(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ५५ ‘प्रगती’ला साथ शिष्यवृत्तीची

केंद्र आणि राज्य शासनाच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकाराच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजना वेगवेगळ्या संवर्गासाठी असतात. त्यासाठी काही अटी आणि शर्ती ठेवल्या असतात. त्यांचे सुयोग्यरित्या पालन होत असल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ सुलभतेने घेता येतो.

‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (एलआयसी) या संस्थेच्या ‘एलआयसी गोल्डन जुबली फाउंडेशन’द्वारे  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी, शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

शिष्यवृत्तीचे स्वरूप

१) वैद्यकीय क्षेत्र (एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस) – दरवर्षी ४०,००० रुपये (प्रत्येकी २०,००० रुपयांचे २ हप्ते), २) अभियांत्रिकी क्षेत्र (बीई, बीटेक, बी आर्क,) – दरवर्षी ३०,००० रुपये (प्रत्येकी १५,००० रुपयांचे २ हप्ते), ३) नियमित पदवी, पदविका, आयटीआय व व्यावसायिक अभ्यासक्रम दरवर्षी २०,००० रुपये (प्रत्येकी १०,००० रुपयांचे २ हप्ते), ४) मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती इयत्ता १० वीनंतर उच्च माध्यमिक शिक्षण किंवा पदविका /व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या मुलींना २ वर्षांसाठी दरवर्षी १५,००० रुपये दिले जातात.

पात्रता आणि गुण

१) विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी किंवा १२ वी (किंवा समकक्ष) परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह किंवा समान श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. २) चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा,३) कुटुंबाचे सर्व मार्गांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ,५०,००० (साडेचार लाख) रुपयांपेक्षा जास्त नसावे, (मात्र २ लाख ५० हजार रु. उत्पन्न गटातील अर्जदारांना निवडीत प्राधान्य दिले जाते.), ४) एका कुटुंबातील केवळ एकाच विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

आवश्यक कागदपत्रे१) इयत्ता १० वी आणि १२ वी ची मूळ गुणपत्रिका (किंवा मागील उत्तीर्ण परीक्षेचे प्रमाणपत्र), २) चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याचा पुरावा (बोनाफाइड प्रमाणपत्र किंवा शिक्षण शुल्क पावती), ३) सक्षम शासकीय अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, ४) विद्यार्थ्याचे शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड) आणि रहिवासी दाखला, ५) राष्ट्रीयीकृत बँक खात्याचे आयएफएससी  संकेतांक व खाते क्रमांक स्पष्ट दिसणारे विद्यार्थ्याच्या पासबुकाचे पहिले पान किंवा रद्द केलेला धनादेश, ६) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक आणि ईमेल.

अर्ज प्रक्रिया प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांनी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘गोल्डन ज्युबिली स्कॉलरशीप’ या संपर्कसाखळीवर अर्ज भरावा. अर्जाची कोणतीही छापील प्रत  कार्यालयाला पाठवण्याची आवश्यकता नसते.

संपर्क- एलआयसी गोल्डन ज्युबली फाउंडेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ, कॉर्पोरेट ऑफिस, ‘योगक्षेम’ इमारत, जीवन विमा मार्ग, पोस्ट बॉक्स नं. १९९५३, मुंबई – ४०० ०२१, दूरध्वनी-०२२-६८२७६८२७, संकेतस्थळ https://licindia.in किंवा फाउंडेशनचे मुख्य पृष्ठ- https://licindia.in/golden-jubilee-foundation

००

मुलींना मोफत शिक्षण

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास प्रवर्गातील मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क (ट्युशन फी) आणि परीक्षा शुल्क  माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून घेतला आहे.

यात पुढील अभ्यासक्रमांचा समावेश होतो- १) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (पदवी/ पदविका), २) औषधनिर्माणशास्त्र, ३) वास्तुकला (आर्किटेक्चर), ४) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ५) एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, ६) वैद्यकीय/परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रम,

या शिष्यवृत्तीच्या विस्तृत अटी- https://dte.maharashtra.gov.in/wp-content/uploads/2024/08/Girls-Free-Education-GR-and-Circular-1.pdf या संपर्क साखळीवर ठेवण्यात आल्या आहेत.

