(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ९५- सायबर योध्दे

गेल्या काही महिन्यात, सायबर गुन्हेगारांनी घातलेल्या धुमाकुळीच्या चर्चा, वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जात आहेत. (पहेलगाम घटनेनंतर १० लाखाच्या आसपास सायबर गुन्हेगारीच्या घटना घडल्याचे निदर्शनासे आले.) सायबर गुन्हेगारांपासून सावध आणि दक्ष राहण्याच्या सूचनेचा, मौखिक आणि मुद्रित संदेश, आपल्या स्मार्ट फोनवर सतत येतच असतो. यावरुनही सायबर गुन्ह्यांचे जाळे आपल्याभोवती कधीही पडू शकते, ही बाब स्पष्ट व्हावी. बँकिंग व्यवहारात, डिजिटल देवाणघेवाण वाढल्यापासून किंवा या व्यवहारांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे सुरु झाल्यापासून, सायबर गुन्हेगारांची बुध्दिमत्ता आणखीनच तेजाळल्याचे दिसून येते..सायबर गुन्हेबार, डिजिटल व्यवहारातील, आपल्या सूक्ष्म चूक किंवा त्रुटीकडे बारकाईने लक्ष ठेवतात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये, भारतासह जगात मोठी वाढ झालेली दिसते. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नही केले जात आहेत. त्यासाठी उच्चप्रशिक्षित, सायबर सुरक्षा मनुष्यबळाची गरजही मोठ्या प्रमाणावर वाढलीय. त्यामुळे, क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात, ही बाब ध्यानात घेऊन, या क्षेत्राशी निगडित, उच्च तांत्रिक शिक्षण घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायला हवा. डाटा सेक्युरिटी काउंसिल ऑफ इंडिया (डीएससीआय) या संस्थेच्या निरीक्षणानुसार, पुढील एकदोन वर्षातच भारताला ६४ हजाराच्या आसपास सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासू शकते.

अभ्यासक्रम-

सायबर सेक्युरिटीच्या अनुषंगाने काही संस्थांनी पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरु केले आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही करता येतात. पदवीस्तरीय अभ्यासक्रमात सर्वसाधारणपणे, पुढील विषयघटकांचा समावेश असतो – पेनिट्रेशन टेस्टिंग, व्हलनेरॅबिलिटी ॲसेसमेंट, सायबर क्राइम, सायबर फॉरेंसिक, मालवेअर ॲनॅलिसीस, एआय फॉर सायबर सेक्युरिटी, एन्टरप्राइज सेक्युरिटी, नेटवर्क ॲण्ड डाटा सेक्युरिटी, थ्रेट इंटेलिंजन्स, सॉफ्टवेअर सेक्युरिटी, सायबर सेक्युरिटी रेग्युलेशन.

संस्था आणि अभ्यासक्रम

(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, श्री सिटी चित्तूर – बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी, (सायबर सेक्युरिटी) , संपर्क- https://www.iiits.ac.in

(२) नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटी– इंटिग्रेटेड बीटेक- एम.टेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग (सायबर सेक्युरिटी), हा अभ्यासक्रम संस्थेच्या गांधीनगर, दिल्ली, त्रिपुरा, धारवाड, गौहाटी या कॅम्पसमध्ये करता येतो, संपर्क संकेतस्थळ – nfsu.ac.in/admission

(३) एसआरएम इंस्टिट्ट्यूट ऑफ सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी,तिरुचिरापल्ली- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (सायबर सेक्युरिटी), संपर्क-https://www.srmist.edu.in

(४) व्हेलोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (सायबर सेक्युरिटी), संपर्क-  https://vit.ac.in/schools/

(५) मुकेश पटेल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनिअरिंग, मुंबई- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (सायबर सेक्युरिटी), संपर्क- https://engineering.nmims.edu/btech-degree-programmes/b-tech-computer-science-cybersecurity/

(६) एमआयटी पुणे- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (सायबर सेक्युरिटी ॲण्ड फोरेंसिक), संपर्क- https://admissions.mitwpu.edu.in/

(७) विश्वकर्मा इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सेक्युरिटी ॲण्ड ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी), संपर्क- https://www.vit.edu

