मार्ग यशाचा- २५ -‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग एक)
१२ वी नंतर कलाशाखेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतात. कला शाखेतील विषयांची निवड स्वत:ची आवड, गती आणि कल यानुसार करायला हवी. त्यानंतर त्यावर संपूर्ण लक्ष केंदित करायला हवे. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे आणि पदवी मिळवणे एवढेच उद्दिष्ट्य ठेऊ नये. पुढील तीन ते चार वर्षे या विषयांचा सखोल अभ्यास करायला हवा. याचा अर्थ जो काही अभ्यासक्रम असेल तो पूर्णपणे अधिकृत पुस्तकातून वाचून काढायला हवा. यासाठी काही संदर्भग्रंथ सुचवले असल्यास ते सुध्दा वाचायला हवे. यातील महत्वाचे मुद्दे लिहून काढायला हवेत. गाईड किंवा तयार उत्तरांवर उवलंबून राहण्यापेक्षा स्वत:चे नोट्स काढणे, त्यात सध्याच्या काळाशी सुसंगत माहिती समाविष्ट करणे याकडे लक्ष पुरवले पाहिजे. यामुळे लिहिण्याचा सराव होईल. विषयाकडे बघण्याचा स्वत:चा दृष्टिकोन तयार होईल. संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी होणाऱ्या परीक्षांमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षापासून लावलेली स्वत: नोट्स काढण्यासची सवय अत्यंत फायद्याची ठरु शकते. अशा सखोल अभ्यासातून आत्मविश्वासही दुणावतो. इतर शाखांपेक्षा या शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळत असल्याने त्यांनी संवाद कौशल्य व इतर प्रकारच्या कौशल्यप्राप्तीसाठी आणि स्वत:कडे असणाऱ्या कौशल्यात वाढ करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला हवे. इंग्रजी/मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. अवांतर वाचन, लेखन आणि नोंदी करण्याची सवय ही त्रिसूत्री करिअरच्या संधी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
कला शाखेतील विद्यार्थी पारंपरिक बीए अभ्यासक्रमांसोबतच माध्यमे (मीडिया), अभिकल्प(डिझाईन), व्यवस्थापन (मॅनेजमेंट), समाजकार्य, पर्यटन, कायदा, फॅशन अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम करुन चांगले करिअर घडवू शकतात. कला शाखेतील विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही ‘क्रिएटिव्ह थिंकिंग (सृजनशील विचार)’साठी विशेष प्राधान्य दिले जाण्याचा कल वाढताना दिसतो.
१२ वी कला शाखेनंतरचे करिअर पर्याय
(१) फॅशन डिझाइन – कपड्यांची रचना, फॅशनचे नित्य नूतन प्रवाह, फॅशन व्यवसाय, व्यवस्थापन, फॅशन संवाद संप्रेषण आणि वस्त्रोद्योगाचे ज्ञान देणारी शाखा. करिअर संधी- फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट, टेक्स्टाईल डिझायनर, फॅशन कम्युनिकेटर. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, संकेतस्थळ- nift.ac.in)
(२) ग्रॅफिक डिझाइन – जाहिराती, लोगो (चिन्हे) आणि डिजिटल माध्यमांसाठी दृश्यसंवाद कलेचे ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- ग्रॅफिक डिझायनर, युजर एक्सपिरियन्स डिझायनर, जाहिरात संस्था. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, संकेतस्थळ- nid.edu)
(३) प्रॉडक्ट डिझाइन – औद्योगिक उत्पादनांची उपयुक्तता आणि त्यांची आकर्षक रचना करण्याचे शिक्षण यात दिले जाते. करिअर संधी- प्रॉडक्ट डिझायनर, इंडस्ट्रिअल डिझायनर. (संस्था- आयआयटी मुंबई, स्कूल ऑफ डिझाइन, संकेतस्थळ- idc.iitb.ac.in)
(४) वेब डिझायनिंग – संकेतस्थळ आणि लेआउट तयार करण्याचे तांत्रिक व सृजनशील शिक्षण देणारी शाखा. करिअर संधी- वेब डिझायनर, यूआय डिझायनर. (संस्था- विविध शासनमान्य तंत्रशिक्षण संस्था)
(५) डिजिटल मार्केटिंग – सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि ऑनलाइन जाहिरात क्षेत्रासाठी असलेले कौशल्य शिकवले जाते. करिअर संधी- डिजिटल मार्केटर, सोशल मीडिया मॅनेजर, एसईओ तज्ज्ञ. (संस्था- आयआयएम विशाखापट्टणम, संकेतस्थळ- iimv.ac.in)
(६) ललित कला (बीएफए) – चित्रकला, शिल्पकला आणि उपयोजित कलेतील सर्जनशीलतेचे ज्ञान, कौशल्य आणि तंत्र विकसित करणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- चित्रकार, कला शिक्षक, आर्ट क्युरेटर. (संस्था- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, संकेतस्थळ- sirjjschoolofart.in)
(७) अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स – चित्रपट, कार्टून आणि गेमिंगमधील व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्याचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. करिअर संधी- अॅनिमेटर, व्हीएफएक्स कलाकार, गेम डिझायनर. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन)
(८) इंटेरिअर डिझाइन – घरांची आणि कार्यालयांची अंतर्गत सजावट करण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान प्रदान करणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- अंतर्गत सजावटकार, वास्तू सल्लागार. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, संकेतस्थळ- nid.edu)
(९) इव्हेंट मॅनेजमेंट – विविध सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे कौशल्य प्रदान करणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- इव्हेंट आयोजक, वेडिंग प्लॅनर, कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजर. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, संकेतस्थळ- niemindia.com)
