पादत्राणे डिझाइन आणि निर्मिती (पूर्वार्ध)
महाराष्ट्रीय पालक आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या रोडमॅपमध्ये अभावनेच येणारी एक महत्त्वाची संस्था म्हणजे, फूटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट (एफडीडीआय). या संस्थेत पादत्राणे डिझाइन आणि निर्मिती, चामड्यांपासून बनणारी वस्त्रप्रावरणे, ॲक्सेसरीज अशा रोजगारक्षम विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी असे अभ्यासक्रम चालवले जातात. जवळपास शंभर टक्के प्लेसमेंट असलेल्या या संस्थेत मात्र अतिशय नगण्य संख्येने मराठी मुले प्रवेश घेतात.
इतर महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश प्रक्रिया संपल्याने त्या संस्थांमध्ये यंदा प्रवेशाची संधी हुकली आहे. मात्र एफडीडीआय या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेत सामील होण्याची संधी अद्यापही आहे.
संधी साधा
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट (एआयएसटी)’ घेतली जाते. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. ही परीक्षा देशभरातील अनेक शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे.
देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांना संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी (१) पाटणा, (२) कोलकाता, (३) जोधपूर, (४) अंकलेश्वर (सुरत), (५) गुणा, (६) छिंदवाडा, (७) नॉयडा, (८) फुरसतगंज (रायबरेली), (९) रोहतक, (१०) बनूर (चंदिगढ), (११) हैदराबाद, (१२) चेन्नई या १२ शहरांमध्ये कॅम्पस सुरू करण्यात आले आहेत. या सर्व केंद्रांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावत सुविधा, सुसज्ज ग्रंथालये, आंतरराष्ट्रीय परीक्षण केंद्रे, वसतीगृहाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
परीक्षा पद्धती
पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा पॅटर्न पुढीलप्रमाणे- परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. एकूण २०० गुणांचे १२६ प्रश्न विचारले जातात.
(१) सेक्शन ए – ॲनॅलिटिकल ॲबिलिटी (विश्लेषणात्मक क्षमता चाचणी) – एकूण प्रश्न २५ (गुण २५), (२) सेक्शन बी – डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (अभिकल्प कल चाचणी) – एकूण प्रश्न १ (गुण ५०), (३) सेक्शन सी – सामान्य अध्ययन (जनरल अवेअरनेस) – एकूण प्रश्न ३५ (गुण ३५),
(४) सेक्शन डी – उताऱ्यावरील प्रश्न (कॉम्प्रिहेन्शन) – एकूण प्रश्न २५ (गुण २५) आणि इंग्रजी व्याकरण व त्याचा उपयोग – एकूण प्रश्न १५ (गुण १५),
(५) सेक्शन इ – बिझिनेस ॲप्टिट्यूड टेस्ट (व्यवसाय कल चाचणी) – एकूण प्रश्न २५ (गुण ५०).
बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ए, बी, सी आणि डी या सेक्शनमधील प्रश्न सोडवावे लागतील. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ए, सी, डी आणि इ या सेक्शनमधील प्रश्न सोडवावे लागतील.
संस्थेचे महत्त्व
पादत्राणे निर्मिती, डिझाइन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा सातत्याने पुरवठा केल्यानेच या क्षेत्रात भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम एफडीडीआयने सुरू केले आहेत. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संस्थेची स्थापना केली. या संस्थेला २०१७ साली ‘इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’चा दर्जा देण्यात आला. पादत्राणे निर्मिती क्षेत्रात असा दर्जा मिळणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. पादत्राणे आणि चामडी वस्तुनिर्मिती करणाऱ्या जगातील काही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांनी या संस्थेला मान्यता दिली आहे.
पादत्राणे आणि चामडी वस्तुनिर्मितीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये या संस्थेचे विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही संस्था या उद्योगांच्या गरजा, आवश्यकता आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बदलते प्रवाह लक्षात घेऊन अभ्यासक्रमांचे सातत्याने नूतनीकरण करत असते. पादत्राणे निर्मिती, चामड्यापासून बनणारी वस्त्रप्रावरणे आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे अभ्यासक्रम चालवणारी ही जगातील एक प्रमुख संस्था होय.
पादत्राणे उद्योगासोबत विविध चामडी वस्तू, वस्त्रप्रावरणे, हँडबॅग्ज, प्रवासी बॅग्ज वा आधुनिक जीवनशैलीस लागणाऱ्या चामडी वस्तू यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करते. भारतीय पादत्राणे उद्योगास आंतरराष्ट्रीय स्पर्धा करता येणे शक्य व्हावे, हा हेतू ठेवून अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे.
