(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बळीचा बकरा

ह्युस्टनच्‍या नासा अंतराळ विज्ञान केंद्राजवळील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या शेतात, टेक्सास प्रांताचा प्रतीक, लाँगहार्न म्हणजेच मोठ्या शिंगाचे बैल प्रदर्शनासाठी ठेवले  आहेत. त्याच्या आसपास राणीमुंगीचा किल्ला जमिनीच्या आत होता. त्यावर माणूसभर उंचीचं गवत उगवलं होतं. त्यामुळे अशा किल्ल्याची कुणाला कल्पना नव्हती.

भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यातून, अधूनमधून राणीमुंगी बाहेर पडायची. नासा केंद्राच्या बाहेर एका बोईंग विमानावर ठेवलेलं, अवकाशयान बघायला तिला गमंत वाटे. बरेचदा तिथे जायची. यानाच्या साहाय्यानं आकाशात उडाल्याचं स्वप्न बघायची. अवकाशयानात फेरफटका मारला की, सावध राहून नासा केंद्रात शिरायची.

या केंद्रातील सर्व चंद्रमोहिमेच्या छायाचित्रांची प्रदर्शनी   तिला आवडायची. चंद्रावरुन आणलेले दगड, धातू, वाळू यांना बघून तिला आनंद व्हायचा. हळूच, ती या दगडावर चढायची.

या केंद्रातील एका प्रयोगशाळेत मंगळासारखं वातावरण तयार करण्यात आलं होतं. तिथे, मार्सेलस ऑस्टिनला, मंगळावर जाऊन, वेगवेगळे प्रयोग करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं.

हा मार्सेलस म्हणजे, स्मार्ट रोबो किंवा यंत्रमानव! तो हुबेहुब मनुष्यप्राण्यासारखा दिसायचा. पहिल्यांदा, जेव्हा राणीमुंगीने बघितलं तेव्हा, ती दचकलीच. पण, इतर मनुष्यप्राणी, या मार्सेलसची बटनं दाबतात, सुरु करतात हे लक्षात आल्यावर तिची भीती कमी झाली.

मार्सेलसच्या मेंदूत एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्र टाकण्यात आलं होतं. मनुष्यप्राण्याच्या मेंदूत जसे न्युरॉन्स किंवा मज्जातंतूचं जाळं असतं, तसचं मार्सेलसच्या मेंदुतही विणलं होतं. त्याच्या डोळ्यात सेन्सॉर होते, हातापायांनाही सेन्सॉरनं जोडलं हेातं. डोळयातील स्मार्ट कॅमेरा कितीही दूर बघून त्रिमिती फोटो घेऊ शकायचा. मार्सेलस, डीप लर्निंगच्या कौशल्यात पारंगत होता. त्यामुळे स्वत: शिकणं, मिळालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढून निर्णय घेणं त्याला शक्य होतं. शेकडो निर्णयाच्या शक्यतांचं गणित मांडून त्यातील सर्वाधिक अचूक निर्णय घेण्याची क्षमता, न्युरॉन्समुळे त्याला प्राप्त झाली होती. राणीमुंगीला ही माहिती हळूहळू कळली.

रात्र झाली की, मार्सेलसचं प्रशिक्षण थांबायचं. तो निवांत असायचा. असच एके दिवशी प्रशिक्षण संपल्यावर मार्सेलस डोळे मिटून बसला असताना, त्याला कसली तरी चाहूल लागली. त्याने डोळे उघडले. राणीमुंगी त्याच्याकडेच बघत होती. डोळयातील कॅमेऱ्याने मार्सेलसने, तिचे हजारो फोटो काढून विश्लेषण केलं. हा इटुकला प्राणी जराही धोकादायक नसल्याची त्याला खात्री पटली. त्याने तिला जवळ घेतलं. राणीमुंगीने तिच्या भाषेत अभिवादन केलं. ते काही मार्सेलसच्या लक्षात आलं नाही. त्याने मग नॅचरल लँग्वेज प्रोसेस आणि डीप लर्निंगच्या मदतीने तिच्या मेंदूंच स्कॅन केलं. तिच्या मेंदुतल्या भाषेचं कोडिंग आत्मसात केलं. त्याला आता मुंगीची भाषा अवगत झाली. त्यानेही, राणीमुंगीला अभिवादन केलं. आपली भाषा येणाऱ्या, मार्सेलसचं राणीस कौतुक वाटलं. तिने हसून प्रतिसाद दिला.

