शाळा म्हणजे प्राणवायू
आज होणार, उद्या होणार असे म्हणता म्हणता अखेर शाळा सुरु झाली. या दिवसाची वाट तेजोमयी किती तरी दिवसांपासून बघत होती. खूप महिन्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद तेजोमयीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. या आनंदात तिने दफ्तर स्वच्छ केलं. शाळेत न्यायचं सर्व साहित्य दफ्तरात व्यवस्थित ठेवलं. गणवेषाला आईकडून इस्त्री करुन घेतलं. गेले कित्येक महिने शू-रॅकमध्ये आराम करत राहिलेल्या बुटांना काढून स्वच्छ केलं. त्यांना पॉलिश केलं.
तेजोमयीची ही लगबग बाबा कौतुकाने बघत होते. दफ्तर-पुस्तकं-शाळेची बुटं, या बाबी अलेक्झांडरच्या परिचयाच्या असल्याने, तेजोमयी शाळेत जाणार हे त्याला कळलं. तेजोयमीची शाळा घरापासून दूर नव्हती .त्यामुळे कधी बाबा तर कधी आई तिला शाळेत पोहचवून देत. त्यांच्यासोबत अलेक्झांडरचं जाणं असायचं. तेजोमयी सोबत आता पुन्हा आपल्याला शाळेत जायला मिळणार, हे अलेक्झांडरच्या लक्षात आल्यानं, त्याच्या उत्साहाला भरती आली. शाळेच्या तयारीसाठी तेजोमयी या खोलितून त्या खोलित जात असताना, त्याचं सुध्दा इकडून तिकडे जाणं आणि ती काय काय करतेय हे उत्सुकतेनं बघणं सुरु होतं.
असे सर्वजण आनंदी असताना,आई मात्र फारशी खुष नव्हती. शाळा सुरु झाली असली तरी शाळेत याचचं की नाही, हा पर्याय शाळेनं दिला होता. त्यामुळे तेजोमयीनं शाळेत न जात घरुनच ऑनलाइन अभ्यास करावा,असं तिला वाटत होतं.
काय हो, तेजूने शाळेत जायलाच हवं का..तिने बाबांना विचारलं.
अगं,हे काय विचारणं झालं..बाबा म्हणाले.
भीती वाटते हो..आई म्हणाली.
कसली भीती आई..तेजोयमीनं विचारलं.
शाळेत गर्दी होणार. मुलं एकमेकांच्या जवळ येणार. त्यातून कोरोना विषाणू तिकडून इकडे आला तर..आई काळजीच्या सुरात बोलली..
आई, आम्ही काळजी घेऊ की..मुखपट्टी बांधून राहू. हात स्वच्छ करत राहू..एकमेकांपासून दूर राहू..
अगदी बरोबर, शाळेतील शिक्षक सुध्दा काळजी घेणारच ना..तसं त्यांना सांगण्यात आलय..त्यामुळे तू अजिबात चिंता करु नकोस..
तेजूला आता ऑनलाईन अभ्यासाची चांगली सवय झालीय, घरुनच अभ्यास केला तर काय हरकत आहे. तिने यंदातरी शाळेत जाऊच नये,असं मला वाटतं.आपण अधिक काळजी घेतलेली बरी..आई म्हणाली..
आईच्या या बोलण्यामुळे बाबा शाळेत जाण्यासाठी नकार देतील की काय, असं तेजोमयीला वाटलं. ती हिरमुसली.काहीतरी बिनसलय हे लक्षात आल्यानं, अलेक्झांडरनेही चेहरा पाडला.
बाबांच्या ते लक्षात आलं. त्यांनी तेजोमयीला जवळ घेतलं..
बाळ,आता शाळेत जायचच..
म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही तर..आई रागानं म्हणाली..
अगं मुलांसाठी शाळा म्हणजे प्राणवायू सारखं असतं. मित्र-मैत्रिणी त्यांच्यासाठी आनंदाचं झाडं असतात. त्यातून त्यांना उर्जा मिळते. उत्साह मिळतो. इतके महिने ते यापासून मुकले होते…आता पुन्हा तो आनंद घेऊ द्यायला नको का आपण..ज्यांना ज्यायचं नसेल ते नाही जातील,पण आपण मात्र तेजोमयीला पाठवू या..
तिला काही झालं तर..आई म्हणाली.
काही म्हणजे काय..बाबांनी विचारलं..
तिला म्हणायचंय कोरोना झाला तर..तेजोमयी पुटपुटली..
अगं, कोरोनालाच आता कंटाळा आलाय बघ..काढता पाय घेतलाय त्याने.. मुखपट्टी,सॅनिटायझर वापरणाऱ्या तेजोयमी सारख्या शहाण्या मुलांच्या वाटेला तर तो अजिबातच जाणार नाही..बाबांनी आईला समाजावलं. आईला ते पटलं असावं. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. आता आलबेल झाल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलं, प्रेमाने त्याने आईशी लाडीगोडी सुरु केली.
सुरेश वांदिले