(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इन्फ्ल्युअन्सर्स आणि क्रिएटर इकॉनॉमीचा उदय

समाज माध्यमे चांगली की वाईट याची सर्वत्र चर्चा होत असतानाच, आपल्याकडे, वेगवेगळ्या इंफ्ल्युअर्स (समाजमनावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती) यांची सतत भर पडताना दिसते. स्वत:च्या स्मार्ट फोनला एका स्टुडियोमध्ये रुपांतर करण्यात ही मंडळी यशस्वी झाली आहेत. या मंडळींनी स्मार्टफोनमधील विविध टूल्सच्या वापरावर हुकूमत मिळवलीय. स्वत:च्या सर्जनशील गुणवत्तेचा उपयोग करुन ही मंडळी असंख्य विषयांवर रिल्स तयार करताहेत. या रिल्सच्या प्रेमात किंवा प्रभावात म्हणा, शेकडो, हजारो किंवा लाखातही दर्शक पडताहेत.

“क्रिएटर इकॉनॉमी”ची पायाभरणी

या आकडेवारीत अनेक कंपन्यांना व्यवसाय संधी शोधायला सुरुवात केलीय. या मंडळीमुळे “क्रिएटर इकॉनॉमी”ची पायाभरणी झालीय. स्वत:चे म्हणणे एखाद्या कथनाच्या स्वरुपात सांगण्याची, त्याला आपली संस्कृती, परंपरा, धार्मिक मान्यता आदिंचा जोड देण्याची कलाही या मंडळींनी अवगत केल्याने ते सर्वसामान्यांना आकर्षित करण्यात यशस्वी होताना दिसतात.

भविष्यातील वाढ

आपल्या देशात एकत्रितपणे हजारो तास वेगवेगळया प्रकारचे आशय असलेले रिल्स बघितले जातात. त्यामुळे या मंडळीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रभाव दर्शकांवर पडतो. एका अधिकृत आकडेवारीनुसार जगातील सर्वात तरुण इंटरनेट लोकसंख्या भारतीयांची असल्याचे दिसून आलेय. आपल्या देशात चहा किंवा कॉफीच्या एका कपापेक्षा स्वस्त डाटा प्लॅन्स मोबाइल कंपन्यांनी उपलब्ध करुन दिलेत.

अनेक सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योजकांना हे इन्फ्ल्युर्सस, व्यवसायवृध्दीसाठी चांगलाच हातभार लावू शकतात याची खात्री पटलीय. या मंडळींमुळे व्हिडिओ एडिटर्स, कम्युनिटी मॅनेजर्स, फिनटेक स्टार्टअप्स यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालीय. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये देशातील क्रिएटर अर्थव्यवस्थेतील वार्षिक उलाढाल १२,००० कोटीच्या आसपास झाली. दरवर्षी ही वाढ २२ टक्के होऊन २०३२ पर्यंत ही उलाढाल जवळपास ४९,००० कोटी पर्यंत पोहोचेल, असा तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलाय.

जाहिरात क्षेत्रातील बदल

इंन्फ्ल्युअर्सचा प्रभाव लक्षात घेऊन कंपन्या/कॉर्पोरेट्स जाहिरातीतील निधींचा मोठा वाटा त्यांच्याकडे वळवत आहेत. डेंट्सू-एक्स्चेंज फोर मीडिया या संस्थेच्या ग्राहक सर्वेक्षणानुसार, ३९ टक्के भारतीय खरेदीदार पारंपरिक जाहिरातींपेक्षा इन्फ्लुएन्सर्सवर जास्त विश्वास ठेवतात. या मंडळीचा सल्ला ग्राहकांना विश्वासू मित्रासारखा वाटतो.

इन्स्टाग्राम, यूट्यूब अशा व्यासपीठांवर डॅश बोर्ड असतात. त्यावर दर्शकांची /व्ह्यूजची संख्या आपोआप नोंदवली जाते. त्यानुसार त्याचा थेट संबंध महसुलाशी जोडला जात असल्याने, इन्फ्लुसर्सना चांगले उत्पन्न मिळू लागते. मोठे ब्रँडस आता कल्पकतेने या इन्फ्ल्युअर्सचा वापर करुन घेतात. सणासुदिच्या काळात ही मंडळी वेगवेगळी उत्पादने कौशल्याने ग्राहकांपर्यंत पोहचवतात.

