(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिझायनरच्या संकल्पना: तंत्रज्ञाचे कौशल्य

मराठी विद्यार्थी आणि पालकांना रस नसलेली किंवा तुलनेने दुर्लक्षित अशी एक महत्त्वाची ज्ञानशाखा म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजी. मुळात अशी काही ज्ञानशाखा अस्तित्वात आहे, हेच अजूनही बरेच विद्यार्थी आणि पालकांच्या लक्षात येत नाही. अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखांचा सखोल विचार केला जातो; मात्र फॅशन टेक्नॉलॉजी ही शाखा या चर्चेत क्वचितच दिसते. त्यामुळे अभावानेच मराठी विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात. परिणामी, या क्षेत्रात मराठी तज्ज्ञांची संख्या तुलनेने कमी दिसून येते.

या ज्ञानशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या संस्थेमार्फत चालवले जातात. बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (अपॅरेल प्रॉडक्शन) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून तो विद्यार्थ्यांना  या उद्योगासाठी आवश्यक असे सर्व तंत्र आणि कौशल्याचे ज्ञान प्रदान करतो. एनआयएफटीच्या विविध कॅम्पसेसमध्ये या अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अपॅरेल प्रॉडक्शन, गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रांतील सक्षम व्यावसायिक म्हणून विकसित करतो. हा अभ्यासक्रम बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, हैदराबाद, जोधपूर, कांगडा, कन्नूर, कोलकाता, मुंबई, पाटणा आणि पंचकुला या एनआयएफटीमध्ये करता येतो.

फॅशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम फॅशन उद्योगातील उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर आधारित आहे. हे तंत्रज्ञ, फॅशन डिझायनरच्या संकल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित करतात. उत्पादन नियोजन, प्रक्रिया नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेत वाढ, या बाबींवर या तज्ज्ञांना लक्ष केंद्रित करावे लागते.

जागतिकीकरण आणि ई-कॉमर्सच्या विस्तारामुळे, सतत बदलणाऱ्या मागणीनुसार दर्जेदार कपड्यांचे मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी फॅशन तंत्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरते. या उद्योगात डिजिटल टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि डाटा-आधारित निर्णयप्रक्रिया यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी तांत्रिक कौशल्ये महत्वाची आहेत.

जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये

फॅशन तंत्रज्ञाला पुढील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात-  १) उत्पादन व्यवस्थापन – कपड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी, २) गुणवत्ता नियंत्रण – कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत दर्जा टिकवणे
३) पुरवठा साखळी व्यवस्थापन – उत्पादन ते ग्राहक या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वय, ४) उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता – वेळ, खर्च आणि संसाधनांचा योग्य वापर, ५) खर्च नियोजन – उत्पादन खर्च आणि संसाधनांचा समतोल राखणे

आवश्यक कौशल्ये

१) तांत्रिक कल – यंत्रसामग्री आणि सॉफ्टवेअर समजून घेण्याची क्षमता,
२) विश्लेषणात्मक विचार – उत्पादनातील समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे,
३) गणितीय कौशल्य – उत्पादन नियोजन आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक,
४) अचूकता – गुणवत्ता राखण्यासाठी काटेकोर दृष्टिकोन
५) नेतृत्व गुण – उत्पादन प्रक्रियेतील टीमचे व्यवस्थापन

