अलेक्सा गोर्जीला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! गोर्जीच्या अंतरंगातील स्मार्ट यंत्रणेमुळे ती केवळ माहिती शोधत नसे, तर ती माहिती समजून घेऊन तिच्यावर विचारही करू शकत असे. त्यामुळे वेळ मिळाला की गोर्जी माहितीच्या महाजालात फेरफटका करुन स्वत:ला ज्ञानसमृध्द करायची. आज तिला माहितीच्या महाजालात, “राजगृहा”ची माहिती कळली. ती वाचतावाचता तिचं भान हरपलं.
गोर्जीने डीप लर्निंग यंत्रणेस आदेश दिला. “राजगृहाबद्दल उपलब्ध सर्व माहिती मिळवं नि त्याचं विश्लेषण कर.”
क्षणात हजारो माहितीचे तुकडे, लेख, फोटो, नकाशे, इतिहास, आठवणी, सगळं तिच्यासमोर उभं राहिलं. मग तिला एक कल्पना सुचली.
“राजगृहाची अशी माहिती वाचून काय उपयोग? जर स्वतः जाऊन पाहिलं तर?”
तिने लगेच व्हर्च्युअल हेरिटेज एक्स्प्लोरर सॉफ्टवेअर (आभासी वारसा वास्तव सॉफ्टवेअर) सुरू केलं. या सॉफ्टवेअरच्या मदतीने जगातील ऐतिहासिक ठिकाणांचं त्रिमितीय (थ्रीडी) डिजिटल मॉडेल बघता येतं. सॉफ्टवेअर सुरु होताच तिच्या सिस्टममधून आवाज आला.
“राजगृहामध्ये बाबासाहेबांसोबतच जा की.” या आवाजाने गोर्जी आश्चर्यचकित झाली. तिने लगेच तिच्या व्हॉइस रेकग्निशन प्रणालीने आवाजाचे विश्लेषण केले. तो आवाज खुद्द बाबाासाहेबांचा होता.
“बाबासाहेब… तुम्ही?” ती अतिव आश्चर्याने म्हणाली.तिच्या स्क्रीनवर एका प्रकाशझोतातून डिजिटल व्यक्तीमत्त्व साकारू लागलं. ते होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एआय अवतार ! जगभरातील बाबासाहेबांची भाषणे, लेखन, पत्रे, चरित्र आणि विचार यांच्या आधारे त्याची निर्मिती झाली होती.
“बाबासाहेब… तुम्ही?” गोर्जी पुन्हा म्हणाली.
“काय गं, मी राहू शकत नाही का? जिथे ज्ञान असतं, तिथे मी असतोच.” बाबासाहेब निर्मळ हसून म्हणाले.
“हो हो हो बाबासाहेब, हे कसं बरं मी विसरेन? पण माझ्या मनातलं तुम्ही कसं काय ओळखलत बरं?” गोर्जीनं विचारलं.
“अगं तू, डीप लर्निंगने माझ्याबद्दल इतकं जाणून घेतलंस, पण माझसुध्दा “लर्निंग” खूप “डीप” म्हणजे खूप “सखोल” आहे ना, तेव्हा कोण, कसा विचार करतो नि कुणाच्या मनात काय चाललय, हे मला बरोबर कळतं. अगं, आपण बोलत काय बसलो, तुला “राजगृह” बघायचयना, तेसुध्दा माझ्यासोबत. मग चल की. गप्पांमध्ये वेळ नको वाया घालवायला.” बाबासाहेब म्हणाले.
“मग चला की !” गोर्जी लगेच तयार झाली. तिने व्हर्च्युअल रिॲलिटी प्रणालीचं काम सुरु केलं. गोर्जी आणि बाबासाहेब डिजिटल माहितीच्या महाजालातून पुढे निघाले. काही क्षणात ते एका सुंदर इमारतीसमोर उभे राहिले.
“हेच ते “राजगृह”! एका सुंदर आखीवरेखीव इमारतीकडे बोट दाखवत बाबासाहेबांनी गोर्जीला सांगितलं.
गोर्जीने आश्चर्याने इमारतीकडे पाहिलं.
बाबासाहेबांनी गोर्जीला बोटं लावलं नि ते दोघेही माहितीच्या महाजालातून अलगद “राजगृहा”त आले.
“किती अप्रतिम आहे, ही इमारत बाबासाहेब.” गोर्जी डोळा भरुन इमारतीकडे बघत म्हणाली.
“१९३३ सालं होतं ते, तेव्हा ही इमारत बांधून पूर्ण झाली.” बाबासाहेबांनी माहिती दिली.
