(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ८४- लष्करात थेट भरती

 

नुकताच जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई)-मेन परीक्षेचा निकाल घोषित झाला. जेईई मेन परीक्षेच्या गुणांवर आधारित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) आणि इतर केंद्रीय अभियांत्रिकी/तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर जेईई-मेन गुणांच्या आधारावर भारतीय नौदल आणि भारतीय थलसेनेत थेट प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध होते. सैन्यामध्ये उच्चश्रेणीचे करिअर करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या प्रज्ञावंत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर तरुण/तरुणींनी या पर्यायाचा अवश्य विचार करायला हवा.

 

वेगळे करिअर आणि दर्जेदार जीवनशैली जगण्याची संधी यामुळे मिळू शकते. नागरी सेवांपेक्षा अधिक सुविधा, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी, निवृत्तीनंतर उत्तम आयुष्य जगण्यासाठी करण्यात येणारे साहाय्य, देशात आणि देशाबाहेरही नियुक्ती, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य ही काही या सेवेची वैशिष्ट्ये सांगता येतील.

 

**(१) नौदलात थेट भरती**

 

भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत मुलींनाही अर्ज करता येतो. बीटेक पदवी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमार्फत दिली जाते.

 

या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती (परमॅनंट कमिशन) दिले जाते. त्यांना नॅव्हल अॅकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्युत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई)-मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.

 

या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारास १२वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के आणि १२वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. तसेच जेईई मेन परीक्षेत बसलेले असणे आवश्यक आहे.

 

**निवड प्रक्रिया**

 

प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड- सेवा निवड मंडळ)च्या केंद्रांमध्ये मुलाखती/चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुद्धिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणतः तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड नौदलाच्या गरजेनुसार अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळातील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला जातो.

 

संपर्क- www.joinindiannavy.gov.in

 

**थलसेनेत थेट प्रवेश**

 

भारतीय थलसेनेत थेट प्रवेशासाठी १०+२ टेक्निकल एन्ट्री स्किम (टीईएस) ही योजना राबवली जाते. यासाठी केवळ पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतो.

 

**अर्हता-** (१) जेईई मेन परीक्षा, (२) १२वी विज्ञानशाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के गुण मिळवणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. (३) वयोमर्यादा साडेसोळा वर्षे ते साडेएकोणवीस वर्षे.

 

या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. हा कालावधी संपल्यावर त्यांना लेफ्टनंट या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाते.

 

**या योजनेंतर्गत प्रशिक्षणाचे टप्पे-** (१) मूलभूत लष्करी प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते ऑफिसर प्रशिक्षण केंद्र गया येथे दिले जाते. (२) फेज वन (टप्पा एक) – नियुक्तीपूर्व प्रशिक्षण – याचा कालावधी तीन वर्षांचा असून ते कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिकंदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते. (३) नियुक्तीनंतरचे प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते सुद्धा वरील संस्थांमध्ये दिले जाते.

 

अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची अभियांत्रिकी पदवी प्रदान केली जाते. या उमेदवारांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाल्यावर दोन वर्षांत कॅप्टन या पदावर पदोन्नती दिली जाते. पुढे टप्प्याटप्प्याने पदोन्नती होत राहते.

 

अभ्यासक्रम/प्रशिक्षणाच्या तीन वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५६,१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना लेफ्टनंट पदाचे संपूर्ण वेतन भत्त्यासह लागू केले जाते.

 

**निवड प्रक्रिया**

 

या योजनेअंतर्गत निवडीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. यासाठी विशिष्ट कटऑफ गुण निर्धारित करण्यात येतात. निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) समोर मुलाखती/चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही चाळणी मानसोपचार तज्ज्ञ, समूह चाळणी अधिकारी आणि मुलाखत घेणारे अधिकारी यांच्याद्वारे घेतली जाते.

 

प्रत्येक उमेदवारास दोन टप्प्यातील निवड प्रक्रियेतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारासच दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. पहिल्या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना लगेच परत पाठवले जाते. चाळणी परीक्षा पाच दिवस चालते. दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाळणी घेतली जाते. एसएसबीने निवडलेल्या आणि वैद्यकीय बोर्डाने वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठरवलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते. अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार करताना एसएसबीच्या मुलाखतीमधील गुण आणि जेईई-मेन मधील गुण यावर तयार केली जाते. या दोन्हींचे वेटेज निवड मंडळामार्फत ठरवले जाते.

