मार्ग यशाचा-२१ –उत्तम भविष्य डिझाइन करा….
दि.२१ डिसेंबर २०२५ ला काय झाले? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय द्याल? जगात फार तर पाच- दहा हजार मुले या दिवशी जन्मली असतील. कुठे तरी पाच-पन्नास अपघात झाले असतील. पाच पन्नास ठिकाणी गोळीबार झाला असेल, असे साधारणत: सांगता येईल. पण, विद्यार्थ्यांच्या दृष्टिने हा महत्वाचा दिवस होता. कारण यादिवशी एका अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशाची चाळणी परीक्षा देशभरातील अनेक केंद्रावर पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि मुंबई केंद्राचा समावेश होता. तुमच्या पैकी २१ डिसेंबरला किती जणांनी ही परीक्षा दिली? शक्यता तशी कमीच असू शकते, असा प्रस्तुत लेखकाचा अनुभव सांगतो. समजा ही परीक्षा अनेकांनी दिली असल्यास आनंदच आहे. कारण या परीक्षेचा संबंध हा कालच्या लेखातील एका प्रमुख संस्थेतील प्रवेशाशी आहे. ही संस्था आहे, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी). या संस्थेतील गेमिंग विषयाशी संबंधित पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासंदर्भात काल सविस्तर सांगितले. जर विद्यार्थ्यांनी २१ डिसेंबरला ही परीक्षा दिलीच नसल्यास या अभ्यासक्रमासाठी २०२६ च्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाचे व्दार उघडले जाणार नाहीत.
जे झाले ते झाले. मात्र २०२७ च्या करिअरच्या रोडमॅपमध्ये पालक-विद्यार्थ्यांनी या परीक्षेची नोंद आपल्या स्मार्ट फोनमधील कॅलेंडरमध्ये आत्ताच करुन ठेवावी. २०२७ च्या शैक्षणिक वर्षासाठी ही परीक्षा २१ डिसेंबर २०२६ एैवजी २८ डिसेंबर २०२६ किंवा याच्या आसपास होईल. गेल्या तीन वर्षातील या परीक्षेच्या तारखा अशाच असल्याचे दिसून येते. २०२५ सालातील शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा ५ जानेवारी २०२५ ला झाली. २०२३ च्या शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा ८ जानेवारी २०२३ ला झाली. २०२४ शैक्षणिक सत्रासाठीची परीक्षा २४ डिसेंबर २०२३ ला झाली. या परीक्षेच्या किमान एक दीड महिन्याआधी म्हणजे सप्टेबर/ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होते.
सर्वश्रेष्ठ संस्था
एनआयडी ही आपल्या देशातील डिझाइन क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त केलेली संस्था. डिझाइन क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख संस्थांमध्ये एनआयडीचा समावेश होतो. या संस्थेतील पदवी अभ्यासक्रमाला कला, वाणिज्य, मानव्यशास्त्र, विज्ञान अशा कोणत्याही ज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो किंवा ३ वर्षे कालावधीचा तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी किंवा नॅशनल ओपन स्कूलिंग अतंर्गत पाच विषयांसह सिनिअर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी किंवा हायर सेकंडरी सर्टिफिकेट व्होकेशनल एक्झामिनेशन हे अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी पात्र ठरतात.
पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ डिझाइन) (१) ॲनिमेशन फिल्म डिझाइन , (२) एक्झिबिशन डिझाइन , (३) फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन , (४) ग्रॅफिक डिझाइन, (५) सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन, (६) फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन, (७) प्रॉडक्ट डिझाइन, (८) टेक्सटाइल डिझाइन, या विषयांमध्ये करता येतो. या सर्व अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी चार वर्षांचा आहे.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन) हा अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतो-
(१) फिल्म ॲण्ड व्हिडिओ डिझाइन, (२) ग्रॅफिक डिझाइन (३) ॲनिमेशन फिल्म डिझाइन, (४) फोटोग्रॅफी डिझाइन, (५) सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन, (६) फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन, (७) प्रॉडक्ट डिझाइन, (८) टॉय ॲण्ड गेम डिझाइन, (९) ट्रांस्पोर्टेशन ॲण्ड ऑटोमोबाइल डिझाइन, (१०) युनिव्हर्सल डिझाइन, (११) डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरियंस, (१२) स्ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट, (१३) डिजिटल गेम डिझाइन, (१४) इंटरॲक्शन डिझाइन, (१५) इन्फॉर्मेशन डिझाइन, (१६) न्यू मीडिआ डिझाइन, (१७) ॲपेरल डिझाइन, (१८) लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन- (१९) ॲक्सेसरी डिझाइन. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी अडीच वर्षांचा आहे.
हा अभ्यासक्रम (१) कोणत्याही विषयातील चार किंवा तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा (२) चार वर्षे कालावधीचा डिझाइन/फाइन आर्ट/अप्लाइड आर्ट /आर्किटेक्चर या विषयातील १२ वीनंतरची पदविका प्राप्त केलेले विद्यार्थी करु शकतात.
प्रवेश प्रकिया
- पदवी अभ्यासक्रम
या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. आधी प्रिलिमनरी (प्राथमिक) परीक्षा द्यावी लागते. संस्थेने निर्धारित केलेल्या निकषानुसार गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.
