(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

विमानांची देखभाल दुरुस्ती 

देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय विमान वाहतूक अतिशय झपाट्याने वाढत आहे. पुढील काही वर्षात देशातील विमानतळांची संख्या ४०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत ३३००० नव्या विमानांची भर पडेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे किमान ५ लाख परवानाधारक एअरक्रॉफ्ट इंजिनीअर किंवा एअरक्रॉफ्ट मेंटनन्स इंजिनीअर्सची गरज भासेल.

भारत सरकारने आता या क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीस परवानगी दिल्याने या क्षेत्राची आणखी झपाट्याने वाढ अपेक्षित आहे. प्रत्येक विमानाच्या देखभालीसाठी ३० च्या आसपास प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. विमानाची संपूर्ण देखभाल आणि विमानाच्या आतील प्रवाशांच्या सुरक्षेची अत्यंत महत्वाची जबाबदारी एअरक्रॉफ्ट मेटनन्स इंजिनीअरला पार पाडावी लागते.

    इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आणि डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या नियमावलीनुसार एखादे विमान सुरक्षितरीत्या उड्डाण करु शकण्याच्या क्षमतेचे आहे किंवा नाही याचे प्रमाणीकरण या अभियंत्यास करावे लागते. कोणत्याही उड्डाणाच्या आधी विमानांना या अभियंत्याकडून, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र देण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी या अभियंत्याकडे एएमई ( एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग) वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेमार्फत विमानांच्या सुरक्षिततेविषयी सर्व बाबींचे नियंत्रण करण्यात येते. या संस्थेमार्फतच हे प्रमाणपत्र दिले जाते.

   एअर क्राफ्ट मेंटनन्स अभियंता कसे व्हाल ?

   एअरक्रॉफ्ट मेंटनन्स अभियंते (एएमई) होण्यासाठी विद्यार्थ्यांना या विषयाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम अधिकृत आणि शासनमान्य संस्थेकडून करणे गरजेचे आहे.

   एएमई अभ्यासक्रमांतर्गत विमानाची बाह्य आणि अंतर्गत रचना, इंजिन, विविध हवाई उड्डाण प्रकिया यांचे संपूर्ण सैध्दांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान प्रदान केले जाते. यामध्ये विमानाची नियमावली, हवाई वाहतूक गरजा, मनुष्यबळ कामगिरी, विमानांची बांधणी, कार्यान्वयन यांचा समावेश आहे. विमान देखभाल आणि तपासणीच्या अचुक पध्दती, विमानातील विद्दूत यंत्रणा, रेडिओ नेव्हिगेशन, इंधन, वंगन, विमान साहित्य यांचेही ज्ञान प्रदान केले जाते. हवाईउड्डाणाच्या अनुषंगाने विमान आणि त्यातील विविध उपकरणांच्या सक्षमतेविषयी सुयोग्य निर्णय घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

काही संस्था  

() इंस्टिट्यूट ऑफ एअरक्रॉफ्ट मेटंनन्स इंजिनीअरिंग- औरंगाबाद येथे असलेल्या या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली. या संस्थेचा डिप्लोमा इन एअर क्रॉफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत शिकवला जातो. त्यासाठी या संस्थेने औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनसोबत सामंजस्य करार केला आहे. या संस्थेला भारत सरकारच्या डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने मान्यता प्रदान केली आहे.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. हा अभ्यासक्रमांतर्गत दोन शाखांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. () जेट इंजिन असणा-या विमानांची देखभाल. () विमानांची विद्यूत प्रणाली (इलेक्ट्रिकल सिस्टिम), रेडिओ नेव्हिगेशन (दळवळण), आणि उपकरणे (इंस्ट्रूमेंट) कार्यप्रणाली यांची देखभाल.

   निवड प्रक्रिया – या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी एएमएई कॉमन एन्ट्रंस टेस्ट (एएमई सीईटी) ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्रे – पुणे/ मुंबई/ औरंगाबाद. () १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची पध्दती – कालावधी दीड तास. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान – १५ प्रश्न/एकूण गुण- ६०, इंग्रजी १५ प्रश्न/एकूण गुण- ६०, गणित २० प्रश्न/एकूण गुण- ८०, भौतिकशास्त्र २० प्रश्न/एकूण गुण- ८०, रसायनशास्त्र २० प्रश्न/एकूण गुण-८०, असे एकूण ३६० गुणांचे ९० प्रश्न विचारले जातील. () तीन वर्षे कालावधीची  अभियांत्रिकी पदविका किवा बीटेक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची पध्दती – कालावधी दीड तास. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान – १५ प्रश्न/एकूण गुण- ६०, इंग्रजी १५ प्रश्न/एकूण गुण-६०, कलचाचणी/ ॲप्टिट्यूड टेस्ट ६० प्रश्न/एकूण गुण- २४०, असे एकूण ३६० गुणांचे ९० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेसाठी amecet.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. संपर्क- एएमएई सीईटी कॉर्पोरेट ऑफिस, २/१३ सेकंड फ्लोअर, ओल्ड पालम रोड, सुलाहकूल विहार, व्दारका सेक्टर- १३, नवी दिल्ली -११००७८, भ्रमणध्वनी- ८८००६६३००६, दूरध्वनी- ०११-४०१०९४४३, ईमेल- info@amecet.in)

