मार्ग यशाचा- ८०- टॉय स्टोरी!
भारतातील खेळणी उद्योगाची पाळेमुळे थेट सिंधू संस्कृतीच्या काळापर्यंत पोहचलेली दिसतात. त्याकाळातील खेळणी शिट्टीच्या आकाराचा पोपट, माकड आणि लहान आकारातील बैलगाडी या स्वरूपात आढळून येतात. ही खेळणी बांबूच्या काड्या, गवत, माती, दगड आणि तंतूपासून बनवलेले कापड यासारख्या नैसर्गिक साहित्यापासून तयार केली जात. आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे भारतीय खेळण्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला असून नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून खेळण्यांची निर्मिती सुरू झाली आहे.
२०२५ ते २०३० या कालावधीत भारतीय खेळ उद्योग जागतिक स्तरावरील सर्वात मोठा उद्योग ठरावा, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे. त्यानुसार २०२८ पर्यंत भारतीय खेळणी उद्योगातील उलाढाल ३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचू शकते आणि ही वाढ दरवर्षी सुमारे १२ टक्के अपेक्षित आहे. खेळणी निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात सुमारे ४,००० सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) कार्यरत आहेत. या उद्योगांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत विविध प्रकारची प्रोत्साहने आणि आर्थिक सवलती दिल्या जातात.
भारतात ० ते १४ वयोगटातील लोकसंख्या २५ टक्के आहे. या गटातील मुलांची आवडनिवड, क्रयशक्ती आणि शिक्षण लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर खेळण्यांची निर्मिती केली जाते. भारत सरकारने ‘नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर टॉइज‘ (NAPIT – राष्ट्रीय खेळणी कृती आराखडा) तयार केला असून ‘व्होकल फॉर लोकल‘ या उपक्रमावर विशेष भर दिला आहे. याद्वारे स्थानिक खेळणी अधिकाधिक खरेदी करण्यासाठी जनजागृती केली जात असून यामध्ये केंद्रीय २० मंत्रालये व विभाग सामील झाले आहेत. तसेच परदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांवर ७० टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी लावण्यात येत आहे.
१४ वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी खेळण्यांच्या सुरक्षितेकडे विशेष लक्ष दिले जात असून ही सुरक्षा मानके बंधनकारक करण्यात आली आहेत आणि निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सूक्ष्म औद्योगिक घटकांकडे परीक्षण सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांना एक वर्षासाठी परवाना देण्याचा निर्णय भारतीय मानक ब्युरोने (BIS) घेतला आहे. तसेच स्वतःच्या औद्योगिक घटकात परीक्षण सुविधा स्थापन करण्यासाठी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. देशी खेळणी उद्योगाला सहाय्य करण्यासाठी क्लस्टर आधारित १९ खेळणी औद्योगिक घटकांना एमएसएमई मंत्रालयामार्फत अर्थसाहाय्य केले जाते. भारतीय बनावटीच्या खेळण्यांना प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रातील नावीन्यतेला उत्तेजन देण्यासाठी ‘इंडियन टॉय फेअर‘ आणि ‘टॉयकॅथॉन‘सारखे उपक्रम राबवले जात आहेत. नोएडा येथे भव्य ‘टॉय पार्क‘ची उभारणी करण्यात आली असून यामध्ये निर्यातक्षम दर्जेदार खेळणी, इलेक्ट्रॉनिक खेळणी, सॉफ्ट टॉईज, प्लॅस्टिक खेळणी, क्रीडासाहित्य, लाकडी खेळणी आणि बोर्ड गेम्स यांचा समावेश आहे.
अमेरिकेने सुरू केलेल्या आयात शुल्क धोरणामुळेही भारतीय खेळण्यांचे मार्केट जागतिक स्तरावर विस्तारण्याची मोठी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बाबी लक्षात घेता, ‘टॉय डिझाइन‘ क्षेत्रात उत्तम करिअर संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रात करिअर करण्याची सर्जनशील इच्छा आणि तीव्र आवड असल्यास विद्यार्थ्यांनी ‘बॅचलर ऑफ डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन‘ हा अभ्यासक्रम करायला हवा. या अभ्यासक्रमामध्ये थ्रीडी मॉडेलिंग, साहित्याची निवड आणि उपयोगकर्त्याच्या (युझर) दृष्टिकोनातून अभिकल्पाची संरचना यांसारख्या बाबी शिकवल्या जातात, ज्या दर्जेदार आणि सुरक्षित खेळणी निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक ठरतात.
