(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भाग्यवान महाराज!

अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे  तिने गोर्जीची तक्रार केली.

“तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मच हं!” असे   भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे बघितलं. गोर्जीच्या तोंडाजवळ जाऊन कुंईकुंई केलं. तरीही ती ढिम्म! आता तेजोमयीच्या रागाचा पारा जरा वाढला.

“फारच शहाणी झालीस हं, गोर्जी तू? असं ती तिच्या कानाजवळ जाऊन पुटपुटली. त्याचवेळी गोर्जीची समाधी भंग पावली. तिच्या डोक्यावरचे बल्ब लागले. ते बघून अलेक्झांडरने शेपूट हलवून आनंद व्यक्त केला. त्याने तेजोमयीस इशारा केला,

“आता हिला काय विचारायचं की तिच्यावर ओरडायचं की रुसून बसायचं, हे ठरव बाई लवकर.” असा होता त्या इशाऱ्याचा अर्थ.

खरंतर आता तेजोमयीस चांगलाच राग आला होता. पण ही बया इतकी कशात मग्न झाली होती हे जाणून घेण्याची उत्सुकता तिला लागली. त्यामुळे आपला राग काबूत ठेऊन तिने गोर्जीस विचारलं,

“काय गं, कुठे हरवली होतीस? माझी कामं खोळंबलीत ना.”

“सॉरी सॉरी! अगं, मी इतकी गुंग झाले होते की, कशाचं काहीच भान राहिलं नाही. सॉरी हं. आईबाबांकडे तक्रार करु नकोस, माझी.”

“नाही करणार, पण तू कशात इतकी गुंग झाली होतीस गं? तेजोमयीनं गोर्जीला पुन्हा विचारलं. काहीतरी प्रश्न विचारल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलं. त्यामुळे स्वारी कान टवकारुन बसली.

“अगं मला, थोडा निवांत वेळ मिळालाना तेव्हा मी, माहितीच्या माहाजालात फिरु लागले. मला महाराजांवरचं  एक पुस्तक मिळालं.”

“महाराज म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज का?”

“हो हो हो, तेच. महाराजांची गोष्ट वाचताना कशाचं भानच राहिलं नाही गं.”

“सगळयांचच तसं होतं, गोर्जी.”

“खरंय ते. पण मला एक वेगळी गंमतपण कळली.”

“कसली गं?”

“महाराज त्यांच्या लहानपणी आणि विशेषत: दिवाळी आणि उन्हाळ्यात मित्रांसोबत भरपूर खेळायचे, त्यांच्यासोबत इकडेतिकडे भटकायचे, उंडारक्या करायचे. माँसाहेबांचीसुध्दा यासाठी ना नसे.”

“वा व! वंडरफुल! कित्ती छान!” उर्त्स्फुत प्रतिक्रिया दिली.

” अगं तेजो, एकदा कुणीतरी मोठ्ठे सरदार त्यांच्याकडे आले. शिवबा कुठे आहेत, असं त्यांनी विचारलं. मॉसाहेबांनी त्यांना, शिवबा खेळायला गेल्याचं सांगितलं.

तेव्हा ते सरदार म्हणाले, ” माँसाहेब अहो, शिवबांच असं खेळणंबिळणं म्हणजे वेळेचा अपव्यय. आता या सुट्यांमध्ये त्यांना आमच्याकडे सुरु असलेल्या तलवारबाजीच्या वर्गात धाडा. हा वर्ग सकाळी असतो. दुपारी आमच्याकडे चित्रकला व मूर्तीकलेचा वर्ग असतो. तो ते करतील. संध्याकाळी संगीताचा वर्ग असतो, तिथे ते जातील. म्हणजे कसं, शिवबांना सगळयाच गोष्टी येतील ना.”

ते ऐकून माँसाहेब हसल्या. सरदारांना आश्चर्य वाटलं.

“काय हो माँसाहेब, आमचं काही चुकलं का?”

“सरदारसाहेब, तुमचं चुकलं की नाही हे सांगता यायचं नाही. पण शिवबा, वर्षंभर अनेक गोष्टी शिकत असतातच की. आता या दिवाळीत थोडं त्यांच्या डोक्याला नि बुध्दीला शांतता नको का? सवंगड्यासोबत खेळणं, इकडेतिकडं उंडारणं म्हणजे काही वेळ वाया घालवणं नाही. यातूनही काही ना काही ते शिकतीलच. सवंगड्यांसोबत त्यांची मैत्री घट्ट होईल.फिरण्या फिरण्यात त्यांना अवतीभवतीचं वेगळं काही बघण्याची दृष्टी मिळेल.”

असं बोलून मॉसाहेबांनी सरदारांकडे बघितलं. सरदारांना यातलं    फार कळलं नाही नि पटलंही नाही. त्यामुळे थोड्यावेळाने ते निघून गेले.

“माँसाहेबांना खरच तसं  वाटत होतं का गं?”तेजोमयीने अलेक्साला प्रश्न केला.

“अगं पण, मी कशाला खोटं बोलू. कां बरं तू असं मला विचारलसं?”

“आमच्या आईसाहेबांना नि बाबासाहेबांनाही असंच वाटलं तर किती बरं ना. म्हणजे या क्लासमधून त्या क्लासमध्ये जाण्याची कसरत तरी थांबेल माझी? बरोबरना रे अलेक्झू.” तेजोयमीने त्याला विचारलं. या प्रश्नात आईचा संबंध असल्याचं पठ्ठ्याच्या बरोबर लक्षात आलं. त्याने तिथून हळूच काढता पाय घेतला. अलेक्सा गोर्जीनेही डोळे किलकिले केले.

०००