(८) डी.जे संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- बीटेक इन कॉम्प्युटर सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी (इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सेक्युरिटी ॲण्ड ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी), संपर्क- https://www.djsce.ac.in/

(९) सीडॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग)- या संस्थेने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन (१) सायबर सेक्युरिटी ॲण्ड फॉरेसिंक आणि (२) आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टिम्स ॲण्ड सेक्युरिटी हे प्रत्येकी  सहा महिने कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. अर्हता- आयटी/कॉम्प्युटर सायंस/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल /इं‍स्ट्रुमेंटेशन या विषयातील अभियांत्रिकी पदवी किंवा कॉम्प्युटर सायंस/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील एम.एस्सी किंवा कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदवी किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) किंवा भौतिकशास्त्र/गणित/सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी. संपर्क-https://www.cdac.in

 

याक्षेत्रात येण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र किंवा यासारख्या अभ्यासक्रमांसोबतच पुढील काही प्रमाणपत्र प्रशिक्षणही महत्वाची, अर्हता ठरतात – यामध्ये, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इंडस्ट्री असोशिएशन सिक्युरिटी (कॉम्पटीआयए सिक्युरिटी), सर्टिफाइड इन्फॉर्मेशन सिस्टिम्स सिक्युरिटी प्रोफेशनल (सीआयएसएसपी), सर्टिफाइड इथिकल हॅकर, यांचा ठळकपणे उल्लेख करावा लागतो. क्लॉऊड सेक्युरिटी, रिस्क ॲनॅलीसीस, इंट्रुजन डिटेक्शन, माहिती सुरक्षेची साधने,  ही कौशल्य प्राप्त केल्यास, याक्षेत्रात अधिक चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.

करिअर संधी

सायबर सेक्युरिटीच्या क्षेत्रात पुढील करिअर संधी मिळू शकतात- (१) सायबर सेक्युरिटी ॲनॅलिस्ट – या तज्ज्ञांचे वर्णन डिजिटल गार्ड किंवा डिजिटल सुरक्षा रक्षक असे केले जाते. हे रक्षक कोणत्याही संशयास्पद कृत्याचा शोध घेतात. नेटवर्क सुरक्षेचे संनियंत्रण करतात. माहिती तंत्रज्ञानातील सायबर सुरक्षेच्या प्रवाहांबाबत संशोधन करतात. वापरकर्त्यांना सुरक्षा नियमावलीचे प्रशिक्षण देतात, (२) सेक्युरिटी टेस्टर— सायबर हल्ल्यापासून बचाव करण्याच्या यंत्रणेचा विकास करण्यासाठी, अशा हल्ल्यांचे सदृष्यीकरण करुन, संभाव्य धोक्यांचा शोध, हे तज्ज्ञ घेतात, (३) नेटवर्क सेक्युरिटी इंजिनीअर- कोणताही संभाव्य सायबर हल्ला थोपवण्यासाठी, नेटवर्कचे डिझाइन आणि संरक्षण, सुरक्षा हॉर्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे एकत्रिकरण, जोखीम व्यवस्थापन, हे अभियंते करतात. (४) सायबर सेक्युरिटी कंसल्टंट- एकाच वेळी अनेक ग्राहकांना, सायबर सुरक्षेविषयी सल्ला आणि मार्गदर्शन करतात. प्रत्येक संस्थेच्या गरजेनुसार अतिशय भक्कम अशी सुरक्षा कार्यप्रणाली विकसित करतात. जोखीम विश्लेषणाचे कार्य करतात, (५) इन्फॉर्मेशन सेक्युरिट स्पेशॅलिस्ट- संस्थात्मक पातळीवरील सायबर सुरक्षा यंत्रणा आणि प्रणाली हाताळण्याचे कौशल्य या तज्ज्ञांकडे असते. संस्थागत पातळीवर सायबर सुरक्षेविषयी प्रशिक्षण देतात. ॲण्टीव्हायरस सॉफ्टवेअरचे संनियंत्रण करतात, (६) सायबर सेक्युरिटी मॅनेजर- संस्थेतील सुरक्षा पथकाचे संनियंत्रण करतात. उच्च श्रेणीचे सुरक्षा नियोजन करतात, त्यासाठी निधीची उपलब्धतता करुन घेतात. (७) चिफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर- संस्थांतर्गत, सायबर सुरक्षा हाताळणारे सर्वोच्च अधिकारी म्हणून, हे तज्ज्ञ कार्य करतात. विविध पथकांचे संनियंत्रण करतात. कंपनीच्या किमती मालमत्तेच्या संरक्षणासाठी विविध धोरणे आखून, त्यांची अंमलबजावणी करतात, (८) सायबर सेक्युरिटी इंसिडेंट रिस्पाँडर- माहितीच्या साठ्याचे संरक्षण करण्यासाठी, सायबर हल्ले कमी होतील, यावर लक्ष केंद्रित करणे, सायबर धोक्यानंतर कार्यप्रणाली सुरळीत करणे, ही कार्ये या तज्ज्ञांना करावी लागतात. (९) आयटी ऑडिटर- माहिती कार्यप्रणालीचे मूल्यांकन, लेखा परीक्षण, सुरक्षा, कार्यक्षमता आणि अनुपालनाची खात्री हा तज्ज्ञ करतो.

