मार्ग यशाचा- ८२- कॉर्पोरेट रुग्णालयांचे व्यवस्थापक कसे व्हाल?
आपल्या देशात कॉर्पोरेट रुग्णालयांच्या सतत वाढत चाललेल्या साखळीमुळे, या क्षेत्राचे रूपांतर आता मोठ्या व्यवसायात किंवा उद्योगात झाले आहे. या क्षेत्रात नवेनवे गुंतवणूकदार किंवा उद्योजक उतरत आहेत. या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये व्यावसायिक कार्यक्षमता वाढण्यासाठी, बिग डेटा अॅनालिटिक्स, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सुविधा/सेवांचा समावेश केला जात आहे. हे क्षेत्र झपाट्याने आंतरशाखीय बनले आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. ही गरज रुग्णालय व्यवस्थापन किंवा प्रशासन (हॉस्पिटल मॅनेजमेंट/अॅडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम भागवू शकेल.
या अनुषंगाने पुढील काही अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात-
(१) टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम्स स्टडीज मार्फत, दोन वर्षे कालावधीचा, मास्टर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, हा अभ्यासक्रम चालवला जातो. कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरूपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध स्वरूपाचे प्रश्न आणि समस्यांना सोडवण्यासाठी या मनुष्यबळाचा उपयोग होतो. रुग्णांच्या थेट जीवनमरणाचा प्रश्न असल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी उत्तम दर्जाच्या नेतृत्वाची गरज असते. असे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे प्रदान केले जाते.
काय शिकाल?
सर्वसाधारणतः पुढील क्षेत्राचे ज्ञान, हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. आरोग्याशी संबंधित अर्थकारण किंवा अर्थशास्त्र, वित्तीय व्यवस्थापन, संस्थात्मक वर्तणूक, रुग्णालय व्यवस्थापनाची तत्त्वे, रुग्णालयांसाठी संशोधन पद्धती, संस्था आणि सहाय्यकारी कर्मचारी/कामगार सेवा, संस्था आणि वैद्यकीय व सुपर स्पेशॅलिटी (अतिविशेषज्ञ) सेवांचे प्रशासन, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैवसांख्यिकीची तोंडओळख, रुग्णालय माहिती सेवा, रुग्णालय नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कामगार कायदे, रुग्णालयांशी संबंधित नैतिक बाबी, रुग्णालय किंवा आरोग्य व्यवस्थेचे गुणवत्ता व्यवस्थापन, व्यवस्थापकीय विश्लेषण आणि कार्यपद्धतीचे विश्लेषण, रुग्णालयाच्या व्यावसायिक बाबींच्या कायदेशीर चौकटी, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास वाढीच्या व्यूहरचना, आरोग्यविमा आणि जोखीम व्यवस्थापन, नागरी आरोग्य, व्यूहात्मक व्यवस्थापन आणि संस्थात्मक विकास, आरोग्य व्यवस्थेतील उद्योजकता, सेवा व्यवस्थापन.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना कॉर्पोरेट क्षेत्रातील वा सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या विभागांचे संनियंत्रण करणे, रुग्णालयातील नव्या सेवा किंवा नव्या रुग्णालयांचे डिझाइन आणि नियोजन करणे आदी जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. रुग्णालये सल्लागार कंपन्या (हॉस्पिटल कंसलटन्सी फर्म्स), आरोग्यविमा क्षेत्र, आरोग्य सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (हेल्थकेअर आयटी इंडस्ट्री) या क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
अर्हता- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, विधि अशा कोणत्याही शाखेतील पदवीधरास अर्ज करता येतो. पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात (प्रवेश सशर्त). या अभ्यासक्रमाला कॅट (CAT) गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. संपर्क – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, मुंबई- ४०००८८, दूरध्वनी- ०२२-२५५२५००० / २५५२५२५२, संकेतस्थळ- https://admissions.tiss.edu/
(२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बोधगयाने दोन वर्षे कालावधीचा एमबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. खुला संवर्ग ५० टक्के, राखीव संवर्ग ४५ टक्के. कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) चे गुण, मुलाखत आणि इतर घटकांवर आधारित अंतिम प्रवेश दिला जातो. संपर्क- https://iimbg.ac.in/
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जम्मूने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क- https://www.iimj.ac.in/
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता येथे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थकेअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. या क्षेत्रासाठी आवश्यक सैद्धांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. एखादे मोठे रुग्णालय, हेल्थकेअर संस्था येथे प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करून दिली जाते. देशातील दर्जेदार आरोग्य सुविधा/सेवा पुरवणाऱ्या संस्थांचे सहकार्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेतले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
