(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

परवा रॉबिन्सन उंदीरमामा, मार्गारेट मनी मावशीला भेटला तेव्हा त्याचं तोंड कडू कारल्यासारखं झालं होतं. ते बघून मावशीनं त्याला विचारलं,

काय रे माम्या,असा आंबट चेहरा कां झालाय तुझा?

आबंट कुठे गं मावशे, खारट म्हण.

बरं, खारट तर खारट, कां झाला बॉ!

काय सांगू मावशे, उंदीरमामा मावशीसमोर पोक काढून बसला नि सांगू लागला.

परवा तू तिकडे माहीमच्या बाजारात तुझ्या मावस बहिणीस भेटायला गेलीस, तेव्हा मला एकट्याला जाम कंटाळा आला.

म्हणून तुझा चेहरा खारट झाला!

नाही गं मावशे, तू नव्हतीस म्हणून मग मीही पाय मोकळे करण्यासाठी शाहरुख खान सरांच्या “मन्नत“कडे बँडस्टँडवर गेलो.

मग भेटले का शाहरुख खान सर तुला?

मला चालून आणि धावून खूप तहान लागली. वाटलं की “मन्नत“चे दार उघडले जातील नि शाहरुख सरांची भेट होईल. प्यायला पाणीही मिळेल.

मग काय झालं?

बहुतेक शाखरुख सर झोपले असावेत, त्यामुळे त्यांनी “मन्नत“चं दार काही उघडलं नाही. इकडे माझा जीव तहानेने व्याकूळ होऊ लागला.

मग?

मग काय? शाहरुख सरांच्या घरासमोरच समुद्र दिसला मला. गेलो तिकडे पळत पळत आणि लावली जिभ पाण्याला…अ आ आ ई ग !

काय रे, खेकडा चावला की काय तुझ्या जिभेला.

नाही मावशे. पण ते समुद्राचं पाणी जाम खारट निघालं. बापरे बाप !  तेव्हापासून माझं तोंड असं खारट दिसायला लागलं. मावशे, तू इतकी हुषार. सगळया जगाचं ज्ञान तुला असतं. मग हे समुद्राचं पाणी खारट कां? हे सुध्दा तुला ठाऊक असणारच ना.

माम्या, मला ठाऊक नाही अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही.

मग मला सांग की…

माम्या, आपण जे पाणी पितो त्याची चव कशी असते?

 ते नक्कीच खारट नसतं. म्हणूनच तर आपण पिऊ शकतो ना. तहानलेले असतो तेव्हा तर ते अमृतासारखंच वाटतं.

कारण हे पाणी पावसाचं असतं, नद्यांमधलं असतं किंवा बर्फ वितळून तयार झालेलं असतं. यामध्ये क्षाराचं प्रमाण अल्प असतं. त्याची चव आपल्या जिभेला लागत नाही. म्हणून ते आपण पिऊ शकतो.

पण मावशे, मी परवा परवाच कुठे तरी ऐकलं होतं, की हे पावसाचं, नदीचं आणि बर्फाचं पाणी समुद्रात जाऊन मिळतं. असं असुनही समुद्राचं पाणी खारट कां बाँ?

त्याचं एक गणित आहे, माम्या.

अरे बापरे, जिकडे तिकडे या गणितानं धुमाकूळ माजवलाय नुसता. गणिताशिवाय काही कळूच शकत नाही का गं मावशे?

माम्या, गणितामुळे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे कळतात. जर-तरची भानगड राहत नाही.

ओके, तर मग या खारटाचं गणित काय असतं?

समुद्राच्या पाण्यात विरघळेल्या क्षारांचं प्रमाण ग्रॅम प्रति लिटर म्हणजे पार्ट पर थाऊजंड (पीपीटी), या एककात मोजलं जातं. त्यानुसार समुद्राच्या पाण्यात एकूण क्षार ३५ ग्रॅम पति लिटर असतात.

वा व.

म्हणजे तुझ्या डोक्यात शिरतेय वाटतं हे सगळं.

नाही शिरलं तरी ऐकायला भारी वाटतं.

छान, मग ऐकून लक्षात ठेव. समुद्राच्या पाण्यात सोडियम क्लोराइड, कॅल्शियम, पोटॅशिअम यांची सल्फेट संयुगं आणि कॅल्शियम कार्बोनेटचे क्षार विरघळलेले असतात.

