डिजिटल अर्थव्यवस्थेला गती
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेट रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्रात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, सप्टेंबर २०२५ मध्ये “महाराष्ट्र एव्हीजीसी-एक्सआर पॉलिसी २०२५” हे धोरण शासनानं जाहीर केलं. या क्षेत्रात जागतिक पातळीवर एक महत्वाची ‘सॉफ्टपॉवर’ करण्याचा निर्धार शासनानं केला आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश राज्यात ‘डिजिटल क्रिएटिव्ह इंडस्ट्री हब’ तयार करणं हा आहे. त्याव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाईल. या अनुषंगाने पुढील २० वर्षांत सुमारे ५०,००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, २ लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. यासाठी राज्य सरकारने ३,२६८ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. या धोरणामुळे महाराष्ट्रातील तरुणांना अॅनिमेशन, गेम डिझाइन, व्हिज्युअल इफेक्ट्स, एक्सटेंडेड रिॲलिटी तंत्रज्ञान यामध्ये प्रशिक्षण, स्टार्टअप्स आणि जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. तरुणांसाठी नवीन करिअर पर्याय उघडले जातील. हे धोरण महाराष्ट्राच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देईल.
काही वैशिष्ट्ये
(१) शाळा, महाविद्यालयं आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये एव्हीजीसी-एक्सआर अभ्यासक्रम सुरू केले जातील, (२) इंडस्ट्री-ॲकॅडेमिया कोलॅबरेशन (उद्योग-शैक्षणिक संस्था सहकार्य) द्वारे व्यावसायिक कौशल्यं विकसित केली जातील. शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिप्स (आंतरवासिता) उपलब्ध करून दिल्या जातील, (३) स्टुडिओ, प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप्स एकत्र काम करू शकतील, असे एव्हीजीसी-एक्स आर क्लस्टर्स तयार केले जातील, (४) सह-कार्यकारी जागा (को-वर्किंग स्पेस), स्टुडिओ, एक्सटेंडेड रिॲलिटी प्रयोगशाळा यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, (५) स्टार्टअप्ससाठी अनुदान, कर सवलती आणि मार्केटिंग सहाय्य दिलं जाईल. (६) मूळ कथा, पात्र, गेम्स यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) निर्मितीला प्रोत्साहन दिलं जाईल, ७) जागतिक कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं जाईल, (८) एव्हीजीसी-एक्सआर प्रदर्शनी, मेळावे आणि स्पर्धा आयोजित करून जागतिक नेटवर्किंगला (संपर्कसाखळी) चालना दिली जाईल, (९) महिलांसाठी विशेष प्रशिक्षण योजना राबवल्या जातील. (१०) ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रे सुरू करून समावेशक विकासाला चालना दिली जाईल, (११) मुंबई, नागपूर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर/ सातारा येथे एव्हीजीसी पार्क उभारले जातील, (१२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या धर्तिवर मुंबई येथे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापन करुन, त्याला सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये परावर्तीत केलं जाईल, (१३) डिजिटल स्टुडियो आणि व्हर्च्युअल (आभासी) प्रॉडक्शन (निर्मिती) स्टुडियोची उपलब्धता करुन दिली जाईल, (१४) बौध्दिक संपदा (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी) डिजिटल व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
००००
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी)-
ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केली असून त्यास महाराष्ट्र शासन, फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री), सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांचं सक्रिय पाठबळ मिळालय. ही संस्था आयआयटी आणि आयआयएम या संस्थांच्या प्रारुपानुसार विकसित केली जाईल.
या संस्थेमार्फत अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी- एक्सआर) या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण – प्रशिक्षण दिलं जाईल. एव्हीजीसी- एक्सआर क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील मुख्य संस्था म्हणून, आयआयसीटी कार्य करेल. याक्षेत्रातील उद्योग, तंत्रज्ञान आणि शासकीय धोरणे यांना एकत्र आणेल. संस्थेतील अभ्यासक्रमांव्दारे प्रतिभावंत तरुणांना घडवणं, नवनवीन संशोधनाला चालना देणं आणि ‘क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ च्या जागतिक स्पर्धेत भारताचं स्थान अधिक बळकट करणं, हे या संस्थेचं मुख्य ध्येय आहे.
या संस्थेमार्फत अंडर ग्रॅज्युएट डिल्पोमा (पदवीपूर्व पदविका), डिप्लोमा (पदविका) आणि सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांव्दारे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्याचं सखोल ज्ञान प्रदान केलं जातं. त्याचबरोबर, त्यांना रोजगारक्षमही बनवलं जातं. विविध विषय घटकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमधील कलात्मकता आणि तांत्रिक कौशल्य यांचा मेळ घातला जातो. प्रत्यक्ष प्रकल्प आणि प्रशिक्षणाव्दारे कामाचा अनुभव दिला जातो. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील बारकावे शिकवले जातात. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. या संस्थेत उच्च दर्जाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहेत. या क्षेत्रातील नामांकित स्टुडिओ आणि कंपन्यांसोबत करार करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुलभतेनं रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
अभ्यासक्रम (कालावधी – दोन वर्षे)
(१) अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲनिमेशन फिल्म डिझाइन- या अभ्यासक्रमाव्दारे कथाकार (स्टोरीटेलर्स), डिझायनर्स आणि डिजिटल आर्टिस्ट्ना प्रगत प्रशिक्षण दिलं जातं. कला, तंत्रज्ञान आणि कथा सांगण्याची शैली यांचा सुरेख संगम, हा अभ्यासक्रम साधतो. विद्यार्थ्यांना ॲनिमेशन निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. संकल्पना मांडण्यापासून ते स्टोरीबोर्डिंग, कॅरेक्टर डिझाइन, थ्रीडी मॉडेलिंग आणि पोस्ट-प्रोडक्शनपर्यंतच्या सर्व टप्प्यांचं प्रशिक्षण दिलं जातं.
