(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ५६- नीट’ लक्ष द्या!

नीट परीक्षेचा गोंधळ हा आता दरवर्षी मागच्या पानावरुन पुढे चालू अशा प्रकारचा झाल्याचे दिसून येते. या परीक्षेला देशातील २५ लाखाच्या आसपास विद्यार्थी बसतात. या परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, नर्सिंग अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असला तरी मुख्यत्वे विद्यार्थ्यांना एमबीबीएसलाच प्रवेश घ्यायचा असतो. देशभरात शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण जागा, एक लाखाच्या आसपास तर महाराष्ट्रात ही संख्या दहा हजाराच्या आसपास आहे. ही आकडेवारी लक्षात न घेता, पालकमंडळी  विद्यार्थ्यांना एमबीबीएसचे स्वप्न दाखवतात किंवा स्वत:चे स्वप्न मुलाच्या माध्यमातून पूर्ण करु इच्छितात. त्यामुळे शिकवणी वर्गाचे भरमसाठ शुल्क भरण्यासाठी ते एक पायावर तयार असतात. ही कळपीय मानसिकता बरोबर ओळखून जागोजागी ‘नीट कोचिंग फॅक्ट्री’ सुरु झाल्या.

कोणताही विचार न करता या कारखान्यातील तथाकथित यशाचा फार्म्युला विकत घेण्यासाठी ग्राहक धावत येत असल्याने, हे कारखाने महायशस्वी झाले. अशा काही वर्गातील विविध केंद्रांवर १० हजारापासून २५ हजारापर्यंत विद्यार्थी नीटच्या यशासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. दरवर्षी अशा शिकवणी वर्गांमधून किती विद्यार्थी एमबीबीएससाठी निवडले गेले, याचे प्रमाण कुणी लक्षात घेत नाही. अशा शिकवणी वर्गातील १० हजार विद्यार्थ्यांपैकी समजा १०० विद्यार्थ्यांना यश मिळत असल्यास याची टक्केवारी एक निघते. साधारणत: नीट शिकवणी वर्गाच्या “महायशा”चे हेच प्रमाण सर्वत्र दिसते. उर्वरित ९९.९९ टक्के विद्यार्थ्यांचे काय? आता या शिकवणी वर्गांनी, ‘रिपिर्टस स्पेशल बॅच’ किंवा अशाच आकर्षक पध्दतीच्या वेष्टनात मुलांना पुन्हा स्वत:कडे आकर्षित करायला सुरुवात केली आहे. या आकर्षक पॅकेजला हुरुळून जाऊन विद्यार्थी आणि पालक पुन्हा त्याच चक्रात अडकताहेत. दुसऱ्या वर्षीही संबंधित शिकवणी वर्गाचा निकाल असाच एक-दोन टक्क्‌याचा पलिकडे जात नाही. चांगल्या गुणांनी किती रिपिटर्स उत्तीर्ण झालेत, याची कोणतीही सांख्यिकी माहिती कुणीच सांगत नाहीत. काही विद्यार्थी आणखी एक म्हणजे तिसरी संधी घेतात. त्यांची इच्छा नसली तरी पालक त्यांना भरीस घालतात. रिपिटर्सच्या यशाची संख्या ही कायम अल्पच असते, ही बाब पालक आणि विद्यार्थी ध्यानात घेत नाहीत. त्यामुळे वर्ष वाया जातेच, पैसाही पाण्यात जातो. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे  विद्यार्थी मानसिकरित्या खचतो.

टाळता येणे शक्य

हे टाळता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता, नीट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खरोखरच आहे का? हे ओळखायलाच हवे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयातील संकल्पनाच स्पष्ट झाल्या नसल्यास किंवा अनेक बाबी आकलन व्हायला कठीण जात असल्यास, ‘नीट’ परीक्षेतून एमबीबबीएसला प्रवेश मिळणे कठीण जाणारच. अवघ्या १ लाख जागा लक्षात घेतल्यास ‘प्रयत्नांती परमेश्वर’  वगैरे किंवा ‘कोशीस करणे वालोंकी हार नही होती’ अशा कथनास काही अर्थ उरत नाही. शिकवणी वर्गाचे ‘महर्षी’ किंवा ‘सर’जी मंडळी आम्ही म्हणजे, ‘शंभर टक्के यश’ हे कितीही उच्चरवाने सांगत असले तरी स्वत:ची बौध्दिक क्षमता लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी साधकबाधक निर्णय घ्यायला हवा. या निर्णयास पालकांनी पाठिंबा द्यायला हवा. यातच दोघांचेही हित असते.

दुसरे पर्याय

यंदाची नीट परीक्षा आता लवकरच होईल. त्याव्दारे एमबीबीएसला प्रवेश मिळत नसल्यास निराश न होता, वैद्यकीय क्षेत्रातील इतरही पर्यायांचा विचार करायला हवा. पुन्हा पुढच्या वर्षी नीट देण्याचा निर्णय हा ‘आपल्यासाठी अविचार आणि शिकवणी वर्ग संचालकांसाठी सुविचार’ ठरु शकतो.

वैद्यकीय क्षेत्रांतील इतर ज्ञानशाखांमध्ये नीट गुणांच्या आधारावर प्रवेश मिळत असल्यास त्या शाखांना किंवा अलाईड हेल्थ सायंसच्या शाखांना प्रवेश घ्यायला हवा. हे अभ्यासक्रम कौशल्याधारित आहेत. त्यामुळे करिअरच्या बऱ्याच संधी मिळतात. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. संशोधनाच्या संधी मिळतात.