लहान आणि मध्यम उद्योग तसेच प्रादेशिक ब्रँड्स सूक्ष्म इन्फ्लुएन्सरचे स्लॉट्स खरेदी करतात. २५,००० रुपयांत तयार झालेली रील प्रादेशिक टीव्ही वरील जाहिरातीपेक्षा कितीतरी कमी खर्चात अधिक ग्राहकांपर्यंत पोहचते.

रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी

भारताच्या लोकसंख्येपैकी ४० टक्क्यांहून अधिक २५ वर्षाखालील आणि मध्यवयीन फक्त २८ टक्के आहेत. याचा अर्थ दरवर्षी लाखो नवीन पदवीधर तयार होत आहेत. पारंपरिक पध्दतीच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. स्पर्धा परीक्षेसाठी तीन-चार वर्षे जातात. मात्र, चित्रिकरण, संपादन, कोडिंग अशा टुल्सवर प्रभुत्व मिळवल्यास, यूट्यूबवरील थंबनेल्स, एआय कॅप्शनची निर्मिती, आदींच्या माध्यमातून ते लगेच उत्पन्न मिळवू लागतात.

तंत्रज्ञान आणि एआयची भूमिका

देशी, जनरेटिव्ह एआय टूल्स आता हिंदी, तमिळ, मराठी आणि आठ अन्य भाषांमध्ये संहिता लिहून देतात. काही मिनिटात थंबनेल्स तयार करतात. कायरा (Kyra) सारख्या आभासी मॉडेलची निर्मिती यातून झालीय. ‘कायरा’ ही भारताची पहिली इन्स्टाग्राम “एआय मॉडेल”. या कायराचे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. क्रुटिम या देशी एलएलएम्स (लार्ज लँग्वेज मॉडेल) प्रारुपावर आधारित, अॅप्स तयार केली जातात. त्याव्दारे प्रत्येक दिवशी अत्यल्प खर्चात चांगल्या दर्जाचे कंटेट देणे शक्य होते.

व्यावसायिक आणि संघटित विकास

कंटेट क्रिएटर्सच्या अर्थकारणात वाढ झाल्याने ते आता जीएसटीसाठी अर्ज करताहेत. इनव्हॉइस देताहेत. इतर स्टार्टअपप्रमाणे स्वत:ची टीमही तयार करताहेत.

भारतातील ‘क्रिएटर इकॉनॉमी’ एक सक्षम व्यावसायिक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. या बदलामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी विखुरलेल्या स्वरूपातील हे क्षेत्र आता अधिक संघटित झालेय. ब्रँड्ससोबतचे करार, कर प्रणाली आणि कायदेशीर चौकटीमुळे या क्षेत्राला आता ‘उद्योग’ म्हणून मान्यता मिळतेय.

केवळ व्हिडिओ बनवणारे क्रिएटर्सच नव्हे, तर त्यांच्या मागे काम करणारी एक मोठी फळी तयार झालीय. यामध्ये खालील व्यावसायिकांचा समावेश होतो- (१) व्हिडिओ एडिटर्स आणि ग्राफिक्स डिझाइनर्स,  (२) कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट आणि स्क्रिप्ट रायटर्स,  (३) सोशल मीडिया मॅनेजर्स आणि टॅलेंट एजन्सीज, (४) डाटा ॲनालिस्ट (माहिती विश्लेषक).

भारतीय क्रिएटर्स जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. यामुळे जाहिरात क्षेत्र, ई-कॉमर्स आणि स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळालीय.

सरकारने या क्षेत्रातील कौशल्य विकासाला दिलेली साथ आणि वाढते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे ‘क्रिएटर इकॉनॉमी’ हा भारताच्या भविष्यातील आर्थिक वाढीचा एक महत्त्वाचा पैलू ठरेल.

अर्थव्यवस्थेवरील पडसाद

‘क्रिएटर इकॉनॉमी’ ही आता केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तिचे पडसाद अर्थव्यवस्थेच्या अनेक स्तरांवर उमटताना दिसतात.

(१) ई-कॉमर्स आणि सोशल कॉमर्सची लाट: पूर्वी लोक जाहिराती पाहून वस्तू खरेदी करत, पण आता ते आपल्या आवडत्या क्रिएटरच्या शिफारसीवर विश्वास ठेवतात. यामुळे ‘इन्फ्लुएन्सर मार्केटिंग’चा मोठा विस्तार झाला असून, थेट सोशल मीडियावरून खरेदी करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालीय.