(१०) परफॉर्मिंग आर्ट्स – संगीत, नृत्य आणि नाट्य या कलांचे प्रत्यक्ष सादरीकरण आणि सिद्धांत यांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- गायक, नर्तक, अभिनेता, कला शिक्षक. (संस्था- गांधर्व महाविद्यालय, संकेतस्थळ- abgmvm.org)
(११) कंटेंट रायटिंग – संकेतस्थळ आणि ब्लॉगसाठी प्रभावी लेखन करण्याचे तंत्र शिकवले जाते. करिअर संधी- कंटेंट लेखक, कॉपीरायटर, ब्लॉग संपादक. (संस्था- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, संकेतस्थळ- https://www.ignou.ac.in/schools/programme/DCE)
(१२) हॉटेल मॅनेजमेंट – आदरातिथ्य सेवा, अन्न व खाद्यपदार्थ आणि हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- हॉटेल व्यवस्थापक, शेफ, फूड स्टायलिस्ट. (संस्था- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, संकेतस्थळ- nchm.gov.in)
(१३) ट्रॅव्हल आणि टुरिझम – पर्यटन क्षेत्राचे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य शिकवणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- टूर व्यवस्थापक, पर्यटन सल्लागार, ट्रॅव्हल एजन्सी. (संस्था- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, संकेतस्थळ- iittm.ac.in)
(१४) पत्रकारिता आणि जनसंवाद – बातमीदारी, जनसंपर्क आणि जाहिरात यांसारख्या विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. करिअर संधी- पत्रकार, निवेदक, जनसंपर्क अधिकारी. (संस्था- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, संकेतस्थळ- iimc.nic.in)
(१५) परदेशी भाषा – फ्रेंच, जर्मन, जॅपनीज यांसारख्या जागतिक भाषांचे ज्ञान प्रदान करणारी शाखा. करिअर संधी- अनुवादक, दुभाषा, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील नोकऱ्या. (संस्था- इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, संकेतस्थळ- efluniversity.ac.in)
(१६) चित्रपट आणि टीव्ही – निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय आणि संहिता लेखनाचे कौशल्य शिकवणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- चित्रपट दिग्दर्शक, संपादक, सिनेमॅटोग्राफर. (संस्था- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया-पुणे, संकेतस्थळ- ftii.ac.in)
(१७) बी.एस.डब्ल्यू. (समाजकार्य) – समाजसेवा आणि एनजीओ व्यवस्थापनाचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी शाखा. करिअर संधी- एनजीओ व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ता. (संस्था- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई, संकेतस्थळ- tiss.edu)
(१८) लिंग्विस्टिक्स (भाषाशास्त्र) – भाषेची उत्पत्ती, रचना आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास यात केला जातो. करिअर संधी- भाषा संशोधक, लँग्वेज टेक्नॉलॉजिस्ट. (संस्था- जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, संकेतस्थळ- jnu.ac.in)
(१९) योग सायन्स – योगसाधना आणि आरोग्याचे शास्त्रीय ज्ञान देणारी शाखा. करिअर संधी- योग प्रशिक्षक, वेलनेस कोच. (संस्था- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, संकेतस्थळ- yogamdniy.nic.in)
(२०) डिझास्टर मॅनेजमेंट – आपत्तींचे नियोजन व निवारण करण्याचे तंत्रकौशल्य शिकवणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी. (संस्था- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, संकेतस्थळ- tiss.edu)
(२१) रुरल डेव्हलपमेंट – ग्रामीण विकासाचे प्रकल्प राबवण्याचे प्रशिक्षण देणारी शाखा. करिअर संधी- ग्रामीण विकास अधिकारी, एनजीओ सल्लागार. (संस्था- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, संकेतस्थळ- nirdpr.org.in)
(२२) बी.बी.ए. (मॅनेजमेंट) – व्यावसायिक व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे कौशल्य प्रदान करणारी ज्ञानशाखा. करिअर संधी- व्यवसाय व्यवस्थापक, उद्योजक. (संस्था- आयआयएम इंदोर, संकेतस्थळ- iimidr.ac.in)
(२३) क्रिमिनॉलॉजी – गुन्हेगारीची कारणे आणि कायद्याची अंमलबजावणी हे विषय यात शिकवले जातात. करिअर संधी- तपास अधिकारी, पोलीस सेवा, सुरक्षा सल्लागार. (संस्था- नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, संकेतस्थळ- nfsu.ac.in)
०००
पारंपरिक ज्ञानशाखा
१२ वीनंतर पुढील ज्ञानशाखांमधील शिक्षणाच्या सुविधा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील नामांकित महाविद्यालयांमध्ये आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, याच शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतल्यास करिअरच्या वेगवेगळया संधी मिळू शकतात.
(१) बीए अर्थशास्त्र – बाजार, वित्त आणि अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारी शाखा. करिअर संधी- अर्थशास्त्रज्ञ, आर्थिक सल्लागार. (संस्था- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, संकेतस्थळ- dse.du.ac.in)
(२) इंटिग्रेटेड बीए- एलएलबी – करिअर संधी- वकील, न्यायाधीश, कॉर्पोरेट सल्लागार. (संस्था- नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, संकेतस्थळ- nls.ac.in) (पूर्वार्ध)