मार्ग यशाचा-१९ –– रोबोटिक्स अँड मेकाट्रॉनिक्स
दहावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना नव्या वाटेने जायचे आहे, त्यांच्यासाठी ‘डिप्लोमा इन रोबोटिक्स अँड मेकाट्रॉनिक्स’ हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रोबोटिक्स आणि स्वयंचलन (ऑटोमेशन) चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने, हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना ‘डिजीटल सिस्टिम डिझाइन इंजिनिअर किंवा अशा स्वरुपाच्या रोजगार संधी मिळू शकतात. या अभ्यासक्रमात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि कंट्रोल सिस्टिम्स विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. हा अभ्यासक्रम इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरमेंट्स (आयडीइएमआय) या संस्थेने सुरु केला आहे. ही संस्था भारत सरकारच्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाने सुरु केली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
(१) विद्यार्थ्यांना मेकॉट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समधील समस्या सोडवण्याचे कौशल्य शिकवले जाते, (२) मेकाट्रॉनिक्स प्रणालींचे डिझाइन, नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास शिकवले जाते. (३) मेकॅनिकल, पॉवर, कंट्रोल आणि एम्बेडेड सिस्टिम्समधील तज्ज्ञांसोबत काम करण्याचे कौशल्य विकसित केले जाते, (४) विविध तांत्रिक प्रकल्पांचे एकत्रीकरण आणि चाचणी करण्याचे शिक्षण दिले जाते.
काय शिकाल?
(१) इंजिनिअरिंग– गणित, भौतिकशास्त्र, अप्लाइड मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, (२) टेक्नॉलॉजी– रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी आणि सीएडी-कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ सीएएम-कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चयुरिंग, (३) ऑटोमेशन– पीएलसी (प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर- एक प्रकारचा औद्योगिक संगणक. कारखान्यातील यंत्रांना नेमके काय आणि कधी काम करायचे आहे, याचे ‘प्रोग्रामिंग’ याव्दारे केले जाते. ), स्काडा (सुपरव्हायजरी कंट्रोल ॲण्ड डाटा ॲक्विझिशन- पर्यवेक्षकीय नियंत्रण आणि डाटा संपादन- या सॉफ्टवेअर प्रणालीव्दारे कारखान्यात बसून किंवा दूरवरुन यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येते, यंत्रणा सुरू-बंद करता येतात आणि सांख्यिकी माहिती (डाटा) गोळा करता येते.), इंडस्ट्रिअल ऑटोमेशन आणि हायड्रोलिक्स (द्रवचलित शास्त्र) व न्यूमॅटिक्स (वायुचलित शास्त्र), (४) इलेक्ट्रॉनिक्स– डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मशीन्स, (५) इतर– व्यावसायिक इंग्रजी, संवाद कौशल्य आणि औद्योगिक व्यवस्थापन.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यानंतर पुढील क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात – (१) नवीन मेकॉट्रॉनिक्स उत्पादनांचे डिझाइन आणि निर्मिती,(२) इलेक्ट्रॉनिक्स, अन्न प्रक्रिया, औषधीनिर्माण आणि विमान वाहतूक उद्योग, (३) ऑटोमेटेड सिस्टिम्स आणि स्मार्ट उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या, (४) तांत्रिक विक्री, विपणन (मार्केटिंग) आणि प्रकल्प व्यवस्थापन
या अभ्यासक्रमाचा कालावधी– ३ वर्षे. वयोमर्यादा- १५ ते १८ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३ वर्षांची सवलत). प्रवेशासाठी संस्थेमार्फत कल चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. या परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हा स्वायत्त स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे.
इतर संस्थांमधील अभ्यासक्रम
(१) इंडो- जर्मन टूल रूम, औरंगाबाद- अभ्यासक्रम – डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, अर्हता– किमान ६० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण (अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ५० टक्के), प्रवेश प्रक्रिया– अखिल भारतीय स्तरावर होणारी प्रवेश परीक्षा, करिअर संधी– मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स आणि सिमेन्स यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मेंटेनन्स आणि ऑटोमेशन विभागात संधी. संपर्क संकेतस्थळ: www.igtr-aur.org
(२) इंडो-डॅनिश टूल रूम जमशेदपूर- अभ्यासक्रम- डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड मेकॉट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, अर्हता– १० वी उत्तीर्ण. कालावधी– ३ वर्षे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. करिअर संधी– इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, सप्लाय चेन आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी. संपर्क संकेतस्थळ: www.idtr.gov.in
(३) इंडो-जर्मन मशिन टूल इंदौर- अभ्यासक्रम- डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, अर्हता: १० वी उत्तीर्ण. कालावधी– ३ वर्षे, अर्हता– किमान ६० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण (अनुसूचित जाती आणि जमाती साठी ५० टक्के), संपर्क संकेतस्थळ- http://igtr-indore.com
(४) इंडो जर्मन टूल अहमदाबाद येथे दोन वर्षे कालावधीचा ‘टेक्निशिअन मेकॅट्रॉनिक्स’ हा अभ्यासक्रम १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. संपर्क संकेतस्थळ- https://igtrahd.com
(४) सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर भुवनेश्वर– अभ्यासक्रम: डिप्लोमा इन मेकॉट्रॉनिक्स ॲण्ड रोबोटिक्स, अर्हता– १० वी, कालावधी– ३ वर्षे, प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे दिला जातो. संपर्क संकेतस्थळ: www.cttc.gov.in
०००००
कौशल्याचे तंत्र
रोजगार किंवा स्वंयरोजागारासाठी उपयुक्त ठरु शकतील असे लघु मुदतीचे कौशल्य निर्मितीला वाव देणारे अभ्यासक्रम इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरमेंट्स या संस्थेत करता येतात. ही संस्था, कौशल्य निर्मितीचे विविध प्रशिक्षण गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहे. हे अभ्यासक्रम, ‘नॅशलन स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनसक्यूएफ)(राष्ट्रीय कौशल्य अर्हता आरखडा) नुसार दिले जाते. यातील कौशल्य प्रशिक्षणाच्या स्तरानुसार एक ते दहा मानांकन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार, प्रशिक्षण आणि पुढील शिक्षणासाठी स्वयंस्पष्ट मार्ग उपलब्ध होतात. या संस्थेच्या लघुमुदतीच्या सगळ्या अभ्यासक्रमांना एनएसक्यूएफ मानांकन मिळाले आहे.
