(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ४८ -तंत्रनिकेतन – संधी आणि सावधगिरी

महाराष्ट्रात शासकीय तंत्रनिकेतन संस्थांचे मोठे जाळे पसरलेले आहे. राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या धोरणकर्त्यांनी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन या तंत्रनिकेतनांचा पाया रचला. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक असणारे तांत्रिक कौशल्य मिळावे, या दृष्टीने अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. प्रात्यक्षिकांवर भर देण्याचे धोरण अवलंबले गेले असून, त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण सुलभतेने आणि विनासायास घेता यावे, यासाठी शैक्षणिक शुल्कही अत्यंत अल्प ठेवले आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनाही सुरू केल्या आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेव फुटण्यापूर्वी तंत्रनिकेतन संस्थांमधील पदविका  अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असायची. दहावीतील बरेच गुणवंत विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत असत. त्यांना पुढे उद्योगांमध्ये चांगल्या संधी मिळत आणि अनुभवाच्या बळावर ही मंडळी महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचत. मात्र, मधल्या काळात या परवडणाऱ्या आणि दर्जेदार पदविका अभ्यासक्रमांकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे काहीसे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने जाणीवपूर्वक प्रयत्न करून महाराष्ट्रभर तंत्रनिकेतनातील पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. परिणामी, गेल्या दोन-तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा ओघ पुन्हा वाढलेला दिसतो. शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे गेल्या तीन वर्षांत प्रवेश घेतलेल्या ७० टक्के विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ९५ ते ९६ टक्के होते. बऱ्याच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये हेच चित्र दिसून येते.  हे एक सुचिन्ह मानले पाहिजे.

तंत्रनिकेतन प्रवेशाचे फायदे

शासकीय तंत्रनिकेतनात प्रवेश घेण्याचे अनेक फायदे आहेत- १) सर्व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उच्च प्रशिक्षित आणि अनुभवी अध्यापक वर्ग असतो, २) सुसज्ज प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार साधनांवर प्रात्यक्षिके  करण्याची संधी मिळते, ३) बऱ्याच तंत्रनिकेतनांनी उद्योगांसोबत सहकार्याचे धोरण अवलंबले असल्याने विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होतात, ४) नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी संस्थांमार्फत प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते, ५) विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात,६)  काळाची गरज ओळखून नवनवीन आणि अद्ययावत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, ७) पदविकाधारक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी (बीई/बीटेक) अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी मिळते. पदविकेमध्ये उत्तम गुण मिळवल्यास महाराष्ट्रातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवता येऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांना १२ वीचा ताण आणि त्यानंतर द्यावी लागणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचा तणाव घेण्याची गरज उरत नाही. शिकवणी वर्गांसाठी होणारे हजारो रुपये वाचतात, ८) हे पदविकाधारक विद्यार्थी अनेक राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्थांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (उदा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, आयआयटी मुंबई अंतर्गत असलेले स्कूल ऑफ डिझाइन इत्यादी) असणाऱ्या चाळणी परीक्षेला बसण्यास पात्र ठरतात. याचा अर्थ तंत्रनिकेतनाच्या मार्गातून उच्च श्रेणीच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्याच्या संधी खुल्या होतात, ९) पदविकेच्या काळातील प्रात्यक्षिक ज्ञानाच्या बळावर किंवा काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे स्टार्टअप किंवा स्वयंरोजगार सुरू करू शकतात.

शुल्क आणि सवलती

) शासकीय आणि अशासकीय अनुदानित संस्था–  १) पोस्ट एसएससी (१० वी नंतर) पदविका अभ्यासक्रम (प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश) – प्रति वर्ष ७,५५० रुपये आणि अनामत रक्कम फक्त एकदाच २०० रुपये, २) पोस्ट एचएससी (१२ वी नंतर) पदविका अभ्यासक्रम (प्रथम वर्ष प्रवेश)- एकूण शुल्क प्रति वर्ष ९,५५० रुपये आणि अनामत रक्कम फक्त एकदाच २०० रुपये.

अनुदानित संस्थांमध्ये-  १) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षण शुल्क सवलत योजनेअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ, २) इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत.