व्हिज्युअल स्टोरीटेलिंगची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असून त्याव्दारे पारंपरिक कला आणि डिझाइन्सच्या विविध पैलुंची भक्कम पायाभरणी केली जाते. चित्रपट, टेलिव्हिजन, गेम्स आणि उदयोन्मुख मीडिया प्लॅटफॉर्मसाठी उच्च दर्जाच्या व्हिज्युअल सामग्रीच्या निर्मितीचं सखोल ज्ञान प्रदान केलं जातं. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टानुसार स्पेशलायझेशनचा विषय निवडण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना ॲनिमेशन आणि डिझाइनच्या एका विशिष्ट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करता येतं.
करिअर संधी –
टुडी/थ्रीडी अॅनिमेटर– कॅरेक्टर किंवा क्रिएचर अॅनिमेटर (पात्रांना जिवंत करणारा तंत्रज्ञ)/ कॉमिक आर्टिस्ट / स्टोरीबोर्ड आर्टिस्ट, टेक्निकल आर्टिस्ट / लायटिंग आर्टिस्ट (प्रकाशयोजना तज्ज्ञ)/ मोशन ग्राफिक्स डिझाइनर/ प्री-प्रॉडक्शन आर्टिस्ट (निर्मितीपूर्व तयारी करणारा तंत्रज्ञ)/ व्हिज्युअल स्टोरीटेलर / आयपी क्रिएटर (बौद्धिक संपदा निर्माता)/ प्रॉडक्शन को-ऑर्डिनेटर
(२) अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॲक्टिव्ह व्हिडिओ गेम डिझाइन- या अभ्यासक्रमात प्रकल्प-आधारित शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सहभाग यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थी स्वतंत्रपणे तसेच सांघिक प्रकल्पांवर काम करतात. जागतिक गेमिंग आणि इंटरअॅक्टिव्ह मीडिया उद्योगात टिकून राहण्यासाठी आवश्यक सर्जनशील आणि तांत्रिक कौशल्ये प्रदान केली जातात. यासोबतच व्यावसायिक संवाद, सांघिक कार्य आणि उद्योजकतेची मानसिकता रुजवली जाते. पात्र रचनेतील कलात्मक पैलू, कोडिंग आणि इंजिन डेव्हलपमेंटमधील तांत्रिक अचूकता यांचं ज्ञान प्रदान केलं जातं.
करिअर संधी –
कॅरेक्टर मॉडेल: पात्रांना डिजिटल रूप देणारा तंत्रज्ञ/ एन्व्हायर्नमेंट आर्टिस्ट: खेळातील आभासी जग आणि वातावरण निर्माण करणारा तंत्रज्ञ/ टेक्निकल आर्टिस्ट: कला आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारा तंत्रज्ञ/ प्रिव्हिज आर्टिस्ट : अॅनिमेशन आणि चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाचा दुवा. प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी संपूर्ण चित्रपट किंवा एखादे दृष्य संगणकावर कच्च्या स्वरूपात (रफ व्हर्जन) तयार करणारा तंत्रज्ञ/गेम प्रोड्युसर: गेम निर्मितीचे संपूर्ण व्यवस्थापन पाहणारा निर्माता/ प्रोडक्शन को-ऑर्डिनेटर: निर्मिती प्रक्रियेत ताळमेळ राखणारा समन्वयक/ गेम क्रिएटर: संपूर्ण गेमची संकल्पना आणि निर्मिती करणारा निर्माता.
(३) अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आर्ट ॲण्ड सायंस ऑफ पोस्ट प्रॉडक्शन ॲण्ड इफेक्ट्स- हा अभ्यासक्रम सर्जनशील समस्या निवारण आणि कथा सांगण्याच्या कलेवर भर देतो. चित्रपट, दूरदर्शन आणि नवीन प्रसारमाध्यमांसाठी विद्यार्थी दृश्यात्मकरीत्या कथांची रचना आणि त्याचं सादरीकरण करू शकतात.
जागतिक दर्जाच्या ‘पोस्ट प्रॉडक्शन‘ आणि ‘व्हर्च्युअल प्रॉडक्शन‘ उद्योगात यशस्वी होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमाव्दारे ‘पोस्ट प्रॉडक्शन‘मध्ये विद्यार्थ्यी पारंगत होतात. एडिटिंग (संपादन), कलर ग्रेडिंग, साऊंड मिक्सिंग आणि चित्रपट निर्मितीच्या इतर तंत्रांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.
करिअर संधी-
पोस्ट प्रॉडक्शन मॅनेजर /एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर- पोस्ट प्रॉडक्शन/ स्टुडिओ मॅनेजर/ वर्कफ्लो स्पेशालिस्ट/ प्रेप-आर्टिस्ट/ मॅच मूव्ह आणि ट्रॅकिंग आर्टिस्ट/ लायटिंग आर्टिस्ट/ रिअल-टाइम आर्टिस्ट/ प्रिव्हिज आर्टिस्ट/ व्हीएफएक्स प्रोड्युसर/ व्हीएफएक्स को-ऑर्डिनेटर/ व्हीएफक्स ऑनसेट को-ऑर्डिनेटर
संपर्क- चौथा माळा, फेज टू बिल्डिंग, एनएफडीसी कॅम्पस, २४ पेडर रोड, आयटी कॉलनी, कंबाला हिल, मुंबई- ४०००२६, संकेतस्थळ: https://www.iict.org, ईमेल: info@iict.org किंवा admissions@iict.org
सुरेश वांदिले