(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३८- प्रज्ञावंतांसाठी “नेस्ट”- द बेस्ट!

नुकतीच १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्यास आणि त्याच्या पालकास “नेस्ट” परीक्षेबद्दल विचारलं असता त्या दोघांनांही याबद्दल काहीही सांगता आलं नाही. अतिशय अल्पसंख्येने महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या करिअर रोडमॅपमध्ये “नेस्ट” चा समावेश असतो. या परीक्षेव्दारे अत्युकृष्ट करिअरची संधी उपलब्ध होते, याची जाणीव फार कमी मराठी पालक व विद्यार्थ्यांना आहे. तरी बरे, ही परीक्षा गेल्या अनेक वर्षापासून घेतली जाते. १२ वी विज्ञान शाखेतील शिक्षकसुध्दा या परीक्षेबद्दल विशेष काही मुलांना सांगत नाहीत. परिणामी या परीक्षेला बसणाऱ्या आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मराठी मुलांची संख्या असमानधानकराक राहिली आहे.

नेस्टचा अर्थ आहे – नॅशनल एन्ट्रन्स फॉर स्क्रिनिंग टेस्ट! या परीक्षेव्दारे भुनवेश्वर स्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर), आणि मुंबई स्थित सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स (यूएम-डीइ-सीइबीएस) या अत्यंत महत्वाच्या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम या संस्थेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये विषयांमध्ये करता येतो.

या विषयातील मूलभूत संशोधनास चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थांची स्थापना २००७ साली भारत सरकारच्या अणुउर्जा विभागाने केली. या दोन्ही संस्था स्वायत्त संस्था आहेत. नायसर संस्थेचा अभ्यासक्रम होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूशी संलग्नित आहे तर सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापठाशी संलग्नित आहे. संशोधन कार्यात रस, आवड आणि गती असणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवेत.

अर्हता आणि पात्रता

१२ वी विज्ञानशाखेतील परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी नेस्ट देऊ शकतात.  (यंदा ज्या विद्यार्थ्यांनी नेस्ट परीक्षेसाठी अर्ज केला नसेल आणि दुर्देव्याने  त्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांना ही परीक्षा २०२७ मध्ये देता येईल. ही परीक्षा देण्यासाठी उच्च वयाची अट ठेवण्यात आलेली नाही.)

अशी असते परीक्षा

ही संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड), बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा आहे. पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांचे चार विभाग असतात. विद्यार्थ्याला कोणत्याही तीन विभागातील प्रश्न सोडवावे लागतात. प्रत्येक विभागात २० प्रश्न विचारले जातात. (याचा अर्थ प्रत्येक सेक्शनमध्ये ६० प्रश्न असतात.) प्रत्येक प्रश्नाच्या अचुक उत्तरास तीन गुण दिले जातात. प्रत्येक विभागात चुकलेल्या उत्तरासाठी एका गुणाची कपात  केली जाते. एकूण गुण १८०. पेपरचा कालावधी तीन तास.

पेपर सोडवण्यासाठी लेखनिकाची मदत घेणाऱ्या दिव्यांगजांना एक तास अतिरिक्त दिला जातो. हा लेखनिक अशा दिव्यांगांना स्वखर्चाने आणावा लागतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत असते. हिंदीमधील प्रश्नांबाबत काही शंका असल्यास मूळ इंग्रजी प्रश्न ग्राह्य धरला जातो. विद्यार्थ्याचे विषय आकलन आणि विश्लेषण क्षमता समजून घेण्यासाठी प्रश्नाची रचना केलेली असते.

या परीक्षेतील कोणतेही तीन विभाग सोडवता येत असले तरी “नेस्ट” व्यवस्थापनाने चारही विभाग सोडवण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली आहे. ज्या कोणत्या तीन विभागात सर्वोच्च गुण मिळतात, तेच अंतिम गुणांकनासाठी ग्राह्य धरले जातात. गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्रश्न हे ११वी आणि १२वीच्या एनसीइआरटी( नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग/सीबइएसइ- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या) अभ्यासक्रमांवर आधारित असतात.  महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक बोर्डाचा ११ वी व १२वीचा अभ्यासक्रम साधारणत: असाच आहे.  ज्या विषयघटकांचा समावेश या अभ्यासक्रमात नसेल, त्याचा अभ्यास मात्र एनसीइआरटी/सीबीएसइच्या पुस्तकांतून करावा. विषयघटकांची विस्तृत यादी नेस्टच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. ती एकदा नजरेखालून घालणे योग्य ठरेल. www.nestexam.in या संकेतस्थळावर नेस्ट परीक्षेच्या प्रत्येक विषयाचे घटक बघता येतात. 

