(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ७२ –“गतीशक्ती” आणि  डिफेन्स इंस्टिट्यूट

परिवहन आणि मालवाहतुकीच्या अनुषंगाने शिक्षण-प्रशिक्षण आणि या क्षेत्रातील आंतरज्ञानशाखीय संशोधनास प्राधान्य देणाऱ्या गतीशक्ती विश्वविद्यालयाची स्थापना २०२२ मध्ये करण्यात आली. ही आपल्या देशातील अशा प्रकारची पहिली संस्था आहे. या केंद्रीय संस्थेला रेल्वेमंत्रालयाने प्रायोजित केले आहे. या संस्थेच्या वतीने पुढील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

पदवी अभ्यासक्रम

(१) बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनिअरिंग) – या अभ्यासक्रमात रेल्वेसाठी उपयुक्त ठरेल असे अभियांत्रिकी अभिकल्प (डिझाइन), बांधकाम, देखभाल आदी विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. (२) बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनिअरिंग) – या अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, सिग्नलिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, परिवहनातील सुरक्षा (कवच, सायबर सिक्युरिटी, परिवहन नियंत्रण) अशा बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. (३) बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनिअरिंग) – या अभ्यासक्रमात हायस्पीड रेल सिस्टिम, रेल ऑपरेशन, रेल व्हील इंटरअॅक्शन, रेल्वे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, रेल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, रेल मशीन टूल आदी विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. (४) बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (स्पेशलायझेशन इन रेल इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिक लोको, इलेक्ट्रिक व्हेइकल्स अशा सारख्या विद्युत आधारित परिवहन क्षेत्रातील साधनांचे डिझाइन, विश्लेषणाचे कौशल्य आणि सक्षमता या अभ्यासाच्या माध्यमातून निर्माण केली जाते. (५) बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (स्पेशलायझेशन इन ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स) – या अभ्यासक्रमात परिवहन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विषयातील आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य मिळवून दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर डेटा सायंटिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट अशा करिअर संधी मिळू शकतात. मशीन लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, स्टॅटिस्टिक्स या क्षेत्रात उद्भवणाऱ्या प्रत्यक्ष जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधन करण्याची संधी मिळू शकते. आयबीएम कंपनीच्या सल्ल्यानुसार अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. (६) बीटेक इन एव्हिएशन इंजिनिअरिंग – या अभ्यासक्रमात विमानाचे डिझाइन, विमान देखभाल, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ड्रोन आदी विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते.

प्रवेश प्रक्रिया

या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन-मेन (जेईई-मेन) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. प्रवेश प्रक्रिया जोसा/सी SAB मार्फत केली जाते. जेईई मेन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.

पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन शाखा

या संस्थेने व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले असून या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे उपलब्ध झाले आहे. (१) एमबीए (लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट), (२) एमबीए (पोर्ट्स अँड शिपिंग लॉजिस्टिक्स). या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅट (कॉमन अॅडमिशन टेस्ट)/ मॅट (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट)/ झॅट (झेव्हियर अॅप्टिट्यूड टेस्ट)/ सीयूईटी-पोस्ट ग्रॅज्युएट (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

पदव्युत्तर पदवी तंत्रज्ञान शाखा

(१) एमटेक इन इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम, (२) एमटेक इन रेल्वे इंजिनिअरिंग, (३) एमटेक इन ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग, (४) एमटेक इन रोड्स अँड हायवे इंजिनिअरिंग.

आर्थिक साहाय्य

या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असेल त्यांना शिक्षणशुल्कातून १०० टक्के आणि वसतिगृह शुल्कातून ५० टक्के सूट दिली जाते. ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक आणि तीन लाख रुपयांपर्यंत असेल त्यांना शिक्षणशुल्कातून ५० टक्के आणि वसतिगृह शुल्कातून २५ टक्के सूट दिली जाते. एअरबस कंपनीमार्फत ४० विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वसतिगृह शुल्कातून १०० टक्के सूट मिळवून दिली जाते. प्लासर इंडिया या कंपनीमार्फत १० विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क आणि वसतिगृह शुल्कातून १०० टक्के सूट मिळवून दिली जाते. सिमेन्स कंपनीमार्फत पात्र विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची सूट मिळवून दिली जाते.

