(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 मार्ग यशाचा- ६१-  वास्तव ध्यानात घ्या.

जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- मेन, या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे १३ लाख ५५ हजार विद्यार्थी नोंदणीकृत होते आणि सुमारे १३ लाख ५ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष बसले होते. एप्रिल महिन्यातील दुसऱ्या सत्रात आणखी नोंदण्या झाल्या; दोन्ही सत्रांमधील एकूण युनिक नोंदणीकृत विद्यार्थी सुमारे १६ लाख ५ हजार आणि प्रत्यक्ष बसलेले सुमारे १५ लाख ३८ हजार होते. यापैकी सुमारे अडीच लाख विद्यार्थी जेइइ ॲडव्हान्सड परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले. या परीक्षेतील गुणांवर २३ आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. जेइइ ॲडव्हान्सडमध्ये सुमारे ५६ हजार ८८० विद्यार्थी पात्र झाले आणि आयआयटीमधील एकूण जागा सुमारे १८ हजार ९५० होत्या. यापैकी सुमारे ५० टक्के (साडेआठ-नऊ हजारांच्या आसपास) खुल्या संवर्गासाठी जागा असतात. उर्वरित जागा वेगवेगळ्या संवर्गातील (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमीलेअर ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट-इडब्ल्यूएस, दिव्यांग) यांच्यासाठी राखीव असतात. जेइइ-मेन मधील गुणांवर आधारित, ३१ नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील सुमारे २५ हजार १६० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) मधील सुमारे ११ हजार ५०० जागांवर आणि केंद्रिय साहाय्यता मिळणाऱ्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये (जीएफटीआय) सुमारे ११ हजार ७०० जागांवर प्रवेशाची संधी मिळते.

“नीट” ध्यानात घ्या
नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच ‘नीट’ मार्फत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ६४ ते ६६ हजार जागा भरल्या जातात. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जातात. एकूण सुमारे १ लाख ४० हजार एमबीबीएस जागांसाठी सुमारे २२ लाख ८० हजार विद्यार्थी नोंदणीकृत होते आणि सुमारे २० लाख विद्यार्थी ‘नीट’ची परीक्षा देतात.

या दोन महत्वाच्या परीक्षांना बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्षात उपलब्ध असणाऱ्या जागा यातील तफावत महाप्रचंड आहे. शिवाय ही आकडेवारी धडकी भरवणारीसुध्दा आहे. आयआयटी किंवा एनआयटी किंवा आयआयआयटी या अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान संस्थांमध्ये आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी दिवसरात्र एक करु पाहणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी डोळे उघडवणारी सुध्दा आहे.

प्रत्येक पालक आणि त्याच्या पाल्यास या महत्वाच्या संस्थांमध्ये प्रवेशाचं स्वप्न बघण्याचा अधिकार आहेच. पण स्वप्नं अशीच बघा की, जी साकार होऊ शकतात, असं माजी राष्ट्रपती एपिजे अब्दूल कलाम म्हणत. याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे.

जेइइ आणि नीट या दोन्ही परीक्षांसाठी, ‘महा’ आणि ‘अती’च्या पलिकडे स्पर्धा असते, ही बाब उपरोक्त आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मेडिकल किंवा आयआयटीचा रोडमॅप तयार करण्याआधी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची बौध्दिक कुवत नेमकी किती, याचा १०० टक्के प्रामाणिकपणे विचार करायला हवा, असे ही आकडेवारीच स्पष्ट करते. प्रयत्नांनी परमेश्वर म्हणून किंवा मग प्रयत्नच करायचे नाहीत का? असा सूर आवळून काही उपयोग नाही.

झेपण्याची क्षमता
जेइइ आणि नीट या दोन्ही परीक्षांची काठिण्यपातळी मुलांना खरोखरच झेपू शकते का, याचा विचार आधी पालकांनीच करायला हवा. आजूबाजूचे, परिचयातले, नातेवाईकांचे मित्रांचे मुलंमुली नीट किंवा जेइइ देतात म्हणून आपणही त्याच वाटेने जायला हवे नाही, अन्यथा मागे पडू असे बऱ्याच पालकांना वाटते आणि मुलांच्या आधी तेच नीट किंवा जेइइ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं स्वप्न बघू लागतात. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची बौध्दिक कुवत नेमकी काय, हे पाचवीपासूनच कळू लागते. दहावीपर्यंत सारेच चित्र स्पष्ट होते. ‘नीट’ परीक्षेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न असतात, तर जेइइ मध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातात. या चारही विषयांमध्ये मुलांना किती गती आणि आवड आहे, याचा शोध पालकांनी सातवी-आठवीपासूनच घ्यायला हवा.

गुणपत्रिकेचा आरसा
खरेतर मुलाची गुणपत्रिका हा आरसाच असतो. दहावीतील गुणपत्रिका तर मुलाच्या बौध्दिक आणि आकलन क्षमतेवर आणखीच बऱ्यापैकी प्रकाश टाकते. या चारही विषयांमध्ये फार उंच झेप मुलाला घेता येत नाही, हे दिसत असूनही जर पालक, ‘नीट’ किंवा ‘जेइइ’ परीक्षेसाठी आग्रह धरत असतील तर मुलाचा कपाळमोक्ष होण्याची अधिक शक्यता असते.