या परीक्षेच्या सरावासाठी मॉक टेस्ट मे महिन्यात घेतली जाते. नेस्टच्या संकेतस्थळावर गेल्या दहा वर्षातील प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्या आहेत. परीक्षेचा पॅटर्न, काठीण्य पातळी समजून घेण्यासाठी आणि अभ्यासाची दिशा निश्चित करण्यासाठी या प्रश्नपत्रिकांचा उपयोग होऊ शकतो.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- अमदनगर, अकोला, आंबेजोगाई, अमरावती, बीड, भंडारा, भिवंडी, भुसावळ, बुलढाणा, चाळीसगाव, चंद्रपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, पंढरपूर, रायगड, सांगली, तासगाव, सातारा, सिंधुदुर्ग, सिन्नर, वर्धा, यवतमाळ, पुणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, धुळे, गडचिरोली, इचलकरंजी, जळगाव, जालना, कराड, कोपरगाव, कोल्‍हापूर, लातूर,  नांदेड, नासिक, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर आणि नागपूर. याचा अर्थ महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्वाच्या शहरांमध्ये या परीक्षेची केंद्रे आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्या त्या परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यायला हवी. या यादितील तीन केंद्रांचा पर्याय विद्यार्थ्यांना अर्ज भरताना द्यावा लागतो. प्रत्येक केंद्रावरची विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला दिलं जातं.

उत्कृष्ट सोई-सुविधा

या दोन्ही संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, संगणक केंद्रे, उत्कृष्ट ग्रंथालये आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त अशा वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना विविध शाखांचे ज्ञान-प्रज्ञान केले जाते. ते करताना आंतरज्ञानशाखीय शैक्षणिक प्रणालीचे तत्व अंगिकारले जाते. विद्यार्थ्याला संशोधन प्रकल्पावर कार्य करावे लागते. अनुभवी प्राध्यापक आणि संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मूळ (ओरिजिनल) विषयावर संशोधन करण्याची संधी दिली जाते.

हा अभ्यासक्रम केल्यावर राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था, अध्यापन, जैविक उद्योगातील विकास आणि संशोधन क्षेत्रात करिअर संधी मिळतात. ही पदवी प्राप्त उमेदवार, पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेल पदवीचा अभ्यासक्रम करुन आपल्या ज्ञान आणि संशोधनाची क्षितिजे आणखी रुंदावू शकतात. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या थेट मुलाखतीसाठी प्राप्त ठरतात.

प्रवेशासाठी चुरस

          हा अभ्यासक्रम उच्च श्रेणिचा असल्याने त्याच्या प्रवेशासाठी चुरस असते. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाच्या मूलभूत ज्ञानाच्या आकलनाची पातळी जोखणारी ही परीक्षा आहे. त्यामुळेच एनसीइआरटी/ सीबीएसइ किंवा राज्यशासनाच्या १२ वी बोर्डाचा विज्ञान विषयांचा समजून-उमजून अभ्यास करणे आवश्यक ठरते. विज्ञान विषयातील सर्व घटकांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे.

दिशा शिष्यवृत्ती

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरवर्षी ६० हजार रुपयांची,  “दिशा” (डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी-इन्सेंटिव्ह स्किम फॉर होलिस्टिक सायन्स एज्युकेशन ॲण्ड ऑगमेंटेशन) शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय दरवर्षी उन्हाळी संशोधन प्रकल्पासाठी २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

प्रवेश मिळालेल्या पहिल्यावर्षीच ही शिष्यवृत्ती लागू होते. मात्र पुढील वर्षांमध्ये, परीक्षेतील निर्धारित गुणांकांचा दर्जा राखला नाही तर, त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेपासून बाद केले जाते. मात्र हा विद्यार्थी पुढील वर्षी निर्धारित गुणांकाच्या परिघात आल्यास त्याला पुन्हा शिष्यवृत्ती लागू केली जाते.

या परीक्षेव्दारे नायसर येथे २०० विद्यार्थ्यांना आणि यूएम-डीइ-सीइबीएस येथे ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. दोन्ही संस्थेचे अभ्यासक्रम पूर्णपणे निवासी स्वरुपाचे आहेत.

(यंदा ही परीक्षा जून २०२ रोजी  होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एप्रिल २०२ होती. ही प्रकिया ५ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत परीक्षेचा अर्ज भरला नसेल, ते यंदा या अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशापासून वंचित राहतील. साधारणत: २०२७ च्या जानेवारी महिन्यात पुढील शैक्षणिक सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. याची नोंद इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी आत्ताच करुन ठेवावी.)

संपर्क (१) चिफ कुआर्डिनेटर, नेस्ट २०२१, एनआयएसईआर, भुवनेश्वर, पोस्ट ऑफिस, जतनी खुर्दा- ७५२०५०, ओडिशा, ईमेल- nest-exam@niser.ac.in, (२) यूएएम-डीएई-सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स इमारतीच्या विरुध्द बाजूला, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३२१३२, ईमेल-info@cbs.ac.in, संकेतस्थळ- cbs.ac.in

सुरेश वांदिले