(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३२-तिजोरी सांभळण्याचे तंत्र आणि कौशल्य

१२ वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखा (अकाउंट्स), वित्त (फायनान्स), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतात. महाराष्ट्रात बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवला जातो. अनेक महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवे अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले आहेत. काही महाविद्यालयांनी रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरु शकतील असे स्वयं अर्थसाहाय्यित अभ्यासक्रमही सुरु केले आहेत.

बी.कॉम किंवा एम कॉम किंवा या शाखेशी निगडित वेगवेगळ्या अभ्यासक्रमात शिकलेल्या संकल्पना प्रत्यक्ष काम करताना प्रभावीपणे वापरता येणे अत्यंत आवश्यक आहे. तरच या क्षेत्रात प्रगती साध्य होऊ शकते. अभ्यासक्रम निवडताना स्वत:चा कल आणि आवडही लक्षात घ्यायला हवी- १) हिशोब आणि कर प्रणालीत आवड असल्यास सीए / बीकॉम, २) व्यवस्थापनात रस असल्यास बीबीए / एमबीए, ३) शेअर बाजाराकडे कल असल्यास बॅचलर ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंट (बीएफएम). किंवा बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)/एनएनई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) चे अभ्यासक्रम , ४) कायद्याची आवड असल्यास कंपनी सेक्रेटरी (सीएस) किंवा बीकॉम-एलएलबी-अशा प्रकारचा करिअर मार्ग स्वीकारता येतो.

विद्यार्थ्यांनी टॅली, प्रगत एक्सेल आणि डेटा व्हिज्युअलायझेशन, फिनटेक यांसारखी कौशल्ये आत्मसात करायला हवित. शिक्षण घेतानाच इंटर्नशिप (आंतरवासिता) केल्यास रोजगाराच्या संधी मिळणे सुलभ जाऊ शकते.

०००

सिडेनहॅम महाविद्यालय

वाणिज्य  आणि अर्थशास्त्रातील १२वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवणारी राज्यातील महत्वाची संस्था म्हणजे सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ! सध्या ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या थेट नियंत्रणाखाली आहे. या संस्थेला ११२ वर्षांचा इतिहास आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडात वाणिज्य (कॉमर्स) शिक्षणाची सुरुवात करणारी ही पहिली संस्था. या संस्थेच्या असंख्य विद्यार्थ्यांनी देश आणि विदेशात महत्वाच्या पदांवर कार्य करुन संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या संस्थेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ अध्यापन केले होते.

या संस्थेत बीकॉम आणि एमकॉम या दोन मुख्य अभ्यासक्रमांसोबतच काही स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम करता येतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे अभ्यासक्रम ४ वर्षे कालावधीचे आहेत-

स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम

१) बी.कॉम. इन अकाउंटिंग अँड फायनान्स – या अभ्यासक्रमात वित्तीय तत्त्वे आणि पद्धतींवर लक्ष केंद्रित केले जाते. अर्हता- १२ वी  किंवा समकक्ष परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण.

करिअर संधी १) अकाउंटंट, २) फायनान्शियल ॲनॅलिस्ट, ३) ऑडिटर, ४) टॅक्स कंसलटंट, ५) फायनान्शियल मॅनेजर, ६) इन्व्हेस्टमेंट ॲनॅलिस्ट.

२) बी.कॉम. इन बँकिंग अँड फायनान्शियल ॲनॅलिटिक्सहा अभ्यासक्रम ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिट्यूट लिमिटेड’च्या सहकार्याने चालवला जातो. यात बँकिंग आणि आर्थिक विश्लेषणाचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्हता – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा). या अभ्यसाक्रमाच्या प्रवेशासाठी एचबीएसयू (होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी- सीईटी) ही परीक्षा द्यावी लागते.

रिअर संधी १) इन्व्हेस्टमेंट बँकिंग असोसिएट, २) फायनान्शियल ॲडव्हायझर, ३) बँक कॉम्प्लायन्स ऑफिसर, ४) क्रेडिट ॲनॅलिस्ट, ५) वेल्थ मॅनेजर, ६) ट्रेझरी ॲनॅलिस्ट.

३) बी.कॉम. इन बँकिंग अँड इन्शुरन्स (बीबीआय)- हा अभ्यासक्रम बँकिंग आणि विमा क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या बदलांचे आव्हान स्वीकारण्याठी विद्यार्थ्यांना तयार करतो. अर्हता१२ वी  किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. करिअर संधी १) बँक ऑफिसर, २) इन्शुरन्स एजंट/ॲडव्हायझर, ३) फायनान्शियल ॲनॅलिस्ट, ४) लोन ऑफिसर, ५) रिस्क ॲनॅलिस्ट, ६) म्युच्युअल फंड मॅनेजर, ७) क्रेडिट ॲनॅलिस्ट, ८) पोर्टफोलिओ मॅनेजर.

