्दा पुस्तक परीक्षण वाचत नाही ना..वरवर चाळतो..
काय सांगता बाबा, तेजोमयी जोरात म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे मोठ्ठे भाव उमटले. तेजोमयीच्या मोठ्या आवाजाने अलेक्झांडरची झोपमोड झाल्याने तो दिवाणखान्यात आला. आईही स्वयंपाक घरातून आली.
काय झालं गं, आईने विचारलं. अलेक्झांडरनेही तेजोमयीकडे अशाच आशयानं बघितलं.
अगं काही नाही..मी पुरवणीतील पुस्तक परीक्षण वाचत होते, त्याचं बाबांना आश्चर्य वाटलं. पण त्यांनी जेव्हा सांगितलं की ते स्वत: पुस्तक परीक्षण वाचतच नाहीत, म्हणून मला आश्चर्याचा धक्का बसला..
पुस्तक परीक्षण इतकं महत्वाचं असतं का? आईनं सरधोपटपणे बाबांना विचारलं.
आता या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं, हे बाबांना कळेना.
नाही म्हणजे, असतं ना..असायलाच पाहिजे. हो ना रे रे अलेक्झू.. बाबा, आईकडे न बघता अलेक्झांडरकडे बघत म्हणाले.
अहो, त्याला काय सांगता. मला सांगाना..
हो..हो..कां नाही…अगं पुस्तक परीक्षण महत्वाचं असतं…
मग झालं की, त्यात इतकं आढवेढे घेण्यासारखं काय? तसं स्पष्ट तेजूस सांगा की. असं बोलून आई आपल्या कामास निघून गेली..
पुस्तक परीक्षणाचा स्तंभ फारसा किंवा कधीच न वाचणाऱ्या बाबांची आता मोठी पंचाईत झाली.. विषय तर बंद करता येत नव्हता.. त्यामुळे त्यांनी विषयास बगल देण्यासाठी तेजोमयीस विचारल,
कोणत्या पुस्तकाचं परीक्षण वाचतेस तू बाळ,
पुरवणीतून डोकं बाहेर काढून तेजोमयी म्हणाली…लँग्वेजेस ऑफ ट्रुथ, एसेज २००३ -२०२०…
क्क्का S य, आता जोरानं आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी बाबांची होती.
या मोठ्या आवाजाने आई पुन्हा दिवाणखान्यात आली. अलेक्झांडर दिवाणखान्यातच सोफ्यावर जाउुन झोपला होता. तो दचकून जागा झाला.
अहो, हे तुम्हा बाप- लेकींच चाललय तरी काय? एकदा ती ओरडते, दुसऱ्यांदा तुम्ही किंचळता..आँ.
अहो बाबा, इतकं किंचाळायला काय झालं? मी तर केवळ पुस्तकाचं नाव सांगितलं. सलमान रश्दी यांचं पुस्तक आहे हे..
आँ..बाबा पुन्हा किंचाळता किंचाळता राहिले..
अहो बाबा,तुम्ही बरे आहात ना..
अगं मी बरा आहे…पण तुझं काय?
मी पण बरी आहे..
खरच …
आँ..अहो तुम्ही काहीबाही काय बरळताय..
नाही म्हणजे ही, सलमान रश्दीच्या पुस्तकांचं परीक्षण वाचतेय..
मग वाचू द्या की..त्यात किंचाळायला काय झालय..
अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मोठ्या माणसांना सुध्दा सलमान रश्दींनी लिहिलेलं समजायला कठीण जातं…
अहो बाबा,मी पुस्तक नाही वाचतेय.परीक्षण वाचतेय…
तेही त्यांच्या पुस्तकांसारखं कठीणच असणार ..
पण बाबा, ते वाचल्याशिवाय कसं बरं कळणार?
बरोबर बोललीस तू. जसा एखादा पदार्थ खाल्याशिवाय त्याची चव कळत नाही तसच पुस्तकांचही नाही का? वाचल्याशिवाय कसं कळणार? आईने सोपा सिध्दांत मांडला..
याचा अर्थ बाबा तुम्ही अशी कठीण पुस्तकं वाचतच नाही का ?
बाबा चिडीचूप..
मी मात्र ठरवलय बाबा, हळूहळू आता कठीण पुस्तकं वाचायची. या परीक्षणातलं मला बरच कळत नव्हतं म्हणून दोन तिनदा ते वाचलं..कठीण वाचण्यात आणि समजून घेण्यात मजा असल्याचं आज माझ्या लक्षात आलय..मध्ये मध्ये कंटाळा आला थोडा, किंचित डोकं दुखलं..पण काहीतरी भारी वाचल्याचं आनंदही झाला..तेजोमयी म्हणाली..
घ्या लेकीकडून शिका आता. कथा कांदबरीशिवाय काहीतरी वेगळं वाचत चला..आई बाबांकडे बघत म्हणाली..
बाबांनी नंदीबैलासारखी मान हलवली. तिघेही खळखळून हसले.
चला म्हणजे,जो कोणता प्रश्न निर्माण झाला होता, तो सुटला म्हणायचा, असं अलेक्झांडरच्या लक्षात आलं. हो ना हो बाबा, अशा भावमुद्रेनं त्याने बाबांकडे बघितलं…
सुरेश वांदिले