पादत्राणे डिझाइन आणि निर्मिती (उत्तरार्ध)
फुटवेअर डेव्हलपमेंट ॲण्ड डिझाइन या संस्थेने यंदापासून पुढील नवे बीबीए अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे सगळे अभ्यासक्रम रोजगारक्षम असून पादत्राणे निर्मिती आणि डिझाइन क्षेत्राशी संबंधित उद्योगाच्या गरजा प्रभावीरित्या भागवू शकतात.
(१) बीबीए – डाटा सायन्स ॲनॅलिटिक्स : सध्याचा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय व्यापाराध्ये ‘डाटा’वर अत्याधिक भर दिला जातो. ग्राहकांचा कल ओळखून भविष्यातील मागणीचा अंदाज वर्तवण्यासाठी ‘डाटा’चा वापर केला जातो. या माहितीसाठ्याचे सखोल विश्लेषण करण्याचे तंत्र यात शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर बिझनेस ॲनॅलिस्ट, मार्केट रिसर्च ॲनॅलिस्ट आणि डाटा व्हिज्युअलायझेशन स्पेशॅलिस्ट अशा संधी मिळतात.
(२) बीबीए – ग्लोबल आणि लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट: आंतरराष्ट्रीय प्रीमियम ब्रँड्स (उदा. रोलेक्स, अर्मानी) यांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य प्रदान केले जाते. ब्रँड मॅनेजर, लक्झरी रिटेल मॅनेजर आणि एचएनआय (हाय नेट इन्कम) कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर अशा संधी मिळतात.
नवीन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये –
(१) अभ्यासक्रमात एआय, डाटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंगवर अधिक भर देण्यात आला आहे. (२) प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील प्रकल्प आणि उद्योजकीय मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले जाईल. (३) पर्यावरणपूरक व्यवसाय पद्धती आणि नैतिक व्यवसायाची तत्त्वे प्राधान्याने शिकवली जातील.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची सवलत: ज्या विद्यार्थ्यांनी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेची डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट (डीएटी), अंडर ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन(यूसीइइडी) अशा सारख्या प्रवेश परीक्षा दिल्या असल्यास, त्यांचे गुण प्रवेशासाठी विचारात घेतले जाऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या चाळणी परीक्षेपासून सूट मिळते. मात्र त्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
लॅटरल एंट्री (थेट प्रवेश): ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयात मान्यताप्राप्त संस्थेतून ३ वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असल्यास, त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याची संधी दिली जाते.
एमबीए
या संस्थेमार्फत, रिटेल अँड फॅशन मर्कंडाइज विषयातील एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुढील स्पेशलायझेशन करता येतात – (१) रिटेल टेक्नॉलॉजी, (२) निश (Niche) टेक्नॉलॉजी, (३) मर्कंडायझिंग, (४) व्हिज्युअल मर्कंडायझिंग, (५) ऑपरेशन्स.
करिअर संधी– (१) रिटेल मॅनेजर, (२) एरिया मॅनेजर, (३) ऑपरेशन मॅनेजर, (४) डिपार्टमेंट मॅनेजर, (५) कॅटेगरी मॅनेजर, (६) बायर, (७) रिटेल मर्कंडायझर, (८) व्हिज्युअल मर्कंडायझर. या संधी पुढील कंपन्यांध्ये मिळू शकतात- (१) बाटा, (२) रिलायन्स ब्रँड, (३) शॉपर्स स्टॉप, (४) पँटलून्स, (५) आदित्य बिर्ला ग्रुप, (६) लाइफस्टाइल, (७) बरबेरी, (८) अर्मानी, (९) प्युमा, (१०) झारा, (११) बेनेटॉन, (१२) टॉमी हिलफिगर
हा अभ्यासक्रम नॉयडा, पाटणा, हैदराबाद, छिंदवाडा आणि चंदिगढ येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या प्रत्येक कॅम्पससाठी प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो.
निवड प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट, घेतली जाते. या परीक्षेत (१) विश्लेषणात्मक क्षमता चाचणी (ॲनॅलिटिकल ॲबिलिटी) – एकूण प्रश्न २५ (गुण ५०), (२) इंग्रजी भाषा आणि विश्लेषण क्षमता चाचणी (इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड ॲनॅलिटिकल ॲबिलिटी) – एकूण प्रश्न ५० (गुण ५०), (३) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स) – एकूण प्रश्न ५० (गुण ५०) आणि (४) मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट / डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट – एकूण प्रश्न ५० (गुण ५०). निगेटिव्ह मार्किंग नाही. या परीक्षेत २०० गुणांचे १७५ प्रश्न विचारले जातात.
मास्टर ऑफ डिझाइन
डिझाइन किंवा संबंधित विषयात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात सखोल तांत्रिक ज्ञान आणि सर्जनशील कौशल्य मिळवायचे असल्यास त्यांच्यासाठी ‘मास्टर ऑफ डिझाइन- फूटवेअर डिझाइन आणि प्रॉडक्शन ‘ हा उत्कृष्ट पर्याय ठरतो.
वैशिष्ट्ये: (१) पादत्राणे निर्मितीमधील प्रगत तंत्रज्ञान, नवीन साहित्याचा वापर आणि इर्गोनॉमिक्स (मानवी सुसंगत रचना) यावर भर दिला जातो. (२) जागतिक बाजारपेठेतील बदलत्या फॅशननुसार नवीन उत्पादनांची संकल्पना कशी मांडावी आणि ती प्रत्यक्षात कशी उतरवावी, याचे प्रगत शिक्षण दिले जाते. (३) विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी दिली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी: २ वर्षे.
