(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ४२-महिला उद्योजकतेचे नवे क्षितीज

राज्यातील अधिकाधिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून  एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सहकार्यानं महिला उद्योजकता केंद्र (वुमेन्स आंत्रप्रिन्युरशीप सेल)- वाईज (वुमेन इनोव्हेशन स्टार्टअप आंत्रप्रिन्युरशीप) एसएनडीटीडब्ल्यूयू इनक्युबेशन सेंटर  स्थापन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य नवोन्मेष सोसायटी (महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी) ने यासाठी सहकार्य केलं आहे.

या केंद्रामार्फत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य, आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील विविध योजना आणि उपक्रम एकाच व्यासपीठावर आणले जातात. या केंद्राला स्टार्टअप इंडिया सीड फंड स्किम- एसआयएफएस (स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना) आणि  स्माल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया -एसआयडीबीआय (भारतीय लघुउद्योग विकास बँक) यांचा निधी मिळतो.

या केंद्रामुळे महिला उद्योजकांसाठी सक्षम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. यामध्ये नेटवर्किंग प्लॅटफॉर्म (संपर्कसाखळी व्यासपीठ), तज्ज्ञ मार्गदर्शन, सह-कार्यकारी जागा (को वर्किंग स्पेस), गुंतवणुकीच्या संधी, विशेष कार्यक्रम, प्री-इन्क्युबेशन सहाय्य आणि उद्योग भागीदारी यांचा समावेश आहे. या केंद्राद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सवर विशेष भर दिला जातो. महिलांना त्यांच्या नवसंकल्पना व्यवहार्य आणि विस्तारक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केलं जातं. लिंग-विशिष्ट अडचणींवर मात करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं जातं.

या केंद्राच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सचे इन्क्युबेशन करण्यात आले. त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली. आयडियेथॉन (Ideathon) सारखे उपक्रम राबवून उद्योजकीय समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित केली जाते. हे उपक्रम राष्ट्रीय स्तरावरील  स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया मोहिमांशी सुसंगत आहेत.

प्रमुख उद्दिष्टे

१) आधुनिक उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) आणि सहाय्यक परिसंस्था स्थापन करून नवोन्मेषी संकल्पनांना प्रोत्साहन देणं व सक्षम स्टार्टअप्सना व्यावसायिक यश मिळवून देणं.
२) नवोन्मेषी कल्पना आणि उद्योजकीय प्रतिभेला साहाय्य करून महिला उद्योजकांना आवश्यक संधी उपलब्ध करून देणं.
३) संसाधने, मार्गदर्शन, पायाभूत सुविधा आणि कार्यक्षेत्र उपलब्ध करून देणं.
४) स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यात सहकार्य वाढवून बाजारपेठेत प्रवेश सुलभ करणं.
५) सामाजिक परिणाम साधणारी शाश्वत व्यवसाय मॉडेल (प्रारुप) तयार करण्यास प्रोत्साहन देणं.

या केंद्राव्दारे महिला उद्योजकांमध्ये जीवनकौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करून त्यांच्या सर्वांगीण उद्योजकीय क्षमतांचा विकास केला जातो.

उपलब्ध सुविधा१) उद्योजकता जागरूकता कार्यक्रम
व्यवसाय कल्पना ओळखणे, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन, जोखीम व्यवस्थापन इत्यादी विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात, २) कौशल्यविकास प्रशिक्षण
फॅशन डिझाइन, अन्नप्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, हस्तकला, ब्युटी अँड वेलनेस, डेटा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये अल्पकालीन प्रशिक्षण दिलं जातं, ३) बिझनेस प्लॅन मार्गदर्शन
व्यवसाय आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. यामध्ये बाजार संशोधन, खर्च-नफा विश्लेषण आणि निधी उभारणीचे पर्याय समाविष्ट असतात, ४) स्टार्टअप व इन्क्युबेशन सहाय्य
स्टार्टअप कल्पना विकसित करण्यासाठी जागा, मेंटरिंग आणि तांत्रिक मार्गदर्शन दिलं जातं, ५) शासन योजनांची माहिती
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या योजना, महाराष्ट्र उद्योग संचालनालयाच्या योजना, तसेच बँका व वित्तीय संस्थांमार्फत उपलब्ध कर्जसुविधांबाबत माहिती दिली जाते, ६) नेटवर्किंग व मेंटॉरशिप
उद्योगक्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजकांशी संवाद, मार्गदर्शन सत्रं आणि प्रेरणादायी व्याख्यानं आयोजित केली जातात.

