दरवर्षी लाखो पदवीधर शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात. परंतु उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यामध्ये मोठी दरी दिसून येते. ही दरी बुजवणे आणि रोजगाराची आव्हाने पेलणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. २०२५ च्या श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार एकूण बेरोजगारी दर ३.१ टक्के आहे, पण १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक बेरोजगारी ९.९ टक्के आहे. शिक्षित युवकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. बहुसंख्य पदवीधरांकडे उद्योगांना लागणारे व्यावहारिक कौशल्य नसल्याने त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
सध्याच्या शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रम कालसुसंगत नसतात. उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानाचा वेग आणि शैक्षणिक बदलांचा वेग यात तफावत दिसते. केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर दिल्याने आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याची संधी कमी असल्याने विद्यार्थी कामाच्या ठिकाणी मागे पडतात. शालेय स्तरापासून करिअर मार्गदर्शन आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची कमतरता आहे. जिल्हा किंवा राज्य स्तरावर रोजगार मागणीची वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध होत नाही.
बहुसंख्य विद्यार्थी, अभ्यासक्रम निवडताना केवळ प्रवाहानुसार वाहत जातात. आपला कल, क्षमता आणि बाजारातील मागणी यांचा विचार ते करत नाहीत. परिणामी ते चाचपडत राहतात. त्यांचा वेळ वाया जातो. शिक्षण ते रोजगार या प्रवासात ‘शिका आणि कमवा’ या तत्त्वाची आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या संधींची कमतरता दिसून येते.
सामाजिक मानसिकता
आपल्याकडे आजही नोकऱ्यांनाच जास्त सामाजिक प्रतिष्ठा दिली जाते. यामुळे कौशल्याधारित व्यावसायिक प्रशिक्षणाकडे पाहण्याचा कल नकारात्मक असतो. विशेषतः ग्रामीण भागात महिला आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासाठी सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी कमी असल्याने पालकांची उदासीनता दिसून येते. प्रशिक्षण घेतल्यानंतरही सातत्य राखणे कठीण होते. कौशल्याधारित प्रशिक्षणाला ‘उच्च श्रेणिच्या पदवी’ इतकी प्रतिष्ठा मिळत नसल्याने पारंपरिक अभ्यासक्रमांकडे कल अधिक दिसतो. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
सरकारचे प्रयत्न आणि सद्यस्थिती
सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, नॅशनल अप्रेंटिसशीप प्रमोशन प्रोग्रॅम (राष्ट्रीय आंतरवासिता प्रोत्साहन योजना) आणि जन शिक्षण संस्था सारख्या योजना राबवल्या आहेत. या योजनांद्वारे लाखो युवकांना प्रशिक्षण दिले गेले, पण नोकरी मिळण्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. अनेकदा स्थानिक रोजगाराच्या मागणीनुसार प्रशिक्षण नसते. सैद्धांतिक भाग जास्त आणि प्रात्यक्षिकांवर कमी भर दिला जातो.
२०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणात रोजगारक्षमता आणि उद्योजकतेवर विशेष भर आहे. शाळेपासून व्यावसायिक शिक्षण सुरू करण्याचे, ५० टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आणि कौशल्य व शैक्षणिक शिक्षण एकत्र करण्याची रचना यात अंतर्भूत आहे. तरीही अंमलबजावणीत तफावत दिसून येते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव
कृत्रिम बुद्धिमत्तामुळे काही पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होणार असला तरी नव्या रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काही वर्षांत अनेक कामगारांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा विश्लेषण आणि मूलभूत कोडिंग सारखी कौशल्ये आत्मसात करणाऱ्या युवकांना चांगल्या संधी मिळू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून कौशल्य विकासातील दरी बुजवणे शक्य आहे.
कौशल्य विकासाचे टप्पे
तज्ज्ञांच्या मते दर्जेदार कौशल्य विकासासाठी खालील सहा बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत:
१. पायाभूत कौशल्ये: यात डिजिटल साक्षरता, प्रभावी संवाद कौशल्य, गणितीय क्षमता आणि विषयांच्या मूलभूत संकल्पनांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. हा पाया भक्कम असल्यास भविष्यात, प्रगत कौशल्ये सुलभतेने आत्मसात करता येऊ शकतात.
२. शालेय स्तरावर व्यावसायिक शिक्षण: इयत्ता ६ वी पासूनच मुलांना प्रकल्पाधारित शिक्षण आणि व्यावसायिक विषयांची ओळख करून देणे गरजेचे आहे. यामुळे शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांची सुस्पष्ट वैचारिक जडणघडण होईल. त्यांना करिअर मार्गदर्शन सुलभतेने मिळू शकेल.
३. महाविद्यालयीन आणि भविष्यवेधी कौशल्ये: यापुढे उच्च शिक्षणातील पुस्तकी ज्ञान उपयुक्त ठरणार नाही तर आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बाजारपेठेतील भविष्यातील गरजांचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.
४. शिकाऊ उमेदवारी आणि प्रत्यक्ष अनुभव: ‘शिका आणि कमवा’ या तत्त्वाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण मिळायला हवे. यामुळे त्यांना केवळ अनुभव मिळत नाही, तर आर्थिक स्थैर्यही लाभते.