(२) पर्यटन आणि स्थानिक आदरातिथ्य: ‘ट्रॅव्हल व्लॉगर्स’ दुर्गम आणि अपरिचित ठिकाणांचे व्हिडिओ बनवून त्या ठिकाणांना पर्यटन नकाशावर आणतात. यामुळे स्थानिक होमस्टे, हॉटेल्स आणि गाईड्सच्या व्यवसायात चांगलीच वाढ होताना दिसते.

(३) शिक्षण आणि एड-टेक: 

कठीण अशा वैज्ञानिक संकल्पना किंवा कोडिंगसारखे विषय सोप्या भाषेत सांगणाऱ्या एजुकेशनल क्रिएटर्समुळे शिक्षणाचे लोकशाहीकरण झालेय. यामुळे औपचारिक शिक्षण संस्थांच्या पलीकडे जाऊन शिकण्याची एक नवीन व्यवस्था उपलब्ध झालीय.

(४) प्रादेशिक भाषांमधील क्रांती:

मराठी, तमिळ, बंगाली अशा स्थानिक भाषांमधील क्रिएटर्सना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, स्थानिक ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झालेय.

(५) तंत्रज्ञान आणि उपकरणे: 

क्रिएटर्सच्या वाढत्या संख्येमुळे कॅमेरे, मायक्रोफोन्स, लायटिंग गियर, हाय-एंड लॅपटॉप्स आणि व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मागणीत मोठी वाढ झालीय. यामुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या महसुलातही भर पडलीय.

(६) फिनटेक: 

क्रिएटर्स आता मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असल्याने त्यांच्यासाठी विशेष ‘पेमेंट गेटवे’, इन्व्हॉइसिंग टूल्स आणि परकीय चलन व्यवस्थापनासाठीची नवीन आर्थिक उत्पादने फिनटेक कंपन्यांनी विकसित करायला सुरुवात केलीय. क्रिएटर्सना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ‘क्रिएटर-सेंट्रिक’ बँकिंग प्रारुप (मॉडेल्स) उभी राहत आहेत.

(७) एआय स्टार्ट-अप्स: 

क्रिएटर्सना त्यांचा डाटा व्यवस्थापित करण्यासाठी, व्हिडिओ संपादित करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे विश्लेषण करण्यासाठी प्रगत सॉफ्टवेअरची गरज असते. यामुळे भारतातील अनेक स्टार्ट-अप्स क्रिएटर्ससाठी साधने तयार करत आहेत. तसेच, एआय स्टार्ट-अप्स हे स्क्रिप्ट लेखन, आवाज बदलणे आणि मजकुराचे इतर भाषांत भाषांतर करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

 (८) रिटेल: 

रिटेल क्षेत्रात आता ‘थेट ग्राहकांपर्यंत’ पोहोचण्यासाठी क्रिएटर्सचा वापर केला जातो. अनेक क्रिएटर्स स्वतःचे ब्रँड्स (उदा. फॅशन, सौंदर्य प्रसाधने किंवा खाद्यपदार्थ) मार्केटमध्ये आणत आहेत. यामुळे पारंपारिक रिटेल साखळीत मोठी क्रांती घडताना दिसतेय.

(९) स्किलिंग इंडस्ट्री: 

क्रिएटर इकॉनॉमीमुळे कौशल्य विकासाची एक नवी बाजारपेठ तयार झालीय. केवळ व्हिडिओ बनवणेच नव्हे, तर डिजिटल मार्केटिंग, एडिटिंग, स्टोरीटेलिंग आणि कम्युनिटी मॅनेजमेंट शिकवणाऱ्या संस्थांना मोठी मागणी आहे. हे क्षेत्र तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करतेच शिवाय स्वयंरोजगाराच्या विपुल संधीही मिळवून देते.

 (१०) प्रशासन: 

सरकार आता आपली धोरणे आणि योजना सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘क्रिएटर्स’ची मदत घेत आहेत. सरकारी उपक्रम प्रभावीपणे लोकांपर्यंत नेण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी ‘इन्फ्लुएन्सर मार्केटिंग’चा वापर प्रशासकीय स्तरावर केला जातो.

सुरेश वांदिले