रिअल इस्टेटच्या जगात-भाग दोन
सध्या आपल्या देशात आणि जगात इतरत्र रिअल इस्टेट (जमिनीचे व्यवहार/ गृहसंकुलाची निर्मिती, सदनिकांची खरेदी-विक्री इत्यादी) उद्योग झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी २०२२ पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात १९० बिलियन डॉलर्स गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवलीय. दिवसागणिक या क्षेत्रात विविध प्रकराचे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
सध्या या क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची कमतरता ४ कोटीच्या आसपास असल्याचे उद्योजकांचे निरीक्षण आहे. २०२२ पर्यंत ७५ लाख कौशल्ययुक्त मनुष्यबळास रोजगराच्या संधी मिळू शकतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे नागरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्र आणि राज्यशासन भर देत आहे. पुढील काळात शासनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागाने २५ लाख घरे, १०० स्मार्ट शहरे उभारली जाण्याची शक्यता आहे. मोठ्या खाजगी कंपन्या गृहसंकुलाच्या व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात उतरल्या आहेत. या कंपन्यांना कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज आहे. रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ॲक्ट) सारखा कायदा ग्राहकांच्या हितासाठी आल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक व्यावसायिकरीत्या आणि पारदर्शकरीत्या काम करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात विपणन,विक्री , सेल्स, वित्त, प्रशासन, जनसंपर्क अशा विविध संधी मिळू शकतात.
व्यवस्थापन आणि विपणन
रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेट मार्केटिंग व सेल्स हे अभ्यासक्रम याअनुषंगाने उपयुक्त ठरु शकतात. या अभ्यासक्रमात या क्षेत्राची विस्तृत माहिती, कायदेशीर बाबी, कागदपत्रांची जुळवाजुळव, विविध परवाने, बांधकाम प्रक्रिया, विक्री, इतर तांत्रिक बाबी शिकवल्या जातात.
रियल इस्टेट क्षेत्रासाठी गृहवित्त आणि सूक्ष्म वित्तची गरज भासते. त्यामुळे या क्षेत्रासाठी मनुष्यबळ लागते. स्थापत्य अभियंत्यांना रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये संधी उपलब्ध होते. वास्तुकला अभियंते, लेखा पदवीधर, विधि पदवीधरांनी हा अभ्यासक्रम केल्यावर त्यांच्या कौशल्यात वृध्दी होऊ शकते. रेरा अधिनियमानुसार कम्प्लॉयन्स ऑफिसर, कस्टमर रिलेशनशीप ऑफिसर, प्रोजेक्ट मॅनेजर यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
मनुष्यबळाची गरज
(१) स्पेशलाइज्ड मनुष्यबळ- यामध्ये व्हॅल्युअर, क्वालिटी सर्व्हेअर, फॅसिलिटी मॅनेजर, प्रॉपटी मॅनेजर, सस्टनेबल डेव्हलपमेंट एक्सपर्ट यांचा समावेश होतो.
(२) प्रमुख मनुष्यबळ – यामध्ये इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि प्लॅनर यांचा समावेश होतो.
(३) इतर साहाय्यक मनुष्यबळ- यामध्ये व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, सनदी लेखापाल, विपणन अधिकारी, विक्री अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, वित्तीय नियंत्रक किंवा विश्लेषक, वकील, रेरा कम्प्लॉयन्स ऑफिसर, ग्राहक संपर्क आधिकारी इत्यादींचा समावेश होतो.
आवश्यक गुण
(१) उत्तम मौखिक संवाद कौशल्य, (२) व्यावसायिक शिष्टाचार, (३) सादरीकरण कौशल्य, (४) नेतृत्व कौशल्य, (५) निर्णय क्षमता, (६) संसाधनांची हाताळणी, (७) व्यवस्थापन माहिती प्रणाली, (८) वाटाघाटीची तंत्रे, (९) विश्लेषण कौशल्य, (१०) ग्राहक हाताळणी कौशल्य,(११) दस्तऐवजीकरण आणि अहवाल लेखन,(१२) विवाद/ संघर्ष व्यवस्थापन, (१३) कार्यालय व्यवस्थापन
या उद्योगात, सल्ला मार्गदर्शन, ब्रोकरेज अशा सेवाही लागतात. नव्या अधिनियमानुसार ब्रोकरेज क्षेत्र हे अधिक सुव्यस्थित होणार आहे. यात व्यावसायिकता येईल व पारदर्शक कार्यप्रणाली विकसित होईल. त्यामुळे या क्षेत्रात नव्या करिअर संधी निर्माण होतील.
