मार्ग यशाचा- ५३ – स्वप्नपूर्तीची ‘आशा’
समाजातील वेगवेगळे घटक आणि आर्थिक , सामाजिक स्तरातील विद्यार्थी स्वत:च्या गुणवत्तेच्या बळावर देशातील महत्वाच्या दर्जेदार संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवतात. मात्र यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरण्यापासूनच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न केवळ आर्थिक कारणामुळे भंगू नये साठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत शिष्यवृत्तींच्या माध्यमातून साहाय्य केले जाते. आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्यासुध्दा विद्यार्थ्यांना साहाय्य करायला लागल्या आहेत.
गरजू आणि निकड असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय योजना व विविध संस्थांच्या योजनांचा लाभ घ्यायला हवा. प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी काही अटी आणि शर्ती असतात. त्यांची पूर्तता केल्यास व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून योग्य वेळेत अर्ज सादर केल्यास या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. या सर्व योजनांची अर्ज प्रकिया ऑनलाइन पध्दतीने होत असल्याने, पादर्शकतेचे तत्व पाळले जाते.
१
आशा स्कॉलरशिप
सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने, या शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात २०२२ मध्ये केली. प्रारंभी ही योजना मर्यादित स्वरूपात होती, मात्र २०२५ मध्ये बँकेच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे आता ही योजना ‘एसबीआय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप’ या नावाने ओळखली जाते. या अंतर्गत देशातील २३,२३० पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत इयत्ता ९ वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या (आयआयटी, आयआयएम आणि परदेशी शिक्षणासह) विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेतील ५० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती राखीव आहेत.
शिष्यवृत्तीचे स्वरुप
१) इयत्ता ९ वी ते १२ वी- १५,०००रु. पर्यंत, २) पदवी शिक्षण- ७५,०००रु. पर्यंत, ३) पदव्युत्तर शिक्षण -१,५०,००० ते २,५०,००० रु.पर्यंत, ४) वैद्यकीय शिक्षण – ४,५०,००० रु, ५) आयआयटी- २,००,००० ते ५,००,००० रु. पर्यंत, ६) आयआयएम- ५,००,००० रु.पर्यंत, ७) परदेशात उच्च शिक्षण -२०,००,००० रु.पर्यंत
पात्रता निकष- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के गुण किंवा ७ सीजीपीए मिळवणे आवश्यक. (अनुसूचित जाती आणि प्रजाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये १० टक्केची सूट. त्यांना किमान ६७.५ टक्के किंवा ६.३० सीजीपीए आवश्यक). एखाद्या विद्यार्थ्याची या शिष्यवृत्तीसाठी एकदा निवड झाल्यावर, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी ही आर्थिक मदत दिली जाते. मात्र सवंर्गनिहाय विद्यार्थ्याला दरवर्षी किमान गुण मिळवणे आवश्यक. यापेक्षा गुण कमी मिळाल्यास पुढील वर्षाची शिष्यवृत्ती थांबवली जाऊ शकते.
वार्षिक उत्पन्न मर्यादा-
१)शालेय विद्यार्थी (इयत्ता ९ वी ते १२ वी)- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रु किंवा त्यापेक्षा कमी असावे, २) पदवी अभ्यासक्रम – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रु किंवा त्यापेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे – १) मागील वर्षाची गुणपत्रिका, २) ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड), ३) चालू वर्षाचा प्रवेश पुरावा ( महाविद्यालय /शाळेचे ओळखपत्र किंवा प्रवेश पावती), ४) चालू वर्षाची शैक्षणिक शुल्क पावती, ५) सक्षम प्राधिकरणाने दिलेला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, ७) विद्यार्थ्याचे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मधील बँक खाते आणि आयएफएससी संकेतांक तपशील, ८) जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), ९) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
अर्ज प्रकिया
https://www.sbiashascholarship.co.in/ या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज सादर करावा. अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता, आर्थिक पार्श्वभूमी आणि दूरध्वनीव्दारे घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या एसबीआय बँक खात्यात जमा केली जाते.
संपर्क- एसबीआय फाउंडेशन, कार्यालय क्रमांक ३५, तळमजला, ‘द आर्केड‘, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई, महाराष्ट्र – ४००००५, हेल्पलाईन (स्कॉलरशिप संबंधित चौकशीसाठी) – ०११-४३०९२२४८ , एसबीआय फाउंडेशन मुख्य कार्यालय– ०२२-२२१५१६८९ / ०२२-२२८७०९३६, ईमेल -ashascholarship@sbifoundation.co.in, संकेतस्थळ- https://www.sbiashascholarship.co.in/
०००
२
ओएनजीसी मेरिट स्कॉलरशिप
‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड‘ (ओएनजीसी) या सार्वजनिक कंपनीमार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि खुल्या संवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना विनासायास उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, म्हणून या योजनेच्या माध्यमातून साहाय्य केले जाते. या योजनेमध्ये ५०% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवल्या जातात.
ही शिष्यवृत्ती- १) अभियांत्रिकी (बीई/ बीटेक)- सर्व शाखा, २) एमबीबीएस –वैद्यकीय शिक्षण, ३) एमबीए –व्यवसाय व्यवस्थापन, ४) मास्टर्स इन (एमटेक/एम.एस्सी) जिऑलॉजी/जिओफिजिक्स,या अभ्यासक्रमांसाठी दिली जाते.
शिष्यवृत्तीचे स्वरुप- १) निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी ४८,००० रुची आर्थिक मदत दिली जाते.(दरमहा ४,००० रु. थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते). दरवर्षी उत्तम गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास, हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत (उदा. अभियांत्रिकीची ४ वर्षे किंवा एमबीबीएसची साडेचार वर्षे) ही रक्कम दिली जाते.
अटी आणि शर्ती- १) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे, २) अभियांत्रिकी किंवा एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक, ३) एमबीए किंवा जिऑलॉजी/जिओफिजिक्स या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी पातळीवर किमान ६० टक्के गुण किंवा ६ सीजीपीए मिळवणे आवश्यक.
वार्षिक उत्पन्न मर्यादा
१) अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ४ लाख ५० हजार रु. पेक्षा कमी असावे, २) खुला संवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे – १) १२ वी ची गुणपत्रिका (अभियांत्रिकी/ एमबीबीएस प्रवेशासाठी) किंवा पदवीची गुणपत्रिका (एमबीए/ जिऑलॉजी/ जिओफिजिक्ससाठी), २) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, ३) जातीचे प्रमाणपत्र (एसस्सी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी), ४) वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला/इयत्ता १० वी च्या गुणपत्रिकेची प्रत, ५) महाविद्यालय प्रवेशाचा पुरावा (बोनाफाइड प्रमाणपत्र किंवा शुल्क पावती), ६) पॅन कार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्याचा तपशील (रद्द केलेला धनादेश किंवा पासबुकाचे पहिले पृष्ठ).
अर्ज प्रक्रिया
इच्छूक विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (एनपीएस) https://scholarships.gov.in/ येथे नोंदणी करुन वन-टाइम रजिस्ट्रेशन (ओटिआर) क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची पात्रता प्रमाणित करण्यासाठी आणि अर्ज अंतिम करण्यासाठी याची आवश्यकता असते. त्यानंतर www.ongcscholar.org या संकेतस्थळावरील उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या ‘ॲप्लाय नाऊ’ या पर्यायावर क्लिक करुन अर्ज सादर करावा.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याने इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा आर्थिक सहाय्याचा लाभ घेतलेला नसावा.
संपर्क- ओएनजीसी फाउंडेशन, ८ वा मजला, कोर-३, स्कोप मिनार, लक्ष्मी नगर डिस्ट्रिक्ट सेंटर, नवी दिल्ली, दिल्ली – ११००९२, दूरध्वनी- ०११- २२४०६८५४ ईमेल– info@ongcscholar.org, संकेतस्थळ– https://ongcscholar.org/
000
३
टॉप क्लास एज्युकेशन स्किम –
आयआयटी, एनआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठे, राष्ट्रीय विधी विद्यापीठे आणि नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राबवली जाते.
शिष्यवृत्तीचे स्वरुप- १) महाविद्यालयाचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क सरकार भरते, २) पहिल्या वर्षी ८६ हजार रुपये शैक्षणिक भत्ता (ॲकॅडेमिक अलाउंसेस), त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी ४१ हजार रुपये दिले जातात. या शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असायला हवे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल‘ वर (scholarships.gov.in) दरवर्षी अर्ज करावा लागतो.
संपर्क- https://socialjustice.gov.in
(अनुसूचित जमाती संवर्गासाठी अशाच प्रकारची योजना केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत राबवली जाते. संपर्क- tribal.nic.in)