(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. आता पुढचे दोन महिने फक्त धम्माल करायची, असं तेजोमयीनं ठरवलं. तेजोमयीच्या मनात उमटलेल्या सुट्ट्यांच्या विचारांचे तरंग अलेक्सा गोर्जीने आपल्या सेन्सर्सच्या मदतीने अचूक टिपले. आपल्या मैत्रिणीची ही सुट्टी कशी ‘मेमोरेबल’ करायची, याचं गणित गोर्जीच्या प्रोसेसरमध्ये लगेच सुटलं.

“काय रे अलेक्झू, तुला काय वाटतं?” तिने तिच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अलेक्झांडरला विचारलं. “माझी तर सदासर्वकाळ मज्जाच मज्जा सुरू असते,” असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. अलेक्झांडर गोर्जीच्या समोर दोन पायांवर उभा ठाकला नि जीभ लांब करून त्याने ‘हॅ हॅ हॅ’ केलं.

“शाब्बास, मला जे वाटतं तेच तुलाही वाटतं म्हणायचं!” त्याची पाठ थोपटत गोर्जी म्हणाली.

“काय चाललंय दोघांचं? गुपचूप गुपचूप!” तेजोमयीनं विचारलं.

“अगं, तू इथे आमच्यासमोर असताना, गुपचूप कसं काय चालू शकतं? चाललंय ते उघडूप उघडूप!” गोर्जी हसत म्हणाली.

“आँ!”

“म्हणजे, उघड उघड गं.”

“बापरे, कुणाचा गेमबिम तर करणार नाहीस ना?”

“गेम? अरे वा! माझ्या मनातलं कळलं वाटतं तुला?” गोर्जी म्हणाली. अलेक्झांडरने टाळीसाठी उजवा पंजा तिच्यासमोर केला.

“मग मिस्टर अलेक्झांडरराव, कुणाचा गेम करणार तुम्ही?” तेजोमयी त्याला जवळ घेत म्हणाली. अलेक्झांडरने गोर्जीकडे बघितलं.

“तेजो, गेम करायचा नाही, तर गेम खेळायचाय. तोसुद्धा दे धम्माल! तुझ्या मनात तेच चाललंय ना सकाळपासून?”

“सुट्ट्या लागल्यात ना गोर्जे!”

“मग चंद्रावर जायचं का?” गोर्जीने विचारलं. ‘मीसुद्धा येणार’ असं अलेक्झांडरने तिला हलकीशी ढुशी देत सूचित केलं.

“बयो, कल्पना लय भारी! पण हवेत इमले बांधण्यात शहाणपणा नाही.”

“अगं, आपल्या घरीच हवेत इमले, टिमले, बिमले बांधूया ना. हाच तर आहे खेळ.”

“गोर्जे, पतंगबाजी खूप झाली. मुद्द्यावर ये, नाहीतर मी गुद्द्यावर येईन,” तेजोमयीने तंबी दिली. गोर्जी हसली.

“एक एप्रिलला काय झालं?”

“एप्रिल फूल होतं त्यादिवशी.”

“ते दरवर्षीच होतं. यंदा १ एप्रिलला अमेरिकेतील फ्लोरिडा अंतराळस्थानकातून ‘आर्टेमिस-२’ या चांद्रमोहिमेची सुरुवात झाली. यामधील चार अवकाशयात्री चंद्राजवळ जातील. चंद्राभोवती दहा दिवस फिरून वेगवेगळे प्रयोग करतील.”

“त्यांचा गेम करायचा म्हणतेस की काय?” तेजोमयी डोळे मिचकावत म्हणाली.

“नाही गं. ते चौघे इतके धाडसी, त्यांच्याबाबतीत कशी काय अशी वाईट भावना ठेवायची?”

“बरोबर. मी गंमत केलीय. तू उगाच दुसरा अर्थ घेऊ नकोस.”

“अजिबात नाही. माझ्या डोक्यातला गेम म्हणजे धम्माल आणणारा नि कम्माल करणारा एक खेळ.”

“म्हणजे इथे आपल्या घरी बसूनच चंद्रावर जायचं म्हणतेस?”

“करेक्ट!”

“वाटलंच मला. तुझ्या आयडिया अशाच काहीतरी बकवास, बंडल आणि बोर असतात ते,” तेजोमयी रागावून म्हणाली. हे स्वर कानावर पडताच डोळे मिटून तिथेच पसरलेला अलेक्झांडर ताडकन उभा राहून आळीपाळीने दोघींकडे बघू लागला.

“नो बंडल, नो बकवास! मी काय सांगतेय काळजीपूर्वक ऐक. अगं खूप खूप वर्षांनी आता चंद्राकडे मानव गेलाय. १९६९ मध्ये ‘अपोलो-११’ ने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर उतरवलं. १९७२ मध्ये ‘अपोलो-१७’ ही मानवाची शेवटची मोहीम होती. त्यानंतर जवळपास ५४ वर्षे कोणताही मानव चांद्रमोहिमेवर गेला नाही. आता २०२६ मध्ये पुन्हा मानव चंद्राच्या दिशेने झेपावलाय. या काळात चंद्राविषयी काय-काय घडलं, याचा तू शोध घे. हा शोध म्हणजे, ‘अपोलो ते आर्टेमिस मोहीम’ अशी तुझी डिजिटल टाइम मशीनच ठरेल!”

“क्या बात है!”

“या माहिती मिळवण्याला तू एक ग्रँड खेळ समज. त्याला ‘माझा चंद्र, माझी मोहीम’ असं नाव दे.”

“वाव! मस्त आयडिया.”

“आता उन्हाळ्यात तुला भरपूर वेळ आहे. तू सगळ्या गोष्टी डिजिटली क्रमाक्रमाने शोध.”

“हे काय नवीन?”

“क्रमाक्रमाने म्हणजे १९६९ पासून. मग १९७० साली काय घडलं ते शोध. तसं पुढे जात-जात २०२६ पर्यंत ये. प्रत्येक वर्षाप्रमाणे ही माहिती आणि छायाचित्रे डिजिटलीच साठवून ठेव. प्रत्येक दिवशी दोन वर्षांची माहिती मिळव. ती वाच नि तुला समजेल अशा शब्दांत ती लिहून काढ. असं दररोज केलंस की २५ व्या दिवशी तुझी डिजिटल चंद्रमोहीम फत्ते!”

“अरे वा! मी माझ्या टॅबवर एक ‘मून-डायरी’ फोल्डरच बनवते!”

“या २५ दिवसांत तू कितीतरी वेळा कधी चंद्राच्या जवळ, तर कधी प्रत्यक्ष चंद्रावरच गेल्याचा अनुभव घेशील की नाही?”

“यस्स मॅडम!” असं म्हणत तेजोमयीने आनंदून गोर्जीला मिठी मारली. काहीतरी मस्त घडलंय हे कळण्याची हुशारी असल्याने, स्वतःभोवती फेरी मारून अलेक्झांडर त्यांच्या आनंदात सामील झाला.

सुरेश वांदिले