नामांकित संस्था आणि अभ्यासक्रम
१. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID):
- अभ्यासक्रम: बॅचलर ऑफ डिझाइन (B.Des) इन प्रॉडक्ट डिझाइन (कालावधी: ४ वर्षे).
- अर्हता: कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. प्रवेशासाठी ‘डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट‘ (DAT) ही प्राथमिक आणि मुख्य चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमार्फत NID अहमदाबाद, भोपाळ, जोरहट (आसाम), कुरुक्षेत्र (हरियाणा) आणि आंध्र प्रदेश येथील बी.डिझाइन अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
- स्वरूप: या अभ्यासक्रमात विविध प्रकारच्या वस्तूंच्या डिझाइनचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. आधुनिक काळात खेळणी केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेली नसून शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्यसुविधा, कला आणि डिझाइन थिंकिंग या क्षेत्रांमध्येही ती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या अभ्यासक्रमात विद्यार्थी खेळणी डिझाइन किंवा गेम निर्मितीचा स्वतःचा स्वतंत्र प्रकल्प निवडू शकतो; ज्यामध्ये डिजिटल गेम्स, खेळणी, प्ले स्पेसेस, बोर्ड गेम्स आणि शैक्षणिक खेळण्यांचा समावेश असतो.
मास्टर ऑफ डिझाइन (टॉय अँड गेम डिझाइन): NID ने पदव्युत्तर स्तरावर ‘मास्टर ऑफ डिझाइन इन टॉय ॲंड गेम डिझाइन‘ हा अडीच वर्षांचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू केला आहे. आधुनिक खेळण्यांचा उपयोग मुलांच्या चौफेर विकासासाठी होत असल्याने हे क्षेत्र बहुशाखीय बनले आहे. या अभ्यासक्रमासाठी ४ वर्षांच्या B.Des पदवीसह कोणत्याही विषयातील पदवीधर, अथवा फाइन आर्ट, अप्लाइड आर्ट, डिझाइन, आर्किटेक्चरमधील पदविकाधारक किंवा ३ वर्षांची पदवी प्राप्त विद्यार्थी पात्र ठरतात. प्रवेश NID DAT परीक्षेव्दारे होतो.
- संपर्क: nid.edu
२. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (SID):
- अभ्यासक्रम: बॅचलर ऑफ डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन (कालावधी: ४ वर्षे).
- अर्हता: कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण (प्रवेशासाठी सामायिक चाळणी परीक्षा घेतली जाते).
- संपर्क: sid.edu.in
३. आयआयटी मुंबई (IDC School of Design):
- अभ्यासक्रम: बी.डिझाइन अभ्यासक्रमामध्ये ‘प्रॉडक्ट डिझाइन‘ या विषयघटकाचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सामायिक प्रवेश परीक्षेव्दारे प्रवेश घेऊ शकतात.
- संपर्क: idc.iitb.ac.in
४. एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी (पुणे):
- अभ्यासक्रम: बी.डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन आणि एम.डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन. दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे दिला जातो.
- संपर्क: mituniversity.ac.in
५. पारुल युनिव्हर्सिटी:
- अभ्यासक्रम: स्कूल ऑफ डिझाइनमार्फत ‘बी.डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन‘ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
- संपर्क: paruluniversity.ac.in
६. पर्ल अकॅडमी:
- अभ्यासक्रम: बॅचलर ऑफ डिझाइन इन प्रॉडक्ट डिझाइन (कालावधी: ४ वर्षे). तसेच याच विषयात पदव्युत्तर पदवी (M.Des) देखील उपलब्ध आहे.
- वैशिष्ट्ये: यामध्ये डिझाइन थिंकिंग, प्रॉडक्ट इनोव्हेशन, डिझाइन मॅनेजमेंट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या कौशल्यांचा विकास केला जातो, ज्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण होते.
- संपर्क: pearlacademy.com
— सुरेश वांदिले