) विनाअनुदानित खाजगी संस्था) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेले अंतिम शुल्क, २) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग, शिक्षण शुल्क सवलत योजनेअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ राहील, २) इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत.

  शुल्क सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागते.

प्रवेश पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावीमध्ये  किमान ३५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. प्रवेशासाठी दहावीच्या परीक्षेतील सर्वोत्तम ५ विषयांच्या  गुणांची सरासरी विचारात घेतली जाते.

          केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) द्वारे पारदर्शक पद्धतीने प्रवेश प्रकिया राबवली जाते. विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘सुविधा केंद्र’ उपलब्ध करून दिली जातात. अर्ज सादर करताना ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्जासोबतच मूळ प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतात.

कागदपत्र पडताळणीच्या पद्धती

१) ई-पडताळणी पद्धत (ई-स्क्रुटिनी)- या पर्यायाची निवड केल्यास विद्यार्थ्याला पडताळणीसाठी कोणत्याही सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसते. अर्ज सादर केल्यानंतर, संबंधित सुविधा केंद्र ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्याचा अर्ज आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करते, २) प्रत्यक्ष पडताळणी पद्धत ऑनलाईन पडताळणीत अडचणी येत असल्यास किंवा हा पर्याय निवडल्यास, उमेदवाराला जवळच्या सुविधा केंद्राची वेळ आणि तारीख ऑनलाईन पद्धतीने आरक्षित  करावी लागते. ठरलेल्या दिवशी अर्जाची प्रत आणि सर्व मूळ कागदपत्रे घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जावे लागते. तेथील अधिकारी कागदपत्रे स्कॅन करून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने निश्चित करतात आणि त्याची छापील पोचपावती  देतात.

प्रवेश प्रक्रिया- (१) अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्याचे गुण, प्रवर्ग आणि इतर आरक्षणे यानुसार सर्व पात्र विद्यार्थ्यांची ‘तात्पुरती गुणवत्ता यादी’ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. या यादीत नाव, गुण किंवा आरक्षणाबाबत काही चूक आढळल्यास उमेदवाराला हरकत नोंदवण्यासाठी ठराविक मुदत दिली जाते. ई-पडताळणीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमधून, तर प्रत्यक्ष पडताळणीच्या विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक वैध कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित दावा रद्द केला जातो व उपलब्ध माहितीच्या आधारेच अर्ज निश्चित केला जातो. अंतिम मुदतीनंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जात नाही, (२) प्राप्त झालेल्या सर्व हरकतींचे निवारण केल्यानंतर ‘अंतिम गुणवत्ता यादी’ प्रसिद्ध केली जाते. या यादीतील गुणवत्ता क्रमांकाच्या आधारेच पुढील प्रवेश फेऱ्यांचे जागा वाटप केले जाते, (३) वेगवेगळ्या प्रवर्गातील जागा भरण्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) एकूण ३ फेऱ्या घेतल्या जातात.

सावधगिरी

तंत्रनिकेतन संस्थांमध्ये प्रवेशासाठी दहावीमध्ये केवळ ३५ टक्के गुणांची अट आहे, म्हणून हुरळून जाऊ नये. तंत्रनिकेतनमधील अभियांत्रिकी विषयांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्याची भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र  या विषयांमध्ये गती असणे आवश्यक आहे. जर हे विषय शालेय पातळीवर यथातथाच जमत असतील किंवा मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतील, तर पुढचा शैक्षणिक मार्ग खडतर राहू शकतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. प्रवेश मिळवणे हा केवळ एक भाग झाला, परंतु तंत्रनिकेतनातील अभ्यासक्रम समजून-उमजून उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे हा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. केवळ पदविका परीक्षा उत्तीर्ण होणे पुरेसे नाही; अभ्यासक्रमाच्या कालावधीत शिकलेल्या ज्ञानाचे उपयोजन (ॲप्लिकेशन) करता आले नाही, तर भविष्यात रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे, प्रवेश घेताना स्वतःचा कल, रुची, आवड, विषयांमधील गती आणि आकलन क्षमता या गोष्टींचा गांभीर्याने विचार करूनच योग्य शाखेची  निवड करावी.

संपर्क-https://poly26.dtemaharashtra.gov.in, मदतकक्ष क्रमांक- ७२४९७२४४१८