संधी देणाऱ्या संस्था

पुढील संस्थांमध्ये सायबर सेक्युरिटी तज्ज्ञांना करिअर संधी मिळू शकते- (१) शासकीय संस्था, (२) डिफेन्स काँट्रॅक्टर, (३) कंसल्टिंग फर्म्स, (४) शिक्षण आणि संशोधन संस्था, (५) माध्यमे आणि मनोरंजन संस्था, (६) निर्मिती संस्था- (७) परिवहन आणि साहित्य पुरवठा, (८) विमा कंपनी, (९) औषध निर्माण संस्था, (१०) क्लाऊड सेवा पुरवठादार, (११) वित्तीय संस्था, (१२) टेक जिअँट्स, (१३) आरोग्यसुविधा (हेल्थकेअर), (१४) टेलिकम्युनिकेशन कंपन्या, (१५) ई कॉमर्स आणि रिटेल, (१६) उर्जा, (१७) स्टार्ट अप आणि इनोव्हेटर्स, (१८) गेमिंग उद्योग, (१९) अशासकीय संस्था, (२०) व्यावसासिक सेवा पुरवठादार कंपन्या.

    इथिकल हॅकर

सायबर हल्ल्याला परतवून लावणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळास, इथिकल हॅकर म्हणून ओळखले जातात. संभाव्य सायबर धोके किंवा जोखिमेच्या घटकांचा शोध घेण्यासाठी, या तज्ज्ञास कायदेशीररित्या संगणकीय यंत्रणा किंवा नेटवर्कमध्ये शिरकाव करता येतो. त्यामुळे त्यांना यंत्रणेतील कमकुवत दुवे, बाजू लक्षात येतात व त्यावरचे उपायही करता येतात. परिणामी, संभाव्य धोके टळतात अथवा हल्ले झाल्यास, ते तत्काळ परतवून लावणे शक्य होते. या तज्ज्ञांना, डिजिटल कार्यप्रणालीची सुरक्षा करण्यासाठी, सायबर हल्ल्यांचा सामना करणे, संभाव्य धोके ओळखणे, जोखीम कमी करणे, यासाठी विविध कौशल्ये प्राप्त करावी लागतात. कार्यप्रणालीच्या सुरक्षेचे संनियंत्रण  आणि विश्लेषण करण्यासाठी, हॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. नेटवर्कची सुरक्षा भक्कम केल्यावर, कोणताही डाटा/माहितीची चोरी करणे, या माहितीचा दुरुपयोग करणे, यापासून हल्लेखोरांना थोपवू शकते. यामुळे ब्लॅकमेल, वित्तीय नुकसान, प्रतिष्ठेच्या नुकसानीची जोखीम कमी होते. सायबर दहशतवाद्यांशी सामना करता येणे शक्य होते.

या क्षेत्रात (१) वेब ॲप्लिकेशन हॅकिंग, (२) सिस्टिम हॅकिंग, (३) वेब सर्व्हर हॅकिंग, (४) वायरलेस नेटवर्क हॅकिंग, या चार घटकांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

सुरेश वांदिले

०००