केंद्र आणि राज्यशासनाच्या अखत्यारितील अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळत असल्यास तो घ्यायलाच हवा. अशा संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत असतात. प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक असणारी सर्व संसाधाने या संस्थांमध्ये असतात. या संस्थांमधील रुग्णालयात बरेच रुग्ण येत असल्याने त्यांच्यावर वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांकडून होणारे उपचार जवळून बघता येतात.

०००

अलाईड हेल्थ सायंस (सह वैद्यकीय विज्ञान)

अभ्यासक्रम आणि संस्था

१) हृदय आणि श्वसन विकार (हृदय आअणि फुफ्फुसाशी संबंधित उपचारांमध्ये डॉक्टरांना मदत करणाऱ्या विषयांचा यात समावेश होतो.)- (१) बी.एस्सी कार्डिॲक टेक्नॉलॉजी – ईसीजी, इकोकार्डियोग्रॅफी आणि कॅथ लॅबमध्ये हृदयाच्या तपासणीशी संबंधित तंत्रज्ञान. (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली, संकेतस्थळ – aiims.edu), (२) बी.एस्सी परफ्युजन टेक्नॉलॉजी- खुल्या ह्रदय (ओपन हार्ट सर्जरी) शल्यक्रिये दरम्यान ‘हार्ट-लंग (ह्रदय-फुफ्फुस) यंत्रणा ‘ हाताळणी. (जिपमेर, पुद्दुचेरी, संकेतस्थळ – jipmer.edu.in), (३) बी.एससी रेस्पिरेटोरी केअर टेक्नॉलॉजी- श्वसनाचे आजार आणि व्हेंटिलेटर यंत्रणा हाताळणी. (एम्स, ऋषिकेश, संकेतस्थळ – aiimsrishikesh.edu.in),

२) निदान तंत्रज्ञान (रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विविध प्रयोगशाळा चाचण्या आणि स्कॅनिंग करणाऱ्या विषयांचा यात समावेश होतो.) – (१) बी.एस्सी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी- रक्त, मूत्र आणि इतर जैविक नमुन्यांची प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणी. ( ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस नागपूर, संकेतस्थळ – https://aiimsnagpur.edu.in), (२) बी.एस्सी मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी / रेडिओलॉजी- एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान यंत्रे हाताळणी. (सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), पुणे, संकेतस्थळ – afmc.nic.in), (३) बी.एस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी(लेबॉरेटरी) – शरीरातील जिवाणू, विषाणू आणि आजारांच्या मुळांचा सखोल अभ्यास. (ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालय समूह (https://gmcjjh.edu.in), मुंबई)

३) पुनर्वसन आणि उपचार (औषधांशिवाय किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्ववत बरे होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या विविध थेरपींचा यात समावेश होतो.) (१) फिजिओथेरपी- शारीरिक हालचाली, व्यायाम आणि मसाजद्वारे हाडे, स्नायू किंवा मज्जासंस्थेच्या आजारांवर उपचार. (जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई, संकेतस्थळ – kemh.edu ),(२) ऑक्युपेशनल थेरपी – शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आलेल्या व्यक्तींना त्यांचे दैनंदिन आयुष्य स्वावलंबीपणे जगण्यासाठी विशेष प्रशिक्षण. (टोपिवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई, संकेतस्थळ – tnmcnair.edu.in, (३) स्पीच अँड हिअरिंग थेरपी – रुग्णांच्या बोलणे आणि ऐकण्याच्या विविध समस्यांवर आधुनिक पद्धतीने उपचार. (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग, म्हैसूर, संकेतस्थळ – aiishmysore.in / अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसऑर्डर्स, मुंबई, संकेतस्थळ – ayjnihh.nic.in)

४) ऑपरेशन थिएटर आणि इमर्जन्सी केअर (शस्त्रक्रिया आणि अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय व्यवस्थापन सांभाळणाऱ्या विषयांचा यात समावेश होतो.)- (१) बी.एस्सी ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी- ऑपरेशन थिएटरमधील संवेदनशील उपकरणांची हाताळणी, निर्जंतुकीकरण आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना थेट मदत. (ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. हॉस्पिटल समूह, मुंबई, संकेतस्थळ – https://gmcjjh.edu.in), (२) बी.एस्सी इमर्जन्सी अँड ट्रॉमा केअर- अपघात किंवा गंभीर आपत्कालीन स्थितीत रुग्णाला त्वरित प्राथमिक आणि जीवनरक्षक उपचार देणे. (निमहंस (NIMHANS), बेंगळुरू, संकेतस्थळ – nimhans.ac.in), (३) बी.एस्सी ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजी- शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला भूल देण्याच्या प्रक्रियेत ॲनेस्थेटिस्ट डॉक्टरांना मदत. (बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, संकेतस्थळ – bjmcpune.org)

५) इतर विशेष अभ्यासक्रम (१) बी.एस्सी ऑप्टोमेट्री- डोळ्यांची तपासणी, चष्म्याच्या क्रमांकाची निश्चिती आणि दृष्टीशी संबंधित प्राथमिक उपचार. (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर(gmcnagpur.org)),(२) बी.एस्सी रीनल डायलिसिस टेक्नॉलॉजी – मूत्रपिंड निकामी झालेल्या किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांची डायलिसिस प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडणे. (बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, संकेतस्थळ – bjmcpune.org),(३) न्यूट्रिशन अँड डाएटेटिक्स – रुग्णांच्या विविध आजारानुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार दैनंदिन आहाराचे नियोजन करणे. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद, संकेतस्थळ – nin.res.in / एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई, संकेतस्थळ – sndt.ac.in)

(कंसामध्ये दिलेली संस्थांची नावे नमुन्यादाखल आहेत)

(अधिक माहितीसाठी-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नासिक https://www.muhs.ac.in/)