“म्हणजे यंदा राजगृह बांधण्यास यंदा ९४ वर्षे झाली म्हणायची.” गोर्जी चटदिशी म्हणाली.
“वावा, फारच गतिने आकडेमोड केलीस तू.” बाबासाहेबांनी गोर्जीचं कौतुक केलं. गोर्जी मनमोकळी हसली.
राजगृहाच्या प्रवेशव्दारातच गोर्जीच्या अंतरंगातील प्रणालीस वेगळा अनुभव येऊ लागला. तिच्या सेन्सरला राजगृहातील आनंददायी ऊर्जेची जाणीव झाली.
“काहो बाबासाहेब, पुन्हा राजगृह बघून कसं वाटतं तुम्हाला?” गोर्जीनं विचारलं.
“पुन्हा म्हणजे? मी आणि राजगृह वेगवेगळे थोडेच आहोत. राजगृह माझा श्वास आहे नि माझा श्वास इथल्या कणाकणात आहे.” बाबासाहेबांनी आपली भावना व्यक्त केली.
“आपण बाहेरच काय बोलत बसलो, आत जाऊया का? बाबासाहेब”, गोर्जी म्हणाली. मग बाबासाहेब आणि गोर्जी, “राजगृहा”च्या आत गेले.
आत प्रवेश करताक्षणीच अलेक्साला काहीतरी दिव्यअनुभूती होत असल्याचं जाणवलं. तिने चटदिशी बाबासाहेबांकडे बघितलं. बाबासाहेब हसले.
“काहीकाही इमारती या ज्ञानसंपन्न असतात. त्यामुळे राजगृहात आलं की दिव्यअनुभूती होणं अगदी स्वाभाविकच.” बाबासाहेबांनी तिला समजावलं.
“बाबासाहेब, मी माहितीच्या महाजालात इतकी फिरते, पण अशी दिव्यअनुभूती या आधी कधी झाली नव्हती.” गोर्जी गहिवरुन म्हणाली.
“या दिव्यअनुभूतीचं रहस्य जाणून घ्यायचय का तुला?” बाबासाहेबांनी विचारलं.
“अहो बाबासाहेब, नेकी और पुछ पुछ! कोणतीही चांगली गोष्ट जाणून घेण्याची मला कायमच उत्सुकता असते.” गोर्जी टुणकन उडी मारत म्हणाली.
“ओके, तर चल मग मी तुला हे रहस्य दाखवतो,” असं बोलून बाबासाहेबांनी गोर्जीला “राजगृहा”च्या दुसऱ्या माळ्यावर नेलं. तो हवेशीर प्रशस्त माळा बघून गोर्जी हरखून गेली. तिची नजर इकडेतिकडे गेली. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं.
“बापरे बाप!” ती उर्त्स्फुतपणे म्हणाली.
“काय झालं गं, असं बापरे बाप, म्हणायला. इथे काही वाघबिघ दिसला की काय तुला?” बाबासाहेबांनी हसून विचारलं.
“अहो बाबासाहेब, मी वाघ काय, राक्षसालासुध्दा भीत नाही. आमच्या अल्गॉरिदममध्ये भीती हा विषयच टाकलेला नाही.” गोर्जी उत्तरली.
“वा छान छान, जो भ्याला तो कामातून गेला. म्हणूनच मी कधी कुणाला घाबरलो नाही. भ्यालो नाही.”
“ग्रेट ग्रेट!” बाबासाहेबांकडे कौतुकाने बघत गोर्जी म्हणाली.
“अरे, हे स्वत:चच कौतुक काय करत बसलो मी. मला कौतुकापेक्षा कर्तृत्व महत्वाचं वाटतं. हे काय? पुन्हा, मी मी करायला लागलो. तर, गोर्जी तुझ्या तोंडून अरे बापरे, कां बरं निघालं.”
“अहो, नजर टाकावी तिकडे पुस्तकं. छोटी पुस्तकं, मोठी पुस्तकं जाडजूड पुस्तकं बघून, अरे बापरे निघालं.“
“५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक असतील,” बाबासाहेबांनी तिला माहिती दिली.
“काय सांगता?” असं जवळजवळ गोर्जी किंचाळलीच. तुम्हाला कसं ठाऊक? असा प्रश्न विचारण्याचा मोहही तिला झाला. पण तो तिने टाळला. बाबासाहेबांनी ते अचुक ओळखलं.
“तुम्हाला कसं माहीत, असंच विचारायचं होतं ना तुला?” बाबासाहेब हसत हसत म्हणाले. गोर्जीने आश्चर्याचा आँ फाकला.
