संस्था, संधी आणि दिशा
जेव्हढे विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीइटी देतात, जवळपास तेव्हढ्याच विविध अभियांत्रिकी शाखांच्या जागा असल्याने, प्रत्येकास प्रवेशाची संधी असते. मात्र, अभियांत्रिकी शाखेची निवड करताना विद्यार्थ्याने स्वत:ची आवड, कल यांचा प्रामुख्याने विचार करायला हवा. या शाखांना शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास प्राधान्याने घ्यावा. कारण या संस्थांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असतात. मात्र खासगी संस्थांमध्ये याबाबत खात्रीशिररित्या सांगता येत नाही. त्यामुळे खासगी संस्थेत प्रवेश घेताना अतिशय काळजी घेणे आवश्यक. संबंधित संस्थेचा दर्जा, गुणवत्ता, करिअरच्या मार्केटमधील स्थान, प्लेसमेंटच्या संधी, या संस्थांमध्ये येणाऱ्या कंपन्या, गेल्या तीन-चार वर्षात विद्यार्थ्यांला मिळालेल्या संधी, पॅकेज, प्रयोगशाळा आदी बाबींची सखोल माहिती घेऊनच प्रवेश घ्यायला हवा. ही माहिती सांगोवांगी नसावी. प्रत्यक्ष जाऊन खातरजमा करणे कधीही चांगले.
सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस, सायबर सेक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, एरोस्पेस इंजिनीअरिंग, नॅनोटेक्नॉलॉजी, ओशन इंजिनीअरिंग ॲण्ड नॅव्हल आर्किटेक्चर या काही क्षेत्रातील मनुष्यबळास चांगली मागणी असल्याचे दिसून येते. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे नवे कौशल्य प्राप्त केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगार संधी मिळू शकतात.
काही क्षेत्रे
(१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस- सध्या सर्वाधिक चर्चेत आणि मागणी असलेली ही शाखा. हे तंत्रज्ञान म्हणजे यंत्रांना दिलेला ‘मेंदू‘ आहे. अफाट माहितीचे विश्लेषण करून स्वतः निर्णय घेण्याची क्षमता यात असते. भारतातील एआय मार्केटच्या वाढीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे २०३० पर्यंत या क्षेत्रात विपुल करिअर संधी मिळू शकतात.
या अभ्यासक्रमात मशिन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेस, बिग डाटा ॲनॅलिटिक्स, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, अशासारख्या आजच्या काळासाठी आवश्यक घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते.
पुढील क्षेत्रात याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो- (१) आरोग्य: रुग्णाचे रिपोर्ट तपासून भविष्यात होणाऱ्या आजारांचा अंदाज वर्तवणे, (२) शेती: पिकांवरील रोग ओळखून कोणत्या भागात किती खत किंवा पाणी हवे, याचे अचूक नियोजन करणे, (३) वाहतूक: मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी चालक विरहित कार चालवणे, (५) शिक्षण: प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करणे, (६) उत्पादन क्षेत्र, (७) फिनटेक सारखे वित्तीय क्षेत्र.
करिअर संधी: डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनिअर, मशीन लर्निंग स्पेशलिस्ट.
(२) सायबर सेक्युरिटी- सायबर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे नेटवर्क, उपकरणे आणि माहितीची सुरक्षा करु शकणाऱ्या मनुष्यबळाची गरजही वाढली आहे. जसे आपण घराला कुलूप लावतो, तसेच डिजिटल जगातील आपली माहिती, बँक खाते आणि गोपनीय दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याचे हे ‘कवच‘ आहे. या तंत्राव्दारे ऑनलाइन चोरी आणि फसवणूक रोखण्यासाठी २४ तास पाळत ठेवली जाते. देशाच्या लष्करी माहितीवर होणारे परकीय सायबर हल्ले थोपवले जातात. स्मार्ट घरात बसवलेले कॅमेरे किंवा उपकरणे कुणी हॅक करू नये म्हणून सुरक्षा पुरवली जाते.
या अभ्यासक्रमात नेटवर्क सुरक्षा, ॲप्लिकेशन (उपकरणांची) सुरक्षा आणि माहिती (डाटा) ची सुरक्षा यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. याशिवाय क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, ब्लॉकचेन सिक्युरिटी, फॉरेन्सिक या विषयघटकांचेही ज्ञान प्रदान केले जाते.
सध्या सर्व मोठ्या कंपन्या, आस्थापना, कार्पोरेट, उद्योग यामध्ये या तज्ज्ञांची नियुक्ती केली जात आहे.
करिअर संधी: सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, एथिकल हॅकर, सिक्युरिटी आर्किटेक्ट, सायबर सिक्युरिटी ॲनॅलिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर.
(३) ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी- या तंत्रज्ञानाचे स्वरुप हे एखाद्या ‘डिजिटल रजिस्टर‘ सारखे आहे. यात एकदा झालेली नोंद कोणालाही बदलता किंवा खोडता येत नाही. यामध्ये पारदर्शकता असते. सरकारी अनुदाने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा वापर होत असल्याने भ्रष्टाचारास आळा बसतो. विकत घेतलेले अन्नधान्य किंवा औषध नेमके कुठून आले आणि ते अस्सल आहे का, याची खात्री करता येते. निवडणुकीतील पारदर्शकतेसाठी हे तंत्रज्ञान वापरता येते. ई गव्हर्नन्ससाठीही वापर केला जातो.
मुख्य विषय घटक: क्रिप्टोग्राफी, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, डिस्ट्रिब्युटेड लेजर, कन्सेन्सस अल्गोरिदम, अशासारख्या विषयांचा समावेश होतो.
करिअर संधी: ब्लॉकचेन डेव्हलपर, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर, फिनटेक कंसलटंट.
