नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च(नायसर),भूवनेश्वर आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस,मुंबई या दोन संस्थांतील इंटिग्रेटेड एमएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरवर्षी ६० हजार रुपयांची, “दिशा” (डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी-इन्सेंटिव्ह स्किम फॉर होलिस्टिक सायन्स एज्युकेशन ॲण्ड ऑगमेंटेशन) शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय दरवर्षी उन्हाळी संशोधन प्रकल्पासाठी २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
प्रवेश मिळालेल्या पहिल्यावर्षीच ही शिष्यवृत्ती लागू होते. मात्र पुढील वर्षांमध्ये, परीक्षेतील निर्धारित गुणांकांचा दर्जा राखला नाही तर, त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेपासून बाद केले जाते. मात्र, हा विद्यार्थी पुढील वर्षी निर्धारित गुणांकाच्या परिघात आल्यास, त्याला पुन्हा शिष्यवृत्ती लागू केली जाते. या परीक्षेव्दारे नायसर येथे २०० विद्यार्थ्यांना आणि सीइबीएस येथे ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात.
अभ्यासाची दिशा-
नॅशनल एन्ट्रन्स फॉर स्क्रिनिंग टेस्ट (नेस्ट) परीक्षेतील ज्या विषयघटकांचा समावेश या अभ्यासक्रमात नसेल, त्याचा अभ्यास मात्र एनसीइआरटी/सीबीएसइच्या पुस्तकांतून करावा. विषयघटकांची यादी नेस्ट परीक्षेच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. ती एकदा नजरेखालून घालणे योग्य ठरेल. www.nestexam.in या संकेतस्थळावर नेस्ट परीक्षेच्या प्रत्येक विषयाचे घटक बघता येतात. हा अभ्यासक्रम उच्च श्रेणिचा असल्याने त्याच्या प्रवेशासाठी चुरस असते. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाच्या मूलभूत ज्ञानाच्या आकलनाची पातळी जोखणारी ही परीक्षा आहे. त्यामुळेच एनसीइआरटी/सीबीएसइ किंवा राज्यशासनाच्या १२ वी बोर्डाचा विज्ञान विषयांचा समजून-उमजून अभ्यास करणे आवश्यक ठरते. विज्ञान विषयातील सर्व घटकांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. परीक्षेचा कालावधी- साडेतीन तास. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर
अर्हता आणि पात्रता
२०२४ आणि २०२५ आणि २०२६ साली १२ वी विज्ञानशाखेतील परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी, नेस्ट परीक्षा देऊ शकतात. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट.
संपर्क- (१) चिफ कुआर्डिनेटर, नेस्ट २०२१, एनआयएसईआर, भुवनेश्वर, पोस्ट ऑफिस, जतनी खुर्दा- ७५२०५०, ओडिशा, ईमेल- nest-exam@niser.ac.in, (२) सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स इमारतीच्या विरुध्द बाजूला, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३२१३२, ईमेल-info@cbs.ac.in, संकेतस्थळ- cbs.ac.in
००००
इंडियन असोशिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायंस
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी, इंडियन असोशिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायंस, ही स्वायत्त संस्था, संशोधन कार्यास प्राधान्य देणारा, इंटिग्रेटेड बॅचलर्स-मास्टर्स प्रोग्रॅम इन सायंस (बीएस-एमएस), हा अभ्यासक्रम चालवत असते. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून तो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणकशास्त्र या विषयांमध्ये करता येतो.
पहिल्या तीन सत्रांमध्ये, या विषयांच्या मुलभूत बाबी शिकवल्या जातात. चौथ्या सत्रापासून विद्यार्थ्यांना या विषयांपैकी एक मुख्य विषय अध्ययनासाठी निवडता येतो. सातव्या सत्रापासून थेट संशोधन कार्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८ जून २०२५ रोजी, युजी प्री इंटव्ह्यू स्क्रीनिंग टेस्ट (युपीएसटी) घेतली जाईल. या परीक्षेतील गुणांवर आधारित मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. त्यानंतर या अभ्यासक्रमासाठी ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
अर्हता – या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी बाहेर पडता येते. त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी प्रदान केली जाते.
संपर्क – २ ए आणि २ बी, राजा एस.सी मल्लिक रोड, कोलकाता— ७०००३२, ईमेल-helpdesk@iacs.res.in, संकेतस्थळ- www.iacs.res.in, दूरध्वनी-०३३-२४७३४९७१
सुरेश वांदिले