सीईटीच्या गुणांवर आधारित ५० टक्के जागा भरल्या जातात. ५० टक्के जागा व्यवस्थापकीय कोट्यातून भरल्या जातात. अर्हता – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह १२ वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील ३ वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम. वयोमर्यादा १६ ते २८ वर्षे. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएस डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी करुन घेणे अत्यावश्यक आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधी नसाव्यात. रातआंधळपेणा नसावा. संस्थेकडे राहण्याची आणि भोजण्याची व्यवस्था आहे.

प्लेसममेंट

   हे प्रशिक्षण आणि एएमई प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना एअर एंडिया,गो एअर, स्पाइस जेट, इंडिगो, अलायन्स एअर, एतिहॅद एअरवेज,एअर फ्रांस, एमिरेट्स, कतार एअरवेज, सिंगापूर एअरलाईन्स अशासारख्या विमानसेवा, डेक्कन चार्टर लिमिटेड, ब्ल्यू डार्ट, एअर वन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, एअर चार्टर सर्व्हिस, पवन हंस हेलिकॉप्टर लिमिटेड, एअरवर्क्स, इंडामेर, तनेजा एरोस्पेस ॲण्ड एव्हिएशन, मॅक्स एरोस्पेस, टिस्को, कोल इंडिया, सेल, आणि देशातील ३० च्या आसपास असणाऱ्या फ्लाईंग क्लबमध्ये करिअर संधी मिळाली आहे.

   संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ एअरक्रॉफ्ट मेटंनन्स इंजिनीअरिंग,शासकीय तंत्रनिकेतन, पीर बाजार, उस्मानपुरा, औरंगाबाद – ४३१००५ 431005, दूरध्वनी – ०२४० २९७०४८४, ईमेल- iame_abad@yahoo.com, संकेतस्थळ–www.iameaurangabad.com

०००

०००

विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन ॲण्ड टेक्नॉलॉजी

संस्थेचे अभ्यासक्रम- (१) एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग – मेकॅनिकल. या अभ्यासक्रमास डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशने मान्यता प्रदान केली आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. अर्हता- 12 वी विज्ञान शाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक. किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविका. किंवा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी.

या अभ्यासक्रमात विमानाच्या पुढील देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते – एअरक्रॉफ्ट इंजिन, फ्युअल सिस्टिम, ऑईल सिस्टिम, इंजिन स्टार्टिंग आणि इग्निशन सिस्टिम, फायर प्रोटेक्शन सिस्टिम, एअर कंडिशनिंग सिस्टिम, प्रेशरायझेशन सिस्टिम, लँडिंग गिअर सिस्टिम, इत्यादी.

(२) बी.एस्सी इन एरोनॉटिक्स- या अभ्यासक्रमांतर्गत मेकॅनिकल आणि एव्हिऑनिक्स शाखेतील ज्ञान प्रदान केले जाते. त्या अंतर्गत विमान, हेलिकॉप्टर्स आणि ग्लायडर्स यांचे डिझाइन, बांधणी, कार्यान्वयन, संशोधन आणि परीक्षण अशा सारख्या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

या अभ्यासक्रमास मुंबई विद्यापीठाने मान्यता प्रदान केली आहे. कालावधी- तीन वर्षे. अर्हता –  12 वी विज्ञान शाखेची परीक्षा इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन या विषयातील ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदविका. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना 40टक्के गुण मिळायला हवेत. किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली अभियांत्रिकी पदविका.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना ट्रॅफिक कंट्रोल, क्य्रु आणि मॅनपॉवर शेड्युलिंग, इन-फ्लाईट सर्व्हिस डिपार्टमेंट, सेक्युरिटी, सिव्हिल वर्क्स डिपार्टमेंट, लाइन ॲण्ड मेजर मेंटनंन्स डिपार्टमेंट, ग्राऊंड सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये रोजगार संधी मिळू शकते.

(३) एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग-एव्हिऑनिक्स – या अभ्यासक्रमांतर्गत एअरक्रॉफ्ट इंस्ट्रुमेंट्स सिस्टिम, ऑटोमॅटिक पायलट सिस्टिम्स, रेडियो कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रडार सिस्टिम, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन आणि डिस्ट्रिब्युशन इत्यादी विषयघटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- 12 वी विज्ञान शाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली अभियांत्रिकी पदविका किंवा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी.(अपूर्ण)