मार्ग यशाचा ४१- नव्या संधीचे प्रवेशव्दार!
सीयूइटी-यूजी म्हणजे, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन (अंडर ग्रॅज्युएट) ही महत्वाची परीक्षा सुरु होऊन आता चार वर्षे झाली आहेत. असे असूनही या परीक्षेबाबत म्हणावी तितकी जागरुकता मराठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या परीक्षेच्या प्रवेश प्रकियेबाबत अनभिज्ञच दिसतात.
१२ वींनतर वेगवेगळया करिअर संधी कोणत्या? असा प्रश्न बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडत असतो. या प्रश्नाचे उत्तर या सेंट्रल युनिर्व्हसिटींच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. या एका परीक्षेव्दारे आठ ते दहा विद्यापीठांमधील तुमच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरु शकता. दुर्देव्याने गेल्यावर्षी या परीक्षेला बसणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नव्हती. या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी उत्तर प्रदेश राज्यातून बसले. ज्या राज्याला वेगवेगळया कारणांनी दोष दिला जातो, त्या राज्यातील पालक आणि विद्यार्थी महाराष्ट्रासारख्या स्वत:ला शैक्षणिकदृष्ट्या जागरुक समजणाऱ्या राज्यापेक्षा अधिक जागरुक असल्याचे दिसून येते.
त्यामुळे यंदा जे विद्यार्थी १२ वीत आहेत. त्यांनी सीयूईटी-यूजी या परीक्षेचा महत्वाचा पर्याय लक्षात ठेवायला हवा. पालकांनीसुध्दा ही बाब आतापासूनच मनात आणि डायरित नोंदवून ठेवावी.
सीयूइटी-यूजी ही परीक्षा आपल्या देशातील जवळपास ४८ सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील पदवीस्तरीय वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाते. या सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये कौशल्य वाढवणारे अनेक व्होकेशनल अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. ते विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील आहेत. या सर्व संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल आहेत. ही परीक्षा मराठीसह १३ भाषांमधून देता येते. (या परीक्षेतील गुण आता टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस मुंबई, गोखले स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पुणे आणि देशातील अशाच नामवंत व दर्जेदार संस्था वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी ग्राह्य धरतात.)
संधीचे प्रवेशव्दार
या सामायिक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगत्या विद्यापीठात आणि मनासारख्या ज्ञानशाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणे सुलभ जाते. प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळया अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वाचा घटक १२ वीच राहणार आहे.
या परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन सुयोग्यरित्या होते. हे मूल्यांकन तंत्राधिष्ठित असल्याने मानवी हस्तक्षेपास वाव राहत नाही. ही परीक्षा १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र असा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी १२ वीचा अभ्यास योग्य पध्दतीने करतील त्यांना ही परीक्षा कठीण जात नाही. या परीक्षेसाठी ३७ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १३ भाषा, २७ डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट (एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी (डोमेन) संबंधित विषय. म्हणजेच, ज्या क्षेत्रात किंवा अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे, त्याच्याशी थेट विषय .उदा- जीवशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी) आणि एक सामान्य क्षमता चाचणी (जनरल ॲप्टिट्यूड) च्या निवडीचे पर्याय आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या प्रवेश प्रकियेच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थी, त्याचा विशिष्ट विषय/भाषा आणि सामान्य चाचणीची निवड करु शकतो.
आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, ओडिया, तामीळ, तेलगू आणि उर्दू या १३ भाषांमध्ये प्रश्नपत्रिका असतील. यापैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्यास निवडता येईल.
सीयूइटीमुळे आता दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यास देशातील दर्जेदार अशा शैक्षणिक संस्थेत मनाजोगत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येऊ शकेल.
या परीक्षेव्दारे सामायिक कल चाचणीसोबत विज्ञान, मानव्यशास्त्र, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयात परीक्षा देणे शक्य आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पानत्मक ज्ञानाची तपासणी आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता या परीक्षेव्दारे तपासली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनावश्यकरीत्या शिकवणी वर्गांची मदत घ्यावी लागणार नाही. चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याचा आवडीचा विषय घेणे सुलभ झाले आहे.
परीक्षा पध्दती
(१) विद्यार्थी कोणतेही ५ विषय निवडू शकतो. यामध्ये भाषा आणि सामान्य कल चाचणीचा समावेश आहे. सर्व विषयांचे ५० प्रश्न असतील. हे प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे (मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह) असतील. सर्व पेपरचा कालावधी प्रत्येकी ६० मिनिटे.
भाषा पेपर-
यामध्ये वेगवेगळे उतारे दिले जातील. त्यावरुन विद्यार्थ्याची भाषिक समज आणि आकलन याची चाचपणी केली जाईल. साहित्यिक कल आणि शब्दसंग्रहाचीही चाचपणी केली जाते.
इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, गुजराती, उर्दू, अरेबिक, बोडो, चायनिज, डोग्री, फ्रेंच, जर्मन ,इटालियन, जॅपनिज, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मनिपुरी, नेपाली, रशियन, पर्शियन, संथाली, सिंधी, स्पॅनिश, संस्कृत, तिबेट या ३३ भाषांपैकी कोणतीही भाषा विद्यार्थी निवडू शकतो.