४) बीएस्सी फायनांस (बॅचलर ऑफ सायन्स इन फायनान्स) हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सहकार्याने राबवला जातो. यातील विषय घटकांमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक सिद्धांत पक्के होतात. यात गुंतवणूक, विमा इत्यादी आर्थिक घटकांचे शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान केले जाते. अभ्यासक्रम आणि उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवाचा समन्वय साधला जातो. शेअर बाजारातील बारकावे समजावले जाते. शेअर्स व सिक्युरिटीजचे मूलभूत व तांत्रिक  विश्लेषण करण्यास सक्षम केले जाते. अर्हता- १२ वी  किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

    करीअर संधीइन्व्हेस्टमेंट बँकिंग असोसिएट (गुंतवणूक बँकिंग क्षेत्र), आर्थिक सल्लागार, बँक कॉप्लायन्स ऑफिसर (बँकेतील नियम पालन अधिकारी), क्रेडिट ॲनॅलिस्ट (कर्ज जोखीम विश्लेषक), वेल्थ मॅनेजर (संपत्ती व्यवस्थापक), ट्रेझरी ॲनॅलिस्ट (तिजोरी किंवा निधी विश्लेषक)

    ५) बीएस्सी – लक्झरी ब्रँड अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात विलासी वस्तूंचे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि रिटेल क्षेत्रातील बारकाव्यांचे सखोल शिक्षण दिले जाते. लक्झरी मार्केट्स (विलासी वस्तूंचा बाजार) आणि त्या व्यवसायाशी संबंधित सखोल ज्ञान आणि दृष्टिकोन विकसित केला जातो. लक्झरी उद्योगासाठी आवश्यक असलेली व्यवस्थापकीय कौशल्ये  विकसित केली जातात.

    अर्हता- विद्यार्थी कोणत्याही शाखेतून (कला, विज्ञान, वाणिज्य किंवा डिप्लोमा इ.) १२ वी किंवा समकक्ष परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावा. एचबीएसयू-सीईटी/एमएएच-सीईटी किंवा त्यासारखी कोणतीही समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

    प्रवेश प्रक्रियाप्रवेशासाठी निवडीचे निकष१२ वीच्या परीक्षेतील गुणांना २५ टक्के वेटेज, प्रवेश परीक्षेतील गुण ५० टक्के वेटेज, वैयक्तिक मुलाखत५ टक्के वेटेज.

    करीअर संधीलक्झरी ब्रँड मॅनेजर (ब्रँडची प्रतिमा आणि विक्री व्यवस्थापन), लक्झरी गुड्स प्रॉडक्ट मॅनेजर (वस्तूंचे उत्पादन आणि गुणवत्ता व्यवस्थापक), मर्चेंडायझिंग मॅनेजर (मालाचे नियोजन आणि विक्री व्यवस्थापन), व्हिज्युअल मॅनेजर (ब्रँडच्या सजावटीचे आणि मांडणीचे नियोजन), पीआर स्पेशालिस्ट  (जनसंपर्क तज्ञ)

    या अभ्यासक्रमांशिवाय बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमही करता येतात.

संपर्क ‘बी’ रोड, चर्चगेट, मुंबई – ४०००२०, संकेतस्थळ  https://sydenham.ac.in, ईमेल sydenhamcollege@rediffmail.com

०००

बीएमएस (कॅपिटल मार्केट)

भविष्यातील सक्षम उद्योजकीय नेतृत्व  तयार करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. व्यवस्थापनाच्या सिद्धांतांसोबत या अभ्यासक्रमात ‘कॅपिटल मार्केट’ (भांडवली बाजार) या विषयघटकावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केट, डेरिव्हेटिव्ह्ज आणि आर्थिक नियमांची सखोल माहिती मिळते. इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. केस स्टडीजवरही भर दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. विद्यार्थ्यांना ‘फायनान्शिअल मॉडेलिंग’ आणि ‘मार्केट ॲनालिसिस’मध्ये अतिरिक्त प्रमाणपत्रे मिळतात.

करिअर संधी- इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट (गुंतवणूक विश्लेषक), इक्विटी रिसर्चर,  फायनान्शिअल कन्सल्टंट (आर्थिक सल्लागार), स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलिओ मॅनेजर.

अर्हता- हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्याथी्र करु शकतो. या विद्यार्थ्यांनी  ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक. (बीएसई इंसिट्यूट https://finxinstitute.com/undergraduate)

०००

बिझिनेस ॲनॅलिटिक्स

    डेटा/ बिझिनेस अ‍ॅनॅलिटिक्स हे क्षेत्र आता केवळ इंजिनीअरिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम हा एक उत्तम करिअर पर्याय ठरत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरू या संस्थेने, ‘एमबीए इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी दोन वर्षे.  व्यवसाय/ उद्योगातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी नॅलिटिक्सआणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ (एआय) यांचा प्रभावी वापर करण्याचे ज्ञान विद्यार्थांना प्रदान केले जाते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर  डेटा सायंटिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट, मशीन लर्निंग तज्ज्ञ, कन्सलटिंग आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट अशा करिअर संधी मिळतात.

अर्हता– कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (खुला संवर्ग), अनुसूचित जाती, जमाती दिव्यांग सवंर्गातील उमेदवार- ४५ टक्के. पदवी स्तरावर किंवा १०+२ स्तरावर गणित हा विषय अभ्यासलेला असावा. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) ही परीक्षा द्यावी लागते. निवड प्रक्रिया- टप्पा १)- कॅट परीक्षेतील गुण, १०वी व १२वीचे गुण आणि कामाचा अनुभव यावर आधारित उमेदवारांची निवड केली जाते, टप्पा २)- निवडलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी (रिटन ॲप्टिटयूड टेस्ट) आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाते.

संपर्क- https://www.iimb.ac.in

०००