(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

 

लहान तोंडी…

सध्याच्या वननगरितील सिंह महाराजांचे चिरंजीव म्हणजेच  युवराज फार भित्रे होते. त्यांना कशाचीही भीती वाटायची. एकदा ते न्याहरी करुन विश्रांती करत असताना, चार उंदिर त्यांच्या अवतीभवती गोळा झाले नि खेळू लागले. उंदरांच्या आरडओरडीमुळे युवराजांना जाग आली. समोर उंदिर बघून ते जोराने दचकले. ततपप करु लागले.

युवराज जागे झालेले बघून उंदिर घाबरुन पळून जाण्याच्या बेतात असताना,त्यांच्या लक्षात आलं की,युवराज आपल्यापेक्षा जास्त घाबरले आहेत. त्यामुळे उंदरांनी पळून जाण्याचा बेत रहित केला. त्या चारांपैकी एक अधिक धीट उंदिर युवराजांच्या समोर जाऊन उभा ठाकला आणि त्याने आपले तीक्ष्ण दात त्यांना दाखवले. ते बघून युवराज अर्धमेले झाले. त्यांनी डोळे मिटून घेतले… त्यांनी मनातल्या मनात वनदेवतेचा धावा सुरु केला.

ते बघून दुसरा उंदिर युवराजांच्या अंगावर चढला नि त्यांना गुदगुल्या करु लागला. युवराजांची भीती आणखीच वाढली. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. आपल्याला राक्षसांनी पकडले असून आता आपणास कुणीही वाचवू शकत नाही, याची त्यांना खात्री पटली.त्यांच्या घशाला कोरड पडली.त्यांना मदतीसाठी डरकाळी सुध्दा फोडता येईना.युवराजांनी घाबरुन अंग आक्रसून घेतले.ते बघून तिसऱ्या उंदरांने त्यांच्या तोंडावर उडी घेऊन त्यांची मिशी ओढली. युवराजांनी आणखी घट्ट डोळे मिटून घेतले.त्यांचे पाय लटलट कापू लागले.राक्षसांच्या तावडीतून आता आपण सुटू शकत नाही,असे वाटून त्यांना रडू कोसळले. ते धाय मोकलून रडू लागले. ते बघून चौथ्या उंदरास दया आली. तो इतर तिघांना म्हणाला..

हा काही खरा युवराज नाही. सिंहाचं कातडं पांघरलेला गाढवच दिसतो.

नाही नाही हा खराच सिंह युवराज आहे.

मग इतका हा घाबरट कसा..हा म्हणे आपला राजा होणार पुढे..

नाही..नाही.. मला मला राजा व्हायचे नाही..तुम्हीच व्हा..पण मला सोडा आता..युवराज डोळे न उघडताच म्हणाले.

तू नक्की  गाढव नाहीस ना..

नाही हो मी गाढव असतो तर आतापर्यंत लाथा नसत्या का झाडल्या.. युवराज कसेबसे म्हणाले. त्यांची थरथर वाढली होती. राक्षसांच्या तावडीतून कधी सुटका होते असे त्यांना झाले होते.

अरे, तू युवराज सिंह,तुझा देह एवढा अवाढव्य…मग तुला इतकं घाबरायला काय झालं? एका उंदरानं विचारलं.

राक्षसांना कोण घाबरत नाही..युवराज डोळे न उघडताच म्हणाले.

तू बघितलेस का राक्षसांना..दुसऱ्या उंदराने विचारले.

म्हणजे? मग तुम्ही कोण आहात..युवराज कसेबसे बोलले.

याचा अर्थ, हा मूर्ख युवराज आपणास राक्षस समजतो,असं हळूच एक उंदिर दुसऱ्याच्या कानात म्हणाला..याचा आपण चांगलाच फायदा घेतला पाहिजे.

तो कसा..याला पळवून नेऊ आणि महाराजांकडून खंडणी वसूल करु.. किंवा आपल्यापैकी एकाला युवराज म्हणून नेमणूक करण्याची मागणी करु..

मूर्ख आहेस का…

अरे, ही संधी सोडायची कशाला. या घाबरट युवराजाला पळवून नेल्यावर त्याच्या मोबदल्यात आपण वननगरीचे अर्धे राज्यच मागू की..

वा वा वा वा किती छान..उंदरांचे साम्राज्य..

अर्धे कां? पूर्ण वननगरीचे साम्राज्य मागूया ना..युवराजापेक्षा साम्राज्य मोठेच आहे महाराजांसाठी..चौथा तिसऱ्याच्या कानात म्हणाला..

बराच वेळ झाला तरी कुणाचाच आवाज येत नाही हे बघून युवराजांना वाटले, राक्षस निघून गेले की काय?त्यांना किंचित हायसे वाटले.पण अजुनही त्यांना डोळे उघडण्याची हिंम्मत होत नव्हती.

आपण आपसातच बोलत बसल्याचे उंदरांच्या लक्षात येताच ते पुन्हा युवराजांना घाबरवण्यासाठी म्हणाले..

तुला, आम्ही आता खाउुन टाकणार..

