(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस- बेंगळुरु, या संस्थेतील, १२ वी नंतरचा चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम, हा संशोधन क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. त्यामुळेच या अभ्यासक्रमाचं नाव, “बॅचलर ऑफ सायन्स (रिसर्च)”सं ठेवण्यात आलय.

पदवीस्तरीय अभ्यासक्रमाची संरचना वेगळया पध्दतीने करण्यात आली आहे. पहिली दीड वर्षे सर्व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स, अर्थ ॲण्ड एन्व्हरॉन्मेटल सायन्स या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आंतरशाखीय विषयांचा पाया मजबूत होतो. या दीड वर्षाच्या कालावधित विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची संधी दिली जाते. दीड वर्षानंतर विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स आणि अर्थ ॲण्ड एन्व्हरॉन्मेटल सायन्स या विषयांमधून स्वत:च्या आवडीचा आणि गती असलेला विषय स्पेशलायझेशनसाठी निवडू शकतो. हे विषय निवडल्यानंतरही संबंधित विद्यार्थी त्याच्या आवडीच्या इतरही विषयातील ३० टक्के अभ्यासक्रम करु शकतो. त्यामुळे त्याचे आंतरशाखीय ज्ञान आणखी बळकट होण्यास साहाय्य होते. या अभ्यासक्रमातील संपूर्ण एक वर्षं  हे संशोधनात्मक प्रकल्पासाठी राखीव ठेवलं जातं. अशा प्रकारचा हा देशातील एकमेव अभ्यासक्रम आहे.

चार वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याची इच्छा असल्यास आणखी एक वर्ष अभ्यासक्रम करण्याची त्यास संधी मिळू शकते. त्यानंतर त्याला, मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली जाते.

निवड प्रकिया

१२ वी विज्ञान शाखेत किमान, ६० टक्के गुण मिळवणारे खुलया संवर्गातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतात. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य धरली जाते. २०२साली उत्तीर्ण झालेले आणि यंदा १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. १२ वीमध्ये विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्राचा  अभ्यास करणं आवश्यक आहे. एकूण मंजूर जागांपेक्षा  १० टक्के जागा महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात.

ही पहिल्या टप्प्याची अर्हता झाली. प्रत्यक्ष प्रवेशासाठी पुढील परीक्षांमधील सुयोग्य गुण ग्राह्य धरले जातात- (१)  आयआयटीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई (मेन /ॲडव्हान्स्ड) -२०२५, (२) नीट २०२५ आणि (३) आयसर ॲडमिशन टेस्ट २०२५  

वेगवेगळ्या चाळणी परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात , त्यांची गुणवत्ता यादी संबंधित परीक्षेतील गुणांवर आधारित केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याने सर्व परीक्षा दिल्या असतील तर त्याचा समावेश सर्व परीक्षांच्या यादित केला जातो. त्याचा गुणानुक्रम आणि उपलब्ध जागा यानुसार प्रवेश निश्चित केला जातो. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्ररीत्या अशाच पध्दतीने तयार केली जाते. आयसर ॲडमिशन टेस्टच्याव्दारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने दोन्ही संस्थांचे अर्ज स्वतंत्रपणे भरणं आवश्यक आहे.

संपर्क- पदवी अभ्यासक्रम- द असिस्टंट रजिस्ट्रार, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु-५६००१२, दूरध्वनी-०८०-२२९३३३७९, ई-मेल-admission.ug@ iisc.ac.in, संकेतस्थळ- iisc.ac.in

०००

बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग

    या संस्थेने, बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. याचा कालावधी चार वर्षाचा असून आणखी एक वर्षाचे शिक्षण घेतल्यास एम.टेक ही पदवी प्रदान केली जाते. संशोधन, विकास, भविष्यवेधी नवसंकल्पना, पुढील काळातील तंत्रज्ञान यांच्यासाठी सखोलज्ञान प्राप्त गणितीय, संगणकीय आणि विदा विज्ञानीय क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्याचा, मुख्य उद्देश ठेऊन या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला जेइइ- (जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन) – ॲडव्हान्स्ड, या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जाईल.

संपर्क- btech-ug.iisc.in/MathandComputing

सुरेश वांदिले