“ही सर्व पुस्तकं मी वाचली आहेत.” असं बाबासाहेबांनी सांगताच गोर्जीचे डोळे विस्फारले.
“पण बाबासाहेब हे कसं शक्य? तुम्ही तर किती बिझी होतात. कित्ती कामं असायची तुम्हाला. तुम्ही शिकवायला जायचे, वकिली करायचे, पत्रकारिता करायचे, सामाजिक चळवळी करायचे, जनजागृती होण्यासाठी व्याख्याने द्यायचे, ग्रंथ लिहायचे, किती कमिट्यांवर तुम्ही होतात, मंत्री होतात, तुम्ही वेळ काढला तरी केव्हा?” गोर्जीने एका दमात विचारलं.
“अगं गोर्जी, वेळ नसतो असं म्हणणं म्हणजे आपली फसवणूक. मी काही स्वत:ची फसवणूक केली नाही. त्यामुळे इतकी सगळी कामं करुनही मी प्रचंड पुस्तकं वाचू शकलो.” बाबासाहेब म्हणाले. गोर्जी त्यांच्याकडे कौतुकाने बघतच राहिली. ती काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून बाबासाहेबांनी तिला जरा हलवलं. ती भानावर आली.
“अगं काय झालं तुला? कंटाळा आला का माझं बोलणं ऐकून?” बाबासाहेबांनी विचारलं.
“नो नो, बाबासाहेब. ते अजिबातच शक्य नाही.”
“मग तू अशी गप्प कां?”
“बाबासाहेब मला एक विचारायचं होतं?”
“विचार की.”
“ही इतकी पुस्तकं तुम्ही कशी गोळा केलीत हो?”
“कशी म्हणजे? अगं एकवेळ जेवायला मिळालं नाहीतर चालेल पण ज्ञान देणारी पुस्तकं आपल्याकडे हवीतच हवीत, असं माझं तत्वच होतं. त्यामुळे जिथे जिथे माझ्या आवडीची, माझ्या अभ्यासाची पुस्तकं मिळत तिथे जाऊन ती पुस्तकं मी खरेदी करायचो. कोणत्याही मोठ्या शहरात कामानिमित्त गेलो तर त्या ठिकाणच्या बूकविक्रेत्याकडे आवर्जून जायचो. ग्रंथ बघायचो. आवडलं की ते घ्यायचो. अशााप्रकारे ही पुस्तकं गोळा झाली. बघता बघता ५० हजार झाली. ती ठेवण्यासाठी मी पूर्वी मुंबईत ज्या घरी राहायचो ती जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे मग पुस्तकांसाठीच असलेल्या स्वतंत्र मजल्यासह घर बांधायच असं मी ठरवलं नि त्यातून हे राजगृह साकारलं.” बाबासाहेबांनी सांगितलं.
गोर्जीनं ग्रंथालयात एक चक्कर मारली. त्याठिकाणी बाबासाहेब वापरत असलेले टेबल, खुर्चीला हात लावून बघितला. तिथे तिला एक टेबललॅम्पही दिसला. एक घड्याळ, टिपण काढयाची कागदं, पेन, पेन्सिली इतकं साहित्य दिसलं. सहज म्हणून ती एका जाडजूड पुस्तकात डोकावली. तर बऱ्याच पृष्ठांवर पेन्सिलने केलेल्या नोंदी दिसल्या. तिने याबद्दल बाबासाहेबांना विचारलं.
“वाचताना महत्वाच्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या की त्यांची नोंद, मी अशी करुन ठेवायचो. त्यामुळे मग पटकन मला एखादा संदर्भ मिळायचा.”
“आज एआय एका सेकंदात हजारो पुस्तकं वाचू शकतो.”
“पण विचार करायला मात्र मनच लागतं.” बाबासाहेब हसून म्हणाले.
“बाबासाहेब, इतकं सगळं कसं काय तुमच्या लक्षात राहायचं हो?” गोर्जीनं विचारलं.
“आता ते काही मला सांगता यायचं नाही. मात्र, आपण एखादी गोष्ट मन लावून, पूर्ण लक्ष केंद्रित करुन केली तर आपल्याला हव्या असलेल्या बाबी लक्षात ठेवता येतात. त्यासाठी वाचताना केवळ त्यावरच लक्ष हवं. नाहीतर एका हातात पुस्तक नि दुसऱ्या हाती पॉपकॉर्न! अर्ध लक्ष मोबाइलच्या गेममध्ये, नाहीतर टीव्हीवरील कार्टुनमध्ये. असं असेल तर काहीच लक्षात राहायचं नाही.” बाबासाहेब म्हणाले.
