(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नौदलात “१०+२(बीटेक) डायरेक्ट एन्ट्री” या योजनेंतर्गत मुलींना प्रवेश देण्यात प्रारंभ झाला आहे. आतापावेतो या योजनेमध्ये केवळ मुलांनाच असा थेट प्रवेश दिला जात असे.

मुलींसाठी नौदलात प्रवेशासाठी ही सुवर्णसंधी असून त्याचा लाभ त्यांनी घ्यायला हवा. या थेट प्रवेशाव्दारे विद्यार्थींनींना नौदलाच्या गरजेनुसार, ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरींग, मेकॅनिकल इंजिनीअरींग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरींग (बी.टेक) अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. बी.टेक पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामार्फत दिली जाते. सध्याच्या नियमानुसार (१)ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरींग पदवी घेतलेल्यांना कार्यकारी पदासाठी, (२)मेकॅनिकल इंजिनीअरींग पदवी प्राप्त उमेदवारांना इंजिनीअरींग ( अभीयांत्रिकी/नॅव्हल आर्किटेक्चर) शाखेसाठी व (३)इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरींग पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना तांत्रीक पदासाठी पुढे नियुक्ती दिली जाते.

या चार वर्षाच्या अभ्यासक्रमाचा संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला जातो. यामध्ये  शीक्षण शुल्क, पुस्तके व इतर शैक्षणीक साहित्य, गणवेष, निवास, भोजन यांचा समावेश आहे.

हे प्रशीक्षण केरळ राज्यातील इंडियन नॅव्हल ॲकॅडेमी अझीमाला, येथे दिले जाते. यामध्ये शारीरीक प्रशीक्षणाचाही समावेश आहे. चार वर्षाचे प्रशीक्षण पूर्ण केल्यावर सब लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते. पुढे ॲडमिरल पदापर्यंत पदोन्नतीची संधी मिळू शकते.हे नौदलातील सवौच्च पद आहे.

अर्हता व पात्रता

या योजेनंतर्गत थेट प्रवेश दिला जात असला तरी, मुलींना इंडियन ‍इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या प्रवेशसाठी घेतली जाणारी जेईई (जॉईंट एंट्रस एक्झामीनेशन – मेन) ही परीक्षा द्यावी लागेल. जेईई-मेन परीक्षा अधीकाधीक मुलींनी द्यावी असे आवाहन नौदलाने विशेषत्वाने केले आहे. या विद्यार्थींनींना १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणीतात सरासरीने किमान ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. बारावी किंवा दहावीमध्ये  इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. जेईई-मेन गुणांच्याव्दारे वर्षातून दोनवेळा या योजनेतंर्गत प्रवेशासाठी संबधीत विद्यार्थीनी पात्र ठरु शकते. यासाठी सहा ते आठ महिन्यांच्या आधी सर्व महत्वाची वृत्तपत्रे व रोजगार समाचार या साप्ताहिकात जाहिरात दिली जाते.

निवड प्रक्रिया

जेईई-मेन मधील अखील भारतीय रँक नुसार एसएसबी (सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड – सेवा  निवड मंडळ)च्या मुलाखत व इतर चाचणीसाठी,या योजनेतंर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या निवडक विद्यार्थींनीना बोलावले जाते. त्यासाठी उपलब्ध जागा  व जेईई-मेन मधील अखील भारतीय क्रमांक या बाबींचा  विचार केला जातो. अंतिम गुणवत्ता यादी ही एसएसबी मुलाखत, विविध चाचणी व  वैद्यकीय पात्रतेनुसार केली जाते.

संपर्क https://www.joinindiannavy.gov.in

०००

नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी व नॅशनल नॅव्हल ॲकॅडेमी एक्झामिनेशनव्दारे नौदलासाठी मागील दोन वर्षापासून मुलींना निवडायला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. ही परीक्षा महाराष्ट्रातील औरंगाबाद, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर,पुणे या शहरांमध्ये घेतली जाते. भौतिकशास्त्र, गणीत व रसायनशास्त्र या विषयासह १२ वी उर्त्तीर्ण विद्यार्थीनी या परीक्षेला बसू शकतात. यंदा १२वीची परीक्षा  देणारी विद्यार्थीनी ही परीक्षा देऊ शकते. मात्र, आयोगाने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत बारावीचा निकाल लागायला हवा.