 

या चाळणी परीक्षेत काही अपघात किंवा जखम झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई दिली जात नाही.

 

संपर्क- www.joinindianarmy.nic.in

 

**अग्निपथ योजना**

 

लष्करातील तीनही दलातील भरतीसाठी केंद्रसरकारने अग्निपथ ही योजना कार्यान्वित केली आहे. साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील १०वी/१२वी उत्तीर्ण मुले (आणि काही श्रेणींमध्ये मुलीही) या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात. चार वर्षांसाठी या उमेदवारांची निवड केली जाते. त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी त्यांना सुमारे ३०,००० रुपये मासिक पॅकेज दिले जाते. चौथ्या वर्षापर्यंत या पॅकेजमध्ये वाढ होऊन सुमारे ४०,००० रुपये मासिक होते. चार वर्षानंतर सेवानिधीच्या स्वरूपात सुमारे १० ते ११.७१ लाख रुपये (व्याजासह) दिले जातात. ही रक्कम आयकरमुक्त आहे. निवड झालेल्या अग्निवीरांमधून २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे सेवेत कायम केले जाते. काही राज्यसरकार आणि वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांनी या उमेदवारांना सामावून घेण्याचे ठरवले आहे. या अग्निवीरांना लष्करी शिस्तीतील प्रशिक्षण मिळाल्याने चार वर्षांच्या कालावधीत अग्निवीरांचे रूपांतर सक्षम, समर्थ आणि आधुनिक कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.

 

संपर्क https://www.mygov.in/campaigns/agniveer/ किंवा संबंधित दलांची अधिकृत संकेतस्थळे

 

(१) अग्निवीर थलसेना- अग्निवीर जनरल ड्युटी- १०वी उत्तीर्ण, अग्निवीर टेक्निकल- १२वी (भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र), अग्निवीर क्लार्क/स्टोअरकीपर- कोणत्याही शाखेतील १२वी, अग्निवीर ट्रेड्समॅन- १०वी. संपर्क- https://joinindianarmy.nic.in

 

(२) वायूसेना- अग्निवीर वायु – संपर्क- https://agnipathvayu.cdac.in/

 

(३) नौसेना- अग्निवीर एसएसआर (सिनिअर सेकंडरी रिक्रूट)- १२वी- भौतिकशास्त्र, गणित किंवा ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी, एमआर (मॅट्रिक रिक्रूट)- १०वी. संपर्क- https://www.joinindiannavy.gov.in

 

(येथे दिलेली माहिती सर्वसाधारण स्वरूपाची आहे. १०+२ टेक्निकल एन्ट्री किंवा १०+२ नौदल एन्ट्री आणि अग्निवीर निवडीबाबतच्या विविध टप्पे आणि शैक्षणिक, वैद्यकीय अर्हता, प्रशिक्षण, वेतन, पदोन्नती याची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित दलाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.)

 

सुरेश वांदिले

 

**नवीन माहिती (२०२६ च्या अधिकृत स्त्रोतांनुसार)**

 

नौदल १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्रीसाठी २०२६ मध्ये दोन कोर्सेस जाहीर झाले होते (जुलै २०२६ आणि जानेवारी २०२७). मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात. जेईई मेन रँकवर आधारित शॉर्टलिस्टिंग केली जाते. वयोमर्यादा संबंधित कोर्सच्या तारखेनुसार बदलते (साधारणतः १६½–१९½ वर्षे).

 

थलसेना टीईएस-५७ (जुलै २०२७ कोर्स) साठी अर्ज १४ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू आहेत. केवळ अविवाहित पुरुष उमेदवार पात्र. १२वीत पीसीएममध्ये किमान ६० टक्के आणि जेईई मेन २०२६ आवश्यक. सुमारे ९० जागा अपेक्षित.

 

अग्निपथ योजनेत २०२६ मध्येही नियमित भरती सुरू आहे. पहिल्या बॅचची चार वर्षे पूर्ण होत असून २५ टक्के उमेदवार नियमित सेवेत कायम केले जात आहेत. सेवानिधी सुमारे १०–११.७१ लाख रुपये (करमुक्त) मिळते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये माजी अग्निवीरांसाठी आरक्षण आणि वयोमर्यादा सवलत जाहीर झाली आहे.