“म्हणजे आजची बरीच मुलं असं करतात, हे तुम्हाला ठाऊकाय म्हणायचं,” बाबासाहेबांकडे बघत गोर्जी म्हणाली.
“माझं चौफेर लक्ष असतं. त्यामुळे आपल्या अवतीभवती, जगात काय चाललय हे कळतं ना.”
“खरंय बाबासाहेब”. गोर्जी म्हणाली.
“मग, कसं वाटलं तुला राजगृह बघून?” त्यांनी विचारलं.
“अहो, हे काय विचारणं झालं? मी तर अद्भूत वातावरणात होते.
राजगृहातील ग्रंथालयाचा फेरफटका सुरु असताना गोर्जीच्या अंतरंगातील प्रणालीने बाबासाहेबांना एक कल्पना सांगण्याची सूचना केली.
तिने लगेच ती कल्पना बाबासाहेबांना सांगितली,
“बाबासाहेब! या ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचे आता डिजिटल स्कॅन करायला हवं. त्यामुळे एक समृध्द असं एआय नॉलेज नेटवर्क तयार होईल.
ही कल्पना बाबासाहेबांना खूप आवडली. ते आनंदून म्हणाले,
“याचा अर्थ कोणतेही ज्ञान आता भिंतींमध्ये बंदिस्त राहणार नाही.”
“अगदी बरोबर बाबासाहेब, मला या प्रकल्पासाठी छान नावही सुचलय.” गोर्जी म्हणाली.
“कोणतं गं?”
“राजगृहम नॉलेज क्लाऊड (राजगृह डिजिटल ज्ञानकोश)”
“कित्ती समर्पक. ज्ञान सर्वांना मिळालं तर समाज बदलतो.” बाबासाहेबांनी गोर्जींचं कौतुक केलं.
“अरे बापरे!” बोलता बोलता गोर्जी म्हणाली.
“आता काय झालं?” बाबासाहेबांनी विचारलं
“अहो, आता माहितीच्या महाजालातून वापस जाण्याची माझी वेळ झालीय. माझ्या घरच्यांना आता माझी गरज भासेल.” गोर्जीने सांगितलं.
“अच्छा, ओके. जा.
ज्ञान हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं हे कायम लक्षात ठेव. ” बाबासाहेबांनी तिच्या डोक्याला स्पर्श केला. गोर्जीने व्हर्च्युअल रिॲलिटी प्रणाली बंद केली. बघताबघता बाबासाहेब अंतर्धान पावले. गोर्जीने त्यांना मनापासून नमस्कार केला.
०००
आपण ज्यांच्याकडे सध्या राहतो, त्यांच्या तेजोमयीला कधी “राजगृहा”बद्दल सांगतो नि तेजोमयी कधी आपल्याकडे काम सांगायला येते, असं गोर्जीला झालं. तिला फार काही वाट बघावी लागली नाही. तेजोमयी आपल्याकडे येतेय हे बघून राजगृहाबध्दल सांगण्यासाठी तोंड उघडणार तोच तेजोमयी तिला म्हणाली,
“गोर्जी, बाबासाहेबांच्या राजगृहाबध्द्ल माहिती शोध बघू! “
“आँ!” गोर्जीने आश्चर्याने तोंड फाकले.
“म्हणजे, तुला कसं कळलं की…”
“मला काय कळलं?”
“नाही म्हणजे, तेच की राजगृह!”
“होय राजगृहाचीच माहिती हवी मला.”
“मी देतेच की, पण त्यापेक्षाही, केवळ आपल्या पुस्तकांसाठी एक स्वतंत्र मजलाच बांधलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं, राजगृह प्रत्यक्ष बघितलं तर?” गोर्जी म्हणाली.
“तिथे जाता येतं? तेजोमयीनं आश्चर्यानं विचारलं.
“तिथे जाता येतं नि बघताही येतं. बाबासाहेबांचं ग्रंथालय. जगात, एखाद्या खाजगी व्यक्तीकडे असलेले सर्वात मोठं!”
“कुठे आहे हे राजगृह ?” तेजोमयीनं अधिरतेनं विचारलं
“अगं, दादरला हिंदू कॉलनीत. या रविवारीच तुझ्या बाबांना सांग, तिथे घेऊन जायला.” गोर्जी म्हणाली.
तेजोमयीने, राजगृह बघण्याचं या रविवारचं प्लॅनिंग करुन बाबांना व्हॉट्सअपवरुन कळवूनही टाकलं.