प्राथमिक परीक्षेच्या या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान व अवतीभवतीच्या घटनांचे आकलन, तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक चाचणी, आकृत्या, कार्यकारण भाव, तपासण्यासाठी प्रश्नाची रचना केली जाते.
भाग दोन हा निबंधात्मक स्वरुपाचा असतो. या भागात वेगवेगळया परिस्थितीचे वर्णन करणारे उतारे दिले जातात. त्यावर आधारित चित्र काढावे लागतात. उमदेवारांच्या चित्रांकनाचे कौशल्य तपासणीसाठी या भागाचा उपयोग केला जातो. (डिझाइन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याचा कल आणि गती आहे किंवा नाही,याची चाचपणी करणारे हे प्रश्न असतात.) प्राथमिक परीक्षेच्या पेपरचा कालावधी तीन तास. या पेपरमध्ये १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते.
मुख्य परीक्षा गांधीनगर/अहमदाबाद किंवा इतर कॅम्पसमध्ये दोन दिवस चालते. ही चाळणी कॅम्पसमधील स्टुडिओमध्ये घेतली जाते. अभिकल्प शिक्षणासाठी विद्यार्थ्याची कल तपासणी करणा-या विविध प्रकारच्या चाळण्यांचा यात समावेश असतो. या चाळणीसाठी १०० गुण ठेवण्यात येतात. चाळणीची भाषा इंग्रजी असते.
- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांना ‘डिझाइन अॅप्टिट्युड टेस्ट’ द्यावी लागते. यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेचा समावेश असतो. पूर्व परीक्षेत उमेदवाराची वैचारिक क्षमता आणि कल्पकता तपासली जाते. ही ऑफलाइन परीक्षा आहे. कालावधी तीन तास. एकूण गुण: १००.
या पेपरमध्ये दोन भाग असतात – (१) सामान्य क्षमता चाचणी- यात सामान्य ज्ञान, तार्किक विचार, इंग्रजी भाषा आणि डिझाइन क्षेत्रातील घडामोडींवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. (२) सर्जनशील क्षमता चाचणी (क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट)- यामध्ये चित्रकला/ रेखांकने (स्केचिंग), संकल्पना मांडणे (आयडिएशन) आणि समस्या निवारण यावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्राथमिक परीक्षा, ही मुख्य परीक्षेसाठी केवळ ‘पात्रता’ (क्वालिफायर) निश्चित करते. त्यासाठी गुणांचे काही निकष ठरवले जातात. अंतिम निवडीसाठी हे गुण धरले जात नाही.
मुख्य परीक्षा
अंतिम निवड पूर्णपणे या टप्प्यावर अवलंबून असते. यात पुढील बाबींचा समावेश असतो- (अ) स्टुडिओ टेस्ट (वेटेज ४० टक्के)– यात प्रत्यक्ष मॉडेल मेकिंग, साहित्याचा वापर (मटेरिल हँडलिंग), द्रुक-श्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) चाचणी आणि थ्रीडी डिझाइनिंगवर आधारित प्रात्यक्षिके यांचा समावेश असतो, (ब) मुलाखत आणि पोर्टफोलिओ (वेटेज टक्के)– यामध्ये विद्यार्थ्याने केलेल्या कामाचा संग्रह (पोर्टफोलिओ) पाहिला जातो. उमेदवाराची विषयातील समज, संवाद कौशल्य आणि डिझाइन क्षेत्रातील दृष्टीकोन मुलाखतीद्वारे तपासला जातो.
गांधीनगर, अहमदाबाद, बेंगळुरु हे एनआयडीचे जुने कॅम्पस आहेत. गेल्या काही वर्षात (१) एनआयडी आंध्रप्रदेश (गुंटूर), (२) एनआयडी हरयाणा (कुरुक्षेत्र), (३) एनआयडी मध्यप्रदेश (भोपाळ), (४) एनआयडी आसाम (जोरहट) येथे नवे कॅम्पस सुरु झाले आहेत. जुन्या कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सुविधा आहे. मात्र नव्या कॅम्पसमध्ये सध्या (१) इंडस्ट्रिअल डिझाइन, (२) कम्युनिकेशन डिझाइन आणि (३) टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन हे तीन पदवी अभ्यासक्रम करता येतात.
शंभर टक्के उत्तम करिअरची हमी देणारे हे अभ्यासक्रम आहेत. देशातील या प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च डिझाइयनर्सनी हा अभ्यासक्रम केलेला आहे. यातील अनेकजण जागतिक पातळीवरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. अशा या संस्थेत अधिकाधिक मराठी मुलांनी प्रवेशासाठी कंबर कसली पाहिजे. पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनी योग्य वेळी याविषयी मुलांना माहिती दिली पाहिजे.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन पालडी अहमदाबाद – ३८०००७, दूरध्वनी- ०७९-२६६२९५००,टेलेफॅक्स- २६६२९६००, ईमेल – admissions@nid.edu, प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ- www.admissions.nid.edu, मुख्य संकेतस्थळ- http://www.nid.edu
सुरेश वांदिले
००००