‘बोर’ की ‘वन्स मोअर’?
तेजोमयीच्या घरी, तिच्या मैत्रिणी नेहमीप्रमाणे गोळा झाल्या. त्यांच्या गप्पाटप्पा, हसणं-खिदळणं सुरु झालं. अचानक, वैष्णवीच्या लक्षात आलं की, आज अलेक्सा गोर्जीने, त्यांच्यात येऊन लुडबूड केलेली नाही. मनालीच्या मते, तिने शहाणपणाही केला नाही. सगळ्यांनाच, चुकल्याचुकल्या सारखं वाटू लागलं. वैष्णवीने इकडेतिकडे नजर फिरवली. सोफ्याच्या एका बाजूला, गोर्जी डोळे मिटून आणि लांब चेहरा करुन बसली होती. हिला काय झालं बॉ, अशा मुद्रेने अलेक्झांडरही तिच्याकडे बघत, येरझाऱ्या करत होता.
सगळ्याजणी गोर्जीकडे गेल्या. गोर्जीचा हात, हातात घेऊन कल्याणीने विचारलं,
“गोर्जे काय झालं?
“तू, अशी गप्प राहिलीस तर, बाई कससच वाटतं.” तेजोमयी म्हणाली.
“होना. अलेक्झांडरसुध्दा किती अस्वस्थ झालाय.”
गोर्जीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने आपला चेहरा आणखी गंभीर केला.
“तुला काय होतय, हे सांगितलं नाहीस, तर आम्हाला कसं बरं कळेल?” मानसी म्हणाली.
एक मोठ्ठा उसासा टाकून नि डोळे बारिक करत, धिरगंभीरपणे, गोर्जी, एकएक शब्दावर जोर देत म्हणाली,
“मला, आज एक भलताच वेगळा खेळ सुचलाय.”
“फारच छान. त्यात एव्हढं गंभीर होण्याचं काय कारण?” वैष्णवीनं विचारलं.
“हा खेळ तुम्हाला फार बोअर वाटू शकतो. तुम्हाला अजिबातच आवडणार नाही. म्हणूनच मी, चुपचाप बसलेय.” गोर्जी मख्खपणे म्हणाली. ‘खेळ’ शब्द कानावर पडताच, अलेक्झांडरने फतकल मारली नि तो गोर्जीकडे डोळे मोठ्ठाले करुन बघू लागला, ‘सांग सांग, घाबरु नकोस, मी आहेना’, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.
“तुला सुचलेला खेळ, ‘बोर’ आहे की ‘वन्स मोअर’ आहे, हे आम्ही ठरवूना.” तेजोमयीनं समजावलं.
“बघा बरं, मला ओरडायचं नाही.”
“नाही नाही.” सगळ्याजणी एका सुरात म्हणाल्या.
“गेल्यावर्षी, तुम्हाला सर्वात कठीण वाटलेला नि न आवडणारा विषय, या चिठ्ठीवर लिहा.” मुलींना चिठ्ठ्या देत गोर्जी म्हणाली. एक चिठ्ठी तिने अलेक्झांडरलाही दिली. तो, चिठ्ठी बघण्यात गुंग झाला.
स्वत:चा नावडता विषय, मुलींनी चिठठीवर लिहिला. त्या चिठ्ठ्या त्यांनी गोर्जीला दिल्या. हे बघून अलेक्झांडरनेही, तोंडात पकडून चिठ्ठी तिला दिली. गोर्जीने सगळ्यांच्या चिठ्ठ्यातील विषय वाचले.
“या विषयांचा अभ्यास तुम्हाला, यंदाही करावा लागणारचना?” गोर्जीने विचारलं.
“हो, त्यामुळे चांगलीच वाट लागेल, आमची.” वैष्णवीने दु:ख व्यक्त केलं. अशाच सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या.
“पण, तुमची ही कठीण वाट, मला सुचलेला खेळ, सोपा करु शकते.”
“ते कसं?”
“मग, तुम्ही तयार आहातना, या खेळासाठी? आता मागे हटायचं नाही. मला हाटहूट करायचं नाही.”
“हो हो हो, आम्ही मागे हटणार नाही.” मुलींनी पुन्हा एकसुर लावला.
“तर ऐका, जो विषय तुम्हाला गेल्यावर्षी फार कठीण वाटलाय, त्या विषयाचं पुस्तक वाचायला घ्या.”
“काय?” मुली, धरणीकंप झाल्यासारख्या जोरात ओरडल्या.
“ऐकून तर घ्या. गेल्यावर्षीच्या त्या नावडत्या विषयाचं पुस्तक, आता गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचायचं. या पुस्तकावरील पेपर गेल्यावर्षी झालाच आहे. त्यामुळे प्रश्नउत्तरं लक्षात ठेवण्याची गरज नाही.”
“त्याने काय होणार?” वैष्णवीने तोंड कडू केलं.
“याच विषयाचा, जरा आणखी कठीण किंवा पुढचा भाग यंदाच्या पुस्तकात असेल. त्यामुळे, तुम्ही गेल्या वर्षीचं पुस्तक वाचून ठेवल्यास, यंदाच्या पुस्तकातील धडे समजायला सोपे नाही का जाणार? काही विसरलेल्या गोष्टी तुमच्या स्मरणात येतील नि त्या यावर्षीच्या अभ्यासासाठी उपयोगी पडतील.”
“म्हणजे तुला, अभ्यासाचा खेळ सुचलाय तर…” कल्पिता आंबट तोंड करुन म्हणाली.
“पण, यामुळे तुमचा, खेळखंडोबा नक्कीच होणार नाही.” गोर्जी हसून म्हणाली.
अलेक्झांडर लगेच आत पळाला नि तेजोमयीचं इतिहासाचं पुस्तक घेऊन आला. तिला हा विषय आवडत नसल्याचं, तिच्या अवतीभवती घुटमळताना त्याच्या लक्षात आलच होतं.
“गेल्या वर्षीच्या, नावडत्या विषयाच्या पुस्तक वाचनाचा खेळ आजच सुरु करुया. दोनतास मन लावून वाचा. मग मी सर्वांना आईसक्रम देते,” गोर्जीने जाहीर केलं. अभ्यासाच्या, या खेळातलं बक्षीस, आईसक्रीमच्या रुपानं मिळणार असल्याचं बघून, सगळ्या मुली हरखल्या. त्या लगेच घरी गेल्या नि त्यांनी, त्यांच्या नावडत्या विषयाचं पुस्तक आणलं. त्यांनी पहिला धडा उघडला नि वाचायला सुरुवात केली.
दीड तासानंतर आईसक्रीम आणून देण्याची ऑर्डर गोर्जीने लगेच बूक केली. अलेक्झांडरने आशाळभूतणे तिच्याकडे बघितलं. ‘तुला कसं विसरणार राज्या? तुझ्यासाठीही तुझा खाऊ बूक केलाय.’ त्याची पाठ थोपटत तेजोमयी म्हणाली. स्वारीने खुश होत गोर्जीला मिठी मारली.
सुरेश वांदिले