करिअर संधी: १) सिनियर डिझाइन कन्सल्टंट, २) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, ३) डिझाइन स्टुडिओ हेड , ४) ट्रेंड फोरकास्टर ,५) फॅशन स्ट्रेटेजिस्ट
निवड प्रक्रिया:– या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट’ घेतली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्याची डिझाइन समज, विश्लेषणात्मक क्षमता आणि सर्जनशीलता तपासली जाते. हा अभ्यासक्रम नोएडा आणि फुरसतगंज कॅम्पसमध्ये शिकवला जातो..
पीएचडी अभ्यासक्रम:
ज्या विद्यार्थ्यांना पादत्राणे निर्मिती, डिझाइन आणि रिटेल व्यवस्थापन या विषयात जागतिक दर्जाचे संशोधन करण्याची इच्छा आहे, त्यांना अशी संधी उपलब्ध करुन दिली जाते. या उद्योगातील गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधणे, नवीन साहित्याचा शोध लावणे आणि उत्पादनांची कार्यक्षमता वाढवणे यावर यात भर दिला जातो.
चार मुख्य क्षेत्रांत पीएचडी करता येते : १) पादत्राणे डिझाइन आणि उत्पादन, २) फॅशन डिझाइन,३) रिटेल आणि फॅशन मर्कंडाइज, ४) लेदर लाइफस्टाइल आणि प्रॉडक्ट डिझाइन
संस्थेच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये उपलब्ध असलेले ‘इंडस्ट्री ४.०’ तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सस्टेनेबिलिटी आणि मटेरिअल इनोव्हेशन यांसारख्या प्रगत सुविधांचा वापर विद्यार्थ्यांना संशोधनासाठी करता येतो.
आंतरराष्ट्रीय संधी: विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत झालेल्या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुरु असलेल्या प्रकल्पांवर काम करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची संधी मिळते.
करिअर संधी: पीएचडी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठ्या उद्योग किंवा कंपन्यांमध्ये संशोधन प्रमुख, वरिष्ठ सल्लागार, अकॅडेमिक्स (प्राध्यापक), इनोव्हेशन लीडर म्हणून संधी मिळू शकते. हे विद्यार्थी स्वतःचे स्टार्टअप देखील सुरू करू शकतात.
अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात.
यंदापासून सुरू झालेले पदविका अभ्यासक्रम
बदलत्या जागतिक बाजारपेठेची गरज आणि उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ लक्षात घेऊन, एफडीडीआयने यंदापासून एक वर्षं कालावधीचे पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कमी वेळात विशिष्ट तंत्र आणि कौशल्य आत्मसात करून रोजगाराची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील. यात प्रात्यक्षिक, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता यावर विशेष भर देण्यात आला आहे.
अभ्यासक्रम-
१) डिप्लोमा इन फूटवेअर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी– हा अभ्यासक्रम केल्यावर उत्पादन पर्यवेक्षक, क्वालिटी कंट्रोलर, पॅटर्न इंजिनिअर किंवा डिझाइन डेव्हलपमेंट भूमिका अशा संधी मिळतात.(कॅम्पस–नॉयडा, रोहतक, छिंदवाडा, फुरसतगंज, चेन्नई, हैदराबाद, पटना, जोधपूर, गुणा, अंकलेश्वर, कोलकाता, चंदीगढ), २) डिप्लोमा इन फॅशन डिझाइन– हा अभ्यासक्रम केल्यावर – फॅशन डिझायनर, ॲपेरल प्रॉडक्शन सुपरवायझर, पॅटर्न मेकर या संधी मिळतात. स्वतःचे फॅशन ब्रँड/बुटिक सुरु करता येते.(कॅम्पस- नॉयडा, चेन्नई, हैदराबाद) ३) डिप्लोमा इन लेदर ॲक्सेसरीज अँड बॅग डेव्हलपमेंट– हा अभ्यासक्रम केल्यावर लेदर बॅग/ॲक्सेसरीज उद्योगात सॅम्पल कोऑर्डिनेटर, प्रॉडक्शन सुपरवायझर, एक्सपोर्ट हाऊस डिझाइनर अशा संधी मिळतात. स्वतःचा स्टार्टअप सुरू करता येतो.(कॅम्पस–नॉयडा, रोहतक, छिंदवाडा, फुरसतगंज, चेन्नई, हैदराबाद, पटना, जोधपूर, गुणा, अंकलेश्वर, कोलकाता, चंदीगढ) ४) डिप्लोमा इन रिटेल फॅशन मॅनेजमेंट– हा अभ्यासक्रम केल्यावर रिटेल स्टोअर मॅनेजमेंट, फॅशन मर्चंडायझिंग, कस्टमर सर्व्हिस किंवा ई-कॉमर्स अशा संधी मिळतात.(कॅम्पस–नॉयडा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता)
अर्हता– १० किंवा १२वी उत्तीर्ण.या अभ्यासक्रमांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वानुसार प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम नॉयडा, हैदराबाद, चेन्नई, रोहतक, छिंदवाडा, फुरसतगंज, जोधपूर, अंकलेश्वर, कोलकाता, चंदीगढ, गुणा, पटना या कॅम्पसमध्ये शिकवले जातात.
वैशिष्ट्ये: या अभ्यासक्रमात ८० टक्के भर हा प्रात्यक्षिकांवर दिला जातो. उद्योगातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
संपर्क – ई-मेल: admission@fddiindia.com, संकेतस्थळ: www.fddiindia.com
सुरेश वांदिले