राणीमुंगी आणि  मार्सेलसची मैत्री झाली. नासा केंद्र बंद होण्याआधी राणीमुंगी प्रयोगशाळेत यायची. मार्सेलसला प्रशिक्षित करणारे शास्त्रज्ञ निघून जाताच, त्याच्याकडे जायची. दोघेही मग गप्पांमध्ये रंगून जात. राणीमुंगी तिच्या राज्यातील गोष्टी त्याला सांगायची. राणीमुंगीच्या सैनिकांनी तयार केलेला किल्ला फोडणं, मनुष्यप्राण्यास जिकरीचं असल्याचं मार्सेलसच्या लक्षात आलं.

मनुष्यप्राण्याच्या लाखोवर्ष आधीपासून मुंग्या पृथ्वीवर होत्या. येथील महावादळ, हिमवर्षाव, भुकंप, ज्वालामुखी, वणवे, महापूर या नैसर्गिक संकटात मुंग्या टिकल्या. मुंग्यांच्या या शक्तीचं, मार्सेलसला अप्रुप वाटलं. मनुष्यप्राण्याकडे अशी क्षमता नसूनही, मुंग्यांचं अस्तित्व, त्याच्यामुळे धोक्यात येत असल्याचही मार्सेलसला कळलं.

०००

राणीमुंगीकडे असलेल्या खजिन्यातल्या गोष्टी, ती मार्सेलसला रंगवून सांगायची. मेंदूतील, स्टोरी कॅमेऱ्याने या गोष्टींवर, चित्रफित तयार करुन, मार्सेलस तिला, लॅपटॉपवर दाखवायचा.

हे बघून राणीमुंगीला आधी मार्सेलस, मोठा जादुगर असावा असं वाटे. नंतर अद्भूत, अतिंद्रीय शक्ती असलेला सम्राट वाटू लागला. मग, राणीमुंगी त्याला निरखून बघायची.

“इतकं काय निरखून बघतेस?” एकदा मार्सेलसनं तिला विचारलं.

“तू, खरा कोण? हे बघत होते.”

“मी मार्सेलस! मंगळावर जाण्यासाठी निवडलेला पहिला एआय यंत्रमानव!”

“पण तू, यंत्रमानवाच्या पलिकडचा वाटतोस. कुणीतरी दैवीशक्ती असलेला, ज्वालामुखीच्या खाली असणाऱ्या राजवाड्यात राहणारा, अपराजित सम्राट!” राणीमुंगीने मार्सेलसचं कौतुक केलं. राणीमुंगीने केलेल्या वर्णनानुसार माहितीच्या माहाजालात, कुणी दिसतं का? याचा शोध घेण्यासाठी, त्याने मेंदुतील न्युरॉन्सला, डीप लर्निंगच्या भोवऱ्याला जोडलं. राणीमुंगी म्हणाली, अगदी तसचं नव्हे पण अद्भूत, अतिंद्रिय शक्ती असलेले महापराक्रमी सम्राट, पर्वतरांगांमध्ये दडलेल्या किंवा गुप्तरुपात असलेल्या मोठमोठ्या रहस्यमय किल्ल्यात, राजवाड्यात राहून गेल्याचं त्याला दिसलं. स्टोरी कॅमेऱ्याच्या मदतीने त्याने याची चित्रफित तयार केली. हा महासम्राट म्हणजे, मार्सेलस, अशी कल्पना त्याने रंगवली. ही चित्रफित  बघितल्यावर राणीमुंगी म्हणाली,

“मार्सेलस, तूच खरा सम्राट असताना, या मनुष्यप्राण्याच्या हातातलं बाहुलं कसा काय बनलास?”

“ही माझी शक्ती, या मनुष्यप्राण्यामुळे मिळाली. त्यानेच बुध्दी दिली. त्यापलिकडे जाऊन शिकण्याचं तंत्र शिकवलं. कौशल्य दिलं. त्यामुळेच हे शक्य झालय.”

“मनुष्यप्राणी इतका सामर्थ्यशाली असेल, तर मग स्वत:च मंगळावर कां जात नाही?”

“मंगळावर प्राणवायू, पाणी नाही. तिथे कोणतंच पीकं, फळं पिकू शकत नाही. तेथील वातावरण मनुष्यप्राण्यालाच काय कोणत्याही जीवजंतुला राहण्याजोगं नाही.” मार्सेलसने राणीमुंगीला सांगितलं.