रिअल इस्टेट या अनुषंगाने अभ्यासक्रम/प्रशिक्षण चालविणाऱ्या काही संस्था-
रिअल इस्टेट मॅनेजमेंट इंस्टिट्यूट– या संस्थेमार्फत रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट ॲण्ड हाउुसिंग फायनांस हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये रिअल इस्टेट व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध संकल्पना शिकवल्या जातात. कौशल्यवृध्दीसाठी साहाय्य केले जाते. इंटरनेट मार्केटिंगची कौशल्ये शिकवली जातात. करार प्रक्रियेची माहिती दिली जाते. रिअल इस्टेट आणि गृहनिर्माणासाठी लागणाऱ्या वित्तीय बाबी, कर्ज प्रक्रिया, कायदेशीर बाबी यांची माहिती दिली जाते. कर आकारणीचे स्वरुप शिकवले जाते. बांधकामाच्या प्रारंभापासून ते ग्राहकास सदनिकेची विक्री करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रकियेचे संनियंत्रण कसे करावे याची माहिती दिली जाते. प्रकल्प व्यवस्थापनाच्या मुलभूत बाबी शिकवल्या जातात. ग्राहकांशी उत्तम संबंध कसे निर्माण करावे यासाठी टिप्स दिल्या जातात. नेतृत्व गुण विकसित केले जातात. उपलब्ध संसाधनांचा उत्तम व प्रभावी उपयोग कसा करावा, याचे तंत्र शिकवले जाते. कामगार कायद्याची माहिती करुन दिली जाते. कामगार व कर्मचाऱ्यांच्या कामाचे विश्लेषण करणे, चांगल्या कामगार,कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, आदी बाबीही शिकवल्या जातात.
या अभ्यासक्रमात लेआऊट आणि किमतीचे निर्धारण, जमीन-जुमल्याची आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर बाबी शिकवल्या जातात. विक्री आणि विपणनाची मुलभूत तंत्रे, व्यवसाय कसा सुरु करावा याची तंत्रे शिकवली जातात. जाहिरा ती आणि ब्रँडिंग, विक्रीचे नियोजन, व्यवसाय वाढीचे नियोजन, इंटरनेट मार्केटिंग आणि संकल्पना सोशल मीडियाचा वापर, ब्लॉग लेखन आणि संकेतस्थळाची निर्मिती, गृहकर्ज प्रक्रिया, आयकर निर्धारण व नियोजन, भाडेतत्व आणि गहाण ठेवण्याची प्रक्रिया, जमिनीचे व्यवहार, पुनर्विकास, प्रकल्पाचे आयुष्यमान, करार प्रकिया, मनुष्यबळ व्यवस्थापन,रोजगार निर्मिती आणि विश्लेषण, कामगार व कर्मचाऱ्यांची निवड आणि नियुक्ती, कामगारांच्या कामाचे विश्लेषण या घटकांची माहिती करुन दिली जाते.
हा अभ्यासक्रम चार महिन्यांचा असून त्यात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. १२वी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील व्यक्ती हा अभ्यासक्रम करु शकतो.
संपर्क – रिअल इस्टेट मॅनेजमेंट इंस्टिट्यूट, ५ एव्हरग्रीन इंडस्ट्रिअल इस्टेट, शक्ती मिल गल्ली, महालक्ष्मी, मुंबई-४०००११, संपर्क- १८००२२७३६४ ,ईमेल-info@remi.edu.in, संकेतस्थळ- http://www.remi.edu.in
०००
०००
इंस्टिट्यूट ऑफ लिडरशीप-
अभ्यासक्रम- बीबीए इन रिअल इस्टेट मॅनेजमेंट,कालावधी- तीन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, द कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन आणि रिअॅलटर्स ॲण्ड इस्टेट कन्सलटंट्स असोशिएशन या संस्थांशी, मौलाना अबूल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने सामंजस्य करार केला आहे. याच युनिव्हर्सिटीमार्फत ही पदवी दिली जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर रिअल इस्टेट डेव्हलपर, हाऊसिंग ऑफिसर, इव्हेंस्टमेंट कंसलटंट अशा करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ लिडरशीप (आयलीड), ११३,जे माथेस्वारटोला रोड, निअर ॲक्सिस बँक, ऑफ पार्क रिजेंसी हॉटेल, कोलकता- ७०००४६, दूरध्वनी-०३०-४०१८२०००आणि ६३१२२२२२
ईमेल-info@ ilead.net.in, संकेतस्थळ-www.ilead.net.in
००००
०००
इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम
शासकीय तंत्रनिकेतन मुंबई या संस्थेने गृहसंकुलाच्या व्यवस्थापन प्रणालीशी संबधित सर्टिफिकेट कोर्स इन इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
या अभ्यासक्रमात इमारतीच्या देखभाल व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे व त्यासाठी उपयोगात आणणाऱ्या उपकरणांच्या हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सीसीटीव्ही प्रणाली, प्रवेश नियंत्रण प्रणाली, अग्नी सुरक्षा प्रणाली , हिटिंग-व्हेंटिलेशन ॲण्ड एअर कंडिशन प्रणाली यांचा समावेश आहे. कालावधी- ६ आठवडे. अर्हता- दहावी उत्तीर्ण,
संपर्क– शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, बांद्रे पूर्व- मुंबई-४०००५१, दूरध्वनी- ०२२- २६४७४५८७, फॅक्स- २६४७२५५२, ईमेल-principal@ gpmumbai.ac.in,
संकेतस्थळ- http://www.gpmumbai.ac.in
००००