अभ्यासक्रम
या संस्थेने पुढील पदवी स्तरावरील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
१) बॅचलर ऑफ डिझाइन इन फूटवेअर डिझाइन अँड प्रॉडक्शन – हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना (१) मार्केटिंग, (२) डिझाइन, (३) मॅन्युफॅक्चरिंग, (४) रिटेलिंग, (५) मर्कंडायझिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळतात. यामध्ये (१) फॅशन फोरकास्टर, (२) डेव्हलपर, (३) कॉम्प्युटर एडेड स्पेशलिस्ट, डिझाइन कन्सल्टंट, (४) स्ट्रॅटेजी प्लॅनर, (५) व्हिज्युअल मर्कंडायझर, (६) डिझायनर या संधींचा समावेश आहे.
२) बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर गुड्स अँड ॲक्सेसरी डिझाइन – हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना (१) डिझायनर, (२) मर्कंडायझर आणि (३) प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह अशा करिअर संधी मिळतात. या अभ्यासक्रमांतर्गत (१) डिझाइन प्रोसेस आणि मेथॉडॉलॉजी, (२) फॅशन ट्रेंड्स, (३) फोरकास्ट आणि ॲनॅलिसिस, (४) डिझाइन कंसेप्च्युअलायझेशन आणि रेंज बिल्डिंग, (५) डिझाइन प्रॉडक्ट्स इन लेदर गुड्स, (६) गार्मेंट्स आणि ॲक्सेसरी कलेक्शन डेव्हलपमेंट, (७) लेदर गुड्स आणि गार्मेंट डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक, (८) कॉम्प्युटर एडेड डिझाइन, (९) बिझिनेस कम्युनिकेशन आणि प्रॉडक्शन डॉक्युमेंटेशन, (१०) प्रॉडक्ट फोटोग्राफी, (११) क्लासरूम आणि इंडस्ट्रीयल डिझाइन प्रोजेक्ट आदी विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची संधी दिली जाते.
३) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझायनिंग – हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यास पुढील करिअर संधी मिळतात – (१) कन्सल्टंट, (२) पर्सनल स्टायलिस्ट, (३) टेक्निकल डिझायनर, (४) ग्राफिक डिझायनर, (५) फॅशन जर्नलिस्ट, (६) फ्रीलान्स डिझायनर, (७) फॅशन मर्कंडायझर, (८) व्हिज्युअल मर्कंडायझर, (९) क्वालिटी कंट्रोलर, (१०) फॅशन कोऑर्डिनेटर.
उपरोक्त तिन्ही अभ्यासक्रमाचा कालावधी – प्रत्येकी चार वर्षे, अर्हता – कोणत्याही ज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण. (यंदा १२वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतात.)
फॅशन वस्तू विक्री व्यवस्थापन
भारतातील रिटेल (किराणा किंवा किरकोळ) उद्योगाची वाढ झपाट्याने होत असून या क्षेत्रामुळे रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होत आहेत. २०३० पर्यंत या क्षेत्रात अडीच कोटीहून अधिक रोजगार संधी निर्माण होतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. २०३० पर्यंत भारतातील ऑनलाइन रिटेल व्यापार हा ३२५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वार्षिक वाटा ११ टक्के आहे. भारतीय रिटेल उद्योगात अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
या संस्थेने, रिटेल आणि फॅशन वस्तू विक्री व्यवस्थापन या क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी, बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन रिटेल अँड फॅशन मर्कंडाइज, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी – चार वर्षे. अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम नॉयडा, पाटणा, हैदराबाद आणि चंदिगढ येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या प्रत्येक कॅम्पससाठी प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
करिअर संधी – (१) रिटेल स्टोअर मर्कंडायझिंग किंवा डिस्प्ले डिपार्टमेंट, (२) व्हिज्युअल मर्कंडायझिंग आणि सप्लाय कंपनी, (३) रिटेल मर्कंडायझिंग, बायर्स, कॅटेगरी मॅनेजर, (४) रिटेल ऑपरेशन – एरिया मॅनेजर, रिटेल मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, (५) लक्झरी ब्रँड्स – स्टोअर मॅनेजर, (६) ई-कॉमर्स – बिझिनेस मॅनेजर, कॅटेगरी मॅनेजर.
स्पेशलायझेशन
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीबीए अंतर्गत तीन स्पेशलायझेशन सुरू करण्यात आले आहेत:
(१) बीबीए – सप्लाय चेन मॅनेजमेंट: कोणत्याही व्यवसायाचा कणा पुरवठा साखळी असते. वस्तू कारखान्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे कोशल्य आणि व्यवस्थापकीय तंत्रे यात शिकवली जातात. लॉजिस्टिक प्लॅनर, इन्व्हेंटरी मॅनेजर आणि वेअरहाऊस मॅनेजर म्हणून करिअर करता येते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांत हे कौशल्य प्राप्त केलेल्या मनुष्यबळास मोठी मागणी आहे. (अपूर्ण)
सुरेश वांदिले