००००

युजीसी आणि एआयसीटीई शिष्यवृत्ती योजना

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या संस्थांद्वारे व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी (उदा. अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्‍त्र, वास्तुकला, व्यवस्थापन) पुढील शिष्यवृत्ती दिल्या जातात

अ) प्रगती शिष्यवृत्ती–  अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पदवी किंवा पदविका  अभियांत्रिकी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या बँक खात्यात दरवर्षी ५० हजार रुपये थेट जमा केला जातो. (हा निधी शिक्षण शुल्क, पुस्तके किंवा लॅपटॉपसाठी वापरता येतो). या खर्चाचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नसते. हे अर्थसाहाय्य पदवी अभ्यासक्रमासाठी चार वर्षे आणि पदविका अभ्यासक्रमासाठी तीन वर्षे दिले जाते. संबंधित विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या  शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी पात्रता परीक्षेमधील (सीटी/जेइइ) गुण ग्राह्य धरले जातात. त्यासाठी १२वी किंवा समकक्ष परीक्षेतील गुणांच्या टक्केवारींचा आधार घेतला जातो.

संपर्क संकेतस्थळ – www.aicte-india.org  आणि संकेतस्थळ- www.scholarships.gov.in

ब) इंदिरा गांधी सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप

या योजनेच्या माध्यमातून पालकांची एकच मुलगी असलेल्या विद्यार्थीनीस पदव्युत्तर पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी) शिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले जाते. पात्र विद्यार्थींना दर वर्षी ३६,२०० रु .दिले जातात. ही शिष्यवृत्ती दरवर्षी दहा महिन्यांसाठी दिली जाते. (या मुलीला एक भाऊ असल्यास ती या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत नाही.) दूरस्थ शिक्षण (डिस्टंस एज्युकेशन) या पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती दिली जात नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थींनीकडून, शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक शुल्क आकारु नये असे अपेक्षित आहे.

संपर्क संकेतस्थळ- https://www.ugc.gov.in/Scholarships/stu_Scholarship4, ईमेल- contact.ugc@nic.in

या शिष्यवृत्तीचा अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वरूनच भरावा लागतो.

०००

नॅशनल स्कॉलरशीप फॉर पोस्ट ग्रज्युएट स्टडी

विद्यापीठ अनुदान (यूजीसी) आयोगाने, ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी, यूजीसीने मान्यता दिलेल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याची वयोमर्यादा ३० वर्षे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्णवेळेचे असावेत. पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीच्या कालावधीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी देशभरातून १० हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न  आठ लाख रुपयांपर्यंत असावे. शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षे. या योजनेतील मंजुर रक्कम, थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर- डीबीटी) अंतर्गत जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी दिली जाते.

 संपर्क संकेतस्थळ- https://www.ugc.gov.in/Scholarships/stu_Scholarship6) आणि www.scholarships.gov.in

०००

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप

विज्ञान, मानव्यशास्त्र, सामाजिकशास्त्र आणि भाषाशास्त्र या विषयांमध्ये एम.फिल. किंवा पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ (जेआरएफ) दिली जाते.

अर्हता- नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट-ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (नेट-जेआरएफ) किंवा यूजीसी-सीएसआयआर(वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद– काउंसिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतात. मात्र त्यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून दोन वर्षांच्या आत संबंधित विद्यापीठ, संस्था किंवा महाविद्यालयात एम.फिल./पीएच.डी.साठी नोंदणी करावी लागते.

या फेलोशीपसाठी देशभरातून ११,७५० उमेदवारांची निवड केली जाते. फेलोशिपचा कालावधी पाच वर्षे किंवा प्रबंध सादर होईपर्यंतचा कालावधी. (यापैकी जो कालावधी कमी असेल तो,ग्राह्य धरला जातो.)

आर्थिक सहाय्य

(१) पहिल्या दोन वर्षांत उमेदवाराला ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ (जेआरएफ) म्हणून दरमहा ३७,००० रु. फेलोशिप दिली जाते. उर्वरित कालावधीत सीनिअर रिसर्च फेलो‘ (एसआरएफ) म्हणून त्याला दरमहा ४२,००० रु.फेलोशिप दिली जाते. याव्यतिरिक्त संशोधन खर्चासाठी (कॉन्टिंजन्सी) साहाय्य केले जाते. मानव्यशास्त्र व सामाजिकशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना जेआरएफ कालावधीत वार्षिक १०,००० रु. व  एसआरएफ कालावधीत वार्षिक २०,५०० रु  आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जेआरएफ कालावधीत वार्षिक १२,००० रु. व एसआरएफ कालावधीत वार्षिक २५,००० रु.दिले जातात.

संपर्कनेट-जेआरएफ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी- https://ugcnet.nta.nic.in/

(राज्य आणि केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये वेळोवळी बदल होतात. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.)

 

०००