अर्हता- हा अभ्यासक्रमाला, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जैवतंत्रज्ञान किंवा जैववैद्यकीय (बायोमेडिकल) विषयातील पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. तथापि आरोग्य व्यवस्था/सेवा क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरही या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षेतील गुण, शैक्षणिक अर्हता, अनुभव, मुलाखत या घटकांचा अवलंब करण्यात येतो. संपर्क- https://www.iimcal.ac.in/
(५) मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने, एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येत असला तरी, बी.एस्सी, एमबीबीएस, बीएएमएस, बी.फार्म, एमबीए या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
करिअर संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर रुग्णालयाचे फ्रंट ऑफिस, बिलिंग, अकाउंट, वित्त, माहिती व्यवस्थापन सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहित्य/वस्तू व्यवस्थापन, विपणन, पुरवठा व्यवस्थापन, डॉक्युमेंटेशन आदी विभागांमध्ये संधी मिळू शकतात.
संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००९८, दूरध्वनी-८१०४४१२०७१, ईमेल-gicedenquiry@giced.mu.ac.in, संकेतस्थळ- gicededu.co.in / giced.mu.ac.in
(६) इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च (IIHMR), दिल्ली येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट (PGDM), हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट आणि हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टिम या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सुविधा आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची (AICTE) मान्यता प्राप्त आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी- खुला संवर्ग ५० टक्के गुण, राखीव संवर्ग ४५ टक्के गुण.
रुग्णालयाला भेडसावणाऱ्या व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण करणे, आरोग्यसुविधा पुरवणाऱ्या संस्थांचे नियोजन, बांधणी आणि नियोजनाचे कौशल्य प्रदान करणे, नागरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा पुरवठा करणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अशा मनुष्यबळाचा विकास करणे, आदी बाबींचे सैद्धांतिक ज्ञान या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी, बिझिनेस स्कूलच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, कॅट/मॅट/झॅट/जीमॅट/सीमॅट/एटीएमए या पैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूह चर्चेसाठी बोलावले जाते. या दोन्ही बाबींमधील कामगिरी आणि चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते.
संपर्क- IIHMR, प्लॉट नंबर ३, सेक्टर १८ ए, द्वारका, फेज टू, न्यू दिल्ली- ११००७५, दूरध्वनी-०११-३०४१८९००, ईमेल-info.delhi@iihmrdelhi.edu.in, संकेतस्थळ- iihmrdelhi.edu.in
(७) इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च (IIHMR), जयपूर येथे एमबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी- खुला संवर्ग ५० टक्के गुण, राखीव संवर्ग ४५ टक्के गुण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅट/मॅट/झॅट/जीमॅट/सीमॅट/एटीएमए आणि इतर संबंधित परीक्षांतील गुण ग्राह्य धरले जातात. यापैकी कोणतीही परीक्षा दिली नसल्यास विद्यार्थ्यास या संस्थेमार्फत घेण्यात येणारी मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. अंतिम निवड, समूह चर्चा आणि मुलाखतीनंतर केली जाते.
संपर्क- https://iihmr.edu.in
0000
नवीन बाबी
टीआयएसएसचा मास्टर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम आता प्रामुख्याने कॅट गुणांवर आधारित आहे (सीयूईटी-पीजीऐवजी या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी कॅट स्कोअर वापरला जातो).
आयआयएम बोधगया आणि आयआयएम जम्मू येथे हॉस्पिटल/हेल्थकेअर मॅनेजमेंट एमबीए अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम करता येतो.
आयआयएचएमआर दिल्लीचा पीजीडीएम (हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंट) अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून एआयसीटीई मान्यताप्राप्त आणि एमबीए समकक्ष आहे.
गरवारे इंस्टिट्यूटचा पीजी डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन एक वर्षांचा असून फी सुमारे ६६,००० रुपये आहे आणि प्रवेशासाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाते.