(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ५४ -सुपर हायटेक संधी!

बेंगळुरु स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस ही आपल्या देशातील अत्यंत दर्जेदार आणि प्रतिष्ठित संस्था. जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भारतातील मोजक्या संस्थापैकी ही एक संस्था. या संस्थेच्या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी स्तरावरील संशोधन कार्यास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या अभ्यासक्रमांचा नावलौकिकही खूप मोठा.

या संस्थेत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. पहिल्याच वर्षापासून थेट संशोधन कार्य करायला मिळते. यामुळे संस्थेचे विद्यार्थी  विविध उद्योग, संशोधन प्रयोगशाळा आणि स्टार्टअप्स या सर्व ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बजावतात.

या संस्थेने यंदाच्या म्हणजे २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून पुढील चार वर्षे कालावधीचे नवे अभ्यासक्रम सुरु केले आहेत-

() बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात विमान आणि अवकाशयान निर्मितीचे तंत्रज्ञान शिकवले जाते. हा अभ्यासक्रम ॲनॅलिसिस (विश्लेषण), डिझाईन (आराखडा) आणि एक्सपेरिमेंटेशन (प्रयोग) यावर भर देतो. त्‍यामुळे विद्यार्थी एरोस्पेस आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन, उद्योग, आणि प्रगत तंत्रज्ञानावरील आधारित उद्योग-व्यवसाय) यामध्ये करिअर करण्यासाठी सक्षम बनतात.

काय शिकाल?

(१) एरोडायनॅमिक्स (हवेची गती आणि त्याचा वस्तूवर होणारा परिणाम), (२) प्रोप्युल्शन (इंजिनची ढकलण्याची क्षमता किंवा गती), (३) स्ट्रक्चर्स (विमानाची रचना किंवा सांगाडा), (४) फ्लाईट मेकॅनिक्स (उड्डाणाचे शास्त्र), (५) गायडन्स अँड कंट्रोल (दिशादर्शन आणि नियंत्रण), (६) गणित, (७) भौतिकशास्त्र, (८) अभियांत्रिकी यंत्रशास्त्र.

शैक्षणिक सुविधा

(१) नॅशनल ट्रायसोनिक एरोडायनॅमिक फॅसिलिटी (राष्ट्रीय अतिवेगवान वायूगतिशास्त्र सुविधा), लो-स्पीड विंड टनेल्स (कमी गतीच्या हवेचे बोगदे), कंबशन लॅब्ज (ज्वलन प्रयोगशाळा), आणि ॲडव्हान्स कंपोझिट्स टेस्टिंग सेंटर्स (प्रगत मिश्रधातू चाचणी केंद्रे). यांसारख्या सुविधा जागतिक पातळीवर मोजक्याच संस्थांकडे आहेत.

() संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य देणारी संस्कृती हायपरसॉनिक्स (आवाजाच्या गतीपेक्षा पाच पटीने जास्त वेग), स्पेस प्रोप्युल्शन (अंतराळ उड्डाण गती), ऑटोनॉमस सिस्टिम्स (स्वयंचलित यंत्रणा), आणि एआय-ड्रिव्हन एरोस्पेस डिझाईन (कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विमानाचे डिझाईन) यांसारख्या प्रगत विषयांवर संशोधन करण्याची संधी मिळते.

() इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन  आणि डीआरडीओडिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबत सहकार्य या दोन्ही महत्वाच्या संस्थासोबत सक्षम स्वरुपाचे सहकार्य असल्याने येथील अध्यापक/संशोधक राष्ट्रीय मोहिमा आणि धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

()आंतरविद्याशाखीय पर्यावरण मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटेशनल अँड डेटा सायन्सेस आणि भौतिकशास्त्र या विभागांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळते.

करिअर संधी-

() इस्रो, नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन), ईएसए (युरोपियन स्पेस एजन्सी), जाक्सा (जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी)- यामध्ये लॉन्च व्हेईकल्स (उपग्रह सोडणारे रॉकेट), सॅटेलाईट्स (उपग्रह), चंद्र आणि इतर ग्रहांच्या मोहिमा, तसेच स्पेस स्टेशन (अंतराळ स्थानक) च्या मोहिमांमध्ये काम करण्याची संधी.