नको नको असं काही करु नका..महाराजांना सांगून तुम्हाला पाहिजे ते देतो, पण मला खाऊ नका..युवराज आता  फार घाबरले होते.त्यांच्या तोंडून आता शब्दही नीट फुटत नव्हते..

हा हा हा ….तुला खाल्ल्याशिवाय आम्हास चैन पडणार नाही..

नका हो असं काही करु नका..तुम्हाला काय पाहिजे ते महाराजांना सांगून देतो..पण मला सोडा…मला सोडा..युवराज रडत म्हणाले..

हा हा हा.चारही उंदिर चिरक्या आवाजात उद्गारले

हा हा हा..तिथे धारदार आवाज उमटला..

हा तर आबासाहेबांचा आवाज..त्या घाबरलेल्या स्थितीतही युवराजाने ओळखले. याचा अर्थ राक्षस पळून गेले की काय..म्हणून त्याने एक डोळा किंचित उघडला. समोरचे दृष्य बघून तो दंगच झाला..

..

त्याचे आबासाहेब म्हणजेच सिंह महाराज तिथे येऊन त्यांनी आपल्या पंजांनी त्या चारही उंदरांना घट्ट पकडले होते..

ते बघून युवराजांनी खाडकन आपले डोळे उघडले आणि ताडकन ते उभे राहिले.

आबासाहेब…आबासाहेब अहो सोडा त्यांना, ते राक्षस आहेत… मला ते खाणार होते..तुम्हाला खातील सोडा त्यांना..

अरे गधड्या,मूर्खा..इतका कसा घाबरतोस रे. आँ..अरे हे राक्षस नाहीत..उंदिर आहेत उंदिर…तुला घाबरवत होते ते..आणि तू घाबरत होतास..तुला  वनदेवतेने काही बुध्दी दिली की नाही. त्याचा वापर कर ना..एका पंजात या चार उंदरांचा सोक्षमोक्ष लागेल..कळत कसं नाही तुला..

नाही आबासाहेब..हे राक्षसच आहेत..यांना गुदगुल्या करता येतात.यांना मिशा ओढता येतात..ते काहीही करु शकतात..युवराज अजूनही थरथर कापत होते. त्यांचे भेदरलेपण कमी झाले नव्हते..

अरे गधड्या, हे राक्षस नाहीत..उंदिरच आहेत..माहराज गरजले..

त्यांचा राग अनावर होत होता..आता आपली काही खैर नाही हे उंदरांना लक्षात आले..ते गयावया करु लागले.क्षमा करावी क्षमा करावी असे म्हणू लागले.ते बघून युवराज थक्क झाले..आता कुठे त्यांच्या किंचित जिवात जीव आला..

महाराज अजिबात शांत झाले नव्हते.ते त्या उंदरांना रागावून म्हणाले,अरे तुमचा जीव किती आणि तुम्ही खेळ कोणता करता..युवराज तर मूर्ख आहेच मग तुम्ही शहाणे आहात ना..तुम्हाला कसं कळलं नाही..स्वत:च्या जीवापेक्षा बाता जास्त केल्या तर आपलाच जीव धोक्यात येउु शकतो..

महाराज क्षमा असावी..चुकलं आमचं..क्षमा असावी..

क्षमा बिमा काही नाही.लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला की काय शिक्षा होते, हे आता साऱ्यांनाच कळलं पाहिजे..असे म्हणून महाराजांनी त्या चारही उंदरांच्या शेपटाला पकडले आणि गरगर फिरवून त्यांना दूरवर भिरकावून दिले. तेव्हा कुठे त्यांच्या राग किंचित शांत झाला.मात्र समोर घाबरट आणि भित्रे युवराज दिसताच त्यांचा संताप अनावर आला..त्यांनी युवराजांचे कान उपटले.

गधड्या,असाच भीत राहिला तर तुझ्या हातून हे राज्य जाईलच पण तुला जगणेही कठीण होईल..या भित्रेपणाची तुला शिक्षा मिळालीच पाहिजे..

महाराज नको महाराज..युवराज धाय मोकलून रडू लागले..

आता रडतोस कशाला…अमावशेचा किर्र रात्री तू जंगलाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं..ही तुझी शिक्षा…

आबासाहेब मला अंधाराची खूप भीती वाटते..अमावशेला तर गडद अंधार असतो..

असतो ना..म्हणूनच तुला ही शिक्षा..महाराज शांत होत म्हणाले..

हे बघा युवराज,तुमची भीती तर गेलीच पाहिजे..त्यासाठी हाच जालीम उपाय..
ज्याची सगळयात जास्त भीती वाटते,त्याला भिडलं पाहिजे.सामोरे गेले पाहिजे..म्हणजे मग आपोआप भीती कमी होत जाते आणि मग नष्ट होते..

पण आबासाहेब…युवराज रडू लागले..

पण नाही नि बिन नाही..अमावशेच्या रात्री जंगलातून या टोकाकडून त्या टोकाकडे जायचं..

ही शिक्षा फर्मावून महाराज निघून गेले..

अमावशेच्या रात्री चुकून तुम्हाला जंगलात एखादा सिंह दिसला तर तो युवराज आहे समजायचा.. स्वत:चा भित्रेपणा दूर करण्यासाठी शिक्षा भोगणारा..

सुरेश वांदिले