(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतीय वायुदलाने गेल्या अनेक दशकतात, विविध युध्द आणि इतर आणिबाणिच्या प्रसंगात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट वायुदलांमध्ये भारतीय वायुदलाचा समावेश होतो. या दलात, करिअर करण्याची संधी मिळणं, ही एक मोठीच कामगिरी ठरते. वायुदलामध्ये विविध प्रकारच्या कार्यासाठी दरवर्षी नियमितपणे भरती केली जाते. महत्वाकांक्षी आणि पराक्रम गाजवू इच्छिणाऱ्या तरुण -तरुणींनी या करिअर पर्यायाचा अवश्य विचार करायला हवा.

एफसीएटी (एफकॅट) एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट- ही परीक्षा भारतीय वायुदलामार्फत दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट अशी दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड टेस्टिंग हा दुसरा टप्पा पार पाडावा लागतो. याअंतर्गत दोन टप्पे आहेत.

पहिला टप्पा- ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट. दुसरा टप्पा- पिक्चर पर्सेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी संधी दिली जाते. पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्वरित घरी पाठवले जाते. टप्पा दोनची परीक्षा/चाळणी चार ते पाच दिवस चालते. यामध्ये पुढील बाबिंचा समावेश असतो. (१) लेखी मानसशास्त्रीय (सॉयकॉलॉजिकल टेस्ट) चाचणी- ही परीक्षा मानसोपचार तज्ज्ञामार्फत घेतली जाते. (२) समूह (ग्रुप टेस्ट) चाचणी- यामध्ये बाह्य (आऊटडोर) बौध्दिक आणि शारीरिक कृतींचा समावेश असतो. (३) मुलाखत (इंटरव्ह्यू)- मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत व्यक्तिगत संवाद साधला जातो. (४) फ्लाईंग ब्रँचसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संगणकीय वैमानिक निवड प्रक्रिया चाळणी (कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टिम टेस्ट) द्यावी लागते.)

तिसरा टप्पा– (वैद्यकीय चाळणी/मेडिकल एक्झामिनेशन)- दुसऱ्या टप्प्यात, निवड मंडळाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाळणीस सामोरे जावे लागते.

चौथा टप्पा (अखिल भारतीय गुणवत्ता यादी)-वैद्यकीय चाळणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची विविध शाखांमध्ये उपलब्ध जागांनुसार अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते.

अशी असते परीक्षा

ही परीक्षा वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाची असते. ही परीक्षा ऑनलाइनच द्यावी लागते. कालावधी दोन तास. या परीक्षेत १०० प्रश्नांचा समावेश असतो. प्रत्येक अचुक उत्तरासाठी तीन गुण दिले जातात. उत्तर चुकल्यास एक गुणाची कपात केली जाते. जे प्रश्न सोडवण्यात येत नाहीत, त्याला गुण दिले जात नाहीत.

या परीक्षेत (१) संख्यात्मक कौशल्य क्षमता (न्युमरिकल ॲबिलिटी), (२) इंग्रजी शब्द क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी इन इंग्लिश), (३) सर्वसाधारण माहिती/जाणिव (जनरल अवेअरनेस), (४) कार्यकारणभाव (रिझरिनंग), (५) लष्कर कल चाचणी (मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट), या विषयघटकांवर प्रश्न विचारले जातात. न्युमरिकल ॲबिलिटी या घटकाचे प्रश्न, दहावीच्या स्तरावरील असतात. इतर विषयघटकांचे प्रश्न, पदवीस्तरीय असतात.

https://careerindianairforce.cdac.in/ आणि https://afcat.cdac.in/AFCAT/ या संकेतस्थळावर सरावासाठी प्रश्न उपलब्ध करुन दिली जाते.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर

०००

एनसीसी स्पेशल एन्ट्री योजना (फ्लाईंग ब्रँच)या परीक्षेतील(AFCAT) गुणांच्या आधारावर, एनसीसी सिनियर डिव्हजन विंग मधील, ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना हवाई दलात प्रवेशाची संधी दिली जाते. अर्हता- ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि १२ वीमध्ये भौतिक शास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक. उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे असावे. चाळणी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा,आणि शारीरिक मानसिक क्षमता परीक्षा यशस्वी केलेल्या उमेदवार,नियुक्तीसाठी पात्र ठरतात.

संपर्क- एफसीएटी सेल, दूरध्वनी-०२०-२५५०३१०५, ईमेल- afcatcell@cdac.in

सुरेश वांदिले