() डीआरडीओ, एचएएल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड), भारतीय वायू सेना, जागतिक स्तरावर बोईंग, एअरबस, लॉकहीड मार्टिन  आणि सॅफ्रान  आणि सॅफ्रान- विमानाचे डिझाईन, प्रोप्युल्शन, एव्हीओनिक्स (विमानातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा), आणि सिस्टिम्स इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये संधी.

() अर्बन एअर मोबिलिटी (शहरी हवाई वाहतूक उदा- एअर टॅक्सी, प्रगत ड्रोन), स्मॉल सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन्स (लहान उपग्रहांचा समूह), हायपरसॉनिक व्हेईकल्स, आणि स्पेस टुरिझम (अंतराळ पर्यटन) यांसारखी अत्याधुनिक क्षेत्रे.

(५) एरोस्पेस सिस्टिम्ससाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (संगणकीय द्रव गतिशास्त्र) कन्सल्टिंग, रोबोटिक्स, ऑटोनॉमस व्हेईकल्स (चालकविरहित वाहने), आणि सिस्टिम्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी.

२) बी.टेक मेकॅनिक्स अँड कॉम्प्युटिंग

या अभ्यासक्रमात, मेकॅनिक्स (यंत्रशास्त्र) ची मूलभूत तत्वे आणि आधुनिक कॉम्प्युटेशनल मेथड्स (संगणकीय पद्धती) यावर भर दिला जातो. गणित, भौतिकशास्त्र, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि  संगणकीय विज्ञान या विषयांचा पाया मजबूत केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या भौतिक प्रणालींचे विश्लेषण करणे, इंटेलिजंट सोल्यूशन्स (बुद्धिमान उपाय) डिझाईन करणे आणि विविध क्षेत्रांत डेटावर आधारित पद्धतीचे तंत्र सुलतेने वापरता येते.

या अभ्यासक्रमात मॉडेलिंग (प्रतिकृती तयार करणे), सिम्युलेशन (संगणकावरील आभासी प्रयोग) आणि आंतरविद्याशाखीय समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. हा  अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रगत अभियांत्रिकी, रोबोटिक्स, कॉम्प्युटेशनल डिझाईन आधारित उद्योगांसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये प्रदान करतो.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

()संशोधनावर आधारित अभ्यासक्रम प्रगत सिम्युलेशन तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि कॉम्प्युटेशनल डिझाईनचा प्रत्यक्ष अनुभव, () आंतरविद्याशाखीय पर्यावरण- संस्थेमधील एरोस्पेस, एआय, मटेरिअल्स आणि ॲप्लाईड मॅथेमॅटिक्स (उपयोजित गणित) या विभागांसोबत सहकार्य, (३) बेंगळुरू ॲडव्हँटेज (फायदा/लाभ)- भारताचे तंत्रज्ञान केंद्र असलेल्या बेंगळुरूमध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप), प्रकल्प आणि उद्योगातील थेट अनुभव.

करिअर संधी

() रोबोटिक्स अँड ऑटोनॉमस सिस्टिम्स रोबोटिक्स, सिम्युलेशन इंजिनिअरिंग आणि कंट्रोल सिस्टिम्स, () डिजिटल इंजिनिअरिंग -डिजिटल ट्विन्स (प्रत्यक्ष प्रणालीची संगणकीय प्रतिकृती), हाय-परफॉर्मन्स इंजिनिअरिंग सिम्युलेशन्स, आणि कॉम्प्युटेशनल डिझाईन, () ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चुरिंग– ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग (उदा. थ्रिडी प्रिंटिंग), ऑटोमेशन (स्वयंचलन), आणि स्मार्ट फॅक्टरीज (आधुनिक बुद्धिमान कारखाने).

३) बी.टेक  मटेरियल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग

पदार्थांच्या क्षेत्रातील क्रांतीमध्ये आघाडीवर असणारे अभियंते आणि तंत्रज्ञांची निर्मिती करण्याच्या दृष्टिने या अभ्यासक्राची संरचना करण्यात आली आहे. हे विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग (प्रगत वेगवान संगणन), अंतराळ मोहीम, आरोग्य सेवा, ऊर्जा, पायाभूत सुविधा मधील प्रगतीला गती देण्यासाठी महत्वाचे योगदान देतील. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समस्या सोडवण्यावर विशेष भर दिला गेल्याने, संबंधित विद्यार्थी उद्योग, प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधन कार्यात उत्तम प्रकारचे करिअर करू शकतात.

