“तुम्हाला स्मार्ट होण्याचा खेळ खेळायचाय का?” अलेक्सा गोर्जीने, तेजोमयी आणि तिच्या मैत्रणिंना विचारलं. वैष्णवी नाक फुगवत म्हणाली, “त्याची काही गरज नाही.
“आम्ही ऑलरेडी स्मार्ट आहोत. हा हा हा!” कल्याणी दात दाखवत बडबडली.
“गोर्जे, आम्ही स्मार्ट नाहीत हे तुला कुणी सांगितलं?” मीनाक्षीने डोळे वटारुन विचारलं. गोर्जीने अलेक्झांडरकडे बोट दाखवलं. पठ्ठयानेही शेपूट आणि मान हलवून गोर्जीच्या म्हणण्यास होकार दिला.
“तेजो, अलेक्झूने खरंच असं सांगितलं असेल का?” वैष्णवीने नाराजीनं विचारलं.
“त्याला कुठे कळतय, गोर्जी काहीबाही सांगतेय. होनारे अलेक्झू?” अलेक्झांडरकडे बघत तेजोमयी म्हणाली. पठ्ठयाने शेपूट आणि मान हलवून तेजोमयीच्या म्हणण्यास होकार दिला.
“गधड्या, एक काहीतरी खरं सांगना.” मानसीने अलेक्झांडरचा कान उपटला.
“कसा सांगणार? तो तर कुंपनावरचा कावळा!” गोर्जी म्हणाली.
“म्हणजे?” तेजोमयीसकट सगळ्या मुलींनी एकाचवेळी आश्चर्याने विचारलं.
“म्हणजे, हे ही सत्य नि ते ही खरं.”
“ओव्हरस्मार्टपणा झाला हा.”
“त्यासाठी आधी स्मार्ट व्हावं लागतं. मग पुढची पायरी चढावी लागते, अन्यथा ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’.” गोर्जीने असं म्हणत अलेक्झांडरकडे बघितलं. गोर्जी आपल्याला मामा बनवत असल्याचं लक्षात आल्याने अलेक्झांडरने तेथून काढता पाय घेतला. तो आत जाताच तेजोमयीने आपला मोर्चा गोर्जीकडे वळवला,
“तुझं मघापास्नं स्मार्ट पुराण काय चाललय?”
“तू, आमच्यामध्ये नाक खुपसू नकोस.” वैष्णवी रागावली.
“तिच्या या नाक खुपसण्यात एक खेळ दडल्याचं माझ्या लक्षात आलय.” कल्याणी डोक्यावर हात मारीत म्हणाली.
“तुमचं असंच असतं वरातीमागून घोडे!” गोर्जीने डोळे मिचकावले.
“तू आज काहीतरी वेगळच बोलतयेस.”तेजामयी म्हणाली.
“वेगळं नाही, तीन चार म्हणींचं उदारहण दिलं बोलताना.”
“म्हणी?” कल्पिताने तोंड वाकडं केलं.
“यातच दडलाय स्मार्ट होण्याचा खेळ माझे राणी.” गोर्जी कल्पिताला म्हणाली.
“गोर्जे, पुरे झाली तुझी पोपटपंची, काय ते स्पष्टच सांग.”
“सांगतेना, माझं काही बोलाचीच कढी नि बोलाचाच भात कधी नसतं.”
“ते आम्हाला ठाऊकाय. पण आज तुझी शेपटी मारुतीरायांसारखी वाढतच चाललीय.” कल्याणी म्हणाली.
“मग, खेळाल का हा स्मार्ट होण्याचा खेळ?”
गोर्जी सुचवते तो खेळ गमतिदार असल्याचं सगळ्यांना ठाऊक होतं. त्यामुळे आढेवेढे घेत हा खेळ खेळायला मुली तयार झाल्या. गोर्जीने प्रत्येकीला किती म्हणी ठाऊक असल्याचं विचारलं. सर्वांची गाडी चारपाच म्हणींवर अडखळली.
“तरीसुध्दा तुम्ही स्वत:ला स्मार्ट समजता?” गोर्जी म्हणाली.
“गोर्जे, म्हणी ठाऊक असल्याने कुणी स्मार्टफार्ट होत नाही.” तेजोमयी म्हणाली.
“मग, कशामुळे स्मार्ट होतो, ते सांगा.” गोर्जीनं विचारलं. मुलींनी एकमेकिंकडे बघितलं. कुणालाही याचं उत्तर सांगता आलं नाही.
“म्हणजे, ‘तुमचं उथळं पाणी नि खळखळाटच फार.’ असं झालंय.”
“बर बाई. मग आम्ही काय करायचं?” कल्याणीनं वैतागून विचारलं.
“स्मार्ट व्हा!”
“ते कसं व्हायचं?”
“म्हणींच्या भेंड्या खेळा.”
“गोर्जे, आमची मजल पाच म्हणींच्या वर नाही गेलीय, नि म्हणतेस भेंड्या खेळा. आम्हाला मूर्ख समजतेस काय?” वैष्णवी म्हणाली. तुम्ही थोड्याफार तशा आहातच, हे गोर्जीला सांगावसं वाटलं. पण ती फक्त हसली.
“आता काय झालय?”
“म्हणजे, तुमच्या आडातच नाही म्हणून पोहऱ्यात म्हणी येणार नाहीत. पण, आडात तर म्हणी टाकता येतीलना.”
“ते कसं?”
“घ्या, हे सुध्दा मीच सांगायचं. याला म्हणतात, ‘काखेत कळसा नि गावाला वळसा’.”
“तुला म्हणायच तरी काय?”तेजोमयी चिडून म्हणाली.
“असं चिडू नको. तुमच्या प्रत्येकाच्या घरी म्हणी नि वाक्प्रचाराची पुस्तकं नक्कीच असणार. ती घ्या. त्यातल्या शंभर म्हणी पाठ करा. ते तुम्हाला काही अशक्य नाही. त्या पाठ झाल्या की ‘म्हणी-भेंडिंचा’ खेळ खेळा. म्हणी पाठ करताकरता त्यांचा अर्थ समजून घ्या. म्हणजे त्या म्हणींचा वापर कधी, कुठे, कोणत्या प्रसंगी करायचा हे लक्षात येईल. उगाच आपलं हिंग्लिश-मिंग्लिश बोलण्याऐवजी आपल्या मराठी म्हणी वापरा नि मग बघा चमत्कार!”
“कसला चमत्कार?”
“असं, तुम्हाला योग्य त्या ठिकाणी म्हणी वापरता येतात म्हणून समोरची व्यक्ती चाट पडून म्हणेल, काय स्मार्ट मुलगी आहे ही.”
“स्मार्ट होण्याची एक वाट म्हणींमध्ये दडलीय म्हणायची.”
“तेच तर सांगायचा प्रयत्न करतेना मघापासनं. पण तुम्हाला म्हणींपेक्षा टिवल्याबावल्या जास्त प्रिय.” गोर्जी हसून म्हणाली. त्याचवेळी पुन्हा तिथे आलेल्या अलेक्झांडरने मान हलवून, “उंदराला मांजर साक्षीचा प्रत्यय आणून दिला.’’ याचा प्रत्यय आणून दिला.