अटी व शर्ती

१) अर्जदार महिला असावी व महाराष्ट्रात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी, २) व्यवसाय कल्पना व्यवहार्य व नवोन्मेषी असावी,
३) केंद्राच्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक,
४) निधी किंवा सुविधा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील,

संपर्क महिला उद्योजकता केंद्र, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एसएनडीटी महिला विद्यापीठ,), ५ वा मजला, जुहू तारा रोड, संताक्रूझ (पश्चिम), मुंबई – ४०००४९, संकेतस्थळ- wisesndtwu.org,ईमेल- connect@wisesndtwu.org, दूरध्वनी-०२२-२२०३१८७९ आणि ७४००१७५८४२

००००

महिलांचे स्टार्टअप

महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकीय क्षमतेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्यासोबतच कौशल्य विकास, स्टार्टअपमधील नवसंकल्पना आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केलं जातं. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागामार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने, महाराष्ट्र राज्य नवोन्‍मेष संस्था (महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी) ही संस्था स्थापन केली आहे.

राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना डिजिटल तंत्रज्ञान, सेवा व उत्पादन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली. अन्न प्रक्रिया, हस्तकला, तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), आरोग्यसेवा (हेल्थकेअर), शिक्षण, ई-कॉमर्स, कृषी-आधारित उद्योग अशा विविध क्षेत्रांतील महिला स्टार्टअप्स याचा लाभ घेत आहेत. महिला स्टार्टअप्स अधिक सक्रिय व्हावेत आणि त्यांनी नवसंकल्पना साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी वित्तीय, कौशल्यविषयक व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं.

असे मिळतात लाभ

या योजनेंतर्गत पात्र महिला स्टार्टअप्सना १ लाख ते २५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य दिलं जातं. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील महिलांसाठी २५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. प्रकल्पाच्या गरजेनुसार आणि टप्प्याटप्प्यानं अर्थसाहाय्य वितरित केलं जातं.

या अर्थसाहाय्याचा उपयोग पुढील बाबींकरता करता येतो (१) उत्पादन/सेवा विकास, (२) मार्केटिंग व ब्रँडिंग (विपणन आणि मुद्रानिर्मिती), (३) उपकरण खरेदी, (४) प्रमाणपत्रे व गुणवत्ता परीक्षण, (५) कार्यान्वयन (ऑपरेशनल) खर्च, (६) व्यवसाय विस्तार, (६) पायाभूत सुविधा उभारणी, (७) नेटवर्किंग व बाजारपेठ विस्तार

याशिवाय इन्क्युबेशन सेंटर्स, तज्ञ मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यक्रम अशा विविध सत्रांद्वारे व्यवसाय कौशल्य विकसित करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाते. निवड झालेल्या स्टार्टअप्सना तज्ञ समितीसमोर आपली व्यवसाय संकल्पना सादर (पिच-Pitch) करण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

अटी व शर्ती

१) स्टार्टअप कंपनी/व्यवसायाला, उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटरनल ट्रेड- डीपीआयआयटी) विभागाची मान्यता आवश्यक. हा व्यवसाय महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा, २) कंपनीमध्ये महिलांची किमान ५१ टक्के भागीदारी आवश्यक, ३) स्टार्टअप किमान एक वर्ष कार्यरत असावा आणि त्याची वार्षिक उलाढाल साधारणतः १० लाख ते १ कोटी दरम्यान असावी, ४)महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांमधून समान उद्देशासाठी अनुदान घेतलेले स्टार्टअप या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत, ५) निवड झाल्यानंतर प्रगती अहवाल सादर करणं व निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखणं आवश्यक.

अर्ज प्रक्रिया

या योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन स्वरूपाची आहे. अर्ज, महाराष्ट्र राज्य नवोन्‍मेष संस्था यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (msins.in) करावा लागतो.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात-

(१) डीपीआयआयटी मान्यता प्रमाणपत्र, (२) एमसीए नोंदणी प्रमाणपत्र (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयमिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेअट अफेअर्स- एमसीए. एखादी कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप (मर्यादित दायित्व भागिदारी) किंवा इतर कॉर्पोरेट संस्था सुरू करताना एमसीएकडे नोंदणी करावी लागते.  त्यानंतर कंपनीला हे नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं.) (लागू असल्यास), (३) व्यवसाय प्रस्ताव, (४) आर्थिक विवरण / वार्षिक उलाढाल तपशील, (५) आधार कार्ड, (६) बँक तपशील

अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अर्जांची पडताळणी झाल्यानंतर पात्र स्टार्टअप्सची निवड केली जाते.

संपर्क(१) महाराष्ट्र राज्य नवोन्‍मेष संस्था,पहिला माळा, कक्ष क्रमांक ९, एलफिंन्स्टन हायस्कूल, महापालिका मार्ग, धोबी तलाव,मुंबई ४००००१, हेल्पलाइन- २२३१०५९०००
ईमेल: team@msins.in
संकेतस्थळ: msins.in, (२) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभाग- १ ला मजला, नवीन प्रशासन भवन,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
संकेतस्थळ: sded.in
ईमेल: helpdesk@sded.in
हेल्पलाइन: ०२२-२२६२५६५१ / ०२२-२२६२५६५३

०००