वैशिष्ट्ये-

() अत्याधुनिक सुविधा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (अतिसूक्ष्मदर्शक), एक्स-रे डिफ्रॅक्शन (क्ष-किरण विवर्तन), मेकॅनिकल टेस्टिंग (यांत्रिक चाचणी), थिन-फिल्म डिपॉझिशन (पातळ थरांचे संचयन), इलेक्ट्रोकेमिस्ट्री लॅब्ज (विद्युत रसायनशास्त्र प्रयोगशाळा),

() संशोधन- नॅनोमटेरियल्स (अतिसूक्ष्म पदार्थ), क्वांटम मटेरियल्स, बायोमटेरियल्स (जैविक पदार्थ), एनर्जी स्टोरेज (ऊर्जा साठवणूक), आणि एआय-ड्रिव्हन मटेरियल्स डिस्कव्हरी (एआय द्वारे नवीन पदार्थांचा शोध) या क्षेत्रात प्रगत संशोधनाची संधी.

() आंतरविद्याशाखीय समन्वय- फिजिक्स, केमिस्ट्री, सीडीएस (कम्प्युटेशनल अँड डेटा सायन्सेस), ईसीई (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग) आणि सेंटर फॉर बायोसिस्टिम्स सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागांसोबत काम करण्याची संधी.

() उद्योग आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा सहकार्य – प्रायोजित संशोधन  आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून इस्रो, डीआरडीओ, बीएआरसी (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र) आणि आघाडीच्या कंपन्यांशी सहकार्य.

करिअर संधी

() सेमिकंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स इस्रो, डीआरडीओ, बीएआरसी, इंटेल ,टीएसएमसी, सॅमसंग, आणि भारतीय स्टार्टअप्समध्ये चिप मटेरिअल्स, कंपाउंड सेमिकंडक्टर्स, आणि ॲडव्हान्स पॅकेजिंगमध्ये संधी.

() ऊर्जा आणि शाश्वतता बॅटरी टेक्नॉलॉजी, हायड्रोजन मटेरियल्स, सोलर सेल (सौरऊर्जा सेल) विकास, फ्युएल सेल्स, आणि पर्यावरणपूरक मटेरियल्स क्षेत्रात काम.

() अंतराळ आणि संरक्षण- एचएएल, डीआरडीओ, बोईंग, एअरबस आणि स्पेस स्टार्टअप्समध्ये हाय-परफॉर्मन्स स्ट्रक्चरल अलॉईज (उच्च क्षमतेचे मिश्रधातू), थर्मल कोटिंग्स (उष्णतारोधक थर), कंपोझिट्स आणि स्टेल्थ मटेरियल्स (रडारला चकवा देणारे पदार्थ) -यामध्ये संधी.

() जैववैद्यकीय आणि आरोग्यसुविधा- मेडटेक कंपन्या आणि रुग्णालयांमध्ये इम्प्लांट मटेरिअल्स (शरीरात बसवले जाणारे कृत्रिम अवयव/भाग), ड्रग-डिलिव्हरी सिस्टिम्स (शरीरात औषध पोहोचवणारी प्रणाली), डायग्नोस्टिक बायोसेन्सर्स (रोगनिदानासाठीचे जैव-संवेदक).

हे अभ्यासक्रम केल्यानंतर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस, आयआयटी, एमआयटी,  स्टॅनफोर्ड, कॅलटॅक, टीयू डेल्फ्ट, ईटीएच झ्युरिच आणि इतर जागतिक विद्यापीठांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध होते.

प्रवेश प्रक्रिया

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेशासाठी असलेली जेइइ-ॲडव्हान्स्ड परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आयआयटी प्रवेशासाठी असणारी शैक्षणिक अर्हतेची अट या अभ्यासक्रालाही लागू राहील. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जोसा (जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटी)च्या प्रक्रियेत सामील व्हावे लागेल. इंडियन सायंस इंस्टिट्यूटच्या प्रवेश (ॲडमिशन) पोर्टलवर वेगळा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

          संपर्क (१) अभ्यासक्रम चौकशी- ०८०-२२९३४०६०/२२९३३३८८, ईमेल: admission.ug@iisc.ac.in, (२) प्रवेश शुल्क आणि अर्ज शुल्क चौकशी-०८०-२२९३२९७७, ईमेल: admission.acad@iisc.ac.in, संकेतस्थळ- https://btech-ug.iisc.ac.in/contact