या चारही विषयांचा पाया भक्कम नसल्यामुळेच दहावीपर्यंत मुलाला याविषयांमध्ये फार चमक दाखवता येत नाही, हे समजून घ्यायला हवे. या चारही विषयात किमान ८० ते ८५ टक्क्केच्या आसपास गुण असेल आणि त्यात सातत्य टिकवले असल्याचे दिसत असल्यास, प्रयत्नांती परमेश्वर, नक्कीच प्रसन्न होण्याची दाट शक्यता असते. मात्र यापेक्षा फार कमी गुण सातत्याने मिळत असल्यास, संकल्पनात्मकदृष्ट्या मुलगा बराच मागे असल्याचं लक्षात घ्यायला हवं. आतापर्यंत तो अभ्यासच करत नव्हता, किंवा इतरच गोष्टीत रस घ्यायचा, किंवा परीक्षेच्या काळात आजारीच पडायचा, असे किंवा अशाच प्रकारची विविध कारणं सांगण्याकडे बऱ्याच पालकांचा कल असतो. “तो हुषार आहे हो, पण अभ्यास करत नाही, पण त्याने अभ्यास केला तर त्याला नक्कीच काही अशक्य नाही,” असा लाडिक पण फसवा सूर लावला जातो. मुलाने आतापर्यंत मनापासून अभ्यास केला नाही, हे जर मान्य असेल तर, मग तो आता जेइइ किंवा नीटचा अभ्यास मनापासून करेल, याची काय हमी?

गाडी अडखळते कारण…
नीट किंवा जेइइ परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे पूर्ण आकलन होण्याची क्षमता, विद्यार्थ्याने किमान आठवीपासूनच संबंधित विषयाचे ज्ञानग्रहण समजून उमजून केले असल्यास होऊ शकते. ते त्याने आतापर्यंत केलेले नसते. त्यामुळे ‘जेइइ’ किंवा ‘नीट’चा अभ्यास करताना त्याची गाडी पदोपदी अडखळतच राहते. हे अडखळणे, शिकवणी चालकांच्या लक्षातही येत असावे, पण ही मंडळी साधूसंत नसल्याने, ते कधीच मुलाच्या अडखळण्याचा विषय पालकांपुढे काढत नाही. ‘हो जायगा, बस थोडी और मेहनत की जरुरत है,’ असं काहीसं ही मंडळी गोलगोल फिरवत सांगतात. एखाददुसऱ्या सराव परीक्षेत चांगले गुण मिळाले तर, ते पुराव्यादाखल सादर करतात. पण ही फसवणूकच समजायला हवी. ५० सराव परीक्षेत एक किंवा दोन परीक्षेत चांगले गुण मिळणे, ही काही प्रगती नाही. पालकांनीसुध्दा वेळीच ही बाब लक्षात घ्यायला हवी.

पालकांची जबाबदारी
मुळात आपल्या पाल्याला जेइइ किंवा नीट परीक्षेची काठिण्यपातळी जमू शकते का, कितपत जमू शकते, याकडे पालकांनीच आधी लक्ष द्यायला हवे. ते त्यांना विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयातील गुणांवरुन कळू शकते. शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील त्याच्या शिक्षकांकडूनही अशी माहिती काढता येणे शक्य आहे. असे केल्यास व त्यासाठी वेळ काढल्यास, पुढील बराच मनस्ताप टाळता येणं शक्य होतं. मुलांच्या बौध्दिक कुवतीचा अंदाज आल्यावर अट्टाहास सोडून ‘जेइइ’ किंवा ‘नीट’चा मार्ग अनुसरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मग महागडे क्लासेस लावण्याची गरज राहणार नाही. भविष्यातील अपयशाने येणारी निराशा टाळता येणे हे आपल्याच हाती असते. हे नैराश्य मुलाला फार खंगवून टाकू शकते. त्याचा आत्मविश्वासही डगमगू शकतो. ही बाब पालकांनी ध्यानात घ्यायलाच हवी. जेइइ किंवा नीट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी म्हणजेच सारे काही नव्हे. या दोन्ही परीक्षांपेक्षा कमी काठीणपातळी असलेल्या इतर ज्ञानशाखांच्या परीक्षांवर लक्ष दिल्यास, चांगले यश मिळून वेगवेगळया केंद्रिय किंवा राज्यस्तरीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. इतरही ज्ञानशाखांकडे जाण्याचीही संधी मिळू शकते. या ज्ञानशाखांमध्ये प्रवेश घेऊन पुढील तीनचार वर्षात वेगवेगळी कौशल्ये प्राप्त केली, नवे तंत्रज्ञान आत्मसात केले तर स्वत:चं करिअर घडवणं अशक्य होणार नाही.

यासाठी पालकांनीसुध्दा मुलगा इंजिनीअरच झाला पाहिजे किंवा डॉक्टरच झाला पाहिजे, याचा अट्टाहास सोडायला हवा. ही दोन्ही क्षेत्रे महत्वाची आहेतच. पण, त्याशिवाय इतरही क्षेत्रातील चांगल्या दर्जेदार मनुष्यबळाची गरज सातत्याने भासतच असते. अशी सध्या विविध क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. प्रारंभी ही क्षेत्रे आकर्षक वाटत नसतीलही, कदाचित आकर्षक पॅकेजही सुरुवातील मिळत नसेल, पण या क्षेत्रामुळे आवडीच्या क्षेत्रात पाय रोऊन उभे राहण्याची संधी मिळते. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, अथक परिश्रम करण्याची तयारी, नावीण्याचा ध्यास आणि प्रामाणिकपणा या गुणांवर आधारित, आवडीच्या क्षेत्रात टप्याटप्याने एकएक पायरी वर चढता येते.

सुरेश वांदिले