त्यामुळेच समुदाचं पाणी खारट होतं असलं पाहिजे. सपाट चेहऱ्याने मामा म्हणाला.

याचा अर्थ तुझ्या डोक्यात झिरपतेय म्हणायच या खारटाचं गणित.

हॅ हॅ हॅ..मामा ओशाळवाणा हसला.

छान, बरं वाटलं ऐकून. तर माम्या कमी अशांक्षाच्या ठिकाणी असणाऱ्या समुद्राच्या पाण्यात अधिक क्षार असतात. जास्त अक्षांशांच्या पट्ट्यातील समुद्रात कमी क्षार असतात. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे हे असं घडतं.

म्हणजे गोष्टीतला तिसरा कोन समजायचा का या सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेला.

तसच काही समज. आपल्या देशाच्या पश्चिम किना-याला असणाऱ्या समुद्राची क्षारता ३६ ते २७ पीपीटी तर बंगालच्या उपसगारच्या क्षारतेचं प्रमाण या पेक्षा कमी असतं. समुद्राच्या पाण्यात इतर नदी, नाले, ओढे यांचं पाणी सतत येऊन मिसळत असतं. हे मिसळणारं पाणी त्यांच्यात असणारे क्षार समुद्राच्या पाण्यात ओततात.

पण हे क्षार या पाण्यांमध्ये येतात तरी कुठून?

पावसाचं पाणी हवेतलं कॉर्बन डायऑक्साईड शोषून घेतं. त्यामुळे ते ॲसिडिक म्हणजे आम्ल युक्त किंवा आंबट बनतं. हे ॲसिडयुक्त पाणी दगडांवर पडल्याने या दगडांचं विघटन होतं. दगडातील क्षार पदार्थ पाण्यात मिसळतात. ते पाणी नदी-नाल्यात जातं. असं ४ लक्ष बिलियन टन पाणी दरवर्षी पुढे समुद्राला मिळतं. लाखो वर्षापासून ही क्रिया घडत आहे. समुद्राच्या पाण्याचेही बाष्पिभवन होत राहते. त्यामुळे क्षारता आणखी वाढते.

हे क्षार, ते क्षार,  इकडचे क्षार, तिकडचे क्षार…या क्षार पुराणाचा इतका परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतं हे ठाऊकच नव्हतं राव.

हे पुराण काही अजून संपलेलं नाही.

मग?

माम्या, समुद्राच्या तळाशी प्रचंड खडक आहेत. त्यातून बरेच गरम पाणी झिरपत(हायड्रोथर्मल व्हेंटस) असतं. समुद्राच्या तळाशी बरेचदा ज्वालामुखी फुटतात. त्यातूनही काही क्षार बाहेर पडतात आणि पाण्यात मिसळतात.

याचा अर्थ समुद्राच्या पाण्याला क्षारांचा माराच सहन करावा लागतो म्हणायचा. वरुन खालून चोहिबाजूंनी.

हो ना. समुद्रातील सगळं मीठ किंवा क्षार पदार्थ बाहेर काढले तर ५०० फूट जाडीची ४० मजली इमारतच तयार होईल.

काय सांगतेस? मामांनी आश्चर्याने आ फाकला.

पण माम्या, असं असलं तरी समुद्राच्या पाण्याचं खारटपण एका मर्यादेपलिकडे वाढत नाही.

ते कसं काय घडतं गं मावशे?

समुद्राच्या तळाशी काही खनिजांची निर्मिती होते. त्यासाठी या क्षारांचा उपयोग होतो.

वंडरफूल!

शिवाय समुद्राच्या वेगवेगळया थरात राहणाऱ्या जलचरांनासुध्दा त्याचं जीवन छान जगण्यासाठी क्षारांची गरज भासते. त्यामुळे ते हे क्षार पितात म्हण किंवा खातात म्हण.

याचाच अर्थ दाने दाने पे जसे खाने वालका नाम लिहिलं असतं तसंच या क्षार क्षार पे भी खाने-पिने वाले का नाम लिहिलं असतं असच ना मावशे.

करेक्ट…मावशी म्हणाली

पण मावशे, ते जरी खरं असलं तरी आपल्याला बुवा नाही जमायचं ते. आपल्या महापालिकेच्या नळाच्या पाण्याची सर दुसऱ्या कशाला नाही बघ.

मावशीने हसून मान डोलावली आणि दोघांनीही एकाच वेळी नळाच्या पाण्याला तोंड लावलं.

सुरेश  वांदिले