संपर्क- नॅव्हल हेडक्वार्टर्स,डायरोक्टोरेट ऑफ मॅनपॉवर ॲण्ड रिक्र्युटमेंट,ओआय ॲण्ड आर सेक्शन,रुम नंबर २०४,सीविंग,सेना भवन नवीदिल्ली ११००११, दूरध्वनी-०११-२३०१००९७

संकेतस्थळ- https://upsc.gov.in/examinations/active-exams

०००

पदवी नंतरच्या संधी

इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट(आयएनएटी)व्दारे नौदलासाठी अधीकाऱ्यांची निवड केली जाते. ही परीक्षा नौदलामार्फत घेतली जाते. या निवड प्रक्रियेव्दारे पदवी प्राप्त उमेदवारांना कायमस्वरुपी कमीशन व लघु सेवा सेवा  कमीशन दिलं जातं.

परीक्षेचे स्वरुप

ही संगणकाधारीत परीक्षा आहे. यामध्ये चार विभाग असतात. कालावधी दोन तासांचा असतो. परीक्षेमध्ये १०० गुणांचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. यात (१) इंग्रजी, (२) कार्यकारणभाव व सांख्यीकीय क्षमता (रिझनिंग व न्युमरीकल), (३) सामान्य विज्ञान व गणीतीय क्षमता, (४) सामान्य ज्ञानावर प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जातात. अचुक  उत्तराला एक गुण दिला जातो. तर  चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो.

या पेपरमधील चारही विभागात विशीष्ट गुण मिळाल्यासच एसएसबी मुलाखतीसाठी निवड केली जाते. या मुलाखती बेंगळुरु/ भोपाळ/ विशाखापट्टणम/ कोलकता येथे घेतल्या जातात. गुणवत्ता यादी तयार करताना ५० टक्के वेटेज  आयएनईटीला व ५० टक्के वेटेज एसएसबी मुलाखतीला दिलं जातं. वैद्यकीय चाळणीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर अंतिम निवड केली जाते.

या परीक्षेव्दारे (१) वैमानिक (मॅट्रिक रिक्य्रुट), (२) नॅव्हल एअर ऑपरेशन(विमान सेवा परिचालन/कार्यान्वयन)  (३) एअर ट्रॅफिक कंट्रोल (विमान वाहतूक नियंत्रण), (४) नॅव्हल  आर्किटेक्ट(नौदल वास्तुकला), (५) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान), (६)लॉजीस्टीक्स(साहित्य/माल पुरवठा), (७)एज्युकेशन (अध्यापन), (८)नॅव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर (अस्त्र आणि शस्त्रांची पाहणी/निरिक्षण/तपासणी),या पदांसाठी निवड होऊशकते.

विविध पदांसाठी अर्हता

() नॅव्हल आर्किटेक्चर- वयोमर्यादा साडेएकोणीस ते २५, बीई/बीटेक (मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा एरोनॉटिकल किंवा मेटलर्जी किंवा नॅव्हल आर्किटेक्चर यापैकी कोणत्याही एका विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी), () निरीक्षक-ऑब्झर्व्हर- कोणत्याही विषयातील बीई/बीटेक पदवी. १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे.

 () अध्यापन- अर्हता- द्वितीय श्रेणीतील भौतिकशास्त्र किंवा गणितातील पदव्युत्तर पदवी. भौतिकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवीस्तरावर गणिताचा आणि या गणित विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केलेला असावा. किंवा द्वितीय श्रेणीतील रसायनशास्त्र किवा इंग्रजी विषयातील पदवी. रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयाचा अभ्यास केलेला असावा. किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स किंवा टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी.किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा कॉम्‍प्युटर सायन्स याविषयातील पदव्युत्तर पदवी. उमदेवाराने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयाचा अभ्यास केलेला असावा. किंवा अर्थशास्त्र/ इतिहास/राज्यशास्त्र याविषयातील पदव्युत्तर पदवी. वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे.

 ()लॉजिस्टिक्स/वर्क्स- () लॉजिस्टिक्स सवंर्ग- अर्हता-प्रथम श्रेणीसह कोणत्याही विषयातील बीई/बीटेक किंवा प्रथम श्रेणीसह एमबीए किंवा प्रथम श्रेणीसह बीएस्सी /बीकॉम/बीएस्सी इन आयटी आणि पोस्ट गॅज्युएशन डिप्लोमा इन फायनांस/लॉजिस्टिक्स/सप्लाय चैन मॅनैजमेंट/मटेरिअल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणीसह मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /एमएस्सी इन आयटी  () वर्क सवंर्ग – अर्हता- सिव्हिल शाखेतील बीई/बीटेक/बी आर्किटेक्चर. ()कॅटरिंग संवर्ग- हॉटेल मॅनेजमेंट विषयातील एमएस्सी/एमबीए/ प्रथम श्रेणीसह बीएएस्सी किंवा आणि हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर पदविका. वयोमर्यादा साडे एकोणवीस ते २५ वर्षे

