बद्रुद्दिन ओझा
तेजोमीयची चुलत बहीण कल्याणी परदेशात शिक्षणासाठी नुकतीच गेली. तिला पोहचवायला आईबाबांसोबत तेजोमयी सुध्दा विमानतळावर गेली होती. हे तिघेही विमानतळावर पोहचले तरी कल्याणी आणि तिचे आईबाबा अद्यापही पोहचले नव्हते.
कल्याणी तेजोमयीच्या बाबांची फार लाडकी. तिला लहानपणासून ते खूप वेगवेगळ्या नावाने हाक मारायचे. दरदिवशी एक नवं नावं. कधी तर दिवसातून दोन तिनदा तिचं नावं बदलायचं. ही सगळी नावं लिहून ठेवली असती तर या नावाचं एक छान पुस्तक झालं असतं. पण पुस्तक व्हावं असा काही बाबांचा हेतू नव्हता. लाडानं आणि प्रेमानं ते वेगवेगळया नावांनी कल्याणीला बोलावत.
काही काही नाव तर अजबगजबच असत. त्याला ना शेंडा ना बूड . काहीही अर्थ त्यातून निघायचा नाही. सुरुवातीला सगळेजण, त्यांच्या मते, अर्थहिन अशा नावांवरुन बाबांनाच नावं ठेवायचे. मात्र अनेकदा ते तथाकथित अर्थहिन नाव वारंवार कानावर पडलं की ऐकलायला गोड वाटायचं. मग इतरही त्या नावाने कल्याणीस हाक मारत.
कल्याणीस असच एक नाव बाबांनी दिलं होतं, बद्रुद्दिन ओझा.
आता याचा अर्थ काय किंवा कशा संदर्भात हे नाव बांबाना कल्याणीस द्यावं वाटलं, हे कुणालाच कळलं नाही. कुणीही बाबांना त्याबद्दल विचारलं नाही.. मात्र घरातील जवळच्या नातेवाईंकामध्ये हे नाव फार प्रचलित झालं.
कल्याणीने काही पराक्रम गाजवला, की तिचं कौतुक करताना, बघा आमच्या बद्रुद्दिन ओझाचा पराक्रम! ब्रद्रुद्दिून ओझास नाही जमणार तर कुणास जमणार? ब्रद्रुद्दिून ओझास काहीच अशक्य नाही! अशी कौतुकफुलं कल्याणीवर उधळली जात. कल्याणीही याचा मनमुराद आनंद घेई.
तर, इकडे विमानतळावर कल्याणीस येण्यास विलंब झाला, तेव्हा आई-बाबा आणि तेजोमयी कल्याणीच्या अशा कौतुकात रंगून गेले. ब्रद्रुद्दिून ओझाने म्हणजे कल्याणीने जीआरई (परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा-गॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) मध्ये किती छान गुण मिळवले, किती चांगले विद्द्यापीठ मिळाले, शिष्यवृत्ती मिळवली..किती गुणी मुलगी वगैर अशी ती चर्चा होती. या चर्चेत वारंवार बद्रुद्दिन ओझाचा उल्लेख येत राहिला.
विमानतळावर तेजोमयी आणि तिचे आई – बाबा जसे कल्याणीस पोहचवण्यास आले होते, तसेच इतरही अनेकजण त्यांच्या नातेवाईकांना किंवा मुलांना सोडण्यास आले होते. प्रत्येकजण समूह करुन गप्पा -गोष्टी-विनोदात रंगला होता. कुणाच्या बाजूला कोण आहे, याची काही कुणाला काळजी नव्हती आणि चिंताही नव्हती.
तेजोमयी, बाबा आणि आईच्या बाजूला असलेल्या एका ग्रुपमधील मुलगा मात्र अधून अधून यांच्या गप्पा काय चालल्या आहेत, याकडे कान द्यायचा. त्यात ब्रद्रुद्दिून ओझा हे नाव वारंवार येत असल्याचं त्याचा लक्षात आलं. हे चमत्कारिक नाव कसं काय राहू शकतं, याबाबत त्याला संशय आला. त्याच्यातला जेम्सबाँड जागृत झाला. काही संशयास्पद आढळल्यास किंवा कानावर आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावं, असं त्या मुलानं विमानतळावर वाचलं होतं. ब्रद्रुद्दिून ओझा या नावात काही तरी रहस्य दडलं असल्याचं वाटून या पठ्ठ्यानं विमानतळावरील पोलिसांना हळूच कळवून टाकलं.
