तेजोमयीच्या घरी मानसी, वैष्णवी, प्रणाली, मनाली दुपारच्या वेळी जमल्या. आधी त्या गाण्याच्या भेंड्या खेळल्या. मग झालं बिगफूल. प्रणालीवर सगळ्यात जास्त पाईंट्स लागले. त्यामुळे ती बिगफूल झाल्याने, हिरमुसली. अलेक्सा गोर्जीने फ्रीजमध्ये ठेवलेल्या कुल्फ्या सगळ्यांसाठी आणल्या. वेगवेगळ्या चविंच्या त्या कुल्फ्यांवर सगळ्यांनी ताव मारला. प्रणालीची नाराजी पळाली.
“अशी कुल्फी आपल्याला नाही का बनवता येणार?” प्रणालीनं विचारलं.
“तुमच्या सारख्या स्मार्ट मुलींना काही अशक्य आहे का?” गोर्जी म्हणाली.
“गोर्जे, तुझ्या तोंडात साखर!” तेजोमयी म्हणाली.
“मी आता तुम्हाला दाखवणार किचाचं स्वयंपाकघर!”
“हा कोण किचा?”
“ढँव ढँव ढिचा!”
“आँ!”
“गोर्जे मॅडम, आता तुम्ही बका म्हणजे सांगूनच टाका.”
“सांगायचं कशाला? मी नेतेच की थेट त्याच्या स्वंयपाकघरात.” असं बोलून गोर्जीने स्मार्ट टिव्ही सुरु केला. त्यावरील युट्यूब चॅनेल निवडलं. त्यात तिने ‘किचाज किचन’ असं टाईप केलं. पडद्यावर किचा दिसू लागला. तो तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणीच्याच वयाचा असावा. शेफचा पोषाख घालून तो एक पदार्थ बनवता होता. समोर पाहुणे बसले होते. हा पदार्थ तयार झाल्यावर त्याने तो त्यांना दिला. तो खूपच चवदार झाल्याचं त्या पाहुण्यानं सांगून किचाचं कौतुक केलं. मग, वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे किचाचे जुने व्हीडिओ गोर्जीने दाखवले. ते बघून तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणी थक्कच झाल्या.
“याचं खरं नाव निहाल राज. केरळातील त्रिवेंद्रममध्ये राहतो. प्रेमाने सगळेजण त्याला किचा म्हणतात. लहानपणापासून तो स्वयंपाकघरात लुडबूड करायचा. ते बघून त्याच्या आईने त्याला हाटहूट केलं नाही. उलट प्रोत्साहनच दिलं. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी तो जगप्रसिध्द बाल शेफ झाला.” गोर्जीने सांगितलं. तिने यूट्यूब बंद केलं.
“आपणही अशी लुडबूड केली असती तर…” मनाली पुटपुटली.
“जग नाही पण सोसायटी प्रसिध्द नक्कीच झालो असतो.” तेजोमयी हसून म्हणाली.
“आतासुध्दा संधी आहेच की.” गोर्जीने पुस्ती जोडली.
“ती कशी?” वैष्णवीनं विचारलं.
“हा लुडबूड खेळ खेळून, तुम्ही सोसायटी प्रसिध्द शेफ होऊ शकता.”
“लूडबूड…बूडबूड…खूडबूड… समजलं. पुढे…”
“आता, उद्या-परवा आईला सुटी आहे. तेव्हा हा खेळ तिच्यासोबत खेळा.”
“म्हणजे काय करायचं?”
“तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते एकिकीने आईकडून शिकून घ्यायचे.”
“मला पाणीपुरी भारी आवडतं.” मनाली म्हणाली.
“मग पाणीपुरीचं पाणी कसं तयार करायचं, बटाट्याची चटणी कशी करायची, हे आईकडून शिकून घे. प्रणालीने आईकडून आंब्याचं पन्ह कसं करायचं, हे समजून घ्यायचं, तेजोमयीने भेळ कशी करायची हे समजून घ्यायचं. पहिल्या दिवशी पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करायाचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा करुन बघायचं आणि तिसऱ्या दिवशी सगळयाजणी तेजोमयीच्या म्हणजे आमच्या घरी जमून एकएक पदार्थ करायचा नि झक्कास पार्टी करायची.” गोर्जीने समजावलं.
सगळ्या मुलींना हा, ‘लुडबूड खेळ’ चांगला आवडला. दुसऱ्या दिवशी प्रत्येकीने या खेळाचा डाव आईसोबत मांडला. मुलींना पदार्थ बनण्याचा इच्छा झालीय, हे बघून आधी सगळ्या आयांना धक्का बसला. पण मुली मनापासून काहीतरी करु बघतात, हे लक्षात येताच, त्यांना आनंदाचे भरते आले. एकमेकींना व्हॉट्सॲपवरुन सांगून त्यांनी हा आनंद साजराही केला.
सुटिच्या दिवशी बाहेर कुठेतरी हॉटेल नि मॉलमध्ये जाण्याचा बेत रहित करुन सगळ्या आयांनी मुलींना त्यांच्या त्यांच्या आवडीचे सोपे पदार्थ तयार करायला शिकवलं. या शिकवण्याच्या आनंदात सुटिचे दिवस कसे मजेत गेले, हे त्यांनांही कळलं नाही.
स्वयंपाकघरातील ‘लुडबूड खेळ’ फार मजेशीर असल्याचं सर्व मुलींच्या लक्षात आलं. आता हळूहळू आपल्या आवडीचे सोपे पदार्थ आईकडून सुटिच्या दिवशी शिकून घ्यायचं, असं प्रत्येकीनं मनोमन निर्धार केला.
०००
दोन दिवसांची सुटी संपल्यावर सगळ्या आया आपआपल्या ऑफिसमध्ये गेल्या. तिसऱ्या दिवशी सगळ्या मुली तेजोमयीच्या घरी गोळा झाल्या. तेजोमयीने आईला मैत्रिणीसोबत स्वयंपाकघरात ‘लुडबूड खेळ’ खेळणार असल्याचं सांगितलं. आईने तिला परवानगी दिली.
दुपारी सगळ्या मुली तेजोमयीच्या घरी गोळा झाल्या. गोर्जीने त्यांना थेट किचनमध्ये नेलं. कुठे कोणत्या वस्तू ठेवल्यात हे तिला डोळ्यातील सेन्सॉरमधून समजू शकत होतं. तिने सगळ्या वस्तू तेजोमयीला दाखल्या. गॅस सुरु करायला मदत केली. प्रत्येकीने आपला आडवता पदार्थ तयार केला.
हे पदार्थ तयार करतानाची सेल्फी गोर्जीने काढली नि लगेच सोसायटीच्या व्हॉटॲपग्रुपवर टाकली. खाली ओळ होती, “लुडबूड खेळातील सुपरस्टार शेफ!”