सामान्य चाचणी (जनरल टेस्ट)– यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सामान्य बौध्दिक क्षमता, संख्यात्मक क्षमता, तार्किक क्षमता (सर्व सामान्य गणिताची सूत्रे, संकल्पना, विश्लेषणात्मक क्षमता आदींवर हे प्रश्न विचारले जातील.) ही परीक्षा संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असेल.
पदवी प्रवेशासाठीचे विषय –
अकाउंटन्सी/ बूक कीपिंग, ॲग्रिकल्चर, अँथ्रॉपॉलॉजी, बॉयलॉजी/ बॉयलॉजिकल सायंस/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री, बिझिनेस स्टडीज, केमिस्ट्री, एन्व्हिराँन्मेंटल सायंस, कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, इकॉनॉमिक्स/ बिझिनेस इकॉनॉमिक्स/ इंजिनीअरिंग ग्रॅफिक्स/ आंत्रप्रिन्युरशीप/ फाईन आर्ट्स/ व्हिज्युएल आर्ट्स (स्क्लप्चर/ पेंटिग)/ कमर्शिअल आर्ट्स/ जिऑग्रॅफी/जिऑलॉजी, हिस्ट्री, होमसायन्स, नॉलेज ट्रॅडिशन- प्रॅक्टिसेस इन इंडिया, लिगल स्टडीज, मास मीडिया/ मास कम्युनिकेशन, मॅथेमॅटिक्स, परफॉर्मिंग आर्ट्स (डान्स-कथ्थक/ भरतनाट्यम/ कथकली/ ओडिसी/ कुचिपूडी/ मणिपुरी), ड्रामा (थिएटर), म्युझिक (जनरल/ हिंदुस्थानी/ कर्नाटकी/ रविंद्र/ परक्युशन/ नॉन परक्युशन), फिजिकल एज्युकेशन/ नॅशनल कॅडेट कॉरप्स, योग, फिजिक्स, पोलिटिकल सायंस, सायकॉलॉजी, संस्कृत, सोशिऑलॉजी, टिचिंग ॲप्टिट्यूड, फॅशन स्टडीज आणि टुरिझम.
या पेपरमध्ये एनसीइआरटी (नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग)च्या १२वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा झाल्यावर, जाहीर सूचना देऊन https://cuet.nta.nic.in/ या संकेतस्थळावर उत्तर पत्रिका प्रकाशित करण्यात येत. ही उत्तर पत्रिका दोन ते तीन दिवस या संकेतस्थळावर ठेवण्यात येते. या उत्तरांशी सुसंगत उत्तरे नसल्यास, संबंधित विद्यार्थी आपली तक्रार नोंदवू शकतो. तथापि विद्यार्थाने, ज्या प्रश्नासंदर्भात आव्हान दिले असेल, त्यासाठी प्रत्येकी २०० रुपये प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरावे लागते.
परीक्षा केंद्रे
ही परीक्षा देशातील अनेक शहरांमध्ये घेण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्राच्या पुढील शहरांचा समावेश आहे – मुंबई/नवी मुंबई, नांदेड, नंदुरबार, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, अहिल्यानगर (अहमदनगर), अकोला, छ.संभाजीनगर(औरंगाबाद),अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, गडचिरोली, नागपूर, पुणे, नाशिक,वर्धा, कोपरगाव, पंढरपूर
विद्यार्थी आपल्या पंसतीच्या चार केंद्रांची नोंद ऑनलाइन अर्जामध्ये करु शकतो. पहिल्या पसंतीचे शहर/केंद्रच उपलब्ध करुन देण्याचा काटेकोर प्रयत्न केला जातो. तथापि काही प्रशासकीय कारणांमुळे हे शक्य झाले नाही तर इतर शहर/केंद्र उपलब्ध करुन दिले जाते. एकदा निवडलेले केंद्र बदलता येत नाही.
अर्हता – १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले किंवा १२ वीची परीक्षेला बसलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. केवळ या परीक्षेतील गुणवत्ता यादित येऊन चालणार नाही. प्रत्येक विद्यापीठाचे प्रवेशाचे धोरण वेगवेगळे राहू शकते. या धोरणानुसार प्रवेश निश्चित केला जातो. त्यामुळे ज्या विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा असेल, त्या विद्यापीठाच्या प्रवेश अर्हतेत आपण बसतो अथवा नाही, याची खातरजमा विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. संबधित संस्थेच्या संकेतस्थळावर अशी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या तीन वर्षे कालावधीची पदविका प्राप्त उमेदवारही सीयुइटी देण्यासाठी पात्र ठरतात.)
या परीक्षेतील विविध विषयांचा विस्तृत अभ्यासक्रम नॅशनल टेस्टिंग एजंसीच्या, https://cuet.nta.nic.in/cuetug-2026-syllabus/, या संपर्क साखळीवर ठेवण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच २०२७ साली ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम आतापासूनच बघून ठेवावा. म्हणजे त्यांना या परीक्षेची कल्पना येईल आणि त्यादृष्टिने वर्षभर तयारी करता येईल.
संपर्क- ईमेल- cuet-ug@nta.ac.in, दूरध्वनी- ०११-४०७५९०००
०००००