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश आहे- १) गार्मेंट कन्स्ट्रक्शन आणि पॅटर्न मेकिंग- कपड्यांची तांत्रिक रचना, त्यांचे अचूक साचे (पॅटर्न) तयार करण्याचे प्रगत ज्ञान, २) स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग: आधुनिक गार्मेंट फॅक्टरीचे कामकाज, त्यातील स्वयंचलित यंत्रणा आणि कार्यशाळेचे नियोजन,३) फॅशन डाटा ॲनॅलिटिक्स (विश्लेषण)- बाजारातील मागणी, विक्रीचा कल आणि ग्राहकांच्या निवडीचा डाटा वापरून उत्पादनाचे निर्णय घेण्याचे तंत्र, ४) सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक (पुरवठा साखळी आणि वाहतूक-व्यवस्था) जागतिक स्तरावर मालाची ने-आण आणि साठा व्यवस्थापन करण्याचे धोरणात्मक नियोजन, ५) क्वालिटी मॅनेजमेंट (गुणवत्ता व्यवस्थापन)- वस्त्रोद्योगातील जागतिक मापदंडानुसार उत्पादनाची दर्जाची तपासणी करण्याचे कौशल्य.

वैकल्पिक विषय

याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील पर्यायी विषय निवडण्याची संधी मिळते- १) एआय आणि मशिन लर्निंग फॅशन उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, २) सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग–  शाश्वत किंवा पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि पुनर्प्रक्रिया, ३) स्मार्ट वेअरेबल्स (तंत्रज्ञानयुक्त किंवा बुद्धीमान वस्त्रे)- तंत्रज्ञान आणि कापड यांचा संगम असलेली आधुनिक वस्त्रे (उदा. सेन्सर्स लावलेले कपडे), ४) रिटेल ऑपरेशन्स (किरकोळ विक्री व्यवस्थापन किंवा दुकान संचालन) – शोरूम्स आणि ऑनलाइन स्टोअर्समधील तांत्रिक कामकाज.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव मिळावा यासाठी दुसऱ्या वर्षानंतर – टेक्सटाइल इंटर्नशिप, तिसऱ्या वर्षानंतर – अपॅरेल इंडस्ट्री इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. शेवटच्या वर्षी १८ आठवड्यांचा उद्योगाधारित प्रकल्प करावा लागतो. यामुळे उत्पादन कार्यक्षमता, गुणवत्ता सुधारणा आणि पुरवठा साखळी यांसारख्या प्रत्यक्षातील समस्या जाणून घेता येतात.

अर्हता१२ वी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त ३ वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम.

करिअर संधी१) प्रॉडक्शन मॅनेजर (उत्पादन व्यवस्थापक) – कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेचे प्रमुख, २) क्वालिटी हेड (गुणवत्ता प्रमुख) – उत्पादनाचा दर्जा निश्चित करणारे अधिकारी, ३) सप्लाय चेन कन्सल्टंट (पुरवठा साखळी सल्लागार) – पुरवठा साखळीचे नियोजन करणारे तज्ज्ञ, ४) टेक्निकल मर्चेंडायझर (योग्य उत्पादन, योग्य किमतीत आणि योग्य वेळी बाजारात उपलब्ध करून देणारा समन्वयक) – डिझाइन आणि उत्पादन यांच्यातील तांत्रिक दुवा, ५) फॅशन डाटा ॲनॅलिस्ट – डाटाच्या आधारे बाजाराचा कल ओळखणारे विश्लेषक. स्वत:चा उद्योगही (स्टार्टअप)सुरु करता येतो.

प्रवेश प्रक्रियाया अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी ‘एनआयएफटी प्रवेश परीक्षा’ द्यावी लागते. यात गॅट (जनरल ॲबिलिटी टेस्टसामान्य क्षमा चाचणी) समावेश असतो. या पेपरमध्ये संख्यात्मक कौशल्य,  इंग्रजी, तार्किकता, आणि सामान्यज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न बारावीच्या परीक्षेच्या दर्जाचे असतात. सर्वसाधारण आकलन कौशल्य तपासले जाते

