(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ७५ – देशसेवेची संधी

स्वातंत्र्योत्तर काळात लष्कराने देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात अभिमानास्पद कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे देशातील विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तिन्ही दलांचे सैनिक/अधिकारी मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारतीय लष्कर हे जगातील सर्वोत्कृष्ट लष्करांपैकी एक समजले जाते. अशा श्रेष्ठ दलाचा भाग बनण्याची आणि देशाची सर्वोच्च स्वरूपाची सेवा करण्याची संधी पुढील विविध मार्गांनी मिळते. ही संधी केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळते आणि भविष्यात अजोड पराक्रम, गुणवत्ता आणि दर्जा यांच्या बळावर वरिष्ठ पदांवर कार्य करण्याचीही संधी मिळते. 

**कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस** 

बारावीनंतर एनडीए किंवा १०+२ टेक्निकल एन्ट्री किंवा १०+२ कॅडेट एन्ट्री या योजनेमधून लष्करात प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेल्या तरुण-तरुणींसाठी पदवी अभ्यासक्रमानंतर कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस ही परीक्षा लष्करातील नियुक्तीची संधी उपलब्ध करून देते. ही परीक्षा दरवर्षी दोनदा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. 

या परीक्षेव्दारे पुढील ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो- (१) इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी देहरादून- यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी १३ जागा आर्मी विंगमधील एनसीसी-सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, (२) इंडियन नॅव्हल ॲकॅडेमी एजिमाला- यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी ६ जागा नॅव्हॅल विंगमधील एनसीसी-सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता- अभियांत्रिकी पदवी, (३) एअर फोर्स ॲकॅडेमी हैदराबाद- यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी ३ जागा एअर विंगमधील एनसीसी-सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतात, तथापि त्यांनी १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी, (४) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी चेन्नई- या ठिकाणी पुरुष आणि महिलांना लघु सेवा कमिशन योजनेंतर्गत अतांत्रिक स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. 

उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक. या पदांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या शारीरिक क्षमतेची मानके नियुक्तीच्या वेळेस महत्त्वाची ठरतात. 

**अशी असते परीक्षा** 

(१) इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी, इंडियन नॅव्हॅल ॲकॅडेमी, एअर फोर्स ॲकॅडेमीसाठी परीक्षा- इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक (एलिमेंट्री) गणित या विषयांचे प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर. कालावधी प्रत्येकी दोन तास. (२) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी परीक्षा- या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे चार पर्याय दिले जातात. उत्तर चुकल्यास ०.३३ टक्के गुण कापला जातो. एखाद्या प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक उत्तरावर खुणा केल्यास व त्यातील एक उत्तर बरोबर असल्यासही त्या प्रश्नाचे उत्तर चूक समजून ०.३३ टक्के गुण कापला जातो. कोणतेही उत्तर न दिल्यास गुणकपात केली जात नाही. 

सामान्य ज्ञान आणि गणित विषयाचा पेपर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असतो. गणित पेपरचा दर्जा १०वीच्या पातळीचा तर इतर विषयांच्या पेपरचा दर्जा पदवी परीक्षेच्या पातळीचा असतो. या परीक्षेचा पेपर विशिष्ट पद्धतीनेच सोडवावा लागतो. त्यासंदर्भातील विस्तृत सूचना माहितीपुस्तिकेत देण्यात आल्या आहेत. या पद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करणे अपेक्षित आहे. या पेपरची तपासणी यंत्राव्दारे केली जात असल्याने पेपर सोडवण्याच्या पद्धतीचा अवलंब न केल्यास गुणांमध्ये कपात होण्याची शक्यता असते. यासाठी संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहील, अशी स्पष्टता संघ लोकसेवा आयोगाने केली आहे. 

एलिमेंट्री गणिताचा विस्तृत अभ्यासक्रम माहितीपुस्तिकेत देण्यात आला आहे. त्यातील सर्व घटकांच्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्यास प्रश्न सोडवणे सुलभ जाऊ शकते. हे विषयघटक विस्मरणात गेले असतील वा कठीण जात असल्यास या विषयाच्या अध्यापकांकडून पुन्हा एकदा समजून घेऊन सराव करायला हवा. इंग्रजी भाषेचे सर्वसाधारण आकलन आणि शब्दसंग्रह तपासण्यासाठी प्रश्न विचारले जातात. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, भारताचा इतिहास, भूगोल, सर्वसामान्य विज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. पदवीस्तरीय विद्यार्थ्याला विज्ञानाच्या मूलभूत बाबींचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. परीक्षा केंद्रे- मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर. 

इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी, इंडियन नॅव्हॅल ॲकॅडेमी, एअर फोर्स ॲकॅडेमीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी प्रत्येकी ३०० गुण असतात. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीसाठी २०० गुण असतात. मुलाखतीमध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश असतो. 

**बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी** 

सेवा निवड मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या या निवड प्रक्रियेचे दोन टप्पे आहेत- (१) पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग (ओआयआर) चा समावेश असून यात पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि डिस्क्रिप्शन टेस्ट अशा दोन चाळण्यांचा समावेश केला जातो. 

(२) या दोन्ही टेस्टच्या गुणांवर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. या चाळण्यांचा कालावधी चार दिवसांचा असतो. 

उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी समूह परीक्षण अधिकारी, मुलाखत घेणारे अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ या तिघांमार्फत घेतली जाते. या तिन्ही चाळणीला विशेष वेटेज ठेवण्यात येत नाही. तिन्ही चाळणीमधील उमेदवारांची एकत्रित कामगिरी लक्षात घेऊन गुण दिले जातात. उमेदवाराची अधिकारी म्हणून गुणवत्ता आणि प्रशिक्षण क्षमता जाणून घेण्यासाठी या सर्व चाचण्यांचा उपयोग केला जातो. त्यानंतरच उमेदवाराची शिफारस केली जाते. 

या चाचण्यांची विस्तृत माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे. 

**वैद्यकीय व शारीरिक क्षमता चाचणी** 

या चाचण्यांसोबतच वैद्यकीय व शारीरिक क्षमता चाचणीही महत्त्वाची असते. लष्करी सेवेत येऊ इच्छिणारे उमेदवार किमान पातळीवर वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे अपेक्षित आहे. तरच अशांना कठीण लष्करी प्रशिक्षण घेणे सुलभ जाऊ शकते. आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसच्या वैद्यकीय अधिकारी/डॉक्टरांमार्फत ही चाचणी घेतली जाते. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी या डॉक्टरांनाच देण्यात आली आहे. 

उमेदवार वैद्यकीय व मानसिकदृष्ट्या फिट असावा, त्याला कोणताही आजार, असक्षमता किंवा लक्षणे नसावीत. वैद्यकीयदृष्ट्या फिटसाठी आवश्यक बाबींचे विस्तृत विवेचन माहितीपुस्तिकेत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यापूर्वी किंवा अर्ज भरल्यानंतर सर्व बाबी समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन सुद्धा घेता येईल. काही वैद्यकीय बाबींमध्ये सुधारणा करता येणे शक्य असल्यास ते करणे शक्य होईल. छोट्याछोट्या बाबी राहून गेल्यास त्याचा अंतिम निवडीच्या वेळी विपरीत परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेतलेली बरी. वय, वजन आणि उंचीचे कोष्टक देण्यात आले असून त्यानुसार खबरदारी घ्यायला हवी. 

मेडिकल बोर्डाने उमेदवाराला वैद्यकीयदृष्ट्या सक्षम घोषित केल्यावरच त्याची निवड केली जाते. एखाद्या उमेदवारास अनफिट घोषित केल्यास हा उमेदवार ४२ दिवसाच्या आत अपील मेडिकल बोर्डाकडे अपील करू शकतो. या बोर्डानेही अनफिट केल्यास एका दिवसात त्याला रिव्ह्यू मेडिकल बोर्डाकडे अपील करता येते. 

संपर्क- फॅसिलिटेशन काउंटर, दूरध्वनी- ०११-२३३८११२५ / २३०९८५४३, संकेतस्थळ- www.upsconline.nic.in 

**(२) केंद्रीय राखीव पोलीस दल** 

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ), सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये दरवर्षी असिस्टंट कमांडंट या पदांची भरती सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट) एक्झामिनेशन या परीक्षेव्दारे केली जाते. 

परीक्षा केंद्र नागपूर आणि मुंबई. परीक्षेसाठी upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो. 

संपर्क- www.upsconline.nic.in 

सुरेश वांदिले