५. रोजगार आणि डिजिटल व्यासपीठे: नोकरीच्या संधी आणि रोजगार मेळाव्यांसाठी आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक वापर करायला हवा. महाविद्यालयांमधील ‘प्लेसमेंट सेल’ अधिक बळकट करणे आवश्यक आहे.
६. रोजगाराची गुणवत्ता आणि सुरक्षितता: मिळालेली नोकरी केवळ नावापुरती नसावी, तर त्यात कामाची सुरक्षितता, स्थैर्य आणि सन्मानजनक मोबदला आवश्यक ठरतो. अन्यथा मिळवलेले कौशल्य वाया जाऊ शकते.
मार्गदर्शक तत्त्वे
विद्यार्थ्यांनी काय करावे?
(१) स्वतःचा कल ओळखा: इतरांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःची आवड, क्षमता आणि बाजारातील मागणी यांचा ताळमेळ साधा. यासाठी व्यावसायिक करिअर समुपदेशनाची मदत घ्या, (२) कौशल्याला प्राधान्य: केवळ ‘कागदी प्रमाणपत्रा’पेक्षा प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता महत्त्वाची समजा, (३) डिजिटल युगाशी जुळवून घ्या: तुम्ही कोणत्याही शाखेत असा, पण किमान एक डिजिटल कौशल्य (उदा. कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्स, डाटा विश्लेषण किंवा मूलभूत कोडिंग) आत्मसात करणे अनिवार्य आहे, (४) स्थानिक संधींचा अभ्यास: आपल्या भागात कोणते उद्योग (उदा. शेती प्रक्रिया, पर्यटन किंवा छोटे कारखाने) वाढत आहेत, हे पाहून त्यानुसार कौशल्ये मिळवा. (५) आजीवन शिक्षणाची सवय– शिक्षण हे पदवी वा पदव्युत्तर पदवीनंतर संपत नाही. दर सहा महिन्यांनी आपल्या क्षेत्रातील एखादा नवीन ऑनलाइन कोर्स (उदा. स्वयम, एमकेसीएल) करून स्वतःला अद्ययावत ठेवा.
पालकांसाठी
(१) मानसिकता बदला: मुलांच्या केवळ गुणांवर किंवा पदवीवर भर देऊ नका, तर त्यांच्या हाताला काम मिळेल अशा कौशल्यांवर लक्ष द्या, (२) आवड जोपासा: मुलांवर आपल्या इच्छा न लादता, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना तज्ज्ञ बनण्यासाठी पाठिंबा द्या, (३) फसव्या जाहिरातींपासून सावध: ‘१००% नोकरीची हमी’ देणाऱ्या संस्थांच्या जाहिरातींना बळी पडू नका. संस्थेची अधिकृतता आणि गुणवत्ता तपासा, (४) क्षमतांची ओळख: पाल्याच्या जमेच्या बाजू आणि उणिवा ओळखून त्याला योग्य क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहित करा.
इतर बाबी
(१) उद्योग-शिक्षण भागीदारी: शिक्षण संस्थांनी उद्योगांशी थेट सहकार्य करून अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. यामुळे आवशक्यता असलेलीच कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवले जातील, (२) प्रात्यक्षिकांवर भर: सैद्धांतिक शिकवण्यापेक्षा कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभवावर अधिक भर आवश्यक, (३) महिलांसाठी पोषक वातावरण: ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरक्षित वातावरण, वाहतुकीची सोय आणि विशेष शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे, (४) नेटवर्किंग: या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी नेटवर्किंग उपक्रम राबवावेत.
भीती की संधी?
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची भीती असली तरी, याच तंत्रज्ञानामुळे नव्या संधींची दारे उघडणार आहेत. ‘डेटा ॲनालिटिक्स’, ‘प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग’ आणि ‘मशिन लर्निंग’ सारख्या क्षेत्रातील मागणी वाढली आहे. तांत्रिक कौशल्यांइतकीच भावनिक बुद्धिमत्ता, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची क्षमता, ही मानवी कौशल्ये आता अधिक महत्त्वाची ठरतील. आजच्या विद्यार्थ्याने पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन उपयुक्त कौशल्ये, प्रात्यक्षिक अनुभव आणि सतत शिकण्याची मानसिक तयारी ठेवल्यास शिक्षण आणि रोजगारातील दरी कमी होऊ शकेल.
उपयुक्त संकेतस्थळे
रोजगार आणि स्वयंरोजार मिळवण्यासाठी अचुक आणि अद्ययावत माहिती कुठून मिळवावी, हा प्रश्न बऱ्याच तरुण-तरुणींना कायम पडत असतो. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी अनेक डिजिटल उपक्रम शासनामार्फत राबवले जातात त्याअनुषंगाने पुढील महत्वाच्या संकेतस्थळांची निर्मिती शासनाने केली आहे – (१) कौशल्य प्रशिक्षण – www.kaushalya.mahaswayam.gov.in, (२) रोजगार आणि नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी- www.rojgar.mahaswayam.gov.in, (३) उद्योजकता मार्गदर्शन- www.udyog. mahaswayam.gov.in
सुरेश वांदिले