भीती?
बाप्पांचे उद्या आगमन होणार म्हणून तेजोमयी, आईबाबा आणि अलेक्झांडर सगळेजण आनंदात होते. आता फक्त काही तास उरले होते,त्यांच्या आगमनासाठी. सर्वांच्या डोळ्यात उद्याची आतुरता स्पष्टपणे दिसत होती. मात्र या उत्साही वातावरणात अलेक्सा गोर्जी फार काही खुष दिसत नव्हती. तिची नाराजी अलेक्झांडरच्या बरोबर लक्षात आली. तो तेजोमयीला गोर्जीकडे घेऊन गेला. आतल्या खोलीत गोर्जी डोळे मिटून एका कोपऱ्यात बसली होती. हिचं काहीतरी बिनसलंय हे तेजोमयीच्याही लक्षात आलं.
“काय गं, काय झालं?” तेजोमयीनं विचारलं.
“मला भीती वाटतेय.” अर्धवट डोळे उघडून गोर्जी उत्तरली.
“बापरे, डोनाल्ड काकांनी तुझ्यावर डोळे वटारलेत की काय?” तेजोमयी डोळे मिचकावत मिश्किलपणे म्हणाली. जणू काही हा विनोद आपल्याला कळलाय असं समजून अलेक्झांडरने शेपूट हलवत लाडाने गोर्जीला हलकशी ढुशी दिली.
“अगं, मला तेच काय, कोणत्याच काका-मामा-दादा-भावांची भीती वाटत नाही.” गोर्जी म्हणाली.
“मग?”
“मला बाप्पांची भीती वाटतेय.”
“आँ, हे काय भलतंच? तुझं आपलं काहीतरीच.” तेजोमयी आश्चर्यचकित होत म्हणाली.
“खरंच भीती वाटतेय.” गोर्जीने पुन्हा काळजी व्यक्त केली.
या तिघांचं बऱ्याच वेळेपासून काय गुळपीठ चाललंय हे बघण्यासाठी आईबाबा आतल्या खोलीत आले. त्याचवेळी बाबांच्या कानावर भीती शब्द पडला. त्यांनी आश्चर्यानं विचारलं..
“कुणाची आणि कुणाला भीती?”
“बाप्पांची”
“अगं बयो, काहीतरीच काय बोलतेस. त्यांची भीती वाटायला ते काय वाघोबा-बिघोबा लागून गेलेत की काय?” आईने नाराजी व्यक्त केली. आई बरोबरच बोलणार ही खात्री असल्याने अलेक्झांडरने मान हलवली.
“अगं, तुला म्हणायचं तरी काय?” बाबांनी विचारलं.
“अहो बाबा, मला असं वाटतंय की यंदा बाप्पा येणारच नाहीत.”
“ये बाई….येणार नाहीत काय, ते आलेच आहेत. फक्त मुर्हूत उद्या आहे म्हणून. तू स्मार्ट आणि इंटेलिजेंट आहेस म्हणून काहीही तारे तोडू नकोस…” आई रागावली.
“थांब थांब अशी गोर्जीला रागावू नकोस.. बाप्पा येणार नाही ही भीती तिला कां वाटते? हे तर समजून घेऊ या.” तेजोमयीनं गोर्जीची बाजू घेतली. बाबांनीही तिला पाठिंबा दिला.
“ते येणार नाहीत असं मला वाटतं कारण गेल्या वर्षी जे जे तुम्ही कबूल केलं त्या सगळ्यांना तुम्ही वाटण्याच्या अक्षता लावल्या.”
“बयो, काहीतरी काय बडबडतेस.” आईचा पारा आता जरा चढलाच.
“अहो आई, तुम्ही म्हणजे केवळ आपलं घर नव्हे हो, सगळ्यांचं म्हणतेय मी.”
“सगळ्यांचं काय करायचंय आम्हाला? आम्ही आमचं बघूना.”
“तसं नाही हो.. बाप्पा सगळ्यांचेच आहेत की नाहीत. सगळ्यांनी मिळून त्यांना गेल्या वर्षी सांगितलं होतं की आम्ही प्रामाणिकपणेच वागू. पर्यावरणाचं नुकसान करणार नाही. प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळू, पाण्याचा आणि विजेचा अपव्यय करणार नाही. ध्वनी प्रदुषण करणार नाही. सांगितलं होतंना.”
“नाही म्हणजे पण हो….” आई चाचरत म्हणाली.
“पण, आता वर्षभराने बाप्पा येताहेत तर परिस्थिती जैसे थे. हे बघा…” असं म्हणत गोर्जीने स्वत:च्या डेटाबेसला स्मार्ट टीव्हीशी जोडून घेत टीव्ही सुरु केला.
गेल्या वर्षी मुंबईत प्लॅस्टिक कचरा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी किती वाढली होती, याच्या गोर्जीच्या सिस्टीममध्ये साठवलेल्या नोंदींचा आलेख टीव्हीवर दिसू लागला. गेल्या वर्षी विसर्जनाच्या रात्री डेकोरेशनचे लाईट्स आणि डीजेसाठी स्पीकर लावले, त्यात नेहमीपेक्षा जवळपास तिप्पट वीज वापरली गेली. पाण्याच्या नासाडीलाही काही धरबंदच राहिलेला नव्हता. विसर्जनाच्या वेळी नद्या-समुद्रात प्लॅस्टिक, फुले, नारळ आणि रंग यांचा ढीग साचला होता. हे दृश्य धुसर होताच गोर्जीने टीव्ही बंद केला.
“यामुळे बाप्पांना स्वत:ची फसगत झाल्यासारखी वाटतेय. म्हणून ते नाराज होऊन येणार नाहीत याची भीती वाटतेय. म्हणजे ते तसे मूर्तीरुपाने येतीलही, पण त्यांच्या नाराजीचं काय?”
“काय?” अवचितपणे तेजोमयी बोलून गेली.
“गोर्जे, हा गहन प्रश्न आहे. आम्हाला बाप्पांच्या नाराजीपेक्षा उत्सव अधिक प्रिय आहे.” आई म्हणाली.
“उत्साहाने उत्सव साजरा केला की वाटतं झाली बाप्पांची आराधना.” बाबांनी खंत व्यक्त केली.
“पण तू आमचे डोळे उघडलेस.” तेजोमयी म्हणाली.
“बाप्पा डोळे उघडे ठेऊन सगळं साठवून ठेवतात, हे विसरुनच गेलो आम्ही. त्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊन याचा स्फोटही होऊ शकतो, याची खरंतर आम्हालाच भीती वाटायला हवी.” आई अलेक्झांडरला कुरवाळत म्हणाली. गोर्जी किती हुशार आहे असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटून तो तिच्याकडे एकटक बघू लागला.
सुरेश वांदिले