प्लेसमेंट आणि इंटर्नशिप

या अभ्यासक्रमांमध्ये संबंधित उद्योगांना लागणारे कौशल्य आणि तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांना अशा उद्योगांमध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करून दिली जाते. पुढील कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आणि इंटर्नशिपची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे- (१) व्हॉल्वो, (२) आयआरपी इन्फ्रा टेक, (३) हिंद रेक्टिफायर, (४) श्रीराम सिमेंट, (५) ट्रान्सवर्ल्ड, (६) फ्लिपकार्ट, (७) टीसीआय, (८) ई २ ई रेल, (९) कॉगपोर्ट, (१०) डीपी वर्ल्ड, (११) टीव्हीएस सप्लाय चेन, (१२) वंडर सिमेंट, (१३) अल्ट्रा टेक, (१४) एक्सप्रेस ग्लोबल लॉजिस्टिक्स, (१५) ओम लॉजिस्टिक्स, (१६) ऑल कार्गो लॉजिस्टिक्स, (१७) महिंद्रा लॉजिस्टिक्स, (१८) डिलिव्हरी, (१९) जेएसडब्ल्यू, (२०) डीएचएल, (२१) जेएम बक्सी, (२२) इंडी कोल्ड, (२३) आदित्य बिर्ला अल्ट्राटेक.

या संस्थेने पुढील काही संस्थांसोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, संशोधन, शैक्षणिक भेटी अशा संधी उपलब्ध होतात- (१) दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन, (२) नोकिया, (३) रेलटेल, (४) कर्मयोगी भारत, (५) कॉनकॉर, (६) पाटील ग्रुप, (७) एअरबस, (८) मोनॅश युनिव्हर्सिटी, (९) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रेनिंग अँड रिसर्च भोपाळ, (१०) महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, (११) इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स.

संपर्क- लालबाग, वडोदरा ३९०००४, ईमेल- admissions@gsv.ac.in, संकेतस्थळ- gsv.ac.in

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत पुढील महत्त्वाचे पदव्युत्तर पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखांमधील पदवीधरांनी आपल्या पुढील रोडमॅपमध्ये या अभ्यासक्रमांचा समावेश करायला हवा. लष्करी शिस्तीतील या दर्जेदार संस्थांमधील हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम करिअर संधी मिळवून देऊ शकतात. अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळते. अनुभवी प्राध्यापकांमुळे ज्ञानकक्षा चौफेर होण्यास साहाय्य मिळते.

एमटेकचे स्पेशलायझेशन (१) एरोस्पेस इंजिनिअरिंग- गाइडेड मिसाइल, (२) मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, (३) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग- आर्टिफिशियल इंटेलिजन्स, (४) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग- सेमीकंडक्टर चिप डिझाइन, सिग्नल प्रोसेसिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रडार अँड कम्युनिकेशन, डिफेन्स अँड स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, (५) टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, (६) डेटा सायन्स, (७) सायबर सिक्युरिटी, (८) रिन्यूएबल एनर्जी, (९) नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, (१०) क्वांटम कॉम्प्युटिंग, (११) सेन्सर टेक्नॉलॉजी/लेसर अँड इलेक्ट्रो ऑप्टिक्स, (१२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग- मरीन इंजिनिअरिंग, आर्ममेंट अँड कॉम्बॅट व्हेइकल, मेकॅनिकल सिस्टिम डिझाइन, (१३) मटेरिअल इंजिनिअरिंग, (१४) ऑटोमेशन अँड रोबोटिक्स.

एमएस्सी इन (१) फूड टेक्नॉलॉजी. हा अभ्यासक्रम डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मैसूर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. (२) अप्लाइड फिजिक्स- फोटोनिक्स, (३) मटेरिअल सायन्स, (४) डेटा सायन्स, (५) अप्लाइड केमिस्ट्री, (६) एमएस्सी टेक- फोटोनिक्स.

एमटेक अभ्यासक्रमांना गेट (ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. तर एमएस्सी अभ्यासक्रमांना जॅम (जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्लेसमेंट

हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना डीआरडीओ येथे प्लेसमेंटची संधी मिळू शकते. देशातील आघाडीच्या उद्योगांमध्येही चांगली करिअर संधी मिळते. क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी येथे मास्टर अभ्यासक्रम आणि जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयात ड्युएल डिग्री अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते. हे अभ्यासक्रम केलेल्या ९५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्या आणि उद्योगांमध्ये करिअर संधी मिळत असते.

संपर्क- गिरीनगर, पुणे ४११०२५, ईमेल- jr@diat.ac.in, संकेतस्थळ- www.diat.ac.in

२०२६ मधील बदल

गतीशक्ती विश्वविद्यालयात बीटेक इन मेरिटाइम इंजिनिअरिंग हा अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू आहे. बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे अधिकृत नाव बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स असे आहे. एमबीए पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स हे अधिकृतपणे पोर्ट्स अँड शिपिंग लॉजिस्टिक्स असे आहे. बीटेक प्रवेश जोसा/सी SAB मार्फत केला जातो. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग अंतर्गत यूएव्हीज हे स्पेशलायझेशनही उपलब्ध आहे.