 

 () विधि संवर्ग- वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र ठरणारी विधि विषयातील पदवी आणि वयोमर्यादा २२ ते २७ वर्षे. () एअर ट्रॅफिक कंट्रोल-अर्हता- कोणत्याही विषयातील बीई/ बीटेक. १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा साडेएकोणवीस ते २५ वर्षे. () पायलट (वैमानिक)() सामान्य (जनरल)-अर्हता- कोणत्याही विषयातील बीई/बीटेक आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे. () कमर्शिअल- अर्हता- डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविशनचा मान्यताप्राप्त व सध्या कार्यरत असलेला कर्मशिअल वैमाननिक परवाना. वयोमर्यादा १९ ते २५ वर्षे.  ()  नॅव्हल आर्मामेंट इंस्पेक्शन – अर्हता- इलेक्ट्रिकल/ इलेक्टॉनिक्स/ मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ इंस्ट्रुमेंटेशन/आयटी/ केमिकल/ मेटलर्जी/ एरोस्पेस इंजिनीअरिंग या विषयातील पदवी. वयोमर्यादा साडे एकोणवीस ते २५ वर्षे.

००००

“एनसीसी सी” प्रमाणपत्रधारक बीई व बीटेक पदवीधारकांना प्रवेशाची सूचना कम्बाईंड  डिफेन्स सर्व्हीस परीक्षेसोबतच प्रकाशीत केली जाते. या गटातील उमेदवारांना लेखी परीक्षा देण्याची गरज नसते. या गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाते. वैद्यकीय चाळणी नंतर  अखील भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागेनुसार नियुक्ती  दिली जाते. दर वर्षी जानेवारी व जुलैमध्ये या गटातील अधीकाऱ्यांच्या प्रशीक्षणास  प्रारंभ होतो.( महिलांसाठी जागा उपलब्ध असल्यास जाहिरातीत तसे नमूद करण्यात येते.)

एसएसबी प्रक्रिया

यामध्ये उमदेवार  अधीकारी म्हणून कार्यरत होण्यास सक्षम आहे किंवा नाही याची चाचपणी केली जाते. संबधीत उमेदवाराकडे असणारे नियोजन व संस्थात्मक कौशल्य, सामाजिक स्वीकाराहार्यता, सामाजिक  परीणामकारकता, चैतन्यशीलता आदी गुणांची तपासणी केली जाते.

एसएसबी मुलाखती दोन टप्प्यात घेतली जाते. (१) टप्पा एक- बुध्दीमत्ता चाचणी, चित्र  आकलन व चर्चा चाचणी

(२) टप्पा दोन- मानसशास्त्रीय चाचणी,समूह चाचणी व मुलाखत. या दोन्ही टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना नंतर वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया तीन ते पाच दिवस चालू शकते.

शारीरिक क्षमतेची चाचणी

भरती प्रक्रियेत शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी महत्वाची ठरते. मौखिक चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. शारीरिक चाळणीत उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. त्यामुळे या घटकांसाठीची तयारी यंदा १२ वीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीशाखेला विद्यार्थींनींनी पहिल्यावर्षापासूनच करावी. शारीरिक क्षमतेसाठी ठरलेल्या निकषात बसण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहे, त्याकडे आतापासूनच लक्ष दिल्यास तशी सक्षमता पुढीच चार वर्षात उत्तमरीत्या प्राप्त होईल. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थींना मात्र शारीरिक क्षमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागेल. त्यासाठी त्यांना सुव्यवस्थित नियोजन करुन त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे ही सर्वात आवश्यक अर्हता असल्याने, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

लघु.सेवा कमिशनमध्ये प्रारंभी १० वर्षासाठी नियुक्ती दिली जाते. त्यानंतर दोन टप्प्यात प्रत्येकी दोन वर्षासाठी म्हणजे चार वर्षे वाढ मिळू शकते. यासाठी उमेदवाराचा आतापर्यंतची कामगिरी, सुदृढता आदी बाबींचा विचार केला जातो. या संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती केली जात नाही.

संपर्क https://www.joinindiannavy.gov.in

सुरेश वांदिले