हे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत. (१) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी- सहा महिने, अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इंस्ट्रुमेंटेशन अशा विषयातील अभियांत्रिकी पदविका (एनएसक्यूएफ पातळी- सहा), (२) थ्री डी ॲनिमेशन- माया, कालावधी- सहा महिने, अर्हता- १० वी (एनएसक्यूएफ पातळी पाच), (३) थ्री डी ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्ट, कालावधी- सहा महिने, अर्हता- १२ वी (एनएसक्यूएफ पातळी- सहा), (४) ग्रॅफिक्स ॲण्ड वेब डिझाइन, कालावधी- तीन महिने, अर्हता- १० वी (एनएसक्यूएफ पातळी-पाच), (५) ॲनिमेशेन ॲण्ड मल्टिमीडिया टेक्नॉलॉजी, कालावधी- सहा महिने, अर्हता- १० वी, (एनएसक्यूएफ पातळी-सहा), (६) फिल्म मेकिंग , कम्पोझिटिंग ॲण्ड एडिटिंग, कालावधी – तीन महिने, अर्हता- १२ वी (एनएसक्यूएफ पातळी-पाच), (७) ॲडव्हान्स्ड वेब डिझाइन ॲण्ड ॲनिमेटर, कालावधी- सहा महिने, अर्हता-१० वी (एनएसक्यूएफ पातळी- सहा, (८) मोबाइल रिपेरिंग/ हँडहेल्ड प्रॉडक्टस, कालावधी – तीन महिने, अर्हता- आयटीआय किंवा १२ वी (एनएसक्यूएफ पातळी-पाच, (९) रुम एअर कंडिशनिंग ॲण्ड होम ॲप्लायंसेस, कालावधी- चार महिने, अर्हता-आयटीआय किंवा १२वी ( एनएसक्यूएफ पातळी – पाच), (१०) एलइडी, एलसीडी, प्लाझमा टीव्ही, होम थिएटर रिपेअरिंग, कालावधी- ३ महिने, अर्हता-आयटीआय किंवा १२ वी, (११) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क, कालावधी- सहा महिने, अर्हता- तांत्रिक ज्ञानासह १२ वी किंवा पदविका , (१३) डिप्लोमा इन प्रॉडक्शन/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन पदवी (एनएसक्यूएफ पातळी-सहा),
ज्या अभियंत्यांना नवे कौशल्य शिकून स्वत:ची रोजगार क्षमता वाढवायची असेल, त्यांच्यासाठी या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दीड वर्षाचा आहे.
(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड ॲनिमेशन ॲण्ड फिल्म मेकिंग, अर्हता- आयटी किंवा मल्टिमीडिया मधील पदवी (एनएसक्युएफ पातळी- आठ),(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, अर्हता- प्रॉडक्शन/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन पदवी (एनएसक्युएफ पातळी- आठ), (३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॅड (कॉम्प्युटर एडेड डिझाइन)/ कॅम (कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चुरिंग), अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल किंवा समकक्ष यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी (एनएसक्युएफ पातळी- आठ) ,(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅनिकल प्रॉडक्ट डिझाइन, अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल किंवा समकक्ष यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी.
या अभ्यासक्रमांना प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश या तत्वानुसार प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती संवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक शुल्कातून सूट दिली जाते.
या संस्थेने (साकिनाका मुंबई) येथे विस्तारीत प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात एमएस ऑफिस, टॅली, सी लँग्वेज, सी प्लस प्लस लँग्वेज, कोअर जावा, ॲडव्हान्स्ड एक्सेल हे लघुमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमाचे शुल्क अत्यल्प आहे. संपर्क- साग बॉग, मरोल, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२
पत्ता – स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गाच्या विरुध्द दिशेला, एवेरार्ड नगरबस स्टॉप, सायन, चुनाभट्टी, सायन, मुंबई- ४०००२२, दूरध्वनी- ०२२- २४०५०३०१, संपर्क- ईमेल-training@idemi.org, संकेतस्थळ- idemi.org,
००००
सुरेश वांदिले