पोलिसांनी तडकाफडकी काही कार्यवाही केली नाही. या मुलाच्या बोलण्यात काही तथ्य आहे का, हे बघण्यासाठी एक साध्या वेषातला पोलीस तेजोमयी आणि आई-बाबांच्या अवतीभवती घुटमळू लागला. गप्पांमध्ये रंगलेल्या तिघांनाही याचा काही पत्ता नव्हता. तसेही विमानतळावर माणसे इकडे तिकडे फिरत असतात हे बाबांना ठाऊक होतं. त्यामुळे एक-दोनदा त्या व्यक्तीकडे लक्ष जाऊनही बाबांनी दुर्लक्ष केलं.
काही वेळाने कल्याणी तिच्या आई – बाबांसोबत टॅक्सीतून उतरताना तेजोमयीस दिसली. आई जरा मोठ्या आवाजात बोलून गेली,
चला आली एकदाची बद्रुद्दिन ओझा..
कल्याणीसुध्दा या तिघांना बघताच धावतच त्यांच्याकडे आली. कल्याणी, तेजोमयीस मीठी मारणार तोच त्यांच्या अवतीभवती असलेल्या पोलिसाने बाबांना हटकले,
कोण आहे हा बद्रुद्दिन ओझा? तुम्ही माणसं तर चांगल्या घरची वाटता.
बाबांना त्यावेळी पोलिसाच खूप राग आला. तरीसुध्दा त्यांनी शांतपणे विचारलं,
ब्रद्रुद्दिून ओझा कोण? हे विचारणारे तुम्ही कोण? तेव्हा त्या पोलिसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. बाबांचा राग शांत झाला.
काय मग, घालू का बेड्या तुमच्या हातात? पोलीस जोरानं म्हणाला. अवतीभवतीची माणसं तिथे गोळा झाली. तेजोमयी, कल्याणी घाबरले.
अहो, तुम्ही आमच्यावर पाळत कां ठेवत आहात?बाबांनी शांतपणे विचारलं.
ब्रद्रुद्दिून ओझाबद्दल, आम्हास संशय आलाय. हा दहशतवादी तर नाही ना एखादा..तुमचा कसा संबंध त्याच्याशी?त्याने बाबांना दरडावून विचारलं.
आता मात्र बाबांना हसू आवरेना. त्यांनी प्रत्युत्तर न देता कल्याणीस त्या पोलिसांच्या समोर उभं केलं.
हा घ्या तुमचा ब्रद्रुद्दिून ओझा. बाबा म्हणाले
ही तर मुलगी आहे.
आहे ना. आम्ही तिला लाडाने ब्रद्रुद्दिून ओझा म्हणतो. आपल्या लाडक्या लेकीस किंवा लेकास कोणत्या नावाने बोलवायचय यावर काही बंधनं नाहीना पोलीस साहेब..
नाही म्हणजे म्हणजे... तो पोलीस आता त त प प करु लागला..त्याच्या लक्षात लगेच चूक आली. त्याने बाबांची क्षमा मागितली.
ज्या मुलाने ही माहिती पोहचवली होती, तो बाजूला उभा राहून गम्मत बघतच होता, त्याला पोलिसाने हटकले..
त्या मुलाच्याही लक्षात चूक आलीच होती. मात्र आता तो गर्भगळीत झाला. पोलिसाने त्याला दरडावले. तेव्हा त्याचे आई – बाबा मध्ये पडले. पोलिसांवरच ते ओरडले. तेव्हा पोलिसाने त्याच्या आईबाबांना त्याने काय उद्योग केले ते सांगितलं.
अहो, तुम्ही जरा तुमच्या पोराला असं दुसऱ्यांच्या संभाषणात, दुसऱ्यांचा कामात उगाचाच नाक खुपसण्यापासून थांबवा जरा..चांगली सवय नाही ही. अन्यथा एखादे दिवशी तोही अडचणित यायचा नि तुम्ही सुध्दा..त्या मुलाच्या आईबाबांना आपल्या मुलाची चूक उमगली. त्यांनी पोलिसांची क्षमा मागितली. बाबांना झालेल्या मनस्तापाबद्दलही क्षमा मागितली.
पोलीस तर खजिल झालाच होते. मात्र तिथून जाताना त्याने ब्रद्रुद्दिून ओझ्यास म्हणजे कल्याणीस शुभेच्छा द्यायला विसरला नाही. झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून त्याने विमानतळावरील गर्दितून कल्याणीस तिच्या सामानसह विमानतळाच्या आत पोहचवून दिलं….
सुरेश वांदिले