(४) इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)- या तंत्राव्दारे अनेक संस्था आणि उद्योगांमधील विविध स्मार्ट उपकरणे, सेन्सर्स, प्रणाली एकमेकांशी जोडली जातात. त्यांची सुरक्षा, आयओटीच्या कार्यप्रणालीतील विविध घटक यावर या अभ्यासक्रमात प्रामुख्याने भर दिला जातो. घरातील फ्रीज, एसी, दिवे आणि कार अशी उपकरणे किंवा साधने इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात, त्याला इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणतात. रस्त्यावरील दिवे, गाड्या नसताना आपोआप बंद होतात किंवा कचऱ्याची कुंडी भरली की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संदेश पाठवला जातो. कारखान्यातील मशीन खराब होण्याआधीच इंजिनीअरला सुचित केल्या जाते. शरीरावर लावलेले सेन्सर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच डॉक्टरांना अलर्ट पाठवू शकतात.
या अभ्यासक्रमात सेंसर नेटवर्क्स, एम्बेडेड सिस्टम्स, क्लाउड कंप्यूटिंग, आयओटी सिक्युरिटी, एम्बेडेड सिस्टीम्स, सेन्सर्स, या विषयांवर भर दिला जातो.
करिअर संधी: आयओटी इंजिनियर, स्मार्ट सिटी प्लॅनर, आयओटी सोल्यूशन आर्किटेक्ट, एम्बेडेड सिस्टम इंजिनिअर
(५) रोबोटिक्स- रोबो म्हणजे केवळ चालणारे यंत्र नाही, तर मानवाला अशक्य किंवा धोकादायक असलेली कामे अचूकपणे करणारी प्रणाली आहे. रोबोव्दारे मंगळ किंवा चंद्रावर मानवाच्या आधी जाऊन तेथील नमुने गोळा केले जातात. मानवी हातांना न जमणाऱ्या सूक्ष्म आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोटिक हाताने केल्या जातात. रोबोंच्या साहाय्याने आगीत अडकलेल्या लोकांना वाचवले जाते किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन शोधमोहीम राबवली जाते.
या अभ्यासक्रमात विविध प्रकारचे रोबो, त्यांचे नियंत्रण, त्यांचे उपयोजन, रोबोट डायनॅमिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कंट्रोल सिस्टम्स, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट काइनेमॅटिक्स, या विषयीचे ज्ञान प्रदान केले जाते. अनेक क्षेत्रात आता स्मार्ट आणि इंटेलिजेंट रोबोंचा वापर वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढली आहे. रोबोंचे डिझाइन, विकास आणि कार्यान्वयन अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
करिअर संधी: रोबोटिक्स इंजिनियर, ऑटोमेशन स्पेशलिस्ट.
(६) एरोस्पेस इंजिनीअरिंग- हे तंत्रज्ञान केवळ विमानांपुरते मर्यादित नाही. पृथ्वीच्या कक्षेबाहेरील प्रवास आणि उपग्रहीय दळणवळण या शास्त्राच्या मदतीने साध्य केले जाते. हाय-स्पीड इंटरनेट आणि टीव्ही सिग्नल्ससाठी प्रगत उपग्रह अवकाशात सोडले जातात. चक्रीवादळ किंवा पावसाचा अचूक अंदाज घेण्यासाठी हवामान उपग्रहांचा वापर केला जातो. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी टेलिस्कोप अवकाशात पाठवून विशिष्ट कक्षेत स्थिर केले जातात.
एरोडायनामिक्स, स्ट्रक्चर्स, प्रोप्युलशन आणि एव्हिऑनिक्स या चार घटकांचे प्रामुख्याने ज्ञान प्रदान केले जाते. या विषयातील तज्ज्ञांना खाजगी क्षेत्र, शासकीय संस्था, संशोधन संस्था आणि अध्यापनाचा क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात.
(७) नॅनोटेक्नॉलॉजी- नॅनो टेक्नॉलॉजीला भविष्यातील ‘क्रांतिकारी तंत्रज्ञान‘ मानले जाते. यामुळे कमीत कमी नैसर्गिक संसाधने वापरून अधिक टिकाऊ आणि शक्तिशाली वस्तूंची निर्मिती शक्य होईल. या तंत्राव्दारे अत्यंत सूक्ष्म स्तरावर रेणू आणि अणूंच्या रचनेत बदल केले जातात.
या तंत्रज्ञानाचा पुढील क्षेत्रात प्राधान्याने उपयोग केला जातो-
१) आरोग्य आणि औषधोपचार– शरीरातील फक्त आजारी पेशींना (उदा. कर्करोगाच्या) औषध देण्यासाठी नॅनो-रोबॉट्सचा वापर करता येतो. यामुळे निरोगी पेशींना इजा होत नाही. २) इलेक्ट्रॉनिक्स: नॅनो स्तरावरील ट्रान्झिस्टर्समुळे मोबाइल आणि संगणकाचे आकार लहान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. ३) ऊर्जा क्षेत्र: अधिक कार्यक्षम सौर पॅनेल तयार करण्यासाठी आणि बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी नॅनो मटेरिअल्स वापरले जातात. ४) कापड उद्योग: डाग पडणार नाहीत किंवा पाणी शोषून घेणार नाहीत, अशा वस्त्रप्रावरणांची निर्मिती या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जाते. ५) पर्यावरण: पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी नॅनो-फिल्टर्सचा प्रभावी वापर होतो.
मुख्य विषय घटक: नॅनो मटेरियल्स, क्वांटम मेकॅनिक्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स, नॅनो मटेरियल्स, क्वांटम फिजिक्स
करिअर संधी: नॅनोटेक इंजिनियर, रिसर्च सायंटिस्ट
सुरेश वांदिले