करिअर संधी

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना – (१) पोकराना ग्रुप, (२) गिनी ॲण्ड  जॉय, (३) इंटिग्रा  ॲपरेल्स, (३) थर्ड आयसाइट, (४) ट्रॅफेल्स, (५) लगुना क्लॉदिंग, (६) एवायएन ॲक्सेसरीज, (७) पँटलून, (८) आयटीसी एलआरबीडी, (९) कलर प्लस, (१०) सेलिब्रिटी फॅशन, (११) ॲम्बात्तूर क्लॉदिंग कंपनी, (१२) एलटी कार्ले, (१३) टेक्सपोर्ट सिंडिकेट, (१४) गोकलादास एक्पोर्ट्स, (१५) लेव्ही स्टॉस, (१६) मदुरा गार्मेंट्स, (१७) नीती क्लोदिंग, (१८) द शर्ट कंपनी, (१९) टॅफेल्स, (२०) सिल्व्हर ॲपरल लिमिटेड, (२१) शाही एक्सपोर्ट्स, (२२) सिल्व्हर स्पार्क ॲपरल्स, (२३) टेक्सपोर्ट आदी संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.(यामध्ये दरवर्षी काही नव्या कंपन्यांचा समावेश होऊ शकतो. काही कंपन्या बाद होतात.)

०००

मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एम.एफ.टेक)

हा अभ्यासक्रम पूर्णपणे तांत्रिक  आणि व्यवस्थापन कौशल्यांवर  आधारित आहे. यात अभिकल्प किंवा आराखड्यापेक्षा (डिझाइन) प्रामुख्याने पोशाख निर्मिती, पुरवठा साखळी  आणि नवकल्पना  यावर अधिक भर दिला जातो.

अर्हता- बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी किंवा  कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी .

प्रवेश प्रक्रियाप्रवेश मिळवण्यासाठी दोन टप्प्यांतून जावे लागते:  १) सामान्य क्षमता चाचणी (जनरल ॲबिलिटी टेस्ट-गॅट) – ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा असते.  यात गणितीय क्षमता, इंग्रजी, तार्किक विचार  आणि सामान्य ज्ञान  तपासले जाते. २) गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत  लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना या टप्प्यासाठी बोलावले जाते.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश होतो- १)स्मार्ट कारखाना– आधुनिक कारखान्यांचे तांत्रिक संचालन, २) पोशाख उद्योगातील माहिती प्रणाली, ३) विदा आणि सॉफ्टवेअर व्यवस्थापन, ४) जागतिक मालवाहतूक आणि पुरवठा साखळी: आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालाची ने-आण आणि नियोजन, ५) औद्योगिक अभियांत्रिकी– उत्पादन क्षमता वाढवण्याचे तंत्रज्ञान, ६) फॅशन क्षेत्रातील विदा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – फॅशन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.

करिअर संधी

(१)ॲम्बॅत्तूर क्लोदिंग कंपनी, (२)अरविंद मिल्स, (३)बुसाना (४)ॲपेरल्स ग्रुप, (५)एपिक डिझाइन गोकलदास इमेजेस, (६)इम्पलस, (७)एच ॲण्ड एम, (८)आयटीसी, (९)केएसए टेक्नोपार्क, (१०)मदुरा गार्मेंट्स, (११)पँटलून एक्स्पोर्टस गार्मेन्ट्स, (१२)ट्रायबर्ग, (१३)टेक्स्पोर्टस गार्मेन्ट्स, (१४)नेटवर्क क्लोदिंग लिमिटेड, (१५)इंटिमेट ॲपेरल्स पिटेक्स इंडिया, (१६)अलोक इंडस्ट्रिज, (१७)नाइके, (१८)अदिदास, (१९)ली ॲण्ड फंग, (२०)ओरिएंट क्राफ्ट, (२१)शाही एर्क्स्पोट हाऊस, (२२)रिचा ग्रुप, (२३)एलएनजे भिलवारा ग्रुप, (२४)रेमंड्स, (२६)ब्लॅकबेरी, (२७)क्रिएटनेट (२८)कौटॉन्स, (२९)लॅन्डमार्क, (३०)एएमसी, (३१)ओजीटीसी ग्रुप.

सुरेश वांदिले