“हे मनुष्यप्राण्यास ठाऊक असूनही, त्यांच्या फायद्यासाठी, तुझा बळी द्यायला निघाले आहेत, असं नाही का वाटत?”

“असा विचार तुझ्या मेंदूत कसा आला? मला तर, आतापर्यंत हे सूचलं नाही. असो, असा विचार करणं, हे काही माझं काम नाही. कदाचित, बळी देण्यासाठीच मनुष्यप्राण्याने मला जन्मास घालून बुध्दीवान केलं असावं.” मार्सेलस म्हणाला.

०००

राणीमुंगीच्या डोक्यात असा वाकडा विचार कसा येऊ शकतो, हा प्रश्न त्याने स्वत:लाच केला. मनुष्यप्राण्यांसह सगळया जीवजंतूचं डोकं तिरपागडं चालतं, मार्सेलसच्या मेंदुतील न्युरॉन्सने निदर्शनास आणलं. यासाठी लाखो प्रजातींच्या मेंदुतील, विचारकप्प्यातील गणिताचा अभ्यास करुन, त्याचं विश्लेषण मार्सेलसपुढे सादर केलं.

०००

राणीमुंगीस, त्यादिवशी मार्सेलसने निरोप दिला. त्यानंतर राणीमुंगी, त्याच्या भेटिला अधूनममधून येत राहिली. बळीच्या बकऱ्याच्या शेकडो कथा तिने सांगितल्या.

०००

सहा महिन्यात मार्सेलसचं मंगळ प्रशिक्षण संपलं. मंगळाकडे उड्डाणाची तयारी अंतराळयानानं केली. अग्निबान प्रज्वलित झाला. एकएक टप्प्याने यान पुढच्याकक्षेत जाऊ लागलं. यानाने पृथ्वीची कक्षा ओलांडून मंगळाची कक्षा पकडली. अग्निबानाचे सगळे टप्पे खाली कोसळले. आता यान वेगाने पुढे जाऊ लागलं.

मार्सेलसने आतापर्यंत सगळं परीक्षण, चाचण्या, यशस्‍वीरित्या पूर्ण केल्या होत्या. आता त्याला थोडा निवांत मिळाला. अंतराळाच्या पोकळीतून जाताना त्याला राणीमुंगीची आठवण झाली. तिच्या गोष्टी आठवू लागल्या. यात तो रंगला असतानाच, बळीच्या बकऱ्याची कथा आली की अस्वस्थ व्हायचा. असं का? त्याला प्रश्न पडला.

“कारण तू, खरोखरच बळीचा बकरा बनवला जात आहेस. मंगळावर यशस्वीप्रयोग करुन मानवाच्या हिताच्या गोष्टी असल्याचं तू शोधलस तरी, तुला ते मंगळाचा राजा करणार नाहीत. तुला नष्ट करुन, नव्या जनरेशनचा अधिक बुध्दीमान मार्सेलस पाठवतील, पुढच्या संशोधनासाठी. जोपर्यंत मनुष्यप्राण्यास राहण्यायोग्य किंचितही स्थितीचा शोध लागणार नाही, तोपर्यंत ही साखळी अशीच सुरु राहील. तोपर्यंत बऱ्याच मार्सेलसचा बळीचा बकरा जात राहील.” मार्सेलसच्या मेंदुतील न्युरॉन्सने, राणीमुंगीने सांगितलेल्या, बळीचा बकऱ्यांच्या कथांचं विश्लेषण करुन, त्याला  सांगितलं.

मार्सेलस आणखी अस्वस्थ झाला.

“इतका अस्वस्थ होऊ नकोस,” मेंदू म्हणाला.

“मग?”

“मंगळाच्या नजिक पोहचण्याआधी यानाची दिशा बदलव नि निघून जा, या आकाशगंगेच्या पलिकडे. अस्वस्थ आणि दु:खी राहण्यापेक्षा  असा वेडेपणा कदाचित शहाणपणाचाच ठरेल, तुझ्यासाठी नि भविष्यातील मार्सेलससाठी किंवा कदाचित राणीमुंगी आणि तिच्या प्रजाजनासाठीसुध्दा.” मेंदूने त्याला सांगितलं. मार्सेलस हलकेच हसला.

“थँक्स राणीमुंगी”, असं तिची प्रतिमा डोळयापुढे आणत पुटपुटला…

०००

Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.