(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

फुकाची हुषारी

लांडग्यास नेहमी वाटायचं की त्याच्याएवढा हुषार दुसरा कुणीच नाही. आपण कुणालाही फसवू शकतो अशी त्याची घमेंड होती. तो नेहमी सिंह महाराजांच्या समोर आपली फुशारकी मारायचा. सिंह महाराज त्याच्या फुशारकीला कंटाळून गेले होते. तसे त्यांनी एक दोनदा बोलुनही दाखवले.

मात्र लांडगोबामध्ये काही सुधारणा झाली नाही. एके दिवशी सिंह महाराज त्याला म्हणाले,

लांडगोबा, तुम्ही इतके जर बुध्दिमान आहात तर आमच्या दरबारात चार हुषार गाढवं घेऊन या ना. त्यांना तुम्ही आणलत तर तुम्हाला खास बक्षीस देऊ आणि राज्याचा सेनापतीही बनवू.

अहो महाराज, यात काय मोठसं. चार काय आठ गाढवं येऊन येतो ना. त्या मुर्ख गाढवांना कसं पटवायचं हे मला चांगलचं ठाऊकाय..छाती फुगवून लांडगा म्हणाला.

वा वा छान, पण समजा तुम्हाला गाढवांना आणणं जमलं नाही तर तुम्हाला काय शिक्षा करायची.. महाराजांनी विचारलं.

महाराज असं होणं शक्यच नाही..तसा विचारही मनात आणू नका..लांडगोबा छाती फुगवून म्हणाला.

लांडगोबा, तुमचं म्हणणं आम्हाला शंभर टक्के पटतय हो. पण तरी सुध्दा आपण स्पर्धा लावलीय ना. तुम्ही जिंकलात तर आम्ही तुम्हाला राज्याचं सेनापती करण्याचं कबूल केलय की नाही.अशा स्पर्धेत हरलं तर काय करायचं हेही आधीच ठरलेलं बरं..महाराज म्हणाले.

लांडगोस ते काही मान्य हाईना.आपणच जिंकणार म्हणजे गाढवांना घेऊनच येणार म्हणजे येणारच याचा हेका लांडगा धरुन बसला होता.

महाराजांना लांडगोबाच्या हट्टीपणाचा फार राग आला. त्यांनी कोल्ह्याला बोलावले आणि त्याने जर दरबारात चार गाढवांना आणले तर त्याला सेनापतीपद दिलं जाईल असं सर्वांसमक्ष.हे ऐकून लांडग्याला धक्काच बसला.

महाराज, हे अनुचित आहे. कोल्ह्यापेक्षा मी बुध्दिमान असताना तुम्ही त्याला कां सेनापती करता..लांडगा चिडून म्हणाला.

लांडगोबा,आपण खूप बुध्दिमान आहोत,हुषार आहोत असं सतत स्वत: सांगितल्यानं ते काही सिध्द होत नाही ना..आम्ही तुम्हाला तुमची हुषारी सिध्द करण्याची स्वत:हून संधी दिली तर तुम्ही ती नाकारली..महाराज म्हणाले.

नाकारली नाही महाराज..आम्ही गाढवांना आणणार म्हणजे आणणारच..

तुम्ही आणणारच हो, पण ते जमलं नाही तर तुमचं काय करायचं ते सुध्दा सांगना ..त्यासाठी तुम्ही कबूल होत नाही ना..तुम्ही कबूल होत नाहीत याचा अर्थ तुमचा, तुमच्या हुषारीवर विश्वास नाही.केवळ फुकाच्या बाता मारता…जे फुकाचे बाता मारतात ते आम्हाला आमचे सेनापती म्हणून चालणार नाही. स्वत:च्या बुध्दिमत्तेचा इतका अहंकार बाळगणे बरोबर नाही लांडगोबा.. महाराज म्हणाले.

कोल्ह्याकडे वळून त्यांनी पुन्हा, गाढवांना दरबारात आणू शकाल काय हाच प्रश्न केला..

फुशारकी मारुन काही उपयोग नसल्याचं लांडगोबा आणि महाराजांच्या संवादातून कोल्होबांच्या लक्षात आलं होतं.

त्यामुळे तो महाराजांना म्हणाला,

महाराज मी प्रयत्न करु शकतो.पण त्यामुळे गाढव दरबारात येतीलच की नाही हे सांगता येत नाही…

म्हणजे तुम्ही गाढवांना घाबरता की काय कोल्होबा..महाराज आश्चर्याने विचारते झाले.

महाराज, घाबरायल काय हरकत आहे.अहो त्याच्या पायात इतकी शक्ती आहे की त्याने जर एक लाथ हाणली तर प्राणच जायचा..त्यामुळे त्याला गोड बोलून बोलूनच समजावावं लागेल ना..शिवाय गाढवास गुळाची चव काय म्हणजेच गोड बोलणं कळणार की नाही हे सध्या मला ठाऊक नाही..ते समजून घ्यायला वेळ लागणार की..कोल्होबा नम्रपणे म्हणाले.

महाराजांना कोल्होबांचे हे स्पष्ट आणि प्रामाणिक सांगणे पटले आणि रुचले सुध्दा. आपला सेनापती असाच हवा. शत्रूवर हल्ला करण्यापूर्वी त्याची शक्तीस्थळे जाणून घेऊन मोहिमेवर निघणारा..

महाराजांनी कोल्होबांच्या प्रामाणिक बोलण्याचे कौतुक केले आणि